श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी चेन्नई येथील पार्थसारथी मंदिरात घेतलेले दर्शन

Article also available in :

अनुक्रमणिका

मंदिराबाहेर असलेला देवाचा लाकडी रथ

 

१.  नाडीवाचनासाठी महर्षि व्यासही उपस्थित असणे

पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी १६९ क्रमांकाचे नाडीवाचन केले. या नाडीवाचनात महर्षींनी सांगितले, ‘आजच्या या नाडीवाचनाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘आज या ऋषींच्या सभेत सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद देण्यासाठी व्यास महर्षीही उपस्थित आहेत.’ आजचे नाडीवाचन फार छान झाले.

 

२. सनातनच्या कार्याचा सारथीही श्रीकृष्णच असल्याने
महर्षींनी पार्थसारथीच्या रूपात असलेल्या श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन येण्यास सांगणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आरोग्य, साधकांना होणारे त्रास आणि सनातनच्या कार्याला होणारा विरोध या सर्वांवर उपाय म्हणून महर्षींनी सांगितले, ‘आज तुम्ही चेन्नई येथे असलेल्या ‘पार्थसारथी’च्या देवळात दर्शनाला जाऊन या; कारण शेवटी कुरुक्षेत्रावरील युद्धही अर्जुन, म्हणजेच पार्थ याचा सारथी बनलेल्या श्रीकृष्णामुळेच जिंकले, तसेच सनातनच्या कार्याचा सारथीही श्रीकृष्णच असल्याने आपल्याला पार्थसारथीच्या रूपात असलेल्या श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन येणे अत्यंत महत्त्वाचे आहे.’

 

३. पार्थसारथी मंदिराचा इतिहास

 ३ अ. राजा सुमती याला श्रीकृष्णाचे पार्थसारथी रूपात दर्शन घेण्याची इच्छा असणे,
तिरुपती बालाजीने त्याला ‘मी तुला अत्रिऋषींनी स्थापिलेल्या श्रीविष्णूच्या स्थानी दर्शन देईन,
आता त्या स्थानी तुळशीचे बन आहे’, असे सांगणे, त्याप्रमाणे राजाला तिथे श्रीकृष्णाचे पार्थसारथीच्या रूपात दर्शन होणे

महर्षींनी दिलेल्या आज्ञेनुसार आम्ही पार्थसारथीच्या देवळात दर्शनाला गेलो. हे देऊळ ८ व्या शतकात बांधलेले आहे. नंतर राजा कृष्णदेवराय आणि राजा पल्लव यांनी या मंदिरात काही सुधारणा केल्या. या मंदिराविषयी अशी कहाणी सांगतात, ‘त्या वेळचा राजा सुमती याला श्रीकृष्णाचे दर्शन पार्थसारथीच्या रूपात घेण्याची इच्छा होती. ही इच्छा त्याने तिरुपती बालाजीकडे बोलून दाखवली. तिरुपती बालाजीने त्याला सांगितले, ‘हे राजा, येथे अत्रिऋषींनी स्थापलेले एक श्रीविष्णूचे स्थान आहे. तेथे तुला मी पार्थसारथीच्या रूपात दर्शन देईन. आता या स्थानी तुळशीचे बन आहे.’ आणि काय आश्चर्य ! खरोखरच राजाला या ठिकाणी पार्थसारथीच्या रूपात देवाने दर्शन दिले.

३ आ. पार्थसारथी मंदिरातील मूर्ती

त्यानंतर आलेल्या राजांनी त्या ठिकाणी पार्थसारथीचे भव्य मंदिर उभे केले. येथील मूर्ती जवळजवळ १० फूट उंच आहे आणि त्याच्या जवळ रुक्मिणीचीही सुंदर मूर्ती आहे. याच ठिकाणी अत्रिऋषींनी श्रीकृष्ण, रुक्मिणी, अनिरुद्ध, प्रद्युम्न, सात्यकी यांचीही पूजा केली होती. या मूर्तींच्या जवळ सात्यकी यांचीही उभी मूर्ती पहायला मिळते.

३ इ. सात्यकी

सात्यकी हे भगवान श्रीकृष्णाच्या यादव सेनेचे प्रमुख सेनापती होते. अर्जुनाने त्यांना त्याच्याजवळच्या सर्व विद्या शिकवल्या होत्या. कुरुक्षेत्रावर पांडवांच्या बाजूने युद्ध करून जिवंत परत आलेल्या योद्ध्यांपैकी सात्यकी हे एक योद्धे होते. ते श्रीकृष्ण आणि त्यांचे गुरु अर्जुन यांचे निस्सीम भक्त होते.

 

४. नरसिंह मूर्ती आणि लाकडी रथ

याच देवळाच्या मागे नरसिंहाचीही मूर्ती आहे. आम्ही तिचे दर्शन घेतले. देवळाच्या बाहेर ब्रह्मोत्सवात गावात फिरवला जाणारा देवाचा लाकडी रथ आहे. आम्ही त्याचेही दर्शन घेतले.

 

५. भीष्माचार्यांनी अर्जुनावर सोडलेल्या सर्व बाणांचे घाव
श्रीकृष्णाने स्वतःवर झेलल्यामुळे श्रीकृष्णाच्या या मूर्तीच्या तोंडवळ्यावर पुष्कळ भोके असणे

त्याच वेळी या देवळातील उत्सवमूर्ती देवळातील प्रदक्षिणेसाठी निघाली होती. या पंचलोहाच्या मूर्तीला पुजारी फार सुंदर प्रकारे झुलवत होते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ‘या श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या तोंडवळ्यावर पुष्कळ भोके पडली आहेत.’ याविषयी ‘युद्धाच्या वेळी भीष्माचार्यांनी अर्जुनावर जे बाण सोडले, त्या सर्व बाणांचे घाव श्रीकृष्णाने स्वतःच्या अंगावर घेतले. त्याचे प्रतीक म्हणून श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या तोंडवळ्यावर सर्वत्र भोके दिसून येतात’, अशी कहाणी आहे.

 

६. अनुभूती

६ अ. श्रीकृष्णाला तुळशीमिश्रीत गुलाबाच्या फुलांचा हार घालून प्रार्थना
केल्यावर हार देवाच्या डाव्या बाजूने खाली येणे, त्यातून ‘देवाने प्रार्थना स्वीकारली’, याची अनुभूती येणे

मंदिरातील मूर्ती काळ्या पाषाणाच्या आहेत. आम्ही पार्थसारथीच्या मूर्तीला घालायला तुळशीमिश्रीत गुलाबाच्या फुलांचा हार नेला होता. मी देवाला प्रार्थना केली, ‘देवा, या हाराच्या माध्यमातून साधकांचा भक्तीभाव तुझ्या चरणी समर्पित होऊदे आणि सनातन संस्थेवरील सर्व संकटे दूर होऊ देत. साधकांनी भक्तीभावाने वाहिलेल्या या हाराचा तू प्रसन्न मुद्रेने स्वीकार कर.’ मी असे म्हणता क्षणी हा हार देवाच्या डाव्या बाजूने खाली आला. देवाने हारात जिवंतपणा आणून आम्हाला ‘त्याने हार आणि साधकांची प्रार्थना स्वीकारली’, याची एकप्रकारे अनुभूतीच दिली.

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

Leave a Comment