हृदय आणि श्वसनसंस्था यांना बळ देणारी आयुर्वेदातील काही प्रसिद्ध औषधे

Article also available in :

वैद्य मेघराज पराडकर

 

१. लक्ष्मीविलास रस

हे हृदयाला उत्तेजना देणारे औषध आहे. नाडीचे ठोके क्षीण झाले असतांना या औषधाच्या सेवनाने ते पूर्ववत् होण्यास साहाय्य होते. याच्या सेवनाने रक्तवाहिन्या विस्फारित होतात आणि हृदयाची संकोच अन् विकास ही कामे सुरळीत होण्यास साहाय्य होते. हे औषध वैद्यांच्या समादेशानेच (सल्ल्यानेच) घ्यावे. तात्कालिक (त्या वेळेपुरते) औषध घ्यायचे झाल्यास एका गोळीचे चूर्ण थोड्या मधात मिसळून चघळून खावे. अन्य वेळी १५ दिवस ते १ मास सकाळ – सायंकाळ एकेका गोळीचे चूर्ण थोड्या मधात मिसळून चघळून खावे.

१ अ. श्वसनसंस्था आणि रक्ताभिसरण संस्था यांचे विकार

श्वसनसंस्था आणि हृदय यांना बळ देण्यासाठी या औषधाचा चांगला उपयोग होतो. जीव गुदमरल्यासारखा होणे, वारंवार घबराट होणे, छातीत धडधडणे या हृदयाशी संबंधित विशिष्ट लक्षणांमध्ये या औषधाचा उपयोग होतो.

१ आ. उलट्या आणि अतीसार (जुलाब)

यामध्ये नाडीचे ठोके क्षीण झाले असतांना याचा उपयोग करावा.

१ इ. आंत्रिक ज्वर (टायफॉईड)

आंत्रांतील (आतड्यांतील) विषारे नाहीसे होण्यासाठी या औषधाचा उपयोग होतो. तापामुळे आलेली क्षीणता या औषधाच्या सेवनाने दूर होण्यास साहाय्य होते.

१ ई. डोकेदुखी

एकसारख्या कळा येत रहाणे; कपाळ, भुवया, मान आणि पाठ यांतून चमका निघणे; शेकल्याने बरे वाटणे आणि थंड वार्‍याने वेदना वाढणे अशी विशिष्ट लक्षणे असलेल्या डोकेदुखीमध्ये या औषधाचा उपयोग होतो.

 

२. प्रभाकर वटी

हृदयाला बळ देणारे हे औषध आहे. हे ‘छातीत धडधडणे’, या लक्षणावर उपयुक्त आहे. हृदयाच्या विकारांमध्ये हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. कोरोनासारख्या साथीच्या तापानंतर हृदयाला आलेला अशक्तपणा याच्या सेवनाने दूर होण्यास साहाय्य होते. १५ दिवस ते १ मास एकेका गोळीचे चूर्ण दिवसाला २ वेळा मधासह चघळून खावे. औषध वैद्यांच्या समादेशानेच (सल्ल्यानेच) घ्यावे.

औषधे स्वतःच्या मनाने न घेता वैद्यांच्या मार्गदर्शनानुसारच घ्यायला हवीत; परंतु काही वेळा वैद्यांकडे लगेच जाता येण्यासारखी स्थिती नसते. काही वेळा वैद्यांकडे जाईपर्यंत लगेच औषध मिळणे आवश्यक असते, तर काही वेळा थोडेफार औषध केल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. त्यामुळे ‘प्राथमिक उपचार’ म्हणून येथे आयुर्वेदातील काही औषधे दिली आहेत. औषधे घेऊन बरे न वाटल्यास आजार अंगावर न काढता स्थानिक वैद्यांना भेटावे.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.७.२०२२)

साधकांना सूचना

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी साधकांनी काही आयुर्वेदाची औषधे विकत घेऊन ठेवली होती. या औषधांची सविस्तर माहिती १० ते १२ जुलै, तसेच २१ जुलै २०२२ पासून आजपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखांत दिली आहे. साधकांनी हे लेख संग्रही ठेवावेत.

Leave a Comment