हेल्पलाईन क्रमांक : आपत्काळातील जवळचा आणि सुरक्षित मित्र !

Article also available in :

आपत्काळात कठीण प्रसंगाला कधी सामोरे जावे लागेल, हे कुणीही सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत साहाय्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व मार्गांचा वापर अवश्य करावा. त्यासमवेतच ‘हेल्पलाईन’ क्रमांकांचा वापरही आवर्जून करावा. हेल्पलाईन क्रमांक हा भलेही शाश्‍वत पर्याय नसेल; परंतु प्राधान्याने वापरावयाचा पर्याय आहे. जेव्हा आपल्याला वैद्यकीय, हिंसक, आणीबाणी, कायदेशीर किंवा प्रशासकीय अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येते, तेव्हा काळाची पावले ओळखून त्या संकटावर मात करणे आवश्यक असते.

 

१. हेल्पलाईन क्रमांकांचा वापर करण्याची आवश्यकता

सध्याच्या ‘हायटेक’ युगात आपण रहात आहोत. तेव्हा पारंपरिक पद्धतीने कार्य करणे योग्य नाही. त्यामुळे नागरिकांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. पोलीस, रुग्णवाहिका, महामारी, आग लागणे आणि विषबाधा यांच्याशी संबंधित, तसेच वरिष्ठ नागरिकांच्या साहाय्यासाठी हेल्पलाईन क्रमांक दिलेले आहेत. त्यांच्या वापराची प्राथमिकता लक्षात घेऊन त्यांचा उपयोगही करावा.

 

२. हेल्पलाईन क्रमांकांचा वापर करण्याचे लाभ आणि कारणे

२ अ. जलद आणि सक्षम साहाय्य मिळू शकणे

एखाद्या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय साहाय्य हवे असल्यास खासगी किंवा सामान्य व्यक्तीचे साहाय्य घेण्यापेक्षा हेल्पलाईनचे साहाय्य घ्यावे. हेल्पलाईनच्या माध्यमातून जर रुग्णवाहिका उपलब्ध झाली, तर वैद्यकीय उपचार त्वरित चालू होऊ शकतात. तसेच तज्ञांचे साहाय्यही मिळू शकते.

२ आ. हेल्पलाईन क्रमांकाचा वापर केल्यास शासकीय अधिकार्‍यांना टाळाटाळ करता न येणे

हेल्पलाईन क्रमांकाचे संपर्क बहुतेक वेळा ध्वनीमुद्रित होत असतात. त्यामुळे त्यांची नोंद घेणे शासकीय कर्मचार्‍यांना बंधनकारक असते. समजा आपण वाहतूक नियंत्रण विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करून तक्रार केली, तर ‘संबंधित अधिकारी तक्रार नोंद करून घेत नाहीत’, ही सबब त्यांच्याकडे रहात नाही. तसेच योग्य ठिकाणी तक्रार केल्याचा आपल्याकडे भक्कम पुरावाही रहातो.

 

३. हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करतांना काय काळजी घ्यावी ?

अधिवक्ता नागेश जोशी (ताकभाते)

अ. हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करतांना तो चुकून लागला जाऊ नये, याची काळजी घ्यावी; कारण त्याचे ध्वनीमुद्रण होत असते.

आ. हेल्पलाईनचे साहाय्य घेतांना शक्यतो स्वत:चा भ्रमणभाष संच वापरावा, म्हणजे कायदेशीर गोेष्टींमध्ये आपल्याला साहाय्य होते.

इ. ज्या भ्रमणभाष संचाचा उपयोग करून आपण तक्रार केली असेल किंवा साहाय्य मागितले असेल, तो क्रमांक घटनास्थळी असावा.

ई. दूरभाष करणार्‍या व्यक्तीने समोर येऊन स्वत:ची ओळख करून देणे आवश्यक आहे.

उ. घटनेविषयी ज्ञात असलेली माहिती, तसेच साहाय्य काय हवे, हेही पोलीस किंवा संबंधित प्रशासकीय कर्मचारी यांना स्पष्टपणे सांगावे.

ऊ. भ्रमणभाष संच ‘रेकॉर्ड’ (मुद्रण) मोडमध्ये ठेवावा. त्यामुळे संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या सूचना लक्षात ठेवण्यास साहाय्य होते. तसेच आपल्याकडेही दूरभाष केल्याचा पुरावा रहातो.

(टीप : नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकाची अद्ययावत सूची त्यांच्याकडे ठेवावी. तसेच ती वेळोवेळी अद्ययावत करावी. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ती उपयोगी पडेल. – संकलक)

 

४. पोलीस तक्रार करण्याच्या सर्वसाधारण
पद्धतीच्या जोडीला हेल्पलाईन क्रमांकाचा वापर अवश्य करावा !

पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार प्रत्यक्ष करण्यापूर्वी प्रथम ‘१००’ या हेल्पलाईन क्रमांकावर दूरभाष करून तक्रार करावी. मगच पुढील प्रक्रिया चालू करावी, उदा. वाहनाचा किरकोळ अपघात झाला असेल किंवा एखादे अल्पवयीन मूल फिरतांना दिसले किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही घटनेची फौजदारी तक्रार करायची असेल, तर त्याची माहिती १०० क्रमांकावर दूरभाष करून द्यावी.

 

५. प्रशासकीय कामात हेल्पलाईन क्रमांकाचा उपयोग करणे

पूर्वी कार्यालयात गेल्यानंतरच प्रशासकीय कामकाजाला प्रारंभ होत होता; परंतु आता हेल्पलाईन क्रमांकाचा उपयोग करून आपण आपल्या कार्याला गती देऊ शकतो. कार्यालयात जाण्यापूर्वीच या क्रमांकावर संपर्क करून सर्व तपशील समजून घ्यावा. ‘ऑनलाईन’ किंवा ‘ईमेल’द्वारे अर्ज पाठवण्याविषयी तपशील घ्यावा आणि त्याप्रमाणे कृती करावी. त्यामुळे आपल्या प्रशासकीय कामाला गती प्राप्त होईल.

 

६. पोलीस हेल्पलाईन क्रमांकाच्या साहाय्य केंद्रावर दूरभाष केल्यास होणारे लाभ

६ अ. स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा !

यामुळे आपल्या याचिकेची नोंद त्वरित होते. एखाद्या प्रसंगात काही अनिष्ट घडू नये, याची आपण काळजी घेतोच; परंतु प्रसंगाला सामोरे जावे लागल्यास हेल्पलाईन क्रमांकावर दूरभाष केल्याने आपली बाजू सुरक्षित होते.

६ आ. हेल्पलाईन क्रमांकावर दूरभाष केल्याने पुरावे आणि बंधने निर्माण होतात !

आणीबाणीच्या प्रसंगाविषयीची आपली तक्रार किंवा आपली बाजू शासकीय दरबारी प्रथम पोचल्यामुळे आपल्याला आधार मिळतो. तशा स्वरूपाचा पुरावाही निर्माण होतो.

६ इ. दायित्व टाळता न येणे

काही प्रशासकीय अधिकारी हे दायित्व टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपली याचिका किंवा तक्रार एकतर प्रलंबित रहाते किंवा आपण तिचा विचार सोडून देतो; मात्र हेल्पलाईन क्रमांकावर योग्य ती काळजी घेऊन संपर्क किंवा तक्रार केली, तर आपल्याला तिचा लाभ होऊ शकतो.

६ ई. घटनेचा किंवा प्रसंगाचा पुढे संबंध आल्यास त्याचा पुरावा म्हणून वापर करता येणे

एखाद्या प्रसंगात कधी कधी कालांतराने मोठा प्रसंग ओढवणार असतो. त्यामुळे आपण जर ‘१००’ क्रमांकावर तक्रार केली असेल, तर आपल्या बचावासाठी तिचा योग्य वेळी उपयोग होतो.

 

७. हेल्पलाईन क्रमांकाचा वापर न करता कृती केल्यास होणारे तोटे

अ. अनेक वेळा हिंसक किंवा वादविवादाचे प्रसंग निर्माण झाल्यानंतर आपण पोलिसात तक्रार करतो; पण पोलीस तक्रार नोंदवून न घेता उलट आपल्यालाच दम देतात. बहुतेक वेळा पोलीस व्यक्ती पाहून निर्णय घेतात.

आ. आपल्याहून जर विरोधक सक्षम असेल, तर आपल्यालाही ते खोट्या खटल्यात गुंतवतात,

उदा. गोवंशियांची वाहतूक करणार्‍या वाहनांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी काही गोरक्षक पोलीस ठाण्यात गेले होते. तेव्हा पोलिसांनी गोरक्षकांवरच शांती भंग केल्याचे गुन्हे नोंद केले. अशा प्रकरणात आपली बाजू सुरक्षित आणि भक्कम करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंद करणे उपयुक्त ठरते.

इ. काही प्रसंगात विरोधकांनी हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केल्यामुळे पोलिसांनी त्यांची बाजू प्राधान्याने ऐकली आहे, असेही घडले आहे. हेल्पलाईनवरून आपण एखाद्या घटनेविषयी तक्रार केली, तर घडलेल्या प्रकरणात पुढे जायचे कि नाही, याचा अधिकार आपल्याकडे रहातो.

पोलीस हेल्पलाईन क्रमांक हा २४ घंटे कार्यरत असतो. (सर्वच हेल्पलाईन क्रमांक २४ घंटे कार्यरत असतील, असे नाही.) त्यामुळे प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात न जाताही काही प्रसंगांचा निवाडा किंवा अडचण सुटू शकते; कारण काही वेळा जवळच पहारा घालणारे पोलिसांचे वाहन घटनास्थळी पोचते आणि पोलीस आल्यानंतर सर्वसाधारणपणे हिंसेसारख्या घटना थांबतात.

 

८. ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांकाचा उपयोग करावा !

ध्वनीप्रदूषणाची तक्रार करण्यासाठीही हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध आहेत. या क्रमांकाची त्या त्या प्रांतात निश्‍चिती करून घ्यावी लागते. आपल्या घरची व्यक्ती आजारी असेल किंवा काही कारणांमुळे आवाजाचा त्रास होत असेल आणि आपली हानी होणार असेल, तर या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करता येते. बहुधा या क्रमांकावर रात्री १० वाजल्यानंतर चालू असणार्‍या कार्यक्रमांच्या विरोधातील तक्रारींची नोंद घेतली जाते.

 

९. महिलांनी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा !

भारतात केवळ महिलांसाठी विविध हेल्पलाईन क्रमांक कार्यरत आहेत. घरगुती हिंसाचार, कार्यालयात होणारे शोषण, हिंसक घटना इत्यादी प्रसंगांमध्ये त्या या हेल्पलाईन क्रमांकांचा वापर करू शकतात. एखाद्या महिलेवर असे प्रसंग ओढवल्यास तिने प्राधान्याने महिला साहाय्य केंद्राच्या हेल्पलाईन क्रमांकाचा उपयोग करावा. तो लागत नसेल, तर ‘१००’ या क्रमांकावर संपर्क करावा.

 

१०. हेल्पलाईनशी संबंधित समस्या

हेल्पलाईन क्रमांक काही वेळा व्यस्त असतो किंवा काही वेळा संपर्क होत नाही. अशा वेळी पुनःपुन्हा दूरभाष करून प्रयत्न करावा, तसेच इतर आस्थापनांचा भ्रमणभाष वापरून संपर्क करण्याचा प्रयत्न करावा.

टीप : सर्व नागरिक, हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी त्यांच्या जवळचे बिट (छोटी पोलीस चौकी)/आऊट पोस्ट/ पोलीस ठाणे /पोलीस मुख्यालय/अधीक्षक/ पोलीस आयुक्त यांचे संपर्क क्रमांक स्वत:जवळ ठेवावेत. इतर कोणत्याही माध्यमातून आपला पोलिसांशी संपर्क झाला किंवा साहाय्य मिळाले, तरीही हेल्पलाईनवर कळवणे आवश्यक आहे; कारण त्याची दप्तरनोंद रहाते. त्यामुळे आपल्याला पुढील न्यायिक प्रक्रिया किंवा पाठपुरावा करण्यास साहाय्य होते.

– अधिवक्ता नागेश जोशी (ताकभाते), सदस्य, हिंदु विधीज्ञ परिषद. (२५.५.२०२०)

 

काही हेल्पलाईन क्रमांक

यातील काही क्रमांक केंद्रशासनाचे असून काही राज्यशासनाने प्रसिद्ध केलेले आहेत. तरीही स्थानिक क्रमांक अद्ययावत करून स्वत:कडे संरक्षित करून ठेवावेत.

विषबाधा विरोधी – १०६६

अग्नीशमन दल – १०१

इंडियन रेड क्रॉस सोसायटी – (०११)२३७११५५१

दूरभाष क्रमांक चौकशी – १९७

केंद्र सरकार आरोग्य योजना (सी.जी.एच्.एस्.) हेल्पलाईन, आरोग्य सेवा महासंचालनालय – १५५२२४

Disaster Management of Govt. of NCT of Delhi -1077

पोलीस उपायुक्त (हरवलेली महिला आणि मुले) – १०९४

वाहतूक पोलीस हेल्पलाईन – १०९५

देहली पोलीस हेल्पलाईन – १०९०

एन्.डी.एम्.सी. नियंत्रण कक्ष – १२६७

रुग्णवाहिका सेवा – १०६६

महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक – १०९२

ओआर्बीओ सी.एन्. सेंटर, ए.आय.आय.एम्.एस्. (डोनेशन ऑफ ऑर्गन) – १०६०

Leave a Comment