‘हिंदु राष्ट्र’ म्हणजेच रामराज्य !

PP_pande_maharaj
प.पू. परशराम माधव पांडे

‘अखिल मानवजातीच्याच नव्हे, तर सर्व सजीव प्राण्यांच्याही उद्धारासाठी लाभदायक असणारे ‘हिंदु राष्ट्र !’, ही नेमकी संकल्पना समजून न घेता विरोधक, धर्मद्रोही आणि त्यांचे लांगूलचालन करणार्‍या वृत्तवाहिन्या त्याच्या विरोधात बोलत आहेत अन् सर्वसामान्य हिंदूंनाही भडकवण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे नेमके काय ?, हे पुढे दिले आहे.

 

१. साधना करून स्वतःतील
स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणारे ते ‘हिंदु’!

मानवाचा जन्म साधना करून स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून ईश्‍वरप्राप्ती करण्यासाठीच झाला आहे, जेणेकरून त्याला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत पुन्हा अडकावे लागू नये. यासाठी हिंदु धर्मामध्ये जिवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला आहे. साधना करून स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणार्‍यांना ‘हिंदू’ म्हटले आहे.

 

२. मेरुतंत्र नावाच्या ग्रंथात ‘हिंदु’ या शब्दाचा अर्थ पुढीलप्रमाणे दिला आहे.

२ अ. विश्‍वातील सर्व सजीव प्राण्यांचा
उद्धार करण्यासाठी निर्माण होणारे ते हिंदु राष्ट्र !

‘हीनं दूषयति इति हिन्दुः।’, म्हणजेच ‘जो स्वतःतील दोष आणि अहं दूर करण्यासाठी निरंतर प्रयत्नशील आहे, तो हिंदू !’ अशा प्रकारे साधना करणारा साधक हा सर्व जिवांचे कल्याण करणाराच असतो. अशा प्रकारे विश्‍वातील सर्व सजीव प्राण्यांचा उद्धार करण्यासाठी निर्माण होणारे ते ‘हिंदु राष्ट्र’ ! यात सर्व जीव साधक म्हणूनच कार्यरत रहातील.

 

३. गुरुकुल पद्धतीद्वारे साधकांना
मार्गदर्शन झाल्याने मानवाने सहस्रो वर्षे आनंदाने
भौतिक आणि पारमार्थिक जीवन जगून मोक्षप्राप्ती करून घेणे

भारतात पूर्वी अशा प्रकारे गुरुकुल पद्धतीद्वारा साधकांना मार्गदर्शन करून आध्यात्मिकदृष्ट्या सिद्ध केले जात असे. ऋषींनी भगवंताच्या आदेशानुसार या पद्धतीनुसार ४ वेद, ४ आश्रम, ४ वर्ण आणि ४ पुरुषार्थ यांची सांगड घालून समाजाची पायाभरणी केली. त्यामुळे मानवाने सहस्त्रो वर्षे आनंदाने भौतिक आणि पारमार्थिक जीवन जगून मोक्षप्राप्ती करून घेतली.

 

४. हिंदु राष्ट्रातील कार्य रामराज्याप्रमाणेच भेदभावरहित असणे

रामाने राज्य करतांना ‘प्रत्येक जिवाचे कल्याण व्हावे’, यासाठीच राज्य केले. रामराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. त्यामुळे आजही रामराज्याचे गुणगान गायले जाते. याप्रमाणेच हिंदु राष्ट्रातील कार्य रामराज्याप्रमाणेच असणार आहे.’

– प.पू. परशराम माधव पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.५.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात