हिंदु राष्ट्रवाद आपल्या देशाचा धर्म असून ती काळाची आवश्यकता ! – कांची कामकोटीपीठाचे जगद्गुरु श्री शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वती

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वती यांचा ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला आशीर्वाद !

जगद्गुरु शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वती महाराज

 

१. स्वत:पेक्षा आणि कुटुंबापेक्षाही समाज अन् देश यांचा
आपल्यावर अधिक अधिकार आहे, हे प्रत्येक हिंदूने ध्यानात ठेवावे !

हिंदु राष्ट्रवाद ही आमची लौकिक जीवनातील मूलभूत धारणा आणि सिद्धांत आहे. हा राष्ट्रवाद आपण प्राप्त केला पाहिजे. मानव म्हणून जीवन व्यतीत करण्यापूर्वी आपण एक राष्ट्र म्हणून जीवन जगले पाहिजे. शक्ती, एकता आणि संपूर्णता प्राप्त करण्यासाठी आपण जीवनात राष्ट्रवाद अंगीकारला पाहिजे. यामुळे मानवतेसाठी एक राष्ट्र म्हणून जीवन जगण्यासाठी साहाय्यभूत ठरेल. ज्याप्रमाणे सामर्थ्यवान आणि स्वतंत्र मनुष्यच परोपकार करू शकतो, तसेच राष्ट्राचे आहे.

स्वत:पेक्षा आणि कुटुंबापेक्षाही समाज अन् देश यांचा आपल्यावर अधिक अधिकार आहे, हे प्रत्येक हिंदूने ध्यानात ठेवले पाहिजे. हिंदु राष्ट्रवाद आपल्या देशाचा धर्म आहे आणि सध्या ही काळाची आवश्यकता आहे. नुसत्या राष्ट्रप्रेमाला मर्यादा असते; परंतु हिंदु राष्ट्रवाद एक मोठा उद्देश आणि महत्त्वाकांक्षा घेऊन सर्वांना समाविष्ट करतोे.

 

२. आपल्या मातृभूमीतील सर्वच गोष्टींत आध्यात्मिक चैतन्य !

आपण विश्‍वासाचे मूर्त रूप आहोत, हे समजून घेतले पाहिजे. सध्या आम्हाला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा विश्‍वासाची अधिक आवश्यकता आहे. स्वत:वर, राष्ट्रावर आणि राष्ट्राच्या भविष्यावर विश्‍वास हवा. आपलेे भविष्य पूर्णपणे देशाच्या भविष्यावर अवलंबून आहे. त्याचबरोबर दुसर्‍या बाजूने आम्हीच आमच्या देशाचे भाग्यविधाते आहोत. आम्हाला आमच्या मातृभूमीला महान, श्रेष्ठ, शुद्ध आणि आदरणीय बनवायचे आहे. आम्हाला स्वत:ला महान, श्रेष्ठ, शुद्ध आणि आपल्या मातृभूमीचे महान लक्ष्य पूर्ण करण्यायोग्य अन् देशाचे नेतृत्व करण्यायोग्य बनवायला हवे. आपली मातृभूमी ही विश्‍वातील असे एकमेव स्थान आहे, जेथील माती, नदी, वृक्ष-वेली, पशू-पक्षी आणि मनुष्य या सर्वांमध्येही आध्यात्मिक चैतन्य आहे. यामुळेच आपल्या मातृभूमीकडे जतन करण्याजोगा आणि संपूर्ण जगाला देण्याजोगा संदेश आहे. हिंदु राष्ट्रवाद हा एका सहज आणि महान जीवनासाठी आहे.

 

३. हिंदु राष्ट्रात अध्यात्म हा केंद्रबिंदू असेल !

सनातन धर्म हाच आमचा राष्ट्रवाद आहे. आपण सनातन धर्मात जन्म घेतला आहे आणि या धर्मानुसारच आपण प्रगती करत आहोत अन् विकसित होत आहोत. जेव्हा आपण सनातन धर्माचा त्याग करतो, तेव्हा आपण राष्ट्राचाही त्याग करतो. आपली मातृभूमी सर्वश्रेष्ठ आणि उत्कृष्ट अशा भविष्यकाळाची अधिकारी आहे अन् हेच मानवजातीच्या कल्याण्यासाठी अत्यावश्यक आहे. भारतीय राष्ट्रवाद एक शाश्‍वत धर्म आहे, जो सर्व पंथ, विज्ञान आणि तत्त्वज्ञान यांमध्ये सामंजस्य प्रस्थापित करून मानवजातीला पुनर्जीवित करतो. प्रत्येक हिंदूने सदैव स्मरणात ठेवले पाहिजे की, तो सर्वसाधारण मनुष्य नाही. जेवढे आपले पर्वत आणि नद्या प्राचीन आहेत, तेवढे आपण प्राचीन आहोत. प्राचीन संत आणि ऋषी यांचे आम्ही वंशज आहोत. आम्हा सनातन धर्मियांना त्रास सहन करण्याची सवय आहे. आमच्या आत असलेली आध्यात्मिक शक्ती आमच्या शारीरिक शक्तीपेक्षा अधिक प्रभावी, तेजस्वी आहे. आपल्या हिंदु राष्ट्रात अध्यात्म हा केंद्रबिंदू असेल, जे आमच्या अस्तित्वाचे मूळ आहे. अध्यात्म हाच आमचा जन्मजात स्वभाव आहे. हिंदु राष्ट्र या आध्यात्मिकतेशी जोडलेले आहे. यामुळे आपण ज्यासाठी हे सर्व करत आहोत, तो विकास साधला जाईल.

 

४. अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी (ऑनलाईन) ‘नवम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आल्याचे ऐकून आम्हाला आनंद झाला.

‘हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेले हे अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे आणि अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सेवारत असलेल्या सर्वांना भरभरून कृपाशीर्वाद मिळावा’, अशी श्री महात्रिपुरसुंदरीसहित श्री चंद्रमोळीश्‍वर स्वामी यांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो.’

– जगद्गुरु शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वती महाराज

Leave a Comment