वनौषधी आणि ऐतिहासिक स्थाने असलेले लातूर येथील ‘संजीवनी बेट’ !

लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ येथील संजीवनी बेटावर असणार्‍या वन औषधींमुळे हे बेट प्रसिद्ध आहे; मात्र या बेटावरील ऐतिहासिक ठिकाणांमुळे इतिहासाच्या दृष्टीनेही या बेटाचे संशोधन होण्याची आवश्यकता आहे. बेटावरील गुहा, घरांच्या बांधकामाच्या खुणा, तिथे दिसून येणारे विविध आकारांचे खड्डे आणि सर्वांचे आकर्षण असणारे ठिकाण म्हणजे ‘लोटांगण पाँईंट !’ वडवळ गावात सापडलेल्या वीरगळ आणि सतीशीळा यांचाही इतिहासाच्या दृष्टीने शास्त्रीय अभ्यास होण्याची आवश्यकता आहे.

श्री. अभय मिरजकर

लेखक – श्री. अभय मिरजकर, लातूर

 

१. ज्वालामुखीच्या उद्रेकातून संजीवनी बेटाची निर्मिती झालेली असण्याची शक्यता !

ज्वालामुखीच्या उद्रेकामधून संजीवनी बेटाची निर्मिती झालेली असावी, असा तर्क काढला जातो; पण तसा शास्त्रीय आधार कुणीही पडताळून पहात नाही. अगदीच पुरातन काळामध्ये या बेटावर निवास व्यवस्था असावी, असे पुरावे या ठिकाणी आजही दिसतात. संरक्षणाच्या दृष्टीने या बेटाचा वापर झालेला असावा, असे काही पुरावे येथे दिसून येतात.

 

२. बेटावर असलेल्या ऐतिहासिक खुणा !

बेटावर एक गुहा आहे. अत्यंत अरुंद असणार्‍या गुहेत साधारणपणे सुमारे ३० ते ३५ फुटांपर्यंत आत जाता येते. त्यापुढे अत्यंत अरुंद रस्ता असल्यामुळे आतमध्ये जाता येत नाही, तर एक बाजू बंद असल्याचे निदर्शनास येते. या ठिकाणी काही दगडी बांधकामाच्या खुणाही आढळून येतात. बहुदा तेथे घरे असावीत. चौकोनी, आयताकृती आकाराच्या खुणा आजही तेथे दिसून येतात. किती वर्षांपूर्वीच्या आहेत याचा अंदाज येत नाही. बेटावर ३ मोठ्या विहिरीही दिसून येतात. त्याचप्रमाणे विविध आकारातील खड्डे आहेत. वनौषधी आणि झाडपाला यांचा रस काढण्यासाठी अन् कुटण्यासाठी या खड्ड्यांचा वापर केला जात असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वनौषधींचा रस काढण्यासाठीचे खड्डे

 

संजीवनी बेटावरील ‘सतीशीळा’

३. गावात मोठ्या प्रमाणात असलेल्या ‘वीरगळ’ आणि ‘सतीशीळा’ !

येथे विविध आकारातील खड्डे असल्यामुळे त्या ठिकाणी लोकवस्तीही अधिक असावी किंवा वैद्यांची निवासस्थाने असावीत. घायाळ सैनिक आणि नागरिक यांसाठी मोठ्या प्रमाणात यांचा वापर या ठिकाणी झालेला असावा; म्हणजे या भागात एखादे युद्धही झालेले असावे, असा तर्क यावरून काढला जाऊ शकतो. त्याला प्रबळ असा पुरावा म्हणून वडवळ नागनाथ या गावात मोठ्या प्रमाणात असलेल्या ‘वीरगळ’ (वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला दगड किंवा लाकूड यांचा स्तंभ) आणि ‘सतीशीळा’ (मध्ययुगीन कालखंडात युद्धात वीरमरण आलेल्या वीरांची पत्नी सती गेल्यानंतर तिच्या नावाने कुटुंबातील सदस्य कोरीव शीळा उभारत असत) याकडे पहाता येईल. लातूर जिल्ह्यातच नव्हे, तर मराठवाड्यात अन्य कोणत्याही ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात ‘वीरगळ’ आणि ‘सतीशीळा’ सापडलेल्या नाहीत. त्यामुळे इतिहास संशोधकांनी त्याचे संशोधन करण्याची आवश्यकता आहे.

संजीवनी बेटावरील ‘वीरगळ’

४. एकाच बेटावर खडक आणि माती यांचे असलेले विविध प्रकार !

बेटावरून वहात जाणारे पाणी खालच्या बाजूस असणार्‍या एका तलावामध्ये साठते. त्या तलावामध्ये सप्टेंबरमध्ये येणार्‍या उत्तरा नक्षत्रामध्ये बेटावर आलेले रुग्ण स्नान करतात. त्यामुळे अनेकांचे त्वचेशी संबंधित आजार नाहीसे होतात, असे सांगण्यात येते. एकाच बेटावर खडक आणि माती यांचे विविध प्रकार आढळून येतात. त्याचे परीक्षण कुणी केलेले नाही किंवा त्यासंदर्भात कुणालाही ठाऊक नाही, असेच निदर्शनास आले.

 

५. संजीवनी बेटावरील सर्वांचे आकर्षण असणारे ठिकाण म्हणजे ‘लोटांगण पॉईंट’ !

एका झाडाजवळ एक दगड मांडून ठेवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी २ किंवा ३ वेळा स्वतः लोटांगण घातले की, नंतर ती व्यक्ती आपोआप लोटांगण घालत असल्याचे दिसून येते. त्या ठिकाणी खालच्या भागात पोकळी निर्माण झालेली असावी आणि गुरुत्वाकर्षणाच्या दाबामुळे व्यक्ती घरंगळत जात असावी, असा तर्क सध्यातरी काढण्यात येत आहे; मात्र संजीवनी बेटाचे शास्त्रीय पद्धतीने संशोधन केल्यास अनेक ऐतिहासिक संदर्भ मिळतील, असे दिसून येते.

Leave a Comment