नातेवाईकांनी मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मर्त्यलोकात न अडकता, त्याला सद्गती मिळून तो पुढच्या लोकांत जाऊ शकतो. यामुळे त्याच्याकडून (पूर्वजांकडून) कुटुंबियांना त्रास होण्याची, तसेच असा लिंगदेह वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाण्याची शक्यताही घटते.
या लेखात आरंभीचे क्रियाकर्म, क्रियाकर्म कोणी करावे, क्षौरविधी, दहनविधीची सिद्धता, अंत्ययात्रा इत्यादींविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
अनुक्रमणिका
१. व्यक्ती मृत झाल्यानंतर १३ व्या दिवसापर्यंत करायच्या महत्त्वाच्या कृती
व्यक्ती मृत झाल्यानंतर धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तिचे क्रियाकर्म पुरोहितांकडून करून घ्यावे. बहुतेक ठिकाणी अंत्यसंस्कारांविषयी ज्ञान असणारे पुरोहित लगेच मिळणे कठीण असते. अशा वेळी पुरोहित येईपर्यंत पुढीलपैकी काही कृती करता येतील. अन्य कृती करण्याविषयी पुरोहित मार्गदर्शन करतीलच; पण आपल्यालाही ‘त्या कृती नेमक्या कशा कराव्यात ?’, हे लेख वाचून आधीच ठाऊक होईल आणि त्या त्या वेळी ती ती कृती करणे अधिक सोपे जाईल. यांपैकी काही कृतींमध्ये पाठभेद, तसेच प्रांतांनुसार / परंपरांनुसार भेद असू शकतात. जेथे असे भेद आढळतील, तेथे आपल्या पुरोहितांचा समादेश (सल्ला) घ्यावा.
१ अ. व्यक्ती मृत झाल्यावर आरंभी करायच्या कृती
१ अ १. मृताला भूमीवर ठेवणे : मृत्यूपूर्वी व्यक्तीला भूमीवर ठेवले नसल्यास मृत्यू झाल्यानंतर लगेच मृतदेहाला भूमीवर ठेवावे. यासाठी मरणासन्न व्यक्तीच्या संदर्भात करायच्या कृती या लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे कृती कराव्यात. मृत्यूपूर्वी व्यक्तीला दक्षिण दिशेला डोके करून झोपवणे अपेक्षित असले, तरी मृत्यूनंतर मात्र मृतदेहाला ठेवतांना त्याचे पाय संबंधित प्रांतातील पद्धतीनुसार दक्षिणेकडे, उत्तरेकडे किंवा पश्चिमेकडे करावेत.

१ अ २. मृताच्या तोंडात गंगाजल घालणे : मृताच्या तोंडात शक्य असल्यास गंगाजल घालावे आणि त्याचे तोंड बंद करावे.
१ अ ३. मृताच्या तोंडावर, तसेच नाक आणि कान यांत तुळस ठेवणे : मृताच्या तोंडावर तुळशीपत्र ठेवावे. त्याचे कान आणि नाक यांत तुळशीच्या पानांचे तुरे ठेवून ते बंद करावेत. वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असेल, तर तोंड, कान आणि नाक यांत तुळशीपत्र ठेवण्यापूर्वी कापूस घालावा.
१ अ ४. मृताचे शरीर सरळ करून त्याच्या हाता-पायांचे अंगठे बांधणे : मृताचे हात-पाय आणि मान सरळ करावी. डोळे बंद करावेत. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना बांधावेत. दोन्ही हात शरिराच्या पुढील बाजूला घेऊन त्यांचे अंगठे एकत्र बांधावेत. मृत्यूनंतर काही काळाने शरीर घट्ट होत असल्यामुळे नंतर हे करणे कठीण असते. (या कृतीचा उल्लेख धर्मग्रंथात आढळत नाही. ही एक व्यावहारिक कृती आहे.)
१ अ ५. मृताच्या सभोवती थोडेसे अंतर ठेवून अप्रदक्षिणा मार्गाने (घड्याळाच्या काट्यांच्या उलट दिशेने) भस्म किंवा विभूती घालावी !
१ अ ६. मृताच्या डोक्याजवळ तेलाचा दिवा लावणे : कुटुंबातील व्यक्ती मृत झाल्यास लगेच घरात तेलाचा दिवा लावण्याची परंपरा प्रचलित आहे. (मात्र धर्मशास्त्रानुसार दिवा लावणे बंधनकारक नाही.) मृतदेहाच्या डोक्यापासून काही अंतरावर भिजवलेल्या कणकेच्या (गव्हाच्या पिठाच्या) गोलावर केवळ एकच वात असलेला तेलाचा दिवा लावावा. या दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे करावी.
१ अ ७. कुटुंबियांनी प्रार्थना आणि नामजप करत सर्व क्रियाकर्म करणे : कुटुंबियांनी मृत व्यक्तीच्या लिंगदेहाचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी मधूनमधून दत्ताला प्रार्थना करावी – ‘हे दत्तात्रेया, …(मृत व्यक्तीचे नाव घ्यावे) यांच्या लिंगदेहाभोवती तुझे संरक्षककवच सतत असू दे. त्यांना पुढची पुढची गती मिळू दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !’
‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करीत पुढील सर्व क्रियाकर्म करावे.
१ अ ८. मृतदेहाच्या जवळ ध्वनीमुद्रकावर दत्ताचा नामजप लावून ठेवणे : सात्त्विक आवाजातील दत्ताचा नामजप https://www.sanatan.org/mr/audio-gallery या ‘लिंक’वरील ‘श्राव्य दालना’मध्ये उपलब्ध आहे.
१ अ ९. क्रियाकर्माच्या साहित्याची सिद्धता करणे
१. कर्त्याला परिधान करण्यासाठी कोरे (नवे) धोतर;
२. मृतदेहाला लावण्यासाठी तुळशीच्या मुळातील माती, भस्म किंवा विभूती आणि गोपीचंदन;
३. मृतदेह झाकण्यासाठी पांढरे कापड (मृतदेह झाकल्यानंतर त्या पांढर्या कापडाचा एक चतुर्थांश भाग कर्त्याला उपरणे म्हणून वापरण्यासाठी शेष रहायला हवा.);
४. १ वाटी दही आणि १ वाटी तूप यांचे मिश्रण;
५. १ वाटी पंचगव्य (गोमूत्र, गोमय, दूध, दही आणि तूप यांचे मिश्रण);
६. सातूच्या / तांदुळाच्या पिठाचे ७ गोळे;
७. २५० ग्रॅम काळे तीळ;
८. ५०० ग्रॅम तूप;
९. तीळ, फुले आदी साहित्य ठेवण्यासाठी ४ – ५ पत्रावळी, ८ – ९ द्रोण;
१०. कर्ता आणि पुरोहित यांना बसण्यासाठी प्रत्येकी १ आसन;
११. पळी-पंचपात्री, तांब्या आणि ताम्हण;
१२. तिरडीसाठी बांबू (यांची लांबी आणि संख्या स्थानिक परंपरेनुसार ठरवावी);
१३. तिरडी बांधण्यासाठी सुंभ, म्हणजे काथ्याची दोरी (साधारण एक किलो) आणि कोयती;
१४. अग्नी नेण्यासाठी एक लहान मडके, तसेच गोवर्या, लाकडाचे लहान तुकडे, फुंकणी आणि काड्यापेटी;
१५. एक मोठे मडके आणि पाणी;
१६. मृतदेहाला घालण्यासाठी काळ्या वाळ्याच्या मुळांचा हार (शक्य असल्यास) आणि जास्वंदीच्या फुलांचा हार (शक्य असल्यास);
१७. मृतदेहाला घालण्यासाठी तुळशीचा हार, नातेवाइकांच्या संख्येनुसार आवश्यक तितके फुलांचे हार, पांढरी फुले, झेंडूची फुले, ५ – १० तुळशीचे तुरे;
१८. मृतदेहाच्या अवयवांवर ठेवण्यासाठी ७ आणि चितेखाली ठेवण्यासाठी १, असे एकूण ८ सोन्याचे तुकडे (शक्य असल्यास);
१९. शेवाळ;
२०. शमीची लहानशी फांदी;
२१. दर्भ (हे पुरोहित घेऊन येतात. मृत व्यक्तीच्या देश-कालानुसार ‘किती दर्भ वापरावेत ?’, हे ठरते);
२२. चिता रचण्यासाठी आंबा, फणस इत्यादी झाडांची लाकडे, तसेच शेण्या (गोवर्या);
२३. चिता चांगली प्रज्वलित होण्यासाठी तिळाचे तेल, खोबरेल तेल, नैसर्गिक घटकांपासून सिद्ध केलेले अन्य तेल किंवा तूप (साधारण ४ – ५ लि.);
२४. १०० ग्रॅम कापूर; २५. गंगाजल (५-१० मि.ली.).
१ आ. मृत व्यक्तीचे क्रियाकर्म कोणी करावे ?
मृताला अग्नी देण्यापासून कार्य समाप्तीपर्यंतचे विधी करण्याचा अधिकार मृत व्यक्तीच्या मोठ्या मुलाला आहे. काही अपरिहार्य कारणामुळे मोठा मुलगा क्रियाकर्म करू शकत नसेल, तर सर्वांत धाकट्या मुलाने क्रियाकर्म करावे. तोही नसेल, तर अनुक्रमे मधला कोणताही मुलगा, जावई किंवा अन्य आप्तेष्ट यांना क्रियाकर्म करता येते. क्रियाकर्म करणार्या पुरुषाला ‘कर्ता’ म्हणतात.
अविवाहित पुरुष / स्त्री, तसेच निपुत्रिक व्यक्ती आदींचे क्रियाकर्म अनुक्रमे त्यांचा पाठचा भाऊ, वडील किंवा मोठा भाऊ, नाहीतर आप्तेष्ट यांना करता येते.
१ आ १. पुरुषांनी क्षौर करणे आणि नखे कापणे
१ आ २. कर्त्याने स्नान करून कोरे वस्त्र, उदा. धोतर नेसावे, तसेच अंगावर उपरणे घेऊ नये !
१ आ ३. मृताला अंघोळ घालणे
१ आ ४. मृताला नवीन वस्त्रे घालणे
१ आ ५. मृताला अनुलेपन करणे : वास्तविक स्नानानंतर तुळशीच्या मुळातील मातीचे (भस्म, चंदन यांच्याप्रमाणे) सर्वांगाला अनुलेपन करावे.
१ आ ६. मृताच्या गळ्यात हार घालणे
१ आ ७. मृताला पांढर्या वस्त्राने झाकणे
२. हे टाळा !
अ. व्यक्ती मृत झाल्यावर तिच्या नावाने किंवा आठवणीने आक्रोश करणे, ऊर बडवणे यांसारख्या कृती करू नयेत. मृत व्यक्तीला पुढची गती मिळण्यासाठी मृत्यूनंतरचे क्रियाकर्म करायचे असते. नातेवाइकांनी आक्रोश करण्यासारख्या कृती केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह नातेवाइकांच्या भावनांमध्ये अडकू शकतो. यामुळे त्याला पुढची गती मिळण्यास अडथळा येऊ शकतो.
आ. बर्याच ठिकाणी पती मृत झाल्यास पत्नीने मंगळसूत्रातील मुहूर्तमणी, तसेच सोन्याच्या तारेत गुंफलेले काळे मणी वेगळे करून ते पतीच्या मृतदेहासमवेत चितेवर ठेवण्यासाठी देण्याची पद्धत आहे. अशा वेळी मंगळसूत्रातील अन्य सुवर्ण अन् सौभाग्यालंकार काढून सुरक्षित ठेवले जातात. याविषयी आपल्या प्रांतातील पद्धतीनुसार करावे.
इ. मृतदेहाला कोणीही अनावश्यक स्पर्श करू नये.
३. पुढीलपैकी एखाद्या गटात मोडणार्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास तिचे अंत्यसंस्कार पुरोहितांना विचारून करावेत.
अ. ३ वर्षांपेक्षा अल्प वयाची मुले
आ. रजस्वला अवस्थेत मृत झालेल्या स्त्रिया
इ. अविवाहित स्त्रिया किंवा पुरुष
ई. संन्यासी
उ. मृतदेह छिन्नविच्छिन्न झालेल्या व्यक्ती
ऊ. पूर, वणवा इत्यादी दुर्घटनांमध्ये मृत झालेल्या; परंतु मृतदेह विधीसाठी उपलब्ध न झालेल्या व्यक्ती
ए. वरील परिस्थितींव्यतिरिक्त अन्य कोणत्याही असाधारण स्थितीत मृत्यू झालेल्या व्यक्ती
४. अंत्ययात्रेची पूर्वसिद्धता
४ अ. तिरडी बांधणे : तिरडीसाठी बांबू वापरण्याचा प्रघात आहे. असे असले तरी बांबू वापरण्याविषयी धर्मग्रंथांत उल्लेख आढळत नाही. अर्थात् तिरडीसाठी अन्य लाकडाचाही वापर करू शकतो.
४ आ. अग्नी असलेले मडके ठेवण्यासाठी कामट्यांचा विशिष्ट त्रिकोण बांधणे : अग्नी ठेवलेले मडके घेऊन जाण्यासाठी बांबू (किंवा अन्य लाकूड) चिरून त्याच्या तीन कामट्या काढाव्यात. अग्नीचे मडके मावेल, एवढ्या त्रिकोणी आकारात त्या बांधाव्यात.
४ इ. मृताने शेवटच्या दिवशी वापरलेले कपडे आणि अंथरूण-पांघरूण एकत्रित करणे : हे साहित्य स्थानिक परंपरेनुसार चितेत ठेवत असल्यास ते अंत्ययात्रेसमवेत घ्यावे. एखाद्या प्रांतात अन्य परंपरा (उदा. असे साहित्य दान करणे) असल्यास त्याप्रमाणे करावे.
४ ई. अग्नी प्रज्वलित करणे : कर्त्याने गोवर्या, कापूर इत्यादींचा उपयोग करत पुरोहिताच्या साहाय्याने विधीवत् अग्नी प्रज्वलित करावा. प्रज्वलित केलेला अग्नी लहान मडक्यात ठेवावा.
४ उ. मृताला तिरडीवर ठेवणे : पांढर्या वस्त्राने आच्छादलेला मृतदेह पूर्वेला डोके आणि पश्चिमेला पाय करून तिरडीवर ठेवावा. मृतदेह तिरडीच्या कामट्यांना शिल्लक राहिलेल्या सुंभाच्या साहाय्याने तिरडीला बांधावा.
५. अंत्ययात्रा काढणे
१. स्मशानात जातांना अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्या कोणत्याही व्यक्तीने अग्नी पेटवलेले मडके स्वतःच्या उजव्या हातात घ्यावे आणि तिरडीच्या पुढे चालावे. अंत्ययात्रेत ‘पुढे अग्नी असलेले मडके घेतलेली व्यक्ती आणि तिच्यामागे तिरडी’, असे असावे. अग्नी आणि तिरडी यांच्या मध्ये कोणीही असू नये. सर्वांनी तिरडीच्या मागून जावे.
२. कर्त्याने तिरडीला खांदा द्यावा. त्याच्यासह अन्य कुटुंबियांनी, नातेवाइकांनी आणि तेही उपस्थित नसल्यास शेजार्यांनी तिरडीला खांदा द्यावा. तिरडीला एका वेळी चौघांनी खांदा द्यावा.
३. अंत्ययात्रेमध्ये मृतदेहाचे डोके पुढील दिशेस करावे.
४. अंत्ययात्रेतील कोणत्याही व्यक्तीने पाण्याने भरलेले मडके घ्यावे.
५. अंत्ययात्रा स्मशानात पोचेपर्यंत सर्वांनी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ किंवा ‘नारायण’ हा नामजप मोठ्याने करणे योग्य असले, तरी अध्यात्मशास्त्रदृष्ट्या ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप मोठ्याने करणे अधिक योग्य असल्याने तो करावा. दत्ताचा नामजप करणे अधिक योग्य असले, तरी आपापल्या श्रद्धेनुसार श्रीराम किंवा नारायण यांचा नामजप केला तरी चालेल.
६. अंत्ययात्रा अर्ध्या वाटेवर पोचल्यावर तिरडी खाली ठेवावी.
७. कर्त्याने पुरोहितांच्या सांगण्यानुसार पिंड देण्याचा विधी करावा.
८. त्यानंतर तिरडी पुन्हा खांद्यावर घेतांना खांदेकर्यांनी खांदे पालटावेत. याचा अर्थ, तिरडी खाली ठेवण्यापूर्वी ज्या २ खांदेकर्यांनी ती डाव्या खांद्यावर घेतली होती, त्यांनी पुन्हा खांद्यावर घेतांना ती उजव्या खांद्यावर घ्यावी. अन्य दोघांनीही त्यांच्या खांद्यांमध्ये असाच पालट करावा. मग तिरडी पुढे न्यावी.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर १३ व्या दिवसापर्यंत करावयाच्या उर्वरित महत्त्वाच्या कृतींविषयीची सविस्तर माहिती वाचण्यासाठी पहा, ‘मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म (भाग २)’