आकाशात विजांचा कडकडाट होत असल्यास पुढील काळजी घेऊन सुरक्षित रहा !

Article also available in :

पावसाळ्यात पर्जन्यवृष्टी होऊन विजांचा कडकडाट होतो. काही वेळा अन्य ऋतूंमध्येही आकाशात विजा चमकतात. विजेचा प्रकाश आणि तिचा आवाज यांत ३० सेकंदापेक्षा अल्प अंतर असेल, तर ती वीज धोकादायक असते. कडाडणार्‍या विजा भूमीवर आदळून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी करू शकतात. ‘अशा वेळी कोणती दक्षता घ्यावी ?’, हे पुढे दिले आहे.

 

१. महत्त्वाच्या सूचना

अ. ‘वीज पडल्यास इमारतीला धोका पोचू नये आणि जीवितहानी होऊ नये’, यासाठी प्रत्येक इमारतीवर ‘वीज निवारक’ (‘लाईटनिंग अरेस्टर’) यंत्रणा बसवणे अनिवार्य आहे. ‘आपल्या इमारतीवर ‘वीज निवारक यंत्रणा’ उभारण्यात आली आहे ना ?’, याची निश्‍चिती करावी.

आ. घरातील ओल्या भिंती, धातूचे फर्निचर आदी विजेचे संवाहक आहे. घराच्या बाहेर वीज पडल्यास घराच्या ओलाव्याने धोका उद्भवू शकतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी घराच्या भिंतींची ओल काढून घ्यावी आणि ‘भविष्यात पुन्हा ओल येऊ नये’, यासाठी बांधकाम तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन घराची दुरुस्ती करावी.

इ. तार विद्युत-वाहक असल्याने घर, शेत, बाग आदींभोवती शक्यतो तारेचे कुंपण घालू नये. पूर्वीच कुंपण घातले असल्यास त्यापासून हानी उद्भवू नये, यासाठी त्याला चांगले ‘अर्थिंग’ करावे.

ई. आपल्या इमारतीच्या किंवा घराच्या बाहेेरील रस्त्यांवरून ‘हाय टेंन्शन’ विद्युत तारा जात असल्यास आणि शेजारी झाडे असल्यास पाऊस किंवा वारा यांमुळे झाडे तारांवर पडून जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे स्थानिक विद्युत खात्याला संपर्क करून विजेच्या तारांजवळ असलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यास सांगावे.

उ. कोणत्याही विद्युत तारांच्या खाली उभे राहू नये, तसेच तेथे भ्रमणभाषवर बोलू नये. त्या खाली जनावरे उभी रहाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. विद्युत तारांमधून ठिणग्या पडत असल्यास (‘स्पार्किंग’) होत असल्यास त्वरित विद्युत खात्याला कळवावे.

ऊ. विजेचे खांब, विद्युत तारा, तसेच झाडे यांच्याखाली दुचाकी वा चारचाकी वाहने उभी केल्यास वादळामुळे खांब आणि झाडे उन्मळून त्यांच्यावर पडून मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे तेथे वाहने उभी करणे, वाहन चालवत नेणे आदी करू नये.

ए. पावसाळ्यात अनिश्‍चित कालावधीसाठी विद्युत पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे घरात पणत्या, मेणबत्त्या, विजेरी (टॉर्च), कंदील आदींची व्यवस्था करावी.

ऐ. प्रशासनाकडून वेळोवेळी प्रसारित होणार्‍या सूचनांचे पालन करावे. त्यांकडे दुर्लक्ष करू नये.

 

२. वीज चमकत असतांना घरी असल्यास कोणती दक्षता घ्यावी  ?

अ. घराबाहेर पडू नये, तसेच आगाशीत जाऊ नये.

आ. घरातील विद्युत प्रवाहाची मुख्य कळ (मेन स्विच) बंद करून विद्युत प्रवाह खंडित करावा. दूरचित्रवाणी संच, मिक्सर आदी विद्युत उपकरणांची पिन ‘सॉकेट’मधून काढून ठेवावी.

इ. या काळात उद्वाहक यंत्र (लिफ्ट), वातानुकूलन यंत्र (ए.सी.), हेअर ड्रायर आदींचा वापर करू नये. शीतकपाटाला (फ्रिजला) स्पर्श करणे टाळावे. ‘भ्रमणभाष संचाचा वापर करावा कि नाही ?’, या संदर्भात मतमतांतर आहे, तरी सुरक्षेच्या दृष्टीने भ्रमणभाष वापरणे टाळावे.

ई. बाहेरून पाणीपुरवठा करणारा नळ लोखंडी असल्यास त्याला स्पर्श करू नये.

उ. ओल्या भिंतींना स्पर्श करू नये.

ऊ. काही वेळा आपत्कालीन स्थितीत खोटे संदेश सर्वत्र प्रसारित केले जातात. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. शासनाने अधिकृतरित्या प्रसारित केलेली माहिती ग्राह्य धरावी.

 

३. घराबाहेर असतांना घ्यावयाची दक्षता

अ. मोकळ्या आकाशाखाली (उदा. पठार, समुद्र किनारा, मैदान), तसेच विजेचे खांब, ‘मोबाईलचे टॉवर’, दलदलीचे ठिकाण, पाण्याची टाकी, पत्र्याची ‘शेड’ आदी ठिकाणी थांबू नये.

आ. दुचाकी वाहन अथवा ट्रॅक्टर चालवत असल्यास किंवा नौकेतून जात असल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे. चारचाकी वाहनातून प्रवास करत असल्यास वाहनातच थांबावे.

इ. झाडे आणि विजेचे खांब यांपेक्षा दूर अशा सुरक्षित ठिकाणी दुचाकी वा चारचाकी वाहने लावावीत. चारचाकी वाहनांची दारे आणि खिडक्या व्यवस्थित बंद केल्याची निश्‍चिती करावी. त्यांच्या चाकांखाली दगडाचे वजनदार गतीरोधक लावावेत; कारण वादळाच्या वार्‍याने वाहने भरकटण्याची शक्यता असते.

ई. झाडांकडे वीज आकर्षित होत असल्याने कुठल्याही झाडाखाली थांबू नये. विजेचा लोळ भूमीपेक्षा उंच ठिकाणी अधिक आकर्षित होत असल्याने तेथे जिवाला धोका होऊ शकतो.

उ. पाऊस पडत असल्यास अथवा पावसाने सर्वत्र ओल झाली असल्यास कोणत्याही विजेच्या खांबाला स्पर्श करू नये; कारण ओलाव्यामुळे विजेचा झटका (‘शॉक’) बसू शकतो.

ऊ. रस्त्यावर पडलेली झाडे-झुडपे यांना स्पर्श करणे टाळावे. त्या झाडांवर वीजवाहक तारा पडल्या असण्याची शक्यता असते.

ए. पाणी वीजवाहक असल्याने पाण्याच्या स्रोतांपासून दूर रहावे.

ऐ. शेतात किंवा पाण्यात काम करणार्‍या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी जावे.

ओ. विजेवर चालणारे यंत्र, तसेच धातूपासून बनवलेल्या वस्तू वीजवाहक असल्याने त्या वापरू नयेत. अशा वेळी धातूच्या तारा असलेल्या छत्रीचा वापर करणे टाळावे.

 

४. वीज चमकणे बंद झाल्यावर करावयाच्या कृती

अ. वातावरण पूर्ववत् होईपर्यंत घराबाहेर पडू नये.

आ. वादळ आणि पाऊस यांमुळे परिसरातील झाडे पडली असतील अथवा वीजवाहक तारा तुटल्या असतील, तर त्यांना स्पर्श करू नये. अग्नीशमन दल आणि विद्युुत खाते यांना कळवावे.

इ. घरातील गॅसच्या ‘सिलिंडर’मधून गॅसची गळती होत असल्यास विद्युत प्रवाहाची मुख्य कळ (‘मेन स्विच’) बंद करावी. सिलिंडर वार्‍याच्या संपर्कात येईल, अशा ठिकाणी (उदा. आगाशीत) ठेवावा. घरात गॅसचा वास पसरला असल्यास विद्युत कळ दाबू नये.

ई. वाहने, विद्युत उपकरणे, तसेच घरातील साहित्य नवीन असल्यास आणि त्यांचा विमा (इन्शुअरन्स) उतरवलेला असेल अन् नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली हानीभरपाई मिळणार असेल, तर विमा प्रतिनिधींचे मार्गदर्शन घ्यावे. हानी झालेल्या घरातील वस्तूंची आवराआवरी करण्यापूर्वी त्यांची प्रथम छायाचित्रे काढावीत आणि त्यांचा पंचनामा करून घ्यावा.

आपत्तींच्या प्रसंगी ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’च्या (National Disaster Management Authority च्या) ०११-१०७८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मार्गदर्शन घेता येईल.

 

आपत्कालीन स्थितीत केवळ भगवंतच आपले रक्षण करू शकत असल्याने नित्य साधना करा !

नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने भौतिक स्तरावरची कितीही उपाययोजना केली, तरी आपले रक्षण होण्यासाठी भगवंताची नित्य आराधना करायला हवी. अशा स्थितीला धैर्याने सामोेरे जाण्यासाठी प्रतिदिन साधनेचे प्रयत्न करून आत्मबळ निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपत्ती ओढवल्यावर नव्हे, तर आतापासूनच साधनेला आरंभ करावा.

‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्‍लोक ३१) म्हणजेच ‘माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही’, असे भगवंताचे वचन आहे. येणार्‍या आपत्काळासाठी भगवंताला शरण जाऊन आतापासूनच भक्तीभावाने साधना करा आणि भगवंताचे भक्त बना !

वाचकांना आवाहन !

वीज पडणे, या विषयाच्या अनुषंगाने वाचकांना काही सूत्रे सुचवायची असल्यास त्यांनी ती खालील संगणकीय किंवा टपाल पत्त्यावर पाठवावीत, ही विनंती ! यामुळे हा विषय समाजापुढे सखोलपणे मांडण्यास साहाय्य होईल.

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

Leave a Comment