स्मृतिकार आणि गोत्रप्रवर्तक पराशर ॠषि यांचे तपोस्थळ अन् ‘पराशर ताल’

Article also available in :

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

देवभूमी हिमाचल

हिमाचल प्रदेशला ‘देवभूमी हिमाचल’ असे म्हटले जाते. हिमाचल प्रदेश हे युगानुयुगे देवता आणि ऋषीमुनी यांचे वास्तव्य स्थान आहे. वसिष्ठ, पराशर, व्यास, जमदग्नी, भृगु, मनु, विश्वामित्र, अत्री आदि अनेक ऋषींचे तपोस्थळ, तसेच शिव-पार्वती यांच्याशी संबंधित अनेक दिव्य स्थाने येथे आहेत. काही स्थाने मनुष्य पोचू शकतो, अशा कक्षेत, तर काही स्थाने गुप्त आहेत. अशा दिव्य स्थानांमध्येच एक तपोस्थळ आहे ‘पराशर ताल !’ ऋषि पराशर हे वसिष्ठ ऋषींचे नातू आणि महर्षि व्यास यांचे वडील होते. या ठिकाणी द्वापर युगात पांडवही आल्याचा उल्लेख आहे. अशा चैतन्यमय ठिकाणी जाऊन श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सर्व साधकांच्या आरोग्यासाठी आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी पराशर ऋषींना प्रार्थना केली.

 

श्री. विनायक शानभाग

 

‘पराशर ताल’ विषयीची वैशिष्ट्यपूर्ण माहिती

‘पराशर ताल’ हे स्थान हिमाचल प्रदेश राज्याच्या कुल्लु जिल्ह्यातील पराशर अरण्यात आहे. हे स्थान समुद्रपातळीपासून ९ सहस्र फूट उंचीवर आहे. ‘पराशर ताल’ हे एक रहस्यच आहे. येथे एक तलाव आहे आणि त्याच्या मध्यभागी एक छोटेसे द्वीप आहे. हे द्वीप तरंगत असते. तलावात हे द्वीप त्याचे स्थान पालटत असते. या आधी या तलावाची खोली मोजण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न करण्यात आले आहेत; पण ती कुणालाही मोजता आलेली नाही. वर्षातून ४ मास या भागात सर्वत्र बर्फ असल्याने हा तलाव गोठतो.

 

६ वर्षांच्या दैवी बालकाने एका रात्रीत बांधलेले
श्रीविष्णु, शिव आणि पराशर ऋषि यांचे लाकडी मंदिर

तलावाच्या बाजूला १३ व्या शतकात बांधलेले एक मोठे मंदिर आहे. ‘हे संपूर्ण मंदिर एका देवदार वृक्षाच्या लाकडाने एका ६ वर्षांच्या दैवी बालकाने एका रात्रीत बांधले’, असे तेथील पुजार्‍यांनी सांगितले. या मंदिरात पुष्कळ पूर्वी स्थापना केलेली श्रीविष्णूची मूर्ती आणि शिवलिंग आहे. काही वर्षांपूर्वी स्थानिक लोकांनी पराशर ऋषींची एक सुंदर मूर्ती या मंदिरात स्थापन केली आहे.

 

पराशर ऋषींचे माहात्म्य !

‘पराशर ऋषि’ हे स्मृतिकार आणि गोत्रप्रवर्तक ऋषि होते. ‘शाक्ती’ ऋषि त्यांचे वडील होते, तर वसिष्ठ ऋषि त्यांचे आजोबा होते. पराशर ऋषींचे सुपुत्र म्हणजे महर्षि व्यास यांनी वेद, उपनिषदे, पुराण आणि महाभारत आदी लिहिले अन् वेदांचे विभाजन केले. पराशर ऋषि हे सध्याच्या युगातील सप्तर्षींपैकी एक आहेत. त्यांनी ज्योतिष, कृषी आणि आयुर्वेद यांवर अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यामध्ये ‘बृहत्पराशर होराशास्त्र’ अत्यंत प्रसिद्ध आहे. ज्योतिष्यशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांसाठी हा ग्रंथ मूलग्रंथ मानला जातो. आज जी जन्मकुंडली मांडली जाते, त्याचे जनक पराशर ऋषि आहेत. पराशर ऋषींच्या चरणी सनातन संस्थेचे कृतज्ञतापूर्वक त्रिवार वंदन !’

– श्री. विनायक शानभाग (२०.६.२०२१)

 

वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. पराशर ताल येथे पोचण्यापूर्वी १० कि.मी. अंतरापासून सतत उदबत्तीचा सुगंध येत होता. या सुगंधाचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरच्या वातावरणातही तो येत होता. याविषयी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या की, येथे सिद्धपुरुष आणि ऋषिमुनी असल्याने त्यांच्या दैवी अस्तित्वाचा हा सुगंध आहे.

२. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ पराशर ताल येथे पोचल्या, तेव्हा त्यांनी त्या तलावातील छोट्या द्वीपाला प्रार्थना केली. त्यांनी प्रार्थना केल्यावर लगेचच पाण्याचा रंग निळा झाला आणि त्यावर सुंदर अशा दिव्य ज्योती वर आल्या. त्या दिव्य ज्योती स्फटिकासारख्या दिसत होत्या. त्या दिव्य ज्योती म्हणजे तेथे असलेल्या दिव्य शक्तीच होत्या. ‘साक्षात् श्रीविष्णूचे अवतार पराशर ऋषि यांनी ज्योती रूपात दर्शन दिले’, असे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले. हे सर्व श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना स्थुलातूनही दिसत होते. या वेळी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांच्या समवेत असलेले साधक सर्वश्री विनीत देसाई आणि वाल्मिक भुकन यांनाही ‘दर्शन घ्या’, असे म्हटल्यावर त्यांनाही त्या दिव्य ज्योतींचे दर्शन झाले.

– श्री. विनायक शानभाग, हिमाचल प्रदेश (२०.६.२०२१)

 

महर्षि व्यास यांचे पिता पराशर ऋषि यांचे
कुल्लु (हिमाचल प्रदेश) येथील तपोस्थळ आणि पराशर ताल यांचे छायाचित्रात्मक दर्शन !

पराशर ऋषींची मंदिरात बसवण्यात आलेली सुंदर मूर्ती

 

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि मागे दैवी तलावाजवळ ६ वर्षांच्या बालकाने बांधलेले मंदिर

 

पराशर ताल येथील दैवी तलाव, त्यामध्ये असलेले छोटे द्वीप आणि बाजूला असलेले श्रीविष्णु, शिव अन् पराशर ऋषि यांचे लाकडी मंदिर
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment