कुंडलीतील रवि-मंगळ युती योग

Article also available in :

 

१. कुंडलीतील रवि-मंगळ युती योग असतांना व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ?

‘रवि आणि मंगळ या दोन ग्रहांमध्ये अंशात्मक प्रथम दर्जाचा योग झाला असेल, तर व्यक्ती पराक्रमी, साहसी, शूर, जिद्दी, महत्त्वाकांक्षी आणि धाडसी असते. अशा व्यक्तींमध्ये दृढ आत्मविश्‍वास आणि नेतृत्वगुण असतो. त्या इतरांवर हक्क गाजवतात, विरोधकांवर मात करतात आणि प्रतिकूल परिस्थितीशी सामना करतात. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ठरण्यात त्याची लग्न रास, चंद्र रास आणि सूर्य रास यांचा विचार करणे महत्त्वाचे असते.

रवि आणि मंगळ या दोन ग्रहांमध्ये अंशात्मक युती योग, केंद्र योग किंवा प्रतियोग असेल, तर अशा व्यक्ती त्यांच्या क्षेत्रात धाडसी आणि पराक्रमी असल्याचे दिसते. रवि आणि मंगळ या ग्रहांमधील युती योग वेगवेगळ्या राशीतून आणि स्थानातून वेगवेगळी फळे देतात. कोणत्याही ग्रहाची फले ही त्याच्या महादशेत आणि अंतर्दशेत प्रामुख्याने मिळत असतात, तसेच स्थानगत फलांपेक्षा त्याचे इतर ग्रहांशी होणारे योग जास्त प्रभावी वाटतात.

सौ. प्राजक्ता जोशी

 

२. रवि आणि मंगळ या ग्रहांची ज्योतिषशास्त्रीय माहिती

रवि मंगळ
१. स्वराशी सिंह मेष आणि वृश्चिक
२. उच्च राशी मेष मकर
३. नीच राशी तूळ कर्क
४. तत्त्व तेज तेज
५. लिंग पुरुष पुरुष
६. स्थानबल दशम दशम७. दिशाबल पूर्व दक्षिण
७. दिशाबल पूर्व दक्षिण
८. काळबल मध्यान्ह मध्यान्ह
९. संपूर्ण दृष्टी सातव्या स्थानावर चौथ्या, सातव्या आणि
अष्टम स्थानावर
१०. शरिरातील
तत्त्व
अस्थि (हाडे) मज्जा शिरा
११. वर्ण क्षत्रिय क्षत्रिय

 

३. रवि-मंगळ युती योग असणार्‍या व्यक्ती

‘महाराष्ट्राचा कुंडली-संग्रह’ या ग्रंथातील काही ऐतिहासिक कुंडल्या अभ्यासतांना असे दिसते की, शहाजीराजे भोसले, बाजीराव बल्लाळ, महादजी शिंदे आणि रणजित सिंग यांच्या कुंडलीत रवि आणि मंगळ या दोन ग्रहांत युती योग झालेला आहे. सैन्यात नोकरी केलेल्या, लष्करात कार्य केलेल्या व्यक्तींच्या कुंडलीत रवि-मंगळ युती योग आहे. या व्यतिरिक्त क्रांतीकारक राजगुरु, धडाडी आणि शिकार यांसाठी प्रसिद्ध असलेले तालमीचा नाद असलेले कोल्हापूर येथील शाहू महाराज आणि सदैव सत्याग्रही जीवन जगलेले क्रांतीकारक सेनापती बापट यांच्या कुंडलीत रवि-मंगळ या दोन ग्रहांत युती योग झालेला पहायला मिळतो. हिटलर, नेपोलियन आणि लेनिन यांच्या कुंडलीतही रवि-मंगळ या दोन ग्रहांमध्ये युती योग आहे.

३ अ. श्री. शाहू महाराज (जन्मदिनांक : २७.६.१८७४)

श्री. शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे अधिपती होते. हे दानशूर आणि शिक्षणप्रेमी होते. दलित (अस्पृश्य) आणि मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाचे कार्य केल्याने त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. यांना शिकारीचा छंद होता. त्यांनी जातीभेद दूर करण्यासाठी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. यांच्या कुंडलीत रवि-मंगळ युती चतुर्थ स्थानात मिथुन राशीत आहे. रवि-मंगळ युती मर्दानी खेळ, धाडसी कामे, शिकार यांसाठी शुभ असते. यांच्या कुंडलीत शनि-शुक्र प्रतीयोग आणि शुक्र-हर्षल युती योग आहे.

३ आ. श्री. चंद्राबाबू नायडू (जन्मदिनांक : २७.४.१९५१, सकाळी ६.३० मि., हैद्राबाद)

श्री. चंद्राबाबू नायडू हे आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी हैद्राबादमध्ये ‘माहिती तंत्रज्ञान केंद्र’ बनवण्यासाठी प्रयत्न केले. यांच्या कुंडलीत रवि-मंगळ युती मेष राशीत म्हणजे रवि उच्च राशीत आणि मंगळ स्वराशीत आहे. गुरु आणि शुक्र ग्रह स्वराशीत आहेत.

३ इ. श्री. राज ठाकरे (जन्मदिनांक : १४.६.१९६८, सायंकाळी ५.४४ मि., मुंबई)

श्री. राज ठाकरे हे शिवसेनेचे नेते होते. ते ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक आणि ग्रामीण विकासासाठी कार्य चालू केले. यांच्या कुंडलीत रवि-मंगळ युती अष्टमात अष्टमेश बुध युक्त आणि शुक्र ग्रह स्वराशीत आहे.

३ ई. सेनापती बापट (जन्मदिनांक : १२.११.१८८०, सकाळी ९.०० मि.)

सेनापती बापट हे थोर क्रांतीकारक, पुढारी आणि सत्याग्रही होते. त्यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले; म्हणून जनतेने त्यांना ‘सेनापती’ ही पदवी दिली. आरंभीच्या काळात ते शिक्षक होते. स्वातंत्र्योत्तर काळात ‘भाववाढ विरोधी आंदोलन’, ‘गोवामुक्ती आंदोलन’, ‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलन’ इत्यादी आंदोलनांत त्यांनी पुढाकार घेतला. स्वच्छता आणि समाजसेवा यांचे व्रत त्यांनी जन्मभर पाळले. यांच्या कुंडलीत रवि-मंगळ युती व्यय स्थानात तूळ राशीत आहे. पंचमेश गुरु पंचमात स्वराशीत आहे.

३ उ. श्री. महादजी शिंदे (जन्मदिनांक : ३.१२.१७३०)

श्री. महादजी शिंदे हे मराठ्यांचे शूर सरदार होते. इंग्रज त्यांना मानाने ‘द ग्रेट मराठा’ असे म्हणत. पानिपतच्या तिसर्‍या लढाईनंतर त्यांनी मराठा साम्राजाला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे कार्य केले. यांच्या कुंडलीत रवि-मंगळ युती तृतीय स्थानात मेष राशीत, गुरु लाभ स्थानी स्वराशीत, शुक्र चतुर्थात स्वराशीत आणि शनि ग्रह भाग्य स्थानात उच्च राशीत आहे.

३ ऊ. थोरले बाजीराव पेशवे (जन्मदिनांक : १८.८.१७००)

थोरले बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या ४० वर्षांच्या आयुष्यात अनेक पराक्रम गाजवले, तसेच अनेक लढाया केल्या. वेगवान हालचाल हेच त्यांचे प्रभावी हत्यार होते. यांच्या कुंडलीत रवि-मंगळ युती प्रथम स्थानात मेष राशीत, चंद्र स्वराशीत, शुक्र उच्च राशीत आणि गुरु अन् शनि हे दोन ग्रह नीच राशीत आहेत.’

३ ए. श्री. पी.व्ही. नरसिंहराव (जन्मदिनांक : २८.६.१९२१, सकाळी ११.३० मि., करीमनगर)

श्री. पी.व्ही. नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान होते. ते आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री होते. ते अनेक खात्यांचे मंत्री होते. त्यांची मातृभाषा तेलुगु होती. त्यांना तेलगु, तमिळ, मराठी, हिंदी, संस्कृत, उडिया, बंगाली, गुजराती, इंग्रजी, फ्रान्सीसी, अरबी, स्पॅनिश, जर्मन आणि पर्शियन अशा अनेक भाषा येत होत्या. यांच्या कुंडलीत रवि-मंगळ युती दशमांत मिथुन राशीत हर्षल ग्रहाच्या नवपंचम योगात आहे. दशमेश बुध ग्रह दशमात वर्गोत्तम नवमांशी आहे.

(सर्व कुंडल्यांचा संदर्भ : ‘महाराष्ट्राचा कुंडली-संग्रह’, लेखक : श्री. म.दा. भट आणि श्री. व.दा. भट)

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषणशास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा. (६.१.२०२१)

Leave a Comment