सलग २० वर्षे अविरतपणे चालू असलेल्या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक !

जलाशय रक्षणासाठी कडे करून उभे असलेले कार्यकर्ते

पुणे – खडकवासला ग्रामस्थ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आयोजित ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहीम’ २२ मार्च या दिवशी पार पडली. सलग २० वर्षे अविरतपणे चालू असलेल्या या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी नागरिकांचे प्रबोधन केल्यामुळे एकही नागरिक जलाशयात रंग खेळून उतरला नाही. २२ मार्च या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत ही मोहीम राबवण्यात आली. नागरिकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे मोहिमस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह वाढल्याचे दिसून आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी अभियानाविषयी आपले मत व्यक्त केले.

क्षणचित्रे

१. मोहिमस्थळी उपस्थित सर्वांचा ‘जलदेवतेच्या उपस्थितीमुळे वातावरण थंड झाले’, असा कृतज्ञताभाव होता. त्यामुळे मोहिमस्थळी उपस्थित अनेकांमध्ये पुष्कळ उत्साह होता. त्यामुळे थकवाही जाणवला नाही.

२. या वर्षी रंगपंचमीला रंग खेळून पाण्यात अंघोळ करण्यासाठी येणार्‍यांची संख्या अत्यल्प होती. ‘हे या मोहिमेतून होणार्‍या प्रबोधनाचे यशच आहे’, असे अनेक स्थानिक नागरिकांनी सांगितले.

या मोहिमेमुळे पुणेकरांना स्वच्छ पाणी मिळण्यास
पुष्कळ साहाय्य होते ! – गिरीश खत्री, मालक, खत्रीबंधू आईस्क्रीम

सुप्रसिद्ध ‘खत्रीबंधू आईस्क्रीम’चे मालक श्री. गिरीश खत्री यांनी मोहिमस्थळी भेट दिली. ते म्हणाले की, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सलग २० वर्षे जलरक्षणाचे कार्य अविरतपणे करत आहेत. या मोहिमेमुळे पुणेकरांना स्वच्छ पाणी मिळण्यास पुष्कळ साहाय्य होते. या मोहिमेचे हे मोठे यश आहे. समितीच्या या कार्याला माझे नमन ! सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अशा प्रकारे एकत्र येऊन आदर्श समाज निर्मितीसाठी प्रयत्न करावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

मोहिमेत सहकार्य करणार्‍यांचे हार्दिक आभार !

या मोहिमेत ‘इस्कॉन मंदिर ट्रस्ट’ (कोंढवा), श्रीमती निर्मला फडणवीस, श्री. निर्मल देशपांडे, श्री. धनंजय (आबा) पवार, श्री. निखिल पायगुडे, श्री. अरुण बेलुसे, श्री. सागर मते, श्री. गिरीश खत्री, पाटबंधारे विभाग, तसेच पोलीस प्रशासन यांनी मोहिमेसाठी पुष्कळ सहकार्य केले. हिंदु जनजागृती समितीने सर्व ज्ञात आणि अज्ञात हितचिंतकांचे आभार मानले.

Leave a Comment