लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा, ‘मृत्यूनंतर करण्यात येणारे क्रियाकर्म : भाग १’ !
अनुक्रमणिका
मृत्यूनंतरचे क्रियाकर्म हे श्रद्धापूर्वक आणि विधीवत केल्यास मृत व्यक्तीचा लिंगदेह भूलोकात किंवा मृत्युलोकात न अडकता, त्याला सदगती मिळून तो पुढच्या लोकांत जाऊ शकतो. यामुळे त्याच्याकडून (पूर्वजांकडून) कुटुंबियांना त्रास होण्याची, तसेच असा लिंगदेह वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाण्याची शक्यताही घटते.
६. मृतदेहाला अग्नी देणे (दहनविधी)

६ अ. दहनसंस्कार विद्युत्दाहिनीत न करता चितेला अग्नी देऊन विधीवत् करावा ! : विधीवत् दहनसंस्कारासाठी स्मशानभूमी उपलब्ध नसल्यास दत्तगुरूंना प्रार्थना करून आपली अडचण सांगावी आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप करत विद्युत्दाहिनीद्वारे दहनसंस्कार करावा. अधिक माहिती वाचा.. पार्थिवाचे पारंपरिक पद्धतीने दहनसंस्कार न करता सीएन्जी किंवा विद्युत शवदाहिनीचा वापर करणे योग्य आहे का ?
६ आ. मृतदेह चितेवर ठेवणे
अ. स्मशानात पोचल्यावर तिरडीसह मृतदेह चितेवर ठेवतांना मृताचे पाय उत्तर दिशेला आणि डोके दक्षिण दिशेला येईल, असे करावे.
आ. तिरडीचे सर्व सुंभ आणि बांबू (किंवा अन्य लाकडे) सोडवावीत. या दोन्ही साहित्याची विल्हेवाट स्थानिक परंपरेनुसार लावावी.
इ. मृतदेहाच्या हाता-पायांचे अंगठे सोडवावेत.
६ इ. चिता प्रज्वलित करण्यापूर्वीचे विधी
अ. मृत व्यक्तीचे अनुक्रमे मुख, दोन्ही नाकपुड्या, डोळे अन् दोन्ही कान यांत सोन्याचे तुकडे घालावेत / ठेवावेत. सोन्याचे तुकडे नसल्यास तुपाचे थेंब घालावेत.
आ. पुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे मंत्रोच्चार करत तुपाच्या काही आहुती द्याव्यात.
इ. मृत व्यक्तीचे कपाळ, मुख, दोन्ही बाहू अन् छाती या ठिकाणी सातूच्या / तांदूळाच्या पिठाचे गोळे ठेवावेत. प्रत्येक गोळ्यावर तूप घालावे.
ई. काही प्रांतांत अंत्ययात्रेला आलेले लोक मृतदेहावर चंदनकाष्ठ वा अन्य लाकूड, उदबत्ती किंवा कापूर ठेवतात. ही कृती धर्मशास्त्रात सांगितलेली नसून ती लौकिक पद्धत आहे.
६ ई. चितेला अग्नी देणे
अ. कर्त्याने मडक्यातून आणलेल्या अग्नीच्या साहाय्याने पुरोहितांच्या सांगण्यानुसार चितेला मंत्रोच्चारासह अग्नी द्यावा.
आ. प्रथम मृतदेहाच्या (पुरुष असल्यास) डोक्याकडे किंवा (स्त्री असल्यास) पायांकडे आणि त्यानंतर अप्रदक्षिणेने (घड्याळाच्या काट्यांच्या उलट्या दिशेने) फिरत चारही अंगांनी (बाजूंनी) चिता प्रज्वलित करावी. त्यासाठी आणलेल्या अग्नीवर एखादी माडाची झावळी पेटवून घ्यावी.
इ. चिता चांगली पेटण्यासाठी ‘टायर’, ‘रॉकेल’ यांसारख्या रासायनिक वस्तू वापरू नयेत. त्याऐवजी तिळाचे तेल, खोबरेल तेल, तूप आदी वस्तू (जिन्नस) वापराव्यात.
ई. शक्यतो चितेचा धूर आपल्या अंगाला लागू देऊ नये.
उ. मृतदेहाचा कपाळमोक्ष झाल्यानंतर (कवटी फुटल्याचा ध्वनी ऐकू आल्यानंतर) कर्त्याने खांद्यावर पाण्याचे मडके घेऊन मृत व्यक्तीच्या पायांकडे दक्षिण दिशेला तोंड करून उभे रहावे. दुसर्या कोणत्याही पुरुषाने कर्त्याच्या मागे उभे राहून स्मशानातीलच लहान दगडाने (या दगडाला ‘अश्मा’ म्हणतात) त्या मडक्याच्या गळ्याच्या खाली एक भोक पाडावे. कर्त्याने मडक्यातील पाणी सांडवित चितेभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पहिली प्रदक्षिणा (अप्रदक्षिणा) घालावी. नंतर परत मडक्याला पहिल्या भोकाच्या खाली दुसरे भोक पाडावे. यानंतर कर्त्याने आधीसारखीच दुसरी अप्रदक्षिणा घालावी. मग परत मडक्याला दुसर्या भोकाच्या खाली तिसरे भोक पाडावे आणि कर्त्याने आधीसारखीच तिसरी अप्रदक्षिणा घालावी. तिसर्या अप्रदक्षिणेनंतर मृत व्यक्ती पुरुष असल्यास त्याच्या डोक्याकडे मृतदेहाला पाठ करून आणि मृत व्यक्ती स्त्री असल्यास तिच्या पायांकडे मृतदेहाला पाठ करून कर्त्याने उभे रहावे अन् मागे न पहाता मडके खांद्यावरून मागच्या अंगाला टाकून फोडावे.
ऊ. मडक्याला भोक पाडण्यासाठी वापरलेला अश्मा कर्त्याने आठवणीने घरी आणावा.
७. दहनविधीनंतर करायच्या कृती
७ अ. धर्मशास्त्राने सांगितलेली पद्धत
अ. दहनविधीनंतर लगेचच नदी, तलाव किंवा विहीर येथे नामजप करत कर्त्यासह कुटुंबियांनीही स्नान करावे.
आ. कुटुंबियांनी पुरोहितांच्या सांगण्यानुसार अश्म्यावर तिलांजली द्यावी. ज्यांचे वडील विद्यमान आहेत, अशांनी तिलांजली देऊ नये.
इ. स्मशानातून घरी आल्यावर आधी अश्मा घराबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
ई. स्मशानातून परतलेल्यांनी घरात प्रवेश करण्याआधी कडुनिंबाचे पान चावून थुंकून टाकावे; गिळू नये. मग आचमन करून पाषाण, गोमय, अक्षता, दूर्वा, वृषभ, पांढरी मोहरी यांपैकी जे उपलब्ध असेल, त्याला उजव्या हाताने स्पर्श करावा. त्यानंतर घराच्या प्रवेशद्वारात असलेल्या दगडावर किंवा घराचा उंबरठा दगडी असल्यास उंबरठ्यावर प्रथम उजवा पाय ठेवावा. नंतर उजवा पाय घराच्या आत ठेवून हळूहळू घरात प्रवेश करावा. घराच्या प्रवेशद्वारात दगड नसल्यास किंवा घराचा उंबरठा दगडी नसल्यास प्रथम उजवा पाय घराच्या आत ठेवून थेट घरात प्रवेश करावा.
७ आ. धर्मशास्त्रानुसार बाहेर स्नान करणे शक्य नसल्यास आचरायची पद्धत
अ. कुटुंबियांनी पुरोहितांच्या सांगण्यानुसार अश्म्यावर तिलांजली द्यावी. ज्यांचे वडील विद्यमान आहेत, अशांनी तिलांजली देऊ नये.
आ. अश्मा घराबाहेर सुरक्षित ठिकाणी ठेवावा.
इ. घरात प्रवेश करण्याआधी प्रत्येकाने स्वतःवर गोमूत्र किंवा गोमूत्र-अर्क मिश्रित जल शिंपडून शुद्धी करावी.
ई. घरात अन्य कुठेही स्पर्श न करता ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करत स्नान करावे.
उ. कडुनिंबाचे पान चावून थुंकून टाकावे; गिळू नये.
ऊ. मग आचमन करून पाषाण, गोमय, अक्षता, दूर्वा, वृषभ, पांढरी मोहरी यांपैकी जे उपलब्ध असेल, त्याला उजव्या हाताने स्पर्श करावा.
८. दहनविधीच्या दिवशीचे जेवण कोणी शिजवावे आणि ते कसे असावे ?
मृत व्यक्तीच्या घरातील सदस्यांनी अन्य कुळातील शेजारच्या किंवा स्नेह्यांच्या घरी शिजवलेले अन्न (उदा. भात-पिठले, डाळ-तांदुळाची खिचडी, भाकरी यांसारखे साधे पदार्थ) जेवावे. ते शक्य नसेल, तर घरात अन्य कुळातील स्त्रीकडून अन्न शिजवून घ्यावे. परिस्थितीनुरूप अन्न बाहेरून विकत आणले, तरी चालते; मात्र मृत व्यक्तीच्या घरात त्याच्या कुळातील कोणीही अन्न शिजवू नये.
९. अस्थीसंचय (अस्थी गोळा करणे)
१. दहनसंस्काराच्या दिवशी किंवा त्याच्या दुसर्या, तिसर्या, चौथ्या, सातव्या अथवा नवव्या दिवशी अस्थी गोळा कराव्यात.
२. द्विपाद, त्रिपाद, तसेच कर्त्याचे जन्मनक्षत्र या नक्षत्रांच्या दिवशी अस्थी गोळा करू नयेत.
३. शक्य असल्यास रविवार, मंगळवार आणि शनिवार हे वार टाळावेत.
४. शक्य असल्यास प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशी या तिथी टाळाव्यात.
यात काही अडचणी असल्यास पुरोहितांना विचारून निर्णय घ्यावा.
१०. अस्थीविसर्जन
अस्थीसंचय केल्यानंतर त्याच दिवशी किंवा व्यक्ती मृत झाल्यावर दहा दिवसांच्या आत अथवा दहाव्या दिवशी तिच्या अस्थींचे विसर्जन वहात्या पाण्यात करावे. (तोपर्यंत ‘अस्थी कुठे ठेवायच्या ?’, हे पुरोहितांना विचारावे.)
काही कारणाने दहाव्या दिवसानंतर अस्थीविसर्जन करायचे असल्यास त्यासाठी योग्य दिवस आणि त्यानुसार आवश्यक विधी पुरोहितांना विचारून त्याप्रमाणे करावेत.
११. पिंडदान करणे
१. धर्मशास्त्रानुसार पहिल्या दिवसापासून १० व्या दिवसापर्यंत प्रतिदिन तिलांजली, पिंडदान, तसेच विषम दिवशी विषम श्राद्ध करावे. ‘पिंडदान कुठे करावे ?’, हे ‘कोण मृत झाले आहे ? कोणत्या प्रकारचे श्राद्ध आहे ? श्राद्धाची कोणती पद्धत वापरली आहे ?’ आदींनुसार ठरते. अंत्येष्टीचे पिंडदान साधारणतः तीर्थक्षेत्री, नदीच्या काठी, घाटावर, स्मशानात किंवा घराच्या बाहेर केले जाते.
१० व्या दिवशी केल्या जाणार्या पिंडदान विधीमध्ये वायस पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे समजले जाते.
पुरोहितांच्या अनुपलब्धतेमुळे, कर्त्याच्या वयोमानानुसार किंवा अन्य काही कारणामुळे प्रतिदिन सर्व विधी करणे शक्य नसल्यास पुरोहितांच्या सल्ल्याने ९ व्या किंवा १० व्या दिवशी विधींना प्रारंभ करावा.
२. दहाव्या दिवशी पिंडदान विधी झाल्यावर अश्म्यावर थोडेसे खोबरेल तेल घालून तो वहात्या पाण्यात विसर्जित करावा.
१२. ११ व्या आणि १२ व्या दिवशी करायच्या कृती
१. ११ व्या दिवशी स्नान झाल्यानंतर वास्तूत पंचगव्य होम करून घरात पंचगव्य शिंपडावे. सर्वांनी पंचगव्य प्राशन करावे.
२. ११ व्या किंवा १२ व्या दिवशी कर्त्याने मृताच्या उद्देशाने वृषोत्सर्ग, एकोद्दिष्ट श्राद्ध, रुद्रगणश्राद्ध, वसुगणश्राद्ध, तसेच सपिंडीकरणश्राद्ध करण्याचा अधिकार यावा म्हणून षोडशमासिकश्राद्ध (टीप), विविध दाने इत्यादी पुरोहितांच्या सल्ल्याने करावीत.
३. १२ व्या दिवशी सपिंडीकरण श्राद्ध (टीप) करावे. सपिंडीकरण श्राद्ध केल्याने मृत जिवाला ‘पितृ’ ही संज्ञा प्राप्त होऊन त्याला पितृलोकात स्थान मिळते.
टीप – खरे पहाता, १६ मासिक श्राद्धे त्या त्या मासात करणे आणि सपिंडीकरण श्राद्ध वर्षश्राद्धाच्या आदल्या दिवशी करणे उचित ठरते; पण सध्याच्या काळात वर्षभर उत्तरीय सहित सर्व नियम पाळणे शक्य नसते, तसेच घरात त्या काळात अन्य मांगलिक कार्यक्रम करता येणे शक्य होत नाही. त्यामुळे हे विधी ११ व्या किंवा १२ व्या दिवशी केले जातात.
१३. १३ व्या दिवशी करायचा निधन शांतीविधी (शांतोदक)
१३ व्या दिवशी निधन शांतीविधी करावा आणि सर्वांना बोलावून गोड जेवण द्यावे.
मृत्यूनंतर काही जणांच्या तोंडवळा किंवा शरीर यांच्यावर हळदीप्रमाणे पिवळसर रंगाची छटा दिसण्यामागील अध्यात्मशास्त्र
‘कोरोना’ महामारीच्या कालावधीत, तसेच भीषण आपत्काळात मृत व्यक्तीवर अग्निसंस्कार करण्याच्या संदर्भात पुढील सूत्रे लक्षात घ्या...
पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मृत्यूच्या संदर्भात केलेले अनमोल मार्गदर्शन !
सद्यःस्थितीत ‘कोरोना विषाणू’मुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अग्नीसंस्कार करता येत नसल्यास धर्मशास्त्रानुसार करावयाचा ‘पालाशविधी’ !
मृत्यूनंतरच्या जीवनाचा विदेशातील काही रुग्णांनी घेतलेला प्रत्यक्ष अनुभव
देवघरात मृत व्यक्तीचे छायाचित्र लावून त्याचे पूजन का करू नये ?
मृत्यू नंतर एका वर्षाने वर्ष श्राद्ध करावे लागते,ते तिथीप्रमाणे करायचे की तारखेप्रमाणे?
तसेच यापुढेही पुण्यस्मरण करायचे असेल तर ते तिथीप्रमाणे करावे की तारखेप्रमाणे?
नमस्कार श्री. निलेश गायकरजी,
मृत्यू नंतर एका वर्षाने वर्ष श्राद्ध करावे लागते, ते तिथीप्रमाणे करावे, तसेच त्यापुढेही पुण्यस्मरण करायचे असेल तर ते तिथीप्रमाणे करावे. हिन्दु धर्मात तिथीला महत्त्व आहे. त्या तिथीला असलेली नक्षत्रे त्या व्यक्तीला पूरक असतात किंवा कार्याला अनुकूल असतात म्हणून तिथीला महत्त्व आहे.
आमच्या भागात दशक्रिया ऐवजी पाचव्या दिवशी विधी करतात. हे बरोबर आहे का?
नमस्कार राजन जी
दशक्रिया विधी संदर्भात स्थानिक परंपरा वेगवेगळ्या असू शकतात. या विषयी आपल्या कुलपुरोहितांचे अथवा स्थानिक जाणकार पुरोहितांचे मार्गदर्शन घ्यावे ही विनंती.
आपली
सनातन संस्था
13 वा आनी 14 वा दिवस का व केव्हा करतात पुरुष आणि सुहागन मयत हया बद्दल काहि आहे का
सुहागन मयत असेल तर वरील विष्यास अनुसरण कृपया अचूक माहिती हवी आहे
नमस्कार,
हा विषय सविस्तर आहे. विस्तारभयास्तव येथे देणे शक्य नाही. तसेच त्यात प्रांतानुसार पालट असू शकतात. त्यामुळे या विषयी स्थानिक पुरोहितांना विचारावे, ही विनंती.
घरात कोणी पुरूष कर्ता नसेल त्या घरातील महिलांनी काय करावे?
नमस्कार अश्विनी जी
श्राद्ध करण्यासाठी कुटुंबात पुरुष नसतील तर धर्मशास्त्रात पुढील पर्याय आहेत. येथे दिलेल्या क्रमाने कोण श्राद्ध करू शकतात हे आपण ठरवू शकतात.
मुलगा (उपनयन न झालेलाही), मुलगी, नातू, पणतू, पत्नी, संपत्तीत वाटेकरी असणार्या मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या आणि धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड (सात पिढ्यांपर्यंतचे कुळातील कोणीही), समानोदक (सात पिढ्यांनंतरचे गोत्रातील कोणीही), शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्याने श्राद्ध करावे.
प्रत्येक मृत व्यक्तीचे श्राद्ध होईल अन् तिला सद्गती मिळेल, अशी पद्धत हिंदु धर्मात श्राद्ध करण्याच्या अधिकाराच्या संदर्भात सांगितली आहे.
आपली,
सनातन संस्था
पौर्णिमा असल्यास त्या दिवशी तेरावे करता येते का?
नमस्कार,
हो. पौर्णिमा असल्यास त्या दिवशी तेरावे करता येते.
आणि काही कारणास्तव दहवा ज्याने केला त्याला तेरावा नाही करता आला नाही तर पुढे काही समस्या निर्माण होईल का तर त्याचे निवारण कसे करावे
नमस्कार श्री. संजय शिंदे जी,
तुम्हाला कोणत्या कारणामुळे शक्य नाही ते सांगू शकता का ? म्हणजे त्याला काही पर्याय असतील तर सुचवता येईल.
बुधवारी दहावा करता येतो का?
हो.
मृत्युंनंतर भरणी श्राद्ध कधी करावे त्याच वर्षी कीं वर्षश्रद्धांनंतर
नमस्कार,
वर्षश्राद्धानंतर भरणी श्राद्ध करावे.
मृत झाल्यापासून अस्थिविसर्जन १० व्या दिवशी करण्याची प्रथा आहे. परंतु त्या अगोदर अमावस्या आल्यास अस्थिविस
र्जन अगोदर केले जाते. ह्या बद्दल माहिती हवी
नमस्कार प्रशांत जी
अमावस्या आल्यास अस्थिविसर्जन आधी करावे याला शास्त्राधार नाही.
आपली
सनातन संस्था
केस कापणे जरुरी असते का
नमस्कार,
कर्त्याने क्षौर करावे (डोक्यावरचे केस पूर्णपणे काढावेत.), तसेच दाढी-मिशा काढून नखेही कापावीत. क्षौर करतांना बटूप्रमाणे केसांचा घेर न ठेवता केवळ शेंडी ठेवावी.
– कर्त्याचे अन्य भाऊ, तसेच मृत व्यक्तीपेक्षा लहान असलेले कुटुंबीय (ज्यांचे वडील विद्यमान नाहीत असे) यांनीही त्याच दिवशी क्षौर करावे. ते शक्य नसल्यास दहाव्या दिवशी क्षौर करावे.
– कर्ता मृत व्यक्तीपेक्षा वयाने मोठा असल्यास त्याने क्षौर करू नये.
– सूर्यास्तानंतर क्षौर वर्ज्य असल्याने सूर्यास्तानंतर क्षौर करू नये. अशा वेळी मृताची उत्तरक्रिया (प्रतिदिन करावयाचे पिंडदान अन् द्यावयाची तिलांजली) ज्या दिवशी चालू करणार त्या दिवशी कर्त्याने क्षौर करून उत्तरक्रिया आरंभ करावी. इतरांनी १० व्या दिनी क्षौर करावे.
– स्त्रियांनी केस किंवा नखे कापू नयेत.
केसांच्या मुळांशी आश्रित असलेले पाप नष्ट व्हावे आणि विधी करण्याचा अधिकार यावा यासाठी केस कापणे आवश्यक असते.
गरुड पुराणानुसार महिलेला अग्नी संस्कार करता येतात असे वाचले आहे आहे ते खरे आहे का ?
नमस्कार,
हो, खरे आहे, मात्र काही गोष्टी काळाच्या ओघात अल्प झाल्या, त्यानुसार हे ही अल्प झाले; मात्र त्यांनी विधी करायचे झाल्यास कसे करावेत हे दिलेले आहे.
मयताचे दहावी दिवशी जिथे अग्नी दिला आहे त्या जागेवर नयेध्या निवध दाखवितात का
हो, नैवेद्य दाखवतात.
आमच्या मुलगा २४ वयाच्या अविवाहित होता तचा १० वा नंतरच्या विधी माहिती विषयक मार्गदर्शन
नमस्कार,
या साठी निधन कसे झाले, अंत्यविधी कसे आणि कुठले झाले इत्यादी माहिती लागते, त्यावर ते ठरते. त्यामुळे ज्या पुरोहितांनी अंत्यविधी केले त्यांना याविषयी विचारले तर अधिक योग्य होईल.
पत्नीचे क्रियाकर्म मुलगा नसताना कोणी करावे.
पतीने केलेंने काही चुकीचे आहे का.
चुकीचे असल्यास आता उपाय आहे का.
नमस्कार,
मुलगा नसेल तर पती पत्नीचे श्राद्ध करू शकतो.
वर्ष श्राद्ध च्या वेळी सुवेर येत असल्यास काय करावे
नमस्कार श्री. कुंदन कांबळीजी,
सोयर संपल्यावर येणाऱ्या द्वादशी अथवा अमावस्येला करावे.
शनिवारी बारावे आहे रविवारी तेरावे आहे
शनिवारी बारावे तेरावे एकत्र केले तर चालते का
नमस्कार श्री. प्रवीण जोशी जी,
स्थानिक परंपरा आणि स्थानिक पुरोहितांना विचारून या विषयी निर्णय घ्यावा.
तेरा दिवसाचे विधी आम्ही पाच दिवसात केले आहेत, त्यामुळे माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी काही त्रास होईल का?
नमस्कार श्री. पराग कोलतेजी,
पाच दिवसांमध्ये म्हणजेच नवव्या दिवसापासून तेराव्या दिवसापर्यंत किंवा दहाव्या पासून चौदाव्यापर्यंत विधी करण्याची जी पद्धत आहे ती चुकीची नाही तोही शास्त्रातला एक पर्यायच आहे
तरी विधी करणाऱ्या पुरोहितावर श्रद्धा ठेवावी आणि यापुढचे जे वर्ष श्राद्ध आणि महालय श्राद्ध विधी आहेत ते मात्र नियमित श्रद्धा भक्ती ने करावेत.
एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला एकच मुलगी असेल व तिचे लग्न झाले असेल व त्या स्त्रि किवा पुरुषाचा एका चा मृत्यू पहिला असेल व नंतर दुसराचा मृत्यू झाल्यास त्याचे इतर भावकी त्याचे क्रिया विधि करण्यास टाळाटाळ करत असतील व त्या मृत्य व्यक्तिला अग्नि त्याच्या नातवाने म्हणजे मुलिच्या मुलाने दिला असेल तसेच त्याची रक्षा विर्सजन पन त्यानेच केली असेल तर त्या व्यक्तिचे पुढील विधि कोणी करावे . ..
नमस्कार श्री. गणेश पेडणेकरजी,
मुलीच्या मुलाला आपल्या आजी आजोबांचे म्हणजे आईच्या आई, वडिलांचे विधी करता येतात.
Somvarla dahava diwas karta yeto ka? Mazya aajicha 10 wa diwas 7 August la yeto
नमस्कार,
आम्हाला संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.
10 वे, 12 वे इत्यादी अत्यावश्यक विधींना अधिक मास, सोमवार वगैरे कोणतेही बंधने लागू होत नाही. त्यामुळे आपण 10वा दिवस करू शकता.
आपली,
सनातन संस्था
नमस्कार मला विचार्याचे होते माज्य सासूचे २०२१ ला निधन झाले तर त्यांचे वर्ष श्रधा झाले तर आता पितृपक्षाचे तिथी काढावी लागते का
नमस्कार
आपले सासरे हयात असतील तर ते पितृपक्षात अविधवा नवमीला हे श्राद्ध करू शकतात.
आपली,
सनातन संस्था
बाहेर तिर्थस्थळी गेलो असताना वडील,आजोबा हयात आहेत व श्राद्ध करावे असे वाटत आहे अश्या वेळेस श्राद्ध करू शकतो का?
नमस्कार
याविषयी आपण स्थानिक पुरोहितांचे अथवा तीर्थक्षेत्री असलेल्या पुरोहितांचे मार्गदर्शन घ्यावे ही विनंती.
आपली,
सनातन संस्था
महिना श्रद्ध कधी घालावे
नमस्कार निलेश जी
मासिक श्राद्ध म्हणजे प्रतिमास त्याच तिथीस येणारे श्राद्ध.
आपली,
सनातन संस्था
Terava jar amavasyela yet asel tar, tyach divshi kartat ki adlya mhanje (12 vya) divshi karava lagto?
नमस्कार निलेश जी
त्याच दिवशी करण्यात काही अडचण नाही.
आपली
सनातन संस्था
मला सास-यांचे श्राद्ध कधीच करायचे नाही आहे…तर त्या साठी काही विधी आहे का?
नमस्कार
शास्त्रानुसार सासऱ्यांचे श्राद्ध तुमच्या पतीने प्रतिवर्षी करणे अपेक्षितच आहे.
श्राद्ध विधीचे महत्त्व अनेक धर्मग्रंथांमध्ये आहे. त्याचे काही उदाहरणे येथे दिलेली आहेत – https://www.sanatan.org/mr/a/1298.html
आपली,
सनातन संस्था
तेरावी ला एकादशी येत असल्यास करता येईल का
नमस्कार ललित जी
हो त्यादिवशी विधी करायला अडचण नाही.
आपली
सनातन संस्था
ज्ञानप्रबोधिनी पद्धतीत दहावा म्हणजे काकस्पर्श विधी येत नाही. त्याचा त्रास नंतर होतो का?
नमस्कार संगीता जी,
विधींच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, मात्र एखादा विधी केले नाही असे आपल्याला वाटत असेल तरी त्याला पर्याय म्हणून अन्य कोणते विधी करतात हे जाणकार पुरोहितांना विचारून घ्यावे. आणि त्यानुसार कोणत्याही पद्धतीने विधी केलाच गेला नाही तर त्रास होईल की नाही हे आपल्या आणि मृतात्म्याच्या पुण्य संचय, प्रारब्ध, देवाण-घेवाण इत्यादी अनेक अन्य सूत्रांनुसार ठरते.
अध्यात्मिक दृष्ट्या मृत व्यक्तीला पुढील चांगली गती मिळवण्यासाठी नातेवाईक ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करू शकतात.
आई च्या 13 व्या विधीसाठी मुलगी नसली तरी चालते का
नमस्कार
हो. मुलगी नसली तरी चालेल.
आपली,
सनातन संस्था
12-13 va karya बुधवारी kela tar chalel ka
नमस्कार
हो. तसे करू शकतात.
त्यासोबतच मृत व्यक्तिच्या लिंगदेहाला संरक्षण मिळण्यासाठी सर्वजण या वेळी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजपही करू शकतात.
आपली
सनातन संस्था
मृत्यू वैक्तीला 12वा दिवस शनिवार येतोय त्या दिवशी 12( उत्तर कार्य ) केलं तर चालते काय
नमस्कार राजेश जी
हो १२ व्या दिवशी करावयाच्या विधी शनिवारी करू शकतात.
आपली
सनातन संस्था