कुंकू किंवा गंध लावण्याच्या काही पद्धती अन् त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

Article also available in :

‘बहुतांश हिंदु स्त्रिया आणि काही पुरुष कपाळाला कुंकू किंवा गंध लावतात. त्यांची पद्धती प्रांताप्रमाणे किंवा संप्रदायाप्रमाणे निरनिराळी आहे. स्त्रियांनी आणि काही पुरुषांनी कपाळाला कुंकू किंवा गंध लावण्याचे आध्यात्मिक महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

 

१. कपाळाला कुंकू आणि गंध लावण्याची पद्धत

१ अ. आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांहून अल्प असणार्‍यांनी त्यांच्या आज्ञाचक्राची
जागृती होण्यासाठी कपाळाला शक्तीवर्धक गोल किंवा उभे कुंकू लावणे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य असणे

ज्यांची आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांहून अल्प आहे, त्यांनी भ्रूमध्याच्या ठिकाणी असणार्‍या आज्ञाचक्राची जागृती होण्यासाठी कपाळाला भ्रूमध्यावर शक्तीवर्धक कुंकू लावणे योग्य आहे. स्त्रियांनी श्रीदुर्गादेवीच्या शक्तीचे प्रतीक असणारे गोलाकारातील कुंकू कपाळावर लावणेे आणि पुरुषांनी शिवज्योतीचे प्रतीक असणारा ज्योतीप्रमाणे दिसणारा कुंकवाचा उभा टिळा कपाळावर लावणे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य आहे.

१ आ. संतांचा प्रवास ईश्‍वराच्या निर्गुण रूपाकडे चालू झाल्यामुळे त्यांनी ज्योतीर्मय
तेजाचे पूजन करण्यासाठी स्वतःच्या कपाळावर कुंकू न लावता गोल किंवा उभे गंध लावणे योग्य असणे

गंध दोन भुवयांच्या मध्ये अर्धा सें.मी. वर लावावे. आज्ञाचक्राकडून सहस्रारचक्राकडे कुंडलिनीचा प्रवास चालू असतांना तिच्यातील तेजतत्त्व प्रगट अवस्थेत असतांना ते गोलाकार बिंदुप्रमाणे आणि अप्रगट अवस्थेत असतांना ज्योतीप्रमाणे रूप धारण करते. उन्नतांचा प्रवास ईश्‍वराच्या निर्गुण रूपाकडे चालू झाल्यामुळे त्यांनी ज्योतीर्मय तेजाचे पूजन करण्यासाठी स्वतःच्या कपाळावर कुंकू न लावता गोल किंवा उभे गंध लावणे योग्य आहे. गंधामध्ये कुंकवाच्या तुलनेत अधिक प्रमाणात निर्गुण चैतन्य धारण आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता असल्यामुळे, संतांनी (७० टक्के आणि त्याहून अधिक पातळी असणार्‍यांनी) कपाळाला चंदन, गोपीचंदन, रक्तचंदन, अष्टगंध इत्यादींचा गंध लावणे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य आहे.

कु. मधुरा भोसले

 

२. कपाळाला कुंकू आणि गंध उभे लावतांना त्यांची ठेवायची उंची

२ अ. कुंकवाच्या उभ्या टिळ्याचे वरचे टोक कपाळाच्या उंचीच्या अर्ध्या उंचीचे ठेवणे योग्य असणे

७० टक्के पातळीपेक्षा न्यून पातळी असणार्‍याला आध्यात्मिक स्तरावर सक्रीय होण्यासाठी आध्यात्मिक शक्ती मिळणे अधिक महत्त्वाचे असते. कुंकवामध्ये पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी स्वत:च्या कपाळावर कुंकवाचा उभा टिळा लावावा. कुंकवाच्या उभ्या टिळ्याची उंची कपाळाच्या उंचीच्या अर्धी ठेवणे योग्य आहे. असे केल्याने कुंकवाच्या टिळ्यामध्ये क्रियाशक्ती कार्यरत होते आणि कुंकवाचा टिळा लावणारी व्यक्ती आध्यात्मिक स्तरावर अधिक प्रमाणात सक्रीय होते.

२ आ. गंधाचे वरचे टोक कपाळाच्या उंचीच्या अर्ध्या उंचीचे असणे योग्य असणे

‘गंधाचे वरचे टोक कपाळाच्या उंचीच्या संदर्भात कोठपर्यंत हवे ?’, असा प्रश्‍न सर्वांनाच पडतो. गंधाची उंची साधारण एक इंच असावी. गंध हे आत्मज्योतीचे प्रतीक असल्याने त्याची उंची कपाळाच्या उंचीच्या अर्धी असल्यास त्यामध्ये ज्ञानशक्ती अधिक प्रमाणात कार्यरत होते. गंधाची उंची एक इंचाहून अल्प असल्यास इच्छाशक्ती आणि एक इंचाहून अधिक असल्यास क्रियाशक्ती कार्यरत होते.

 

३. कुंकू आणि गंध लावण्याच्या पद्धती

३ अ. कुंकू लावण्याच्या पद्धती

कुंकू लावण्याच्या पुढील दोन प्रमुख पद्धती आहेत.

३ अ १. गोलाकारात कुंकू लावणे

यामुळे स्त्रियांमध्ये श्रीदुर्गादेवीचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होते आणि तिची शक्ती वातावरणात पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होते. अशा स्त्रियांना धर्माचरण आणि साधना करण्यासाठी श्रीदुर्गादेवीची सगुण शक्ती अन् चैतन्य अधिक प्रमाणात मिळते.

३ अ २. ज्योतीप्रमाणे कुंकवाचा उभा टिळा लावणे

यामुळे पुरुषांमध्ये शिवज्योतीस्वरूप शक्ती आणि चैतन्य अधिक प्रमाणात कार्यरत होऊन त्यांना धर्माचरण अन् साधना करण्यासाठी शिवाची निर्गुण शक्ती आणि चैतन्य अधिक प्रमाणात मिळते.

३ आ. गंध लावण्याच्या पद्धती

गंध लावण्याच्या पुढील दोन प्रमुख पद्धती आहेत.

३ आ १. गोलाकारात गंध लावणे

यामुळे ज्ञानशक्तीशी संबंधित शक्ती कार्यरत होते. त्यामुळे बौद्धिक स्तरावरील सेवा, उदा. ग्रंथलेखन करणे सुलभ जाते.

३ आ २. इंग्रजीतील ‘U’ आकाराप्रमाणे (U च्या दोन्ही बाजू सारख्या जाडीच्या) उभे गंध लावणे

यामुळे गंधाकडे विष्णुतत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन कार्यरत होते. त्यामुळे पूजकामध्ये श्रीविष्णुप्रतीचा भक्तीभाव लवकर जागृत होतो.

 

४. पूजेसाठी कपाळावर आणि शरिरावर इतरत्र लावायच्या
विविध प्रकारच्या टिळ्यांमध्ये आकृष्ट होणार्‍या देवतांच्या लहरी

हळद  कुंकू  अष्टगंध  चंदन  भस्म
१. कार्यरत शक्ती इच्छा क्रिया क्रिया + ज्ञान ज्ञान + क्रिया ज्ञान
२. वैशिष्ट्य कामनादायी
(इच्छापूर्ती करणारे)
सौभाग्यदायी सर्वसिद्धीदायी आनंददायी वैराग्यदायी
३. लावण्याची पद्धत गोल स्त्रियांसाठी गोल आणि
पुरुषांसाठी उभा टिळा
गोल किंवा उभे उभे गंध किंवा इंग्रजीतील ‘U’ आकाराचे गंध आडवे पट्टे
४. कोठे लावावे ? कपाळ कपाळ कपाळ आणि कपाळाच्या
बाजूला दोन्ही कानांजवळ
कपाळ आणि कपाळाच्या
बाजूला दोन्ही कानांजवळ
कपाळ, कंठ, दोन्ही दंड, मनगट आणि मांड्या
५. सूक्ष्म परिणाम श्रीदुर्गादेवीची तारक शक्ती ग्रहण होणे आणि सात्त्विक इच्छा
जागृत होणे
श्रीदुर्गादेवीची मारक
शक्ती कार्यरत होऊन
मस्तकाभोवती
संरक्षककवच निर्माण
होणे
विविध देवतांच्या मिश्र
लहरींचा लाभ होऊन मन
स्थिर होऊन बुद्धी सात्त्विक होण्यास साहाय्य मिळणे
श्रीविष्णूचे तत्त्व ग्रहण होऊन आज्ञाचक्र जागृत होणे, मन अंतर्मुख होणे आणि ज्ञानलहरी ग्रहण करण्याची क्षमता
वाढणे अन् देहाभोवती श्रीविष्णुतत्त्वाचे
संरक्षककवच निर्माण होणे
मन शांत आणि स्थिर होऊन अंतर्मुख होणे अन् मनामध्ये वैराग्य प्रबळ होऊन देहाभोवती
शिवकवच निर्माण होणे
६. उपयोग कधी करतात ?
(टीप)
व्रतवैकल्य, देवतांची
पूजा, हळदी-कुंकू
पूजा आणि यज्ञ
यांसारख्या विविध
धार्मिक विधींच्या वेळी
विविध धार्मिक विधी
आणि उपासना
श्रीविष्णूची उपासना शिवाची उपासना आणि
श्राद्धादी मृत्यूत्तर धार्मिक
विधी

टीप : धार्मिक कार्याच्या वेळी हळद किंवा कुंकू यांचा अधिक प्रमाणात वापर करावा. वैयक्तिक स्तरावर देवतेची उपासना करतांना अष्टगंध, चंदन, गोपीचंदन, रक्तचंदन इत्यादींचा वापर करावा. अंत्येष्टी किंवा श्राद्धादी कर्म करतांना भस्माचा वापर करावा. असे केल्याने संबंधित धार्मिक कार्य करण्यासाठी आवश्यक त्या देवतेचे तत्त्व आणि शक्ती उपासकाला मिळून त्याच्याकडून प्रत्येक धार्मिक कर्म अचूक अन् परिपूर्ण होण्यास साहाय्य मिळते.

कृतज्ञता : देवा, तूच आम्हाला कुंकू आणि गंध या विषयी ज्ञान देऊन त्यांचे महत्त्व लक्षात आणून दिलेस, यासाठी आम्ही तुझ्या चरणी कृतज्ञ आहोत.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.५.२०१९, रात्री १०.४०)

3 thoughts on “कुंकू किंवा गंध लावण्याच्या काही पद्धती अन् त्यांचे आध्यात्मिक महत्त्व”

Leave a Comment