सत्यनारायणाची महापूजा

सत्यनारायण पूजेसाठीची मांडणी

सत्यनारायण पूजेसाठीची मांडणी

धार्मिक कार्यक्रम, शुभवार्ता, गृहप्रवेश, नवीन आस्थापनाचे उद्घाटन अशा वेळी सत्यनारायणाची पूजा करण्याची हिंदूंमध्ये पद्धत आहे. तो एक शुभाशुभ विधी आहे. हा विधी केल्यावर वातावरण सात्विक आणि चैतन्यमय होते. देवाशी अनुसंधान टिकवण्यासाठी ते उपयुक्त असते.

कार्यारंभी सत्यनारायणाची पूजा करण्याचे महत्त्व काय ?

प्रत्येक कार्यारंभी श्री गणपतीची पूजा करतातच. असे असतांना कार्यारंभी सत्यनारायणाची पूजा करण्याची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न विचारला जातो. त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे.

वास्तू आणि आस्थापन यांचे उद्घाटन करतांना सत्यनारायणाची पूजा करणे

कोणत्याही वास्तूचे किंवा आस्थापनाचे उद्घाटन करतांना सत्यनारायणाची पूजा करतात; कारण श्रीविष्णु क्रियाशक्तीचे प्रतीक असल्याने त्या त्या स्तरावरील कार्याला गती मिळते. साधारणतः उद्योगधंद्याशी संबंधित आर्थिक, तसेच वास्तूशुद्धी यांच्या प्रक्रियेत रजोगुणाची निर्मिती करणार्‍या सत्यनारायण पूजाविधीची आवश्यकता असते. साधारणतः क्रियेला ऊर्जा प्राप्त व्हावी, यासाठी कार्यारंभी सत्यनारायणाची पूजा केली जाते.

आरोग्य आणि इच्छापूर्ती यांसाठी श्री गणपतीची पूजा करणे लाभदायक असणे

आरोग्य प्रदान करणार्‍या अन् जिवाच्या मनोकामनेशी निगडित पृथ्वी आणि आप तत्वरूपी संकल्पांमध्ये इच्छाशक्तीशी निगडित श्री गणपतीची पूजा लाभदायक ठरते. क्रियेला गती देण्याच्या स्तरावर श्री गणपतिपूजनाने १० टक्के एवढा लाभ होतो, तर सत्यनारायणपूजेने २० टक्के एवढा लाभ होण्यास साहाय्य होते.

एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २७.१.२००६)

संकलक : सत्यनारायणाची पूजा बहुधा कार्य झाल्यानंतर करण्याची पद्धत आहे. आपण कार्यारंभी करण्याविषयी सांगितले आहे. त्याचे कारण काय ?

एक विद्वान : कर्मकांडात कार्याची पूर्तता, म्हणजेच कार्यात काही चूक झाली असेल, तर क्षमायाचनेचा समारोपविधी म्हणून सत्यनारायणाची पूजा केली जाते; परंतु सातत्याने सत्रूपी सत्याचा, म्हणजेच शाश्वततेचा पुरस्कार करणारे श्रीविष्णूचे रूप म्हणजेच नारायण, याची कार्यारंभी पूजा करून, त्याला संतुष्ट करून, त्याच्या वरदहस्ताखाली कृती केल्याने मूलतःच चुकीचे क्रियमाण घडणे टाळले जाते. तसेच वाईट शक्तींचा त्या त्या कार्यातील प्रकोपही दूर होण्यास साहाय्य होते; म्हणून ही पूजा कार्यारंभी करणे जास्त फलदायी आहे; कारण हा एक आवाहनात्मक प्रार्थनास्वरूप विधी आहे. कलियुगात या विधीला प्रायश्चित कर्माचे, म्हणजेच कसेही वागायचे आणि त्याचे पाप टळण्यासाठी कार्यानंतर सत्यनारायणाची पूजा करायची, असे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सनातनच्या साधिका कु. मधुरा भोसले यांनी
सत्यनारायणाच्या पूजेचे केलेले सूक्ष्म ज्ञानविषयक परीक्षण

आश्रमातून केलेल्या सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षणात पूजेची पूर्वसिद्धता चालू असतांना
सत्यनारायणाच्या स्वागतासाठी सूर्याचे किरण आल्याचे जाणवणे अन् तसेच अनुभवण्यास मिळणे

‘सकाळपासूनच मला धाप लागून श्वास घेतांना त्रास होत होता आणि अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे मी आश्रमात राहूनच पूजास्थळाचे सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण केले. श्री. कुष्टे यांच्या वास्तूत श्री सत्यनारायणाच्या पूजेची पूर्वसिद्धता चालू असतांना श्री सत्य-नारायणाच्या स्वागतासाठी सूर्याचे किरण आल्याचे जाणवले. हे किरण संपूर्ण वास्तूत पसरून वास्तू शुद्ध करून चैतन्यमय बनवत होते. प्रत्यक्षात सकाळी ९.२० वाजता मी श्री. कुष्टे यांच्या घरी पोहोचल्यावर मला त्यांच्या वास्तूत चांगली स्पंदने जाणवली. सूर्यकिरणांनी वास्तूत केलेला सकारात्मक पालट मला अनुभवण्यास मिळाला.

श्रीविष्णु अन् श्री लक्ष्मी यांना आवाहन केल्यावर चैतन्याचे निळसर आणि
लालसर झोत येऊन त्यांत अनुक्रमे श्रीविष्णु अन् श्री लक्ष्मी यांच्या दिव्य आकृत्या दिसणे

श्रीविष्णु अन् श्री लक्ष्मी यांना आवाहन केल्यावर मला खोलीत चैतन्याचे दोन झोत येतांना जाणवले. त्यांतील एका झोताचा रंग निळसर आणि दुसर्‍या झोताचा रंग फिकट लालसर होता. (त्या वेळी मला फार थकवा जाणवू लागल्याने मी शेजारच्या खोलीत झोपून १ घंटा सूक्ष्म-ज्ञानविषयक परीक्षण केले.) हे प्रकाशझोत चौरंगावर पोहोचल्यावर मला १ फूट उंचीच्या दोन दिव्य आकृत्या दिसल्या. लालसर प्रकाशझोतात मला लाल वस्त्रधारी श्री लक्ष्मीदेवी दिसली आणि निळ्या प्रकाशझोतात नीलवर्ण असलेला श्रीविष्णु दिसला. (त्या वेळी माझ्या कानांतून उष्ण वाफा बाहेर पडत होत्या आणि मला मळमळून उलटी येत होती.)

साधक-पुरोहित श्री. दामोदर वझे सत्यनारायणाची कथा सांगत असतांना वातावरणात भाव आणि आनंद जाणवू लागला. पूजेच्या चौरंगावर असलेल्या सूक्ष्मातील श्रीविष्णूच्या मुखावर स्मित होते.’ (फोंडा, गोवा येथील सनातनचे साधक श्री. कुष्टे यांच्या घरी संपन्न झालेली सत्यनारायणाची पूजा, २६.५.२००६, सकाळी ९ ते ११.३०)

(साधिकेला थकवा येणे, कानांतून उष्ण वाफा बाहेर पडणे, मळमळून उलटी येणे यांसारखे त्रास हे तिला होणार्‍या वाईट शक्तींच्या त्रासाचे प्रकटीकरण होते. – संकलक)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र’

Leave a Comment