‘गणेशोत्सवाच्या काळात वातावरणात निर्माण झालेले चैतन्य टिकून राहून समष्टीला त्याचा लाभ व्हावा’, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करणे आवश्यक !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यु.टी.एस्.
(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘गणेशोत्सव हा हिंदूंचा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा सार्वजनिक धार्मिक उत्सव आहे. हिंदूंमध्ये धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा वाढीस लागावी अन् हिंदूंच्या संघटिकरणाला हातभार लागावा, या उदात्त हेतूंनी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला. वर्ष २०१८ मध्ये एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘एक गाव एक गणपति’ या संकल्पनेनुसार सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशमूर्तीवर तेथील वातावरणाचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यु.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत श्री गणेशचतुर्थीला (१३.९.२०१८ या दिवशी) पूजनापूर्वी आणि पूजनानंतर, तसेच अनंत चतुर्दशीला (२३.९.२०१८ या दिवशी) आरतीपूर्वी आणि आरतीनंतर श्री गणेशमूर्तीच्या ‘यु.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यु.टी.एस्.’उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’,‘घटकाची प्रभावळ मोजणे’,‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/ tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

२ अ १. श्री गणेशमूर्तीमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच,असे नाही.

२ आ १. श्री गणेशचतुर्थीला पूजनानंतर, तसेच अनंत चतुर्दशीला आरतीनंतर श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे.
श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (मीटर)
पूर्वी
(टीप १)
नंतर
(टीप १)
सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत झालेली वाढ
१. श्री गणेशचतुर्थी (१३.९.२०१८ – श्री गणेशपूजन) (टीप २) ४.६८ ४.६८
२. अनंत चतुर्दशी (२३.९.२०१८ – श्री गणेशाची आरती) ३.१५ ४.२७ १.१२

टीप १ – ‘पूर्वी’ म्हणजे १३.९.२०१८ या दिवशी पूजनापूर्वी आणि २३.९.२०१८ या दिवशी आरतीपूर्वी. तसेच ‘नंतर’ म्हणजे पूजनानंतर आणि आरतीनंतर.

टीप २ – पूजनापूर्वी श्री गणेशमूर्तीची सकारात्मक ऊर्जा मोजतांना ‘यु.टी’ स्कॅनरने ९० अंशाचा कोन केला. स्कॅनरने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते. त्यामुळे येथे प्रभावळीची नोंद नाही.

२ इ. एकूण प्रभावळीच्या (टीप) संदर्भात केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे विवेचन

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.

२ इ १. श्री गणेशचतुर्थीला पूजनानंतर, तसेच अनंत चतुर्दशीला आरतीनंतर श्री गणेशमूर्तीच्या एकूण प्रभावळीत वाढ होणे.
श्री गणेशमूर्तीची एकूण प्रभावळ (मीटर)
पूर्वी
(टीप १)
नंतर
(टीप १)
एकूण प्रभावळीत झालेली वाढ
१. श्री गणेशचतुर्थी (१३.९.२०१८ – श्री गणेशपूजन) ५.४८ ६.२१ ०.७३
२. अनंत चतुर्दशी (२३.९.२०१८ – श्री गणेशाची आरती) ३.९७ ४.६१ ०.६४

टीप १ – ‘पूर्वी’ म्हणजे १३.९.२०१८ या दिवशी पूजनापूर्वी आणि २३.९.२०१८ या दिवशी आरतीपूर्वी. तसेच ‘नंतर’म्हणजे पूजनानंतर आणि आरतीनंतर.

 

३. केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री
गणेशमूर्तीमध्ये आरंभी सकारात्मक ऊर्जा अत्यल्प असण्यामागील कारण

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती नेहमी एकत्रित असते’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत. त्यामुळे देवतेचे रूप आले की, तिची शक्ती तेथे असतेच. प्रत्येक देवतेच्या रूपाचे वर्णन द्रष्ट्या ऋषिमुनींनी धर्मशास्त्रात लिहून ठेवले आहे. त्यामुळे मूर्तीकाराने स्वतःच्या कल्पनेने बनवलेल्या एखाद्या देवतेच्या मूर्तीपेक्षा धर्मशास्त्रात दिलेल्या वर्णनानुसार असलेल्या त्या देवतेच्या मूर्तीत त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात असते. मूर्तीकाराचा मूर्ती बनवण्यामागील उद्देश, मूर्तीच्या निर्मितीसाठी उपयोगात आणलेले घटक (माती, रंग आदी), मूर्ती बनवण्याचे ठिकाण, मूर्तीकाराचा देवतेप्रती भाव इत्यादी घटकांवर मूर्तीची सात्त्विकता अवलंबून असते. मूर्ती जितकी सात्त्विक असेल, तेवढे तिच्यात चैतन्य अधिक येईल. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशमूर्तीमध्ये अत्यल्प सात्त्विकता होती. त्यामुळे वैज्ञानिक चाचणीत या मूर्तीमध्ये अत्यल्प सकारात्मक ऊर्जा आढळली. ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सात्त्विक श्री गणेशमूर्तीची निवड करणे आवश्क आहे’, हे पुढील सारणीतून लक्षात येईल. (‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने वर्ष २०१८ मध्ये श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी पूजनापूर्वी आणि पूजनानंतर एकूण ४ गणेशमूर्तींच्या चाचण्या केल्या. त्या मूर्तींच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुढे दिली आहे.)

श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (मीटर)
श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी पूजनापूर्वी श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी पूजनानंतर
१. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशमूर्ती (टीप १) ४.६८
२. दीड दिवस पूजण्यात आलेली सनातन संस्थेचे साधक श्री. आत्माराम जोशी यांच्या घरातील श्री गणेशमूर्ती २.७० ४.१०
३. पाच दिवस पूजण्यात आलेली सनातन संस्थेचे साधक श्री. उमेश नाईक यांच्या घरातील श्री गणेशमूर्ती १.७० २.०६
४. सनातन-निर्मित धूम्रवर्ण (श्‍वेत रंगाची) श्री गणेशमूर्ती ५.६२ (टीप २) ६. ४२ (टीप २)

टीप १ – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशमूर्तीमध्ये पूजनापूर्वी अत्यल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ मोजता येईल इतकी ती नव्हती.

टीप २ – सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्ती गत काही वर्षांपासून सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवली आहे. तिचे पूजन केले जात नाही. तिच्या समोर बसून साधक नामजपादी साधना करतात. श्री गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी सनातन- निर्मित धूम्रवर्ण (श्‍वेत रंगाची) श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ५.६२ मीटर होती. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी तिच्यावर पूजनादी संस्कार केले नसतांनाही तिच्या सकारात्मक ऊर्जेत ०.८० मीटर वाढ होऊन ती ६.४२ मीटर झाली.

३ आ. गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवाच्या काळात वातावरणातील
चैतन्य टिकून रहावे, यासाठी गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करणे आवश्यक !

घरात ‘दीड दिवस’ आणि ‘पाच दिवस’ श्री गणेशमूर्ती पूजल्याने केवळ त्या घरातील पूजकाला अन् त्याच्या कुटुंबियांना लाभ होतो. त्या मूर्तीतील चैतन्य केवळ त्या घरापुरते मर्यादित रहाते. त्यामुळे प्राणप्रतिष्ठापनेनंतर दीड आणि पाच दिवस पूजलेल्या घरातील श्री गणेशमूर्तींच्या सकारात्मक ऊर्जेत पूजनानंतर झालेली वाढ पुरेशी आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशमूर्तीमुळे समाजातील अनेक भाविकांना चैतन्याचा लाभ होऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या वतीने मूर्ती बसवण्यामागील उद्देश व्यापक असल्याने, त्या मूर्तीमध्ये अधिक प्रमाणात सात्त्विकता असणे आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशमूर्तीवर पूजनादी संस्कार भावपूर्ण करणे, तसेच पुढील दहा दिवसांत तेथील वातावरणातील चैतन्य टिकून रहावे, यासाठी गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करणे आवश्यक ठरते.

श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी पूजनानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ४.६८ मीटर होती. अनंत चतुर्दशीला, म्हणजे ११ व्या दिवशी आरतीपूर्वी श्री गणेशमूर्तीच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ३.१५ मीटर होती. यातून ‘चाचणीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री गणेशपूजन भावपूर्ण करण्यासह तेथील चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले’, असे लक्षात येते. (सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सात्त्विक श्री गणेशमूर्ती बसवल्यास, तसेच गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा केल्यास त्यातून होणारे लाभ द्विगुणीत होतील. – संकलक)

३ इ. सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्ती धर्मशास्त्रात दिलेल्या
गणपतीच्या रूपाच्या वर्णनानुसार, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी
काळानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार बनवलेली असल्याने तिच्यात पुष्कळ चैतन्य असणे

सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्ती पुष्कळ सात्त्विक असल्याने तिच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ चाचणीच्या आरंभीच ५.६२ मीटर, म्हणजे पुष्कळ अधिक आहे. याचे कारण – ‘सनातन-निर्मित धूम्रवर्ण (श्‍वेत रंगाची) श्री गणेशमूर्ती साधक-मूर्तीकाराने धर्मशास्त्रानुसार (धर्मशास्त्रात दिलेल्या गणपतीच्या रूपाच्या वर्णनानुसार), तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार भक्तीभावाने बनवली आहे. ही मूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या उच्च प्रतीची स्पंदने प्रक्षेपित करते. त्यामुळे ही मूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या अधिक प्रमाणात लाभदायक ठरण्यासह तिच्यामध्ये उच्च प्रतीच्या आध्यात्मिक अनुभूती देण्याची क्षमतासुद्धा आहे.

सनातन-निर्मित धूम्रवर्ण श्री गणेशमूर्तीवर पूजनादी संस्कार केलेले नसतांनाही तिच्या सकारात्मक ऊर्जेत श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी ०.८० मीटर वाढ झाली. याचे कारण – ‘गणेशचतुर्थीच्या दिवशी गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते. ही मूर्ती धर्मशास्त्रानुसार आणि स्पंदनशास्त्राचा अभ्यास करून बनवली आहे. त्यामुळे या मूर्तीमध्ये श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात कार्यरत असलेले गणेशतत्त्व आकृष्ट होऊन ते प्रक्षेपित झाले.’

 

४. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्री गणेशोत्सव
आदर्श पद्धतीने साजरा केल्यास गणेशोत्सवाच्या काळात
वातावरणात निर्माण झालेले चैतन्य टिकून राहून समष्टीला त्याचा लाभ होईल !

हिंदूंमध्ये धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा वाढीस लागावी अन् हिंदूंच्या संघटिकरणाला हातभार लागावा, या उदात्त हेतूंनी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला होता. परंतु सध्या सार्वजनिक गणेशोत्सवात होणारे विविध अनुचित प्रकार आणि अनुशासनहीनता (बेशिस्तपणा) यांमुळे उत्सवाच्या मूळ हेतूला हरताळ फासला जाण्यासह उत्सवाचे पावित्र्यही लोप पावत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव हे समाज – प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण माध्यम असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे दायित्व पुष्कळ अधिक आहे. सर्वत्रच्या गणेशोत्सव मंडळांनी ‘एक गाव एक गणपति’ ही संकल्पना अंगीकारणे ही काळाची आवश्यकता आहे. गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करण्यासाठी प्रयत्न केल्यास गणेशोत्सवाच्या काळात वातावरणात निर्माण झालेले चैतन्य टिकून राहून समष्टीला त्याचा लाभ होईल.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

ई-मेल : [email protected] 

Leave a Comment