चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी करावयाची पूर्वसिद्धता आणि प्रत्यक्ष आपत्कालीन स्थितीत करावयाच्या कृती

Article also available in :

मे आणि जून या मासांत भारताला ‘अम्फान’ अन् ‘निसर्ग’ या शक्तीशाली चक्रीवादळांना सामोरे जावे लागले. २०.५.२०२० या दिवशी भारताच्या पूर्व किनारपट्टीला ‘अम्फान’, तर २ आणि ३ जून २०२० या दिवशी मुंबईसह कोकण किनारपट्टीला ‘निसर्ग’ या चक्रीवादळांचा फटका बसला.

मनुष्याला धडकी भरेल, इतका असलेला वार्‍याचा प्रचंड वेग आणि मुसळधार पाऊस अशा स्वरूपातील या वादळांमुळे मोठ-मोठे वृक्षही उन्मळून पडले. घरांच्या भिंती ढासळणे, छत उडून जाणे, आदींमुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. असंख्य लोक बेघर झाले. बर्‍याच ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. मोबाईलचे नेटवर्क ठप्प झाल्याने संपर्क यंत्रणाही तुटली. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. निसर्गाने धारण केलेले हे रौद्र रूप पाहून नागरिक भयभीत झाले.

‘चक्रीवादळ, अतीवृष्टी, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना कधी सामोरे जावे लागेल ?’, हे सांगता येत नाही. कोणत्याही क्षणी अशी स्थिती उद्भवू शकते. त्यामुळे पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सर्वांनी पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे.

 

१. नैसर्गिक आपत्तींच्या दृष्टीने करावयाची पूर्वसिद्धता

अ. नवीन घर बांधत असल्यास पत्र्याऐवजी पक्क्या (उदा. ‘स्लॅब’) छताचा विचार करावा.

आ. घराला छत म्हणून लावलेली पत्र्याची शेड कितीही भरभक्कम वाटत असली, तरी वादळी वार्‍यामुळे पत्रे उडून जातात. छताला लावलेले पत्रे उडून जाऊ नयेत, यासाठी नेहमी पत्र्यावर वाळू भरलेली पोती ठेवावीत; कारण ‘वादळ कधी येईल ?’, हे सांगता येत नाही. (पत्र्याचे क्षेत्र ५०० चौरस फूटांपर्यंत असल्यास प्रत्येकी ५ ते १० किलो वजनाची काही पोती छतावर चोहोबाजूंनी आणि मध्यभागी आवश्यकतेप्रमाणे ठेवावीत. ही पोती चांगल्या गुणवत्तेची असणे आवश्यक आहे.)

इ. घराच्या आजूबाजूला फार जुनी आणि धोकादायक अशी झाडे असल्यास ती कापून घ्यावीत. जेणेकरून वादळाच्या प्रसंगी झाडे उन्मळून पडून घराची हानी होणार नाही.

आपल्या इमारतीच्या किंवा घराच्या बाहेरील रस्त्यांवरून ‘हाय टेंन्शन’ विद्युत तारा जात असल्यास आणि शेजारी झाडे असल्यास पाऊस किंवा वारा यांमुळे झाडे तारांवर पडून जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे स्थानिक विद्युत खात्याला संपर्क करून विजेच्या तारांजवळ असलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यास सांगावे.

उ. कोणत्याही विद्युत तारांच्या खाली उभे राहू नये, तसेच तेथे भ्रमणभाषवर बोलू नये. त्या खाली जनावरे उभी रहाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. विद्युत तारांमधून ठिणग्या पडत असल्यास (‘स्पार्किंग’) होत असल्यास त्वरित विद्युत खात्याला कळवावे.

ऊ. विजेचे खांब, विद्युत तारा, तसेच झाडे यांच्याखाली दुचाकी वा चारचाकी वाहने उभी केल्यास वादळामुळे खांब आणि झाडे उन्मळून त्यांच्यावर पडून मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे तेथे वाहने उभी करणे, वाहन चालवत नेणे आदी करू नये.

ए. पावसाळ्यात अनिश्‍चित कालावधीसाठी विद्युत पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे घरात पणत्या, मेणबत्त्या, विजेरी (टॉर्च), कंदील आदींची व्यवस्था करावी.

ऐ. ‘घराच्या खिडक्या आणि दारे व्यवस्थित बंद होतात ना ?’, याची निश्‍चिती करावी. ती व्यवस्थित बंद होत नसल्यास त्यांची दुरुस्ती करून घ्यावी.

ओ. प्रशासन आणि हवामान खाते यांच्याकडून वेळोवेळी प्रसारित होणार्‍या सूचनांचे पालन करावे. त्यांकडे दुर्लक्ष करू नये.

 

२. वादळ येण्याच्या संदर्भात पूर्वसूचना मिळाली असल्यास करावयाच्या कृती

अ. घराचे अंगण, व्हरांडा, छप्पर किंवा आगाशी या ठिकाणी हलके (अल्प वजनाचे) साहित्य असल्यास ते त्वरित आत आणावे अथवा व्यवस्थित बांधून ठेवावे.

आ. जनावरांना सुरक्षित ठिकाणी हालवावे.

इ. घरात पाणी आणि कोरडे अन्नपदार्थ असावेत.

ई. ‘वार्‍याचा वेग वाढत आहे’, असे लक्षात आल्यास स्वयंपाकघरातील सर्व गॅस आणि त्याचा मुख्य ‘वॉल्व’ बंद करावा. वादळाची तीव्रता संपेपर्यंत तो चालू करू नये.

 

३. वादळाच्या वेळी घरी असल्यास काय करावे ?

अ. घराबाहेर पडू नये. आगाशीत आणि पत्र्याची शेड असणार्‍या भागात जाऊ नये. आसपासच्या घरांचे छप्पर, तसेच वस्तू वार्‍याने उडून येऊन हानी पोचू शकते.

आ. घराच्या खिडक्या आणि दारे व्यवस्थित बंद करून घ्यावीत. वार्‍याच्या वेगामुळे दारे आपोआप उघडली जाऊ नयेत, यासाठी दाराजवळ आतून जड वस्तू ठेवता येतील.

इ. खिडकीच्या काचा फुटून दुखापत होऊ शकते. त्यामुळे खिडकीजवळ थांबणे, झोपणे इत्यादी टाळावे.

ई. घरातील विद्युत प्रवाहाची मुख्य कळ (मेन स्विच) बंद करून विद्युत प्रवाह खंडित करावा. दूरचित्रवाणी संच, मिक्सर आदी विद्युत उपकरणांची पिन ‘सॉकेट’मधून काढून ठेवावी.

उ. या काळात उद्वाहक यंत्र (लिफ्ट), वातानुकूलन यंत्र (ए.सी.), हेअर ड्रायर आदींचा वापर करू नये. शीतकपाटाला (फ्रिजला) स्पर्श करणे टाळावे.

ऊ. काही वेळा आपत्कालीन स्थितीत खोटे संदेश सर्वत्र प्रसारित केले जातात. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. शासनाने अधिकृतरित्या प्रसारित केलेली माहिती ग्राह्य धरावी.

 

४. घराबाहेर असतांना घ्यावयाची दक्षता

अ. वादळाच्या वेळी सुरक्षित ठिकाण शोधून तेथे थांबावे. अधिक संख्येत झाडे, विजेचे खांब इत्यादी नसलेले ठिकाण सुरक्षित म्हणता येईल. झाडे किंवा विद्युत खांब यांखाली थांबू नये.

आ. झाडे आणि विजेचे खांब यांपेक्षा दूर अशा सुरक्षित ठिकाणी दुचाकी वा चारचाकी वाहने लावावीत. चारचाकी वाहनांची दारे आणि खिडक्या व्यवस्थित बंद केल्याची निश्‍चिती करावी. त्यांच्या चाकांखाली दगडाचे वजनदार गतीरोधक लावावेत; कारण वादळाच्या वार्‍याने वाहने भरकटण्याची शक्यता असते.

इ. रस्त्यावर पडलेली झाडे-झुडपे यांना स्पर्श करणे टाळावे. त्या झाडांवर वीजवाहक तारा पडल्या असण्याची शक्यता असते.

ई. पावसाने सर्वत्र ओल झाली असल्यास कोणत्याही विजेच्या खांबाला स्पर्श करू नये; कारण ओलाव्यामुळे विजेचा झटका (‘शॉक’) बसू शकतो.

 

५. वादळ येऊन गेल्यावर करावयाच्या कृती

अ. वातावरण पूर्ववत् होईपर्यंत घराबाहेर पडू नये.

आ. वादळ आणि पाऊस यांमुळे परिसरातील झाडे पडली असतील अथवा वीजवाहक तारा तुटल्या असतील, तर त्यांना स्पर्श करू नये. अग्नीशमन दल आणि विद्युत खाते यांना कळवावे.

इ. घरातील सिलिंडरमधून गॅसची गळती होत असल्यास विद्युत प्रवाहाचे मुख्य बटण (मेन स्विच) बंद करावे. सिलिंडर वार्‍याच्या संपर्कात येईल, अशा ठिकाणी (उदा. आगाशीत) ठेवावा. घरात गॅसचा वास पसरला असल्यास विद्युत कळ दाबू नये.

ई. वाहने, विद्युत उपकरणे, तसेच घरातील साहित्य नवीन असल्यास आणि त्यांचा विमा (इन्शुअरन्स) उतरवलेला असेल आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली हानीभरपाई मिळणार असेल, तर विमा प्रतिनिधींचे मार्गदर्शन घ्यावे. हानी झालेल्या वस्तूंची आवराआवरी करण्यापूर्वी त्यांची प्रथम छायाचित्रे काढावीत आणि त्यांचा पंचनामा करून घ्यावा.

आपत्तींच्या प्रसंगी ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’च्या (National Disaster Management Authority च्या) ०११-१०७८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून मार्गदर्शन घेता येईल.

 

संकटसमयी मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी साधनेला पर्याय नाही !

आज विज्ञानाने सर्व क्षेत्रांत कितीही प्रगती केली असली, तरी वादळासारख्या नैसर्गिक आपत्ती उद्भवू न देणे मानवी शक्तीच्या पलीकडचे आहे. अशा प्रसंगी मन स्थिर ठेवून मनोधैर्य टिकवून ठेवणे, एवढेच आपल्या हातात असते. यासाठी दैनंदिन जीवनात साधनेचे प्रयत्न करणे अनिवार्य आहे. साधनेमुळे बिकट स्थितीलाही धैर्याने आणि आनंदाने सामोरे जाता येते. वाचकहो, आपद्स्थितीत नव्हे, तर आतापासूनच साधनेला आरंभ करा आणि आध्यात्मिक ऊर्जेची (ईश्‍वरी बळाची) शिदोरी आपल्यासह बाळगून निश्‍चिंत व्हा !

 

वाचकांना आवाहन !

वादळाच्या दृष्टीने काही मार्गदर्शक सूत्रे येथे दिली आहे. या विषयाच्या अनुषंगाने वाचकांना काही सूत्रे सुचवायची असल्यास त्यांनी ती खालील संगणकीय किंवा टपाल पत्त्यावर पाठवावीत, ही विनंती ! यामुळे हा विषय समाजापुढे सखोलपणे मांडण्यास साहाय्य होईल.

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

पुढे येणार्‍या तिसर्‍या महायुद्धाच्या काळातही अशी स्थिती उद्भवू शकते. तेव्हासाठीही ही माहिती उपयुक्त ठरू शकते; म्हणून संग्रही ठेवावी.

Leave a Comment