चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे झालेल्या ढगफुटीत नद्यांना पूर येऊन १ सहस्राहून अधिक जनावरे वाहून गेली !

कधीही पूर न आलेल्या चाळीसगाव येथील ढगफुटी म्हणजे भीषण आपत्काळच होय !

जळगाव – चाळीसगाव तालुक्यात ३० ऑगस्टला रात्रभर पडलेल्या पावसाने डोंगरी, तितुर या नद्यांना पूर आल्याने पाणी चाळीसगाव शहरात शिरले. यामुळे तालुक्यातील ४२ गावे बाधित झाली आहेत. नदीकाठच्या गावांतील १ सहस्राहून अधिक जनावरे वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कापूस, केळी, मका, हिरवा चारा आदी पिके उद्ध्वस्त झाली. शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने जमीन पडीक होण्याचा मोठा धोका आहे. वाघडू येथील पशूवैद्यकीय रुग्णालयाची संरक्षक भिंत कोसळून रुग्णालयातही पाणी शिरले. विजेचे अनेक खांब पडल्याने ३ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे.

पुरात वाहून आलेल्या मृत म्हशींच्या स्थितीचे मन हेलावणारे दृश्य

वाकडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पुराचे पाणी शिरले. शालेय पोषण आहाराचा तांदूळ, शैक्षणिक साहित्य, कागदपत्रे सर्वच भिजली. शिक्षकांना साहित्य बाहेर काढून वर्गखोल्या धुवाव्या लागल्या. पाण्यासमवेत कचरा वाहून आल्याने अनेक शाळांच्या प्रांगणात कचर्‍याचा ढिग आणि चिखल साचला.

 

चाळीसगाव शहरातील ७६२ घरे आणि ६०० दुकाने यांची हानी !

दुकानाबाहेर भिजलेले साहित्य आणि स्वच्छता करतांना व्यावसायिक

पुराच्या पाण्यामुळे चाळीसगाव शहरातील ७६२ घरे आणि ६०० दुकाने यांची कोट्यवधी रुपयांची हानी झाली. शहरातील रस्ते आणि दुकाने यांत पाणी शिरल्याने चिखल आणि कचरा साठला आहे. तो महानगरपालिकेच्या वतीने उचलण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. कचरा उचलण्यासाठी जेसीबी, रस्ते धुण्यासाठी टँकर, अग्निशमन बंब यांसह ३५० कर्मचारी तेथे कार्यरत आहेत.

 

लोकप्रतिनिधी, सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांकडून पूरग्रस्तांना साहाय्य !

तालुक्यातील आपत्तीग्रस्त नागरिकांसह कन्नड घाटात बचावकार्य करणार्‍या ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या पथकासाठी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या वतीने जेवण आणि पाणी यांची सोय करण्यात आली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युगंधरा फाऊंडेशन, हिरकणी महिला मंडळ यांनी जेवण, तसेच संसारोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले. रयत सेनेच्या वतीने ‘रोकडे’ या गावातील पूरग्रस्तांना ब्लँकेट, तर वसुंधरा फाऊंडेशन आणि मित्र परिवार यांच्या वतीने २०० कुटुंबांना फिनाईल वाटप करण्यात आले. ‘श्री सत्य साई आपत्ती व्यवस्थापन आणि मेडिकेअर प्रोजेक्ट’च्या माध्यमातून वैद्यकीय उपचार अन् औषधे विनामूल्य देण्यात आली.

‘जिल्हाधिकारी, पालकमंत्री, आमदार, खासदार सर्व जण येथे भेटी देत आहेत; मात्र कोणत्याही प्रकारचे साहाय्य अद्याप गावाला मिळालेले नाही’, अशी खंत वाकडी गावच्या सरपंचांनी खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर पाटील म्हणाले, ‘‘गावागावात पंचनामे चालू आहेत. लवकरच साहाय्य पुरवले जाईल.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment