‘म्युकरमायकोसिस’ (Mucormycosis) किंवा ‘ब्लॅक फंगस्’ या आजाराची लक्षणे आणि त्यावरील होमिओपॅथी औषधांचे उपचार !

Article also available in :

(प्रतिकात्मक छायाचित्र)

१. ‘ब्लॅक फंगस्’चा (एक प्रकारच्या बुरशीचा) संसर्ग कसा होतो ?

‘ब्लॅक फंगस्’ ही एक प्रकारची बुरशी असून ती पालापाचोळा, तसेच प्राण्यांचे शेण या ठिकाणी आढळून येते. याचे बीज हवेतून वातावरणात पसरते आणि श्वासावाटे आपल्या नाकात जाते. आपली प्रतिकारशक्ती चांगली असेल, तर तिचा आपल्या शरिरावर कोणताही परिणाम होत नाही.

 

२. ‘ब्लॅक फंगस्’चा संसर्ग कुणाला होतो ?

होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता

अ. मधुमेह नियंत्रणात नसणारे रुग्ण, तसेच ‘एच्.आय.व्ही.’ झालेले रुग्ण यांची प्रतिकारशक्ती अल्प असल्यामुळे प्रामुख्याने त्यांना हा आजार होण्याचा संभव अधिक असतो.

आ. रक्तातील ‘न्युट्रोफिल’ या प्रकारच्या पांढर्‍या पेशी न्यून झाल्या असता या आजाराचा संसर्ग होतो.

इ. त्याचप्रमाणे कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर प्रतिकारशक्ती न्यून होत असल्यामुळे कोरोनानंतर मधुमेही रुग्णांमध्ये हा आजार दिसून येत आहे.

ई. कोरोनाच्या रुग्णांना विनाकारण अती प्रमाणात ‘स्टिरॉईड्स’ असलेली औषधे दिल्यास त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि त्यांची प्रतिकारशक्ती न्यून होऊन त्यांना या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

 

३. ‘ब्लॅक फंगस्’चे ४ प्रकार आणि त्याच्या प्रकारानुसार लक्षणे

३ अ. र्‍हायनोसेरेब्रल (Rhinocerebral)

या प्रकारामध्ये तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, नाकामध्ये रक्तसंचय होणे आणि ताप येणे, ही लक्षणे असतात. या बुरशीमुळे डोळे आणि मेंदू यांना रक्तपुरवठा करणार्‍या सूक्ष्म रक्तवाहिन्यांमधून होणार्‍या रक्त पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ‘दृष्टी जाणे’ आणि ‘अर्धांगवायू होणे’, अशा प्रकारचे आजार होतात.

३ आ. पल्मोनरी (Pulmonary)

ताप, खोकला आणि दम लागणे

३ इ. गॅस्ट्रिक (Gastric)

पोटामध्ये वेदना होणे, उलटी होणे आणि कधी कधी रक्ताच्या उलट्या होणे

३ ई. टिनीयल (Tineal)

कातडीला सूज येऊन ती लालसर काळी होणे

 

४. होमिओपॅथीचे औषधोपचार

४ अ. अर्सेनिक आल्ब (Arsenic alb)

४ अ १. रोगाची लक्षणे

अ. डोळ्यांची आग होऊन जळजळणारे पाणी वहाणे, डोळ्यांच्या पापण्या लाल होऊन डोळ्यांभोवती सूज येणे, डोळ्यांच्या बाहेरच्या बाजूला रक्तसंचय होऊन तीव्र वेदना होणे, डोळ्यांमध्ये फूल पडणे, उजेड सहन न होणे आणि गरम शेक दिल्याने बरे वाटणे

आ. नाकातून पातळ पाण्यासारखा जळजळणारा स्राव वाहणे, ‘नाक बंद झाले आहे’, असे वाटणे. सतत शिंका येणे. मोकळ्या हवेमध्ये लक्षणांमध्ये वाढ होणे आणि बंद खोलीमध्ये बरे वाटणे, नाकातून रक्तस्राव होणे आणि आग होणे

इ. तोंडवळ्याला सूज येऊन तो पांढरा पडणे आणि तोंडवळ्याला सुया टोचल्याप्रमाणे वेदना होणे

ई. अन्न, तसेच त्याचा वास सहन न होणे, अतिशय तहान लागणे. प्रत्येक वेळी थोडे थोडे; परंतु वरचेवर पाणी प्यावे वाटणे, काही खाल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर उलटी होणे, पोटात जळजळणार्‍या वेदना होणे, घशाशी आंबट पाणी येऊन घसा खवखवणे, सतत ढेकरा येणे, पिवळसर आणि रक्तमिश्रित उलट्या होणे, अतिशय थकवा येणे, अस्वस्थता, काळजी आणि भीती वाटणे. थंड पेय अथवा अन्न पोटात गेल्याने लक्षणांचा प्रकोप होणे, मध्यरात्रीनंतर लक्षणांचा प्रकोप होणे, तसेच अतिशय थकवा येणे

रुग्णामध्ये अशा प्रकारची लक्षणे असतांना त्याला ‘अर्सेनिक आल्ब’ हे औषध ३० ‘पोटॅन्सी’मध्ये (टीप) द्यावे.

उ. त्वचेला सूज येऊन आग होणे, त्वचा कोरडी आणि खरखरीत होणे, थंड हवेमध्ये आणि खाजवल्याने त्रासामध्ये वाढ होणे, त्वचेवर गांधी येऊन आग होणे

ऊ. ज्वर येऊन त्यासमवेत अतिशय थकवा येणे, थंड घाम येणे, अतिशय अस्वस्थता वाटणे, मध्यरात्रीनंतर लक्षणांमध्ये वाढ होणे, गरम पेय प्यायल्याने बरे वाटणे

वरील सर्व लक्षणांसाठी हे औषध ३० ‘पोटॅन्सी’मध्ये प्रतिदिन रात्री एकदा द्यावे.

(टीप : औषधाच्या ‘पॉवर’ला ‘पोटॅन्सी (शक्ती)’ म्हणतात.)

४ आ. थूजा (Thuja) :

या औषधामुळे प्रतिकारशक्ती वाढते. या औषधाचा परिणाम त्वचा, अन्ननलिका, रक्त, मूत्रपिंडे आणि मेंदू यांवर होतो. याचा मुख्य परिणाम त्वचेवर होतो.

४ आ १. लक्षणे

अ. कोणतीही लस घेतल्यानंतर होणारे दुष्परिणाम, खिळा ठोकल्याप्रमाणे डोक्यात वेदना होणे, डोक्याच्या डाव्या बाजूला वेदना होणे, डोळ्यांच्या पापण्या रात्री चिकटणे, डोळ्यांच्या पांढर्‍या भागाचा दाह होणे

आ. नाकातून हिरवट रंगाचा रक्तमिश्रित पू वाहणे, नाकपुड्यांमध्ये व्रण पडणे, नाक कोरडे पडणे, नाकाच्या मुळाशी वेदनायुक्त दाब जाणवणे

इ. जिभेच्या टोकावर तीव्र वेदना होणे

ई. भूक पूर्णपणे मंदावणे, खाल्यानंतर पोटात वेदना होणे आणि पोट फुगणे

उ. त्वचेवर येणार्‍या सर्व प्रकारच्या गाठी

ऊ. ज्वर आल्यावर केवळ शरिराच्या उघड्या भागावरच घाम येणे; परंतु डोक्याला घाम न येणे, घामाला मधाप्रमाणे वास येणे आणि रात्री लक्षणांचा प्रकोप होणे

अशी लक्षणे असतांना रुग्णाला ‘थूजा’ हे औषध ३० पोटॅन्सीमध्ये प्रतिदिन सकाळी द्यावे.

४ इ. काली आयोडाईड (Kali iodide)

४ इ १. लक्षणे

अ. नाकातून पाण्यासारखा आणि जळजळणारा स्राव पुष्कळ प्रमाणात वहाणे अन् नाकाच्या पोकळीमध्ये तीव्र वेदना होणे, नाकाला सूज येऊन त्याचा शेंडा लाल होणे

आ. डोळे लाल होऊन त्यामधून पुष्कळ स्राव येणे, डोळ्यांच्या पापण्या आणि तोंडाला सूज येणे

इ. थंड अन्नपदार्थ, पेये आणि दूध यांमुळे पोटाच्या तक्रारी वाढणे, पुष्कळ तहान लागणे

ई. न्यूमोनिया झालेला असतांना फुप्फुसाकडून पाठीकडे वेदना जाणे आणि जिना चढतांना दम लागणे

वरील लक्षणे असतांना हे औषध ३० ‘पोटॅन्सी’मध्ये प्रतिदिन ३ वेळा घ्यावे.

४ ई. कल्केरिया कार्ब (Calcarea carb)

४ ई १. लक्षणे

अ. डोळ्यातील श्वेतपटलाची अपारदर्शकता (कॉर्नियल ओपॅसिटी)

आ. विसराळूपणा, शंकेखोर वृत्ती आणि ग्रहणशक्ती अल्प असणे, तसेच रोग, संकटे, दुःखद घटना अन् वेडेपणा यांची भीती वाटणे, ‘काहीतरी अरिष्ट ओढवेल’, असा ग्रह होणे

इ. उंचवटा चढतांना चक्कर येणे, प्रतिदिन सकाळी डोकेदुखी चालू होणे आणि मानसिक श्रमाने, खाली वाकल्याने, तसेच मोकळ्या हवेत हिंडल्याने त्यामध्ये वाढ होऊन मळमळ चालू होऊन भोवळ येणे. (अशी लक्षणे असतांना ‘नक्स व्हॉमिका’ हे औषधही देता येते.) अशा रुग्णाला काळोखामध्ये बरे वाटते. ‘डोक्याच्या उजव्या बाजूला बर्फाचा खडा ठेवला आहे’, असे वाटणे, मुलांचे डोके मोठे असून टाळू भरून न येणे

ई. रात्री, तसेच झोपेतून जागे झाल्यावर घशाला कोरड पडणे, मुलांमध्ये दात येण्यास कठीण जाणे, दातांमध्ये नांगी मारल्याप्रमाणे कळा येणे आणि कोणत्याही आवाजाने अन् थंड पेय घेतल्याने त्या कळांमध्ये वाढ होणे

उ. भूक नसणे, शिजवलेले अन्न नकोसे वाटणे, स्वादिष्ट पदार्थ खावेसे वाटणे, दूध पचेनासे होणे, वारंवार ढेकरा येऊन खाल्लेल्या पदार्थाची चव तोंडाशी येणे, मुलांना दह्याप्रमाणे उलटी होणे, पोट फुगीर दिसून ते ‘बशी पालथी ठेवली असता जशी दिसते’, त्याप्रमाणे दिसणे, कंबरेभोवती घट्ट गुंडाळलेले वस्त्र सहन न होणे

ऊ. बद्धकोष्ठता, शौचाला कधी घट्ट, तर कधी ते चिखलाच्या रंगासारखे होणे, शौचाला पांढरट आणि पाण्यासारखे होऊन आंबूस असा घाण वास येणे, गुदद्वाराशी अतिशय कंड सुटणे

अशी लक्षणे असतांना हे औषध ३० ‘पोटॅन्सी (शक्ती)’ मध्ये प्रतिदिन ३ वेळा घ्यावे.

४ उ. कल्केरिया फॉस (Calcarea phos)

४ उ १. लक्षणे

हवेमध्ये पालट झाल्यानंतर होणारी डोकेदुखी, प्रत्येक वेळी खातांना पोटात वेदना होणे, मेंदूचा दाह (Meningitis) हे औषध ३० पोटॅन्सीमध्ये प्रतिदिन ३ वेळा घ्यावे.

रुग्णाला जी लक्षणे आहेत, त्यानुसार वरील औषधांपैकी योग्य ते औषध देणे उपयुक्त ठरते.

 

५. आजाराच्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास साहाय्य होणारी काही औषधे

अ. ऑसिमम स्कॅन (Ocimum scan) (तुळस) Q, + ॲझॅडिराचिटा (Azadirachita) Q + स्वरायटा चिरायटा (Swarita chirita) + इचिनेशिया (Echinecia A.) ही औषधे प्रत्येकी २० मि.लि. या प्रमाणात एकत्र करून त्या मिश्रणाचे २० थेंब दिवसातून ३ वेळा १/४ कप पाण्यातून घेतले असता या आजाराच्या विरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास साहाय्य होते.

आ. R 82 या औषधाचे ५ थेंब दिवसातून ३ वेळा १/४ कप पाण्यातून घतले असता बुरशीजन्य आजारांपासून संरक्षण होण्यास साहाय्य होते.

होमिओपॅथीमध्ये लक्षणांनुसार औषधयोजना केली जाते. त्यामुळे वरील औषधे घेतांना आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा.’

– होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, पुणे (१८.५.२०२१)
येथे दिलेल्या औषधांसह शासनाने प्राधिकृत केलेली वैद्यकीय चिकित्सा आणि औषधे घेणे टाळू नये. अन्य सर्व उपाययोजना पाळाव्यात, तसेच स्थळ, काळ आणि प्रकृती यांनुसार चिकित्सेत पालट होऊ शकतो. त्यामुळे योग्य त्या वैद्यांचा सल्लाही घ्यावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment