अध्यात्मविषयी शंकांचे निरसन

अध्यात्मातील सैद्धांतिक भागाचा कितीही अभ्यास केला, तरी मनातील शंकांचे निरसन झाले नाही तर साधना नीट होत नाही. या दृष्टीने गांवोगांवच्या जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्‍या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे. ‘शंकानिरसन’ या सदरातून प्रश्नोत्तराच्या रूपात हे, सर्वच वाचकांसाठी उपलब्ध करत आहोत. याचा अभ्यास करून अधिकाधिक जिज्ञासूंनी योग्य साधनेला आरंभ करावा आणि जीवनाचे खर्‍या अर्थाने सार्थक करून घ्यावे, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

बहुतेकांना ‘आत्मा’, ‘मुक्ती’, ‘मोक्ष’, ‘वेद’, ‘प्रारब्ध’, ‘देवता’ इत्यादिंविषयी फारशी माहिती नसते. वाचकांना खालील प्रश्नोत्तरातून या सर्वांची मानवी जीवनातील अपरिहार्यता लक्षात येऊन हिंदु धर्माचे महत्व उमगेल. यांतून अधिकाधिक वाचकांनी योग्य साधनेला प्रारंभ करावा हीच अपेक्षा !

प्रश्न : आत्मा अमर आहे, तर मृत्यूनंतर आत्मा परमात्म्यात विलीन होतो, असे सांगितले जाते, ते खरे आहे का?

उत्तर : आत्मा म्हणजे निराळे काही नाही. हवा सगळीकडे आहे, तसेच परमात्मा, ब्रह्म सगळीकडे आहे. जो लिंगदेह आहे, त्याच्यामध्येसुद्धा आहे. आपण मुक्त होतो, तेव्हा आपल्या सगळ्या वासना, आवडी-निवडी जातात. जिवाचे विघटन झाले की, आतील जे आत्मतत्त्व आहे, ते परमात्म्यात विलीन होते. परबह्म, परमात्मा हे तत्त्व आहे. बोलतांना विषय कळावा म्हणून परब्रह्म, ब्रह्म, आत्मा असे आपण म्हणतो. विषय समजायला कठीण जाऊ नये; म्हणून ‘ते ब्रह्म आणि हा आत्मा’ असे म्हणतो. खरेतर दोन्ही एकच आहे.

प्रश्न : माणसाला मुक्ती मिळते, म्हणजे काय होते ?

उत्तर : तो माणूस परमेश्वराशी एकरूप होऊन जातो. त्याला सचि्चदानंद अवस्था प्राप्त होते. काही झाले, तरी त्याला सुख नाही आणि दुःखही नाही. कायमस्वरूपी आनंदावस्था ! म्हणजे तो मुक्त झाला.

प्रश्न : आपल्या गतजन्मीच्या बर्‍यावाईट कर्मामुळे सुख-दुःखाचे भोग आपल्या वाट्याला येतात, त्याला आपण प्रारब्ध असे म्हणतो. मग हे प्रारब्ध चुकवण्यासाठी काय करावे ? कि त्याकडे साक्षीभावाने पहावे ?

उत्तर : सहस्रो, लक्षावधी, कोट्यवधी वर्षांपूर्वी कधीतरी आपला पहिला जन्म झालेला असतो. तेव्हा हवे तसे वागण्यासाठी परमेश्वराने सगळ्या गोष्टी पूर्णपणे आपल्या हाती दिल्या होत्या. तेव्हा आपण जे कर्म केले, ते सगळे क्रियमाणकर्म झाले. जे आपल्या हातात असते, त्याला क्रियमाण म्हणतात. त्या जन्मात आपण काही चांगली कर्मे केली, तर काही वाईट. या चांगल्या-वाईटाचा परिणाम आपल्याला पुढच्या जन्मात भोगायचा आहे, त्याला संचित म्हणतात. त्यापैकी थोडा भाग आपण दुसर्‍या जन्मात भोगला, ते प्रारब्ध झाले. असे करता करता आतापर्यंत आपले लक्षावधी जन्म होऊन गेले आणि आपले संचित पुष्कळ साचल्याने त्यातील काही भाग भोगून संपवण्यासाठी प्रत्येक जन्मात आपण थोडा थोडा प्रारब्धाच्या रूपाने घेऊन येत आहोत. कलियुगात क्रियमाण केवळ ३५ प्रतिशत आहे आणि ६५ प्रतिशत गोष्टी प्रारब्धामुळे होत आहेत. असाच काळ पुढे पुढे जाऊन जेव्हा कलियुगाचा अंत येईल, तेव्हा आपल्या जीवनातील १०० प्रतिशत गोष्टी प्रारब्धानुसार घडतील.

प्रारब्धाचे तीन प्रकार आहेत. मंद प्रारब्ध, मध्यम प्रारब्ध आणि तीव्र प्रारब्ध. मंद प्रारब्ध साधनेने टाळता येते. त्यासाठी साधना कोणती करायची, तर कुलदेवतेची उपासना करावी. प्रारब्धभोग सहन करण्याची क्षमता वाढवणे किंवा मंद प्रारब्ध असेल, तर ते नष्ट करणे हे सर्व कुलदेवतेच्या उपासनेने साध्य होते. पूर्वजांचे आत्मे त्रास देत असतील, तर दत्ताची उपासना किंवा भूतबाधा, करणी यांपैकी काही झाले असेल, तर त्यासाठी हनुमान, कालीमाता या देवतांची उपासना करावी. कुंडलिनीचक्र किंवा नाडीत अडथळा असल्यास त्या त्या चक्रांचे बीजमंत्र आहेत, त्यांची उपासना करावी. प्राणशक्ती न्यून झाल्यास शिव, विष्णु, गणपति, महालक्ष्मी यांसारख्या उच्च प्रतीच्या देवतांची उपासना करावी. या सर्वांमागे शास्त्र आहे. वैद्य ज्याप्रमाणे निरनिराळ्या व्याधींवर निरनिराळी प्रतिजैवके देतात, त्याप्रमाणे जीवनातील निरनिराळ्या अडचणींवर निरनिराळी साधना सांगितली आहे. जीवनातील ६५ प्रतिशत समस्या प्रारब्धामुळे निर्माण होत असल्यामुळे प्रत्येकाला कुलदेवतेचे काही ना काही करणे आवश्यकच आहे. त्यामुळे देव आपल्याला अशा ठिकाणी जन्माला घालतो, ज्या कुलदेवतेचे नाम आपले प्रारब्ध घालवण्यासाठी उपयुक्त आहे.

आपण जन्माला यायचे मुख्य दोन उद्देश आहेत. पहिला म्हणजे आपल्याला साधना करून परत परमेश्वराकडे जायची संधी मिळावी. प्रत्येक जन्मात आपल्याकडून चुकाच झाल्याने देव पुनःपुन्हा आपल्याला संधी देत आहे. जेणेकरून या जन्मात तरी साधना करून आपण पुढच्या लोकात जाऊ आणि दुसरे कारण म्हणजे देवाण-घेवाण पूर्ण करणे, म्हणजेच प्रारब्धभोग भोगून संपवणे.

मध्यम प्रारब्ध घालवण्यासाठी संतांची किंवा गुरूंची कृपा असावी लागते. त्यांच्या संकल्पानेच ते जाऊ शकते. तीव्र प्रारब्ध असल्यास संत आणि गुरूही त्याच्या आड येत नाहीत. तीव्र प्रारब्धाचे भोग परमेश्वरानेच भोगण्यासाठी दिल्याने आणि परमेश्वर अन् संत किंवा गुरु निराळे नसल्याने ते यात ढवळाढवळ करत नाहीत. ते भोगण्याची क्षमता मात्र गुरु शेवटपर्यंत देत रहातात.

संतांना प्रसन्न करण्यासाठी काय करावे, तर त्यांच्या कार्यात सहभागी व्हावे. संतांचे किंवा परमेश्वराचे, अवतारांचे एकच कार्य असते, ते म्हणजे लोकांना साधनेकडे वळवणे आणि त्यांची प्रगती घडवून आणणे. या कार्यात आपण सहभागी झाल्यास आपल्यावरही संतांची, गुरूंची कृपा होते. एखाद्या समारंभात आपल्याकडे दायित्व असलेल्या कामात कोणी साहाय्य करण्यास आल्यावर तो जसा आपल्याला आपला वाटतो, त्याप्रमाणे संतांचे जे कार्य आहे, समाजात सत् चा प्रसार करणे, लोकांमध्ये त्याची आवड निर्माण करणे, या कार्यात जीव झोकून दिला की, संत म्हणणारच आहेत, ‘हा माझा आहे’. म्हणजे मध्यम प्रारब्ध संपणारच आहे.

प्रश्न : प्रत्येक गावामध्ये शंकराचे एक तरी देऊळ असतेच. त्यांना रामेश्वर, कलेश्वर, गंगेश्वर असे का म्हणतात ? शंकर तर एकच आहे; पण शंकराचे मंदिर सहसा कुठे आढळत नाही, बहुतेक ठिकाणी वेगळी नावे असतात, असे का ?

उत्तर : शंकराचेच काय, विष्णुसहस्रनाम आहे. गणेश सहस्रनाम आहे. बर्‍याच देवांची अशी निरनिराळी नावे आहेत. नावे निरनिराळी तरी का असतात ? तर जेथे जे नाव आहे, त्या नावात ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती’ हे सर्व एकत्र असतात. म्हणजे देवाला काही कार्य करायचे असते, तेव्हा तो त्या कार्यासाठी अवतार घेतो. त्या कार्याला पूरक अशी शक्ती तो घेऊनच येतो. ती शक्ती त्या कार्याला पूरक असली की, त्याचे रूप तसे असते आणि त्याचे नावही तसे असते.

‘शंकर एक आहे’ असे वाटत असले, तरी रामेश्वर, कलेश्वर, गंगेश्वर यांच्यात सूक्ष्म भेद असतो. त्यांच्या कार्यातही थोडा थोडा भेद असतो. त्याअनुषंगाने निरनिराळी नावे असतात. साधना वाढली की, तुम्ही मार्गाने चालत आहात आणि तुम्हाला एखादे देऊळ दिसले, तर तुम्हाला स्वतःला कळते की, हे गणपतीचे, दत्ताचे, शंकराचे, रामाचे कि विष्णूचे देऊळ आहे. त्यातून जी स्पंदने निर्माण होतात, त्यामुळे कळते. आणखी पुढच्या टप्प्याची प्रगती झाली की, रामेश्वराचे आहे कि गंगेश्वराचे आहे कि कलेश्वराचे आहे, हेही कळायला लागते. ही नावे म्हणजे निरनिराळ्या शक्ती आहेत. त्या सूक्ष्मातील शक्ती साधनेने अनुभवता येतात.

संदर्भ : सनातन-निर्मित ध्वनिचकती ‘अध्यात्मविषयक शंकानिरसन’

 

प्रश्न : देवपूजेतील आणि देवालयातील घंटा अन् झांज पितळी का असावेत ?

उत्तर : पितळ या धातूतील रजोकण हे इतर धातूंतील रजोकणांपेक्षा जास्त संवेदनशील असतात. ते कुठलाही आघात चटकन ग्रहण करून तसेच आपल्या रजोकणांच्या पोकळीत घनीभूत करून आवश्यकतेप्रमाणे लगेच वातावरणात प्रक्षेपित करू शकतात. रजोकणांच्या कंपनांतून प्रक्षेपित केल्या जाणार्‍या नादाला सत्त्वकणांचीही जोड मिळाल्याने या नादाची वातावरणात घुमणारी आस दीर्घकाळ टिकते. दीर्घकाळ टिकणारी नादाची आस ही निर्गुण लहरींशी संबंधित असल्याने ती ब्रह्मांडातील त्या त्या उच्च देवतेच्या सूक्ष्मतर लहरींना आकृष्ट करून कार्यरत करू शकते. म्हणून शक्य तो नाद उत्पन्न करण्यासाठी तांब्यापेक्षा संवेदनशील रजोकणांचे प्राबल्य अधिक असलेले पितळ वापरतात. या कारणास्तव देवपूजेतील आणि देवालयातील घंटा आणि झांज ही नाद उत्पन्न करणारी उपकरणे पितळी असतात.

– पू. (सौ.) अंजली गाडगीळ (१३.१.२००५, दुपारी २.१२)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’