स्वदेशीचा अवलंब करा आणि राष्ट्राभिमान जोपासा !

विदेशी वस्तूंच्या खरेदीने राष्ट्राचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे परदेशी वस्तू विकून भारताची प्रतिवर्षी जवळजवळ ५ लाख कोटी रुपयांची लूट होत आहे ! स्वदेशीचा पुरस्कार करणे ही काळाची गरज आहे. याविषयी थोर राष्ट्रपुरुषांचे उद्बोधक विचार प्रस्तुत लेखात आपल्याला वाचावयास मिळतील. यांतून स्वदेशीचे महत्त्वही लक्षात येईल.

१. वस्तू विदेशी आस्थापनाची (कंपनीची) आहे, हे कसे ओळखाल ?

विदेशी वस्तू न वापरता स्वदेशी वस्तूच वापरणे म्हणजे, स्वतःच्या देशाचा अभिमान बाळगणे होय. यासाठी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती विदेशी कि स्वदेशी आहे, याची विक्रेत्याकडून माहिती करून घ्या. त्याला ठाऊक नसल्यास उत्पादनाच्या वेष्टनावरून ते उत्पादन विदेशी आहे का, ते ओळखता येते. भारतात सध्या ३ प्रकारच्या विदेशी आस्थापनांच्या वस्तू विक्रीस येतात.

अ. परदेशी आस्थापनाने थेट भारतात निर्यात केलेली वस्तू, उदा. निव्हिया क्रीम, नोकिया भ्रमणभाष (मोबाईल).

आ. परदेशी आस्थापनाने भारतात आस्थापन उभारून उत्पादिलेल्या वस्तू, उदा. बाटा इंडिया, नेस्ले इंडिया, पॉन्ड्स इंडिया.

इ. परदेशी आस्थापनाने भारतातील आस्थापनाशी करार करून भागीदारी तत्त्वावर उत्पादिलेल्या वस्तू, उदा. किर्लोस्कर कमिन्स, मारुति सुझुकी.

स्वदेशी वस्तू वापरा आणि देशाभिमान जागवा !

१. दाढीचे क्रीम

विदेशी आस्थापनांची उत्पादने : पामोलिव्ह, ओल्ड स्पाईस, जिलेट, डेनीम, पार्कृ एव्हन्यू
भारतीय आस्थापनांची उत्पादने : गोदरेज, इमामी, विको

२. दाढीचे पाते

विदेशी आस्थापनांची उत्पादने : जिलेट, ब्रिस्टल, एम् 3, सेव्हन-ओ-क्लॉक
भारतीय आस्थापनांची उत्पादने : सुपरमॅक्स, टोपाझ, लेझर, अशोक, गॅलंट

३. शॅम्पू

विदेशी आस्थापनांची उत्पादने : ऑल क्लीअर, नाईल, पॅन्टीन, हेड अ‍ॅन्ड शोल्डर्स, सनसिल्क
भारतीय आस्थापनांची उत्पादने : हिना, हर्बल, वाटिका, शिकेकाई

४. शीतपेये

विदेशी आस्थापनांची उत्पादने : कोकाकोला, लिम्का, थम्स अप
भारतीय आस्थापनांची उत्पादने : लस्सी, लिंबू सरबत, उसाचा रस

विदेशी वस्तूंवर बहिष्कार घाला आणि याविषयी इतरांचेही प्रबोधन करा !

(« Scroll table sideways »)

वस्तू विदेशी उत्पादक स्वदेशी उत्पादक
दंतमंजन कोलगेट, पेप्सोडेंट, क्लोज-अप बबूल, मिसवाक
दाढीचे क्रीम पामोलिव्ह, ओल्ड स्पाईस, जिलेट गोदरेज, इमामी, विको
दाढीचे पाते सेव्हन-ओ-क्लॉक, जिलेट सुपरमॅक्स, टोपाझ, लेझर, अशोक
केशरक्षक हॅलो, ऑल क्लीयर, नाईल, सनसील्क, हेड अ‍ॅण्ड शोल्डर्स, पॅन्टीन हर्बल, वाटिका, (शॅम्पू) शिकेकाई, केशकांती,
हिना, सनातन शिकेकाई (चूर्ण स्वरूपात)
सौंदर्यप्रसाधने लक्स, डव्ह, लॅक्मे, रेव्हेलॉन, डेनीम डाबर, विको, इमामी, आयुर, पतंजली
शीतपेये कोका कोला, पेप्सी, लिम्का, स्प्राईट अमूल, हल्दीराम,

२. विदेशी वस्तूंच्या वापरामुळे भारताची होत असलेली हानी

२ अ. परदेशी आस्थापनांकडून भारत प्रतिदिन लुबाडला जाणे

भारतात अनुमाने (अंदाजे) ६,००० बहुराष्ट्रीय आस्थापने व्यापार करत आहेत. ही आस्थापने भारतियांची अक्षरशः लूट करत आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे, प्रतिलिटर केवळ २.१० रुपये उत्पादनमूल्य असणारी परदेशी शीतपेये भारतात प्रतिलिटर १५ ते २० रुपयांना विकली जातात ! हा पैसा परदेशी आस्थापनांना मिळतो, म्हणजेच परदेशात जातो.

अशा प्रकारे परदेशी कंपन्यांद्वारे येथे कृत्रिम शीतपेये, साबण, केशरक्षक (शँम्पू), ‘टूथपेस्ट’, ‘क्रीम’, ‘फेस पावडर’, ‘चिप्स’ इत्यादी वस्तू विकून भारताची प्रतिवर्षी जवळजवळ ५ लाख कोटी रुपयांची लूट होत आहे !

२ आ. पारतंत्र्यात जाण्याचा धोका उद्भवणे

१. ‘भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंनी मोठे क्षेत्र व्यापले आहे आणि स्वदेशाभिमानाच्या अभावी त्या वस्तू भारतीय जनता विकतही घेत आहे. चीन एकीकडे आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून भारतात अतिक्रमण करत आहे आणि दुसरीकडे भारतीय बाजारपेठ हस्तगत करत आहे. ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने याच पद्धतीने भारताला पारतंत्र्यात ढकलले आणि पुढे भारतावर दीडशे वर्षे राज्य केले.’ – श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई. (दैनिक ‘सनातन प्रभात’, पौष कृ. त्रयोदशी, कलियुग वर्ष ५१११ (१२.१.२०१०)

२. भारत चीनची सर्वांत मोठी बाजारपेठ आणि कच्चा माल पुरवण्याचे साधन बनत आहे. चीन शासन भारताकडून ४०,००० कोटी रुपयांची वसुली त्याच्या उत्पादनांच्या माध्यमातून मिळवत आहे. ही रक्कम भारताला वेढा घालण्यास पुरेशी आहे. (मासिक ‘गीता स्वाध्याय’, ऑक्टोबर २०११)

 

३. स्वदेशीचा पुरस्कार करणार्‍या राष्ट्रपुरुषांचा आदर्श ठेवा !

३ अ. स्वराज्यासाठी नाणी बनवून देऊ इच्छिणार्‍या लबाड इंग्रजाला नकार देणारे छत्रपती शिवाजी महाराज !

‘वर्ष १६७४ मध्ये रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा झाला. शिवराय राजसिंहासनावर बसले. परकीय राज्यांचे प्रतिनिधी एकापाठोपाठ एक येऊन राजांना नमस्कार करून भेटवस्तू (नजराणे) देत होते अन् राजसभेत आसनस्थ होत होते.

इंग्रजांचा प्रतिनिधी हेन्री ऑक्झेंडनची पाळी आली. त्याने राजांना नमस्कार करून भेटवस्तूचे तबक पुढे केले. राजांनी तबकाला हात लावला. हेन्रीने पुढे सरकून तबकावरील वस्त्र सरकवले. झगमगाट झाला. ताटात इंग्रजांच्या टांकसाळीत बनलेली चकचकीत आणि सुबक नाणी दिसली. महाराजांना कौतुक वाटले अन् त्यांच्या मुखावर स्मितरेषा उमटली.

हेन्री वाटच पहात होता. त्या क्षणी तो मोडक्यातोडक्या मराठीत म्हणाला, ‘‘अ‍ॅपन म्हॅणॅलात थर टुमच्या स्वहराझ्याच्छी नॅणी अ‍ॅम्ही टयार खरून डेवू.’’

राजांच्या मुखावरील स्मित ओसरले. कठोर स्वरात राजे गर्जले, ‘‘पुन्हा अशी आगाऊपणाची सूचना करू नका ! आमची स्वराज्याची नाणी असतील ओबडधोबड, सुधारू आम्ही ती ! देणार असाल, तर आम्हाला टांकसाळीचे तंत्रज्ञान द्या ! दिले नाहीत, तरी आम्ही ते विकसित करू !’’

ही होती शिवरायांची स्वदेशी अन् स्वावलंबनाची दृष्टी !’

– श्री. सु.ह. जोशी आणि श्री. दिलीप केळकर (‘कथारूप स्वदेशी’)

३ आ. ‘स्वदेशी’चा शत्रू तो ‘स्वदेशा’चाही शत्रू’, असे सांगणारे लोकमान्य टिळक !

स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरुद्ध मोठी जनजागृती करणारे लोकमान्य टिळक एके ठिकाणी म्हणतात, ‘अमुक वस्तू परदेशी असल्याने घेऊ नयेत, असे एकदा ठरल्यावर फाजील शहाणपणाने किंवा डौलाने त्याच्याविरुद्ध जो जाईल, त्याच्यावरच बहिष्कार टाकून त्याच्याशी सर्व व्यवहार बंद केला पाहिजे. ‘स्वदेशी’चा शत्रू आणि ‘स्वदेशा’चा शत्रू यांत काही भेद नाही !’

३ इ. क्रांतीकारकांचे मुकुटमणी : स्वा. विनायक सावरकर

१. बालपणी स्वदेशीविषयक स्फूर्तीगीत रचणे

बालपणीच सावरकरांच्या मनात स्वदेशीच्या अभिमानाचा उदय झाला होता. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी ‘स्वदेशीचा फटका’ (‘फटका’ म्हणजे एक प्रकारचे आवेशयुक्त गाणे) रचला होता.

२. परदेशी कपड्यांची प्रचंड सार्वजनिक होळी करणे

बंगालच्या फाळणीच्या विरोधात ७.१०.१९०५ या दिवशी पुणे येथे गाडाभर विदेशी कपड्यांची पहिली होळी करण्यात आली. लोकमान्य टिळक आणि शि.म. परांजपे यांच्या साक्षीने पुण्यात सार्वजनिक रितीने परदेशी कपड्यांची प्रचंड होळी करणारे सावरकर हेच पहिले भारतीय पुढारी होत. या तथाकथित अपराधासाठी त्यांना महाविद्यालयाच्या वसतीगृहातून काढून टाकण्यात आले आणि १० रु. दंडही करण्यात आला.

३. स्थानबद्ध असतांनाच्या काळातही स्वदेशीविषयी जागृती करणारे हिंदूंचे पुढारी !

‘अंदमान येथे कारावास भोगून आल्यावर रत्नागिरीत स्थानबद्ध असतांनाही सावरकरांनी ग्रंथलेखनाव्यतिरिक्त अस्पृश्यता निवारण, भाषाशुद्धी आदी चळवळींसह ‘स्वदेशी’वरही लक्ष केंद्रित केले होते. एक प्रश्नावली करून आणि स्वयंसेवक पाठवून (आजच्या भाषेत ‘मार्केट सर्व्हे’) घरोघरी कोणत्या परदेशी वस्तू वापरल्या जातात, याची माहिती त्यांनी गोळा केली. इच्छा असूनही ‘स्वदेशी वस्तू कोठे उपलब्ध आहेत’, हे कळल्यावाचून त्या वस्तू विकत घेतल्या जाणार नाहीत, हे त्यांनी ओळखले होते. रत्नागिरी नगरात (शहरात) कोणत्या दुकानात कोणत्या स्वदेशी वस्तू उपलब्ध आहेत, या सामान्य वाटणार्‍या विषयावर त्यांनी एक लेखच लिहिला होता. ‘तरुणपणी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ लिहिणारा अन् ‘जयोस्तुते…’ हे स्वतंत्रतादेवीचे स्तोत्र रचणारा मी, असले लेख कुठे लिहित बसू’, असा विचार त्यांनी केला नाही.

रत्नागिरीत असतांना स्वा. सावरकर स्वदेशी वस्तूंची हातगाडी फिरवीत, तसेच स्वदेशी वस्तू दुकानांत ठेवण्यासाठी दुकानदारांचे मनही वळवीत.’

– डॉ. अरविंद सदाशिव गोडबोले (‘मला उमजलेले स्वा. सावरकर’)

 

४. स्वदेशीविषयी अभिमानी असणार्‍या जपानी नागरिकांचा आदर्श ठेवा !

४ अ. अमेरिकेचे एकही चारचाकी वाहन खरेदी न करणारे जपानी लोक !

‘अमेरिकेतील एका आस्थापनाने चारचाकी वाहनांच्या विक्रीसाठी जपानमध्ये एक कार्यालय उघडले; मात्र जपानमध्ये अमेरिकेतील आस्थापनाचे एकही चारचाकी वाहन विकले गेले नाही.

स्वदेशी मालाचाच वापर करण्यामध्ये जपानी माणूस नेहमी अग्रेसर कसा असतो, हे लक्षात आले ना ? अशा देशभक्तीच्या बळावर काही वर्षांतच जपान पुन्हा ‘समर्थ देश’ म्हणून उभा राहिला.

 

५. स्वदेशी वस्तूंचा अवलंब तुम्ही कसा कराल ?

स्वदेशी वस्तू वापरा अन् परदेशी वस्तू टाळा !

एखाद्या देशातून (उदा. चीनमधून) येणार्‍या वस्तू तुलनेने स्वस्त असल्या किंवा अधिक आकर्षक असल्या, तरी त्या विकत घेऊ नका. त्या वस्तू घेतल्याने संबंधित वस्तूंचे भारतीय उद्योजक आणि कामगार देशोधडीला लागतात. स्वदेशीचे महत्त्व ओळखून स्वदेशी वस्तू वापरा अन् परदेशी वस्तू टाळा.

परदेशी कपडे, खाद्यपदार्थ (उदा. कृत्रिम शीतपेये, बर्गर, पिझ्झा), लेखण्या (पेन), खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादी खरेदी करू नका !

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment