सत्तरी तालुक्यात पुरामुळे सर्वाधिक हानी : अनेक गावांचा शहरापासून संपर्क तुटला

पाण्यात पूर्णपणे बुडालेल्या घराचे कौलारू छप्पर दिसत आहे.

फोंडा – अतीवृष्टीमुळे राज्यातील म्हादई, वाळवंटी, रगाडा, शापोरा आदी नद्यांचे पाणी सत्तरी आणि डिचोली तालुक्यांमधील शेती-बागायतींमध्ये शिरले आहे. सर्वाधिक हानी सत्तरी तालुक्यात झाली आहे. पैकुळ, सत्तरी आणि शेळ-मेळावली येथील पूल कोसळले आहेत. अडवई, सत्तरी आणि वाळपई पालिका क्षेत्रातील काही घरे कोसळली आहेत. वाळपई शहरातील पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने अन्य गावांशी संपर्क तुटला आहे. पर्ये मतदारसंघातील काही महिलांनी ‘रात्रभर पाऊस पडल्याने या भागातील लोक रात्री भीतीने झोपले नाहीत’, अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली. वाळपई-पणजी मार्गावरील ‘सत्तरी तालुका शेतकरी सोसायटी’जवळील लहान पुलावर नदीचे पाणी आल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. यामुळे दोन्ही बाजूंनी नागरिक अडकून पडले.

 

वाळपई येथे २४ घंट्यांत विक्रमी ११.६ इंच पावसाची नोंद

वाळपई येथे इतिहासात पहिल्यांदाच २४ घंट्यांत ११.६ इंच पावसाची नोंद झाली. २ ऑक्टोबर २००९ मध्ये काणकोण येथे अतिवृष्टी झाल्याने पूर आला होता आणि या वेळी २४ घंट्यांत १०.६ इंच पावसाची नोंद झाली होती.

 

सत्तरी येथे पूरसदृश स्थितीवर लक्ष ठेवण्याची
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या संबंधित खात्यांना सूचना

अतिवृष्टी आणि संततधार पाऊस यांमुळे म्हादई नदी तुटुंब भरून वहात आहे. वाळपई तालुक्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती आहे. अनेक लोकांच्या घरात पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. आताच्या घडीला लोकांची सुरक्षा पुष्कळ महत्त्वाची आहे. आम्ही २२ जुलैला रात्रभर जागे राहून येथील नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांच्याशी संपर्कात होतो. सत्तरी आणि उसगाव येथे आपत्कालीन व्यवस्थापन गट नेमण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली आहे. धोका संभवत असलेल्यांना सुरक्षित स्थळी हालवण्यात येत आहे. जलस्रोत खाते, अग्नीशमन दल, सार्वजनिक बांधकाम खाते, उपजिल्हाधिकारी, मामलेदार आदींना सत्तरी तालुक्यातील पूरसदृश स्थितीवर नजर ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

 

डिचोली आणि सांखळी येथील काही लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

सुपाची पूड, सांखळी येथील लोकांना सुरक्षित स्थळी हालवतांना आपत्कालीन पथक

अंजुणे धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आल्यावर धरणातून वाळवंटी नदीत पाणी सोडल्याने सांखळीतून वहाणार्‍या वाळवंटी नदीने मध्यरात्री धोक्याची पातळी ओलांडली. वाळवंटी नदीला महापूर आल्याने सांखळी आणि हरवळे परिसर पुराच्या विळख्यात सापडला. सांखळी येथील श्री दत्तमंदिर, क्रीडा मैदान आणि श्री वाठारेश्वर देवस्थान येथे पाणी शिरले, तसेच सुपाचे पूड हा गाव, काजीवाडा-विठ्ठलापूर, गावठण, विर्डी आदी परिसर पाण्याखाली गेला. यामुळे येथील लोकांची एकच तारांबळ उडाली. सांखळी बाजारातील पूर नियंत्रक विभागातील पंप पुन्हा चालू करून पाणी नदीत फेकण्याचे काम चालू करण्यात आल्याने सांखळी बाजारपेठेतील पुराचा धोका टळला.

 

तिलारी धरणाचे पाणी  सोडल्याने साळमध्ये पूरसदृश स्थिती

तिलारी धरणाचे पाणी २२ जुलैच्या रात्री सोडल्याने यंदाही साळ गावात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. येथील अनेक घरे पाण्यात बुडाली आहेत, तर मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. श्री भूमिका मंदिरातही पाणी शिरले. येथील काही जनावरे पुरात वाहून गेल्याचे वृत्त आहे.

बार्देश तालुक्यातील राण्याचे जुवे येथे घरांचे अंगण आणि अन्यत्र गुडघाभर पाणी भरून राहिले आहे. तारवाडा, कामुर्ली येथेही अशीच स्थिती आहे.

 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला पूरसदृश स्थितीचा आढावा

पूरसदृश स्थितीचा आढावा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पूरसदृश हरवळे भागाची पहाणी केली आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला.

 

दक्षिण गोव्यात सावर्डे, धारबांदोडा आणि सांगे तालुक्यांतील नद्यांना पूर

दक्षिण गोव्यात सावर्डे, धारबांदोडा आणि सांगे तालुक्यांतील झुआरी आणि कुशावती नद्यांना पूर आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले; मात्र पावसाने सकाळपासून विश्रांती घेतल्याने अनेक ठिकाणी घरात शिरलेले पाणी ओसरू लागले आहे. सावर्डे येथे घरात पाणी गेल्याने लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कुशावती नदीला पूर आल्याने पारोडा येथील पूल पाण्याखाली गेल्याने मडगाव येथे जाणारा मुख्य रस्ता गेल्या ५ दिवसांत दुसर्‍यांदा पाण्याखाली गेला आहे.

 

सोनावळी येथे रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे इंजिन आणि एक डबा रुळावरून घसरला

गोव्याजवळ कर्नाटकच्या हद्दीत सोनावळी येथे सकाळी ६.३० वाजता दक्षिण-मध्य रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळल्याने सकाळी मुंबई येथे जाणार्‍या मंगळुरू-मुंबई विशेष रेल्वेचे इंजिन आणि एक डबा रुळावरून घसरले; मात्र या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुसळधार पावसामुळे पूर्वीच विस्कळीत झालेले रेल्वेचे वेळापत्रक काही काळासाठी ठप्प झाले. या घटनेनंतर कोकण रेल्वेमार्गावरील ५, तर दक्षिण-मध्य रेल्वेमार्गावरील १ मिळून एकूण ६ गाड्या रहित करण्यात आल्या.

 

वाळपई येथील अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्रातील
२० गोवंशियांचा मृत्यू, तर १५ हून अधिक गोवंश घायाळ

नाणूस येथील गोशाळेतील मृतावस्थेतील गोवंश

वाळपई येथील अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्राची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. याविषयी अधिक माहिती देतांना केंद्राचे श्री. हनुमंत परब म्हणाले, ‘‘कर्नाटक येथील कळसा-भंडुरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग (अतिरिक्त पाणी धरणातून सोडणे) चालू झाल्याने वाळपई परिसरात उत्तररात्री ३.३० वाजता येथील म्हादई नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे केंद्रात आणि गोशाळेत पाणी शिरल्याने केंद्राची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. गोशाळेतील सुमारे २० गोवंशियांचा मृत्यू झाला आहे, तर १५ गोवंश घायाळ आहेत. पशूसंवर्धन खात्याच्या वाळपई विभागातील पशूवैद्यकीय अधिकार्‍यांनी (डॉक्टरांनी) तातडीने घटनास्थळी येऊन घायाळ गुरांवर उपचार चालू केले आहेत. वाळपई आणि आसपासच्या परिसरातील राजस्थानी समाजातील लोक आणि आसपासचे नागरिक यांनी केंद्राला तातडीचे साहाय्य केले.’’ सिकेरी, मये येथील ‘गोमंतक गौसेवक महासंघा’चे अध्यक्ष कमलाकांत तारी यांनी अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्राला गोमंतकातील गोप्रेमींनी भेट देऊन आवश्यक ते साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे.

नाणूस, वाळपई येथील गोशाळेचे केवळ पत्र्याचे छप्पर दिसत आहे.

 

अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्राला आर्थिक साहाय्य करण्यासाठी बँकेचा तपशील

CENTRAL BANK OF INDIA, खाते क्रमांक -3676720393
शाखा – VALPOIIFSC-CBIN0280725

क्षणचित्रे

१. बोणकेवाली, वांते येथे शाणू गावडे आणि उत्तम गावडे यांची घरे कोसळली.

२. सावईवेरे येथील प्रसिद्ध श्री अनंत देवस्थानात पुराचे पाणी शिरले. देवस्थान परिसर जलमय झाला होता.

३. सांत इस्तेव मतदारसंघातील पाटो येथील रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला. यामुळे येथील गावातील लोकांचा मुख्य भागाशी संपर्क तुटला. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश नाईक यांनी या भागाला भेट देऊन बोटींच्या साहाय्याने पुरात अडकून पडलेल्यांना सुरक्षित स्थळी हालवण्यासाठी संबंधितांना साहाय्य केले.

४. निरंकाल, फोंडा येथील तारीवाड्यावरील निरंकाल भागाला जोडणारा एकमेव पूल पाण्याखाली गेला. यामुळे तारीवाड्यावरील लोकांचा संपर्क तुटला. तसेच कोडली-दाभाळ ते फोंडा रस्त्यावर निरंकाल येथे रस्ता पाण्याखाली गेला. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली.

५. थिवीचे आमदार निळकंठ हळर्णकर यांनी साहाय्यक मामलेदारांसमवेत थिवी मतदारसंघातील पूरसदृश स्थितीची पहाणी केली.

६. कलणा नदीचे पाणी अचानकपणे वाढल्याने या नदीवरील १५ एम्.एल्.डी. क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प बंद करण्यात आल्यामुळे संपूर्ण पेडणे तालुक्याला २४ आणि २५ जुलै या दिवशी मर्यादित स्वरूपात पाणीपुरवठा होणार आहे. तसेच ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी शिरल्याने फोंडा, तिसवाडी आणि सत्तरी तालुक्यांना मर्यादित स्वरूपात पाणीपुरवठा होणार.

७. हरवळे येथे २३ लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. अर्धाअधिक आमोणा गाव पाण्याखाली गेला, तसेच कुळे आणि शिगाव गावांतील अनेक परिसर पाण्याखाली गेला आहे.

८. बाग्रांझा घाट येथे मोठी दरड कोसळल्याने लोंढामार्गे उत्तर भारतात जाणारी दक्षिण-मध्य रेल्वे वाहतूक ठप्प झाली.

९.अनमोड घाटात, तसेच चोर्ला घाटात दरड कोसळल्याने फोंडा-बेळगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली.

१०. राज्यातील ‘बी.एस्.एन्.एल्.’च्या जोडण्या बंद झाल्या. यामुळे ‘१०८’ हा जनतेसाठीचा वैद्यकीय आपत्कालीन सेवेशी संबंधित संपर्क क्रमांक बंद झाला. यामुळे ‘जी.व्ही.के.-ई.एम्.आर्.आय्.’ या वैद्यकीय आपत्कालीन सेवा पुरवणार्‍या संस्थेने आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी (०८३२) ६६५६९६९ हा संपर्क क्रमांक संपर्कासाठी नागरिकांना दिला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment