सनातन संस्थेचा मंदिर स्वच्छता हा उपक्रम अतिशय चांगला ! – सौ. शोभा पाटील, नगरसेविका, भाजप

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी विविध उपक्रमांचे आयोजन

लातूर येथील बैठकीला उपस्थित धर्मप्रेमी

लातूर – सनातन संस्थेचा मंदिर स्वच्छता हा उपक्रम अतिशय चांगला आहे. मंदिरांमध्ये सत्त्विकता आणि सकारात्मकता असतेच; मात्र तेथील स्वच्छता झाल्यामुळे त्या ठिकाणची प्रसन्नता अधिक वाढते. त्याचा लाभ संपूर्ण समाजाला होतो, त्यामुळे समाजातील अधिकाधिक लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन येथील भाजपच्या नगरसेविका सौ. शोभा पाटील यांनी केले. शिवकृपा सोसायटी येथील ओमकार हनुमान मंदिर येथे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’अंतर्गत विविध उपक्रमांच्या नियोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

या बैठकीला हिंदुत्वनिष्ठ श्री. रत्नदीप निगुडगे, श्री. किशोर डाळे, श्री. निंबाळकर यांच्यासह सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री देशमुख आणि अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी नगरसेविका सौ. शोभा पाटील यांनी कोणकोणत्या मंदिरांमध्ये साकडे घालण्यास जाऊ शकतो याविषयी माहिती देऊन ‘आमचे सनातन संस्था आणि समिती यांना सदैव सहकार्य असेल’, असे आश्वासन दिले.

 

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’अंतर्गत सोलापूर
जिल्ह्यात ७५ ठिकाणी साकडे, तर विविध मंदिरांची स्वच्छता !

धाराशिव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साकडे घालतांना भक्त

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवनिमित्त ठिकठिकाणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्ये विविध मंदिरे, भजनी मंडळे यांठिकाणी सामूहिक प्रार्थना करून देवाला साकडे घालण्यात येत आहे, तर काही ठिकाणी मंदिरांची स्वच्छता करण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, धर्मप्रेमी आणि भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत ७५ ठिकाणी साकडे घालण्यात आले असून ४ मंदिरांची स्वच्छता करण्यात आली आहे.

 

‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’अंतर्गत म्हैसगाव (जिल्हा सोलापूर) येथे श्रीराम फेरीचे आयोजन !

म्हैसगाव येथील पवार वस्तीवरील श्रीराम फेरीमध्ये सहभागी झालेले धर्मप्रेमी

म्हैसगाव (जिल्हा सोलापूर) येथील पवार वस्ती येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग घेण्यात येतो. या वर्गातील धर्मप्रेमींनी ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’अंतर्गत प्रतिदिन पहाटे ५ वाजता ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा जयघोष करत श्रीराम फेरी काढण्यास प्रारंभ केला आहे. श्रीरामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत ही फेरी काढण्यात येत आहे. फेरी झाल्यानंतर सर्व धर्मप्रेमी मंदिरात आरती करतात. त्यानंतर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या घोषणेने फेरीची सांगता करण्यात येते. फेरी काढण्यास प्रारंभ केल्यापासून धर्मप्रेमींना रामराज्याची अनुभूती येत असल्याचे सांगितले.

Leave a Comment