‘हँड, फूट अँड माऊथ’ (हात, पाय आणि तोंड) या साथीच्या रोगावर आयुर्वेदातील प्राथमिक उपचार

Article also available in :

हाता-पायांवर पुरळ येणे, ताप आणि ताप गेल्यावर तोंडात वेदनादायक फोड येणे, ही लक्षणे असलेल्या साथीच्या रोगाला आधुनिक वैद्यकशास्त्रात ‘हँड, फूट अँड माऊथ’ रोग म्हणतात. या रोगावरील आयुर्वेदातील प्राथमिक उपचार येथे देत आहे.

 

१. आयुर्वेदातील दृष्टीकोन

पावसाळ्यात पाणी ‘अम्ल विपाकी’ बनते. संस्कृत भाषेमध्ये ‘अम्ल’ म्हणजे ‘आंबट’. ‘विपाक’ म्हणजे ‘पोटात जठराग्नीचे काम झाल्यावर अन्नाची पालटणारी चव’. ‘आपण जेवलेल्या अन्नावर जठराग्नीची प्रक्रिया झाल्यावर त्याची चव आणि गुणधर्मही पालटतात’ , असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे. पाणी अम्ल विपाकी झाल्याने पित्त वाढण्याकडे शरिराचा कल असतो. पावसाळ्यातील पाणी सूक्ष्म जंतूंनीही दूषित झालेले असते. सततच्या पावसाने अग्नी (पचनशक्ती) मंद झालेला असतो. त्यामुळे पावसाळ्यात रोगांची साथ पटकन पसरते. ‘अंगावर पुरळ उठणे’, हे पित्त वाढल्याचे, तर ताप हे अग्नी मंद होऊन अन्नपचन नीट होत नसल्याचे लक्षण आहे.

वैद्य मेघराज पराडकर

 

२. आयुर्वेदानुसार प्राथमिक उपचार

२ अ. अडुळशाचा रस

७ दिवस सकाळी आणि सायंकाळी १ चमचा अडुळसा किंवा कडूनिंब यांच्या पानांचा रस द्यावा. ताप नसल्यास हा रस पाव चमचा तुपात मिसळून द्यावा. ताप असल्यास नुसताच द्यावा. रस काढण्यापूर्वी पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत.

२ अ १. अडुळशाचा रस काढण्याची पद्धत

नुसतीच पाने कुटल्यास अडुळशाचा रस निघत नाही. रस काढण्यासाठी अडुळशाचे पान तव्यावर किंचित गरम करावे लागते. एखादे पान थोडे गरम करून घ्यावे. मग ते खलबत्त्यात कुटून त्याचा रस काढावा. थोडे पाणी घातल्यास रस सहज येतो. हा रस घरातील सर्वांनीच थोडा थोडा घेतल्यास चालतो; पण तो ७ दिवसच घ्यावा. तापाच्या साथींमध्ये साथ रोखण्यासाठी अडुळशाचा पुष्कळ चांगला उपयोग होतो. पूर्वीच्या काळात ‘देवी’ या रोगाची साथ रोखण्यासाठी वैद्य अडुळसा आणि ज्येष्ठमध यांचा काढा देत असत.

२ अ २. अडुळशाच्या रसाला पर्याय

सनातनचे ‘वासा (अडुळसा) चूर्ण’ही उपलब्ध आहे. रस मिळणे शक्य नसेल, तेव्हा हे पाव चमचा चूर्ण थोड्याशा पाण्यात मिसळून द्यावे.

२ अ ३. तीन वर्षांच्या खालील मुलांसाठीचे प्रमाण

रस किंवा चूर्ण वरील प्रमाणाच्या अर्ध्या प्रमाणात द्यावे.

२ आ. अंघोळीसाठी औषधी पाणी

लहान मुलांच्या अंघोळीच्या गरम पाण्यात कडूनिंब किंवा अडुळसा यांची पाने घालावीत.

 

३. आहार

३ अ. खायला काय द्यावे ?

ताप असतांना लहान मुलांना भूक लागलेली नसल्यास खायला देऊ नये. अधेमधे कोमट पाणी प्यायला द्यावे. मूल जेव्हा खायला मागेल, तेव्हा त्याला थोडेसे मुगाच्या किंवा तुरीच्या डाळीचे वरण किंवा कढण कोमटसर असतांना पाजावे. मूग किंवा तूर पित्त न्यून करतात. थोडी भूक बाकी राहू द्यावी. पोटभर आहार देऊ नये. नंतर जेव्हा भूक लागेल, तेव्हा जेवणाची वेळ झाल्यास वरणभात आणि अवेळी भूक लागल्यास मुगाच्या डाळीचे पातळ पदार्थ द्यावेत. पूर्ण बरे वाटू लागल्यावरच नेहमीचा आहार चालू करावा.

३ आ. दृष्टीकोन

आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार ताप असतांना शरिराची रोगप्रतिकारक संस्था सूक्ष्म जंतूंशी झगडत असते. अशा वेळी नेहमीसारखा आहार घेतल्यास तो पचवण्यासाठी शरिराला जे श्रम होतात, त्यांमुळे रोगाशी झगडण्यासाठी शरिराची शक्ती पुरत नाही. यासाठी आयुर्वेदामध्ये ताप आल्यास ‘लंघन’, म्हणजे ‘काही न खाता-पिता उपवास’ करण्यास सांगितले आहे. उपवास केल्यावर लगेच नेहमीचा आहार घेऊ नये. पचण्यास हलक्या आहारापासून आरंभ करून क्रमाक्रमाने आहार वाढवावा.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.८.२०२२)

Leave a Comment