आपत्काळाच्या गर्तेत

कोरोनाचे संकट आल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याची चर्चा चालू झाली. एका सूक्ष्म विषाणूने बघता बघता संपूर्ण विश्‍वाचे दळणवळण ठप्प केले. उणेपुरे ५ मास ‘कोरोना’ या एकाच संकटाची चर्चा चालू आहे. कोरोनाच्या धक्क्यातून सावरत असतांना दळणवळण बंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीची चर्चा चालू झाली. दृष्टीपथात असलेले आर्थिक संकट इतके गहिरे असणार आहे की, एकही व्यक्ती त्याच्या झळा बसण्यापासून वाचणार नाही. हे महाभयंकर संकट एकीकडे असतांनाच चक्रीवादळ, उष्णतेची लाट, टोळधाड यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनीही त्यांचे रौद्ररूप दाखवायला प्रारंभ केला. गेल्या आठवड्यात बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये ‘अम्फान’ या चक्रीवादळाने हाहाःकार माजवला. या चक्रीवादळाची पूर्वकल्पना मिळाल्याने प्रशासनाने जवळपास ६ लाख नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. त्यामुळे मनुष्यहानी रोखण्यात काही प्रमाणात यश मिळाले असले, तरी या चक्रीवादळामुळे वित्तहानी पुष्कळ झाली. त्यातच २ दिवसांपूर्वी राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमध्ये टोळधाडीने धुमाकूळ घातला. या टोळ किटकांनी संत्री, मोसंबी, भाजीपाला आणि उभी शेते फस्त केली. टोळधाडीला परतवण्यासाठी काही ठिकाणी औषध फवारणी, वाद्यांचा आवाज करणे असे काही उपाय योजले गेले; पण शेवटी हानी व्हायची ती झालीच. या जोडीला एका विशिष्ट टप्प्यातील नागरिकांना उष्णतेच्या लाटेचाही सामना करावा लागला. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये नुकतेच ४६.७ अंश सेल्सियस एवढे तापमान नोंदवले गेले. या काळात जगात नोंदवल्या गेलेल्या पहिल्या १० उष्ण शहरांमध्ये भारतातील पिलानी, चुरु, नागपूर आणि चंद्रपूर या ४ शहरांचा समावेश होता.

कोरोना, अन्य नैसर्गिक संकटे एका बाजूला असतांना जग वेगाने तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने प्रवास करत आहे. भारत या युद्धापासून अलिप्त राहू शकत नाही. लडाख सीमेवर चीन आणि भारत यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला, तर नेपाळनेही भारतावर डोळे वटारले आहेत. पाकिस्तान नावाची डोकेदुखी चालू आहेच. नुकतेच पोलीस आणि सैन्य यांनी जम्मू-काश्मीरमध्ये ‘पुलवामा’सारखे आक्रमण करण्याचा जिहाद्यांचा डाव उधळून लावला. पाकव्याप्त काश्मीरच्या सूत्रावरून पाकिस्तानची गरळओक चालूच आहे. दुसरीकडे देशातील साधू-संतांवर प्राणघातक आक्रमण होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासन-प्रशासन यांमधील समन्वयाचा अभाव, प्रशासकीय ढिलाई, दायित्वशून्यपणा यांमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. या सर्व घटना वेगवेगळ्या न पहाता त्रयस्थपणे या घटनांची साखळी जोडली, तर आपत्काळ केवळ चालू झाला नसून प्रत्येक क्षणाला संपूर्ण विश्‍व वेगाने या तीव्र आपत्काळाच्या दिशेने ढकलले जात असल्याचे लक्षात येते.

 

साधना अपरिहार्य

 

हा आपत्काळ किंवा संकटकाळ काही अचानक आलेला नाही. अनेक द्रष्टे संत, भविष्यवेत्ते यांनी वर्ष २०२० ते २०२३ हा भयावह संकटांचा काळ असल्याचे आणि साधना करणे, हाच या आपत्काळातून तरून जाण्याचा मार्ग असल्याचे सांगून ठेवले आहे. ‘आगामी तिसरे महायुद्ध इतके महाभयंकर असेल की, त्यासमोर पहिले आणि दुसरे महायुद्ध खेळण्यातील लढाईप्रमाणे वाटेल’, या भविष्याचा वेध घेणार्‍या संतवाणीतूनच या आपत्काळाची तीव्रता लक्षात येऊ शकते. अशा वेळी कोरोना काय किंवा अन्य संकटे काय, ती येतील, निघून जातील आणि जीवन पूर्वपदावर येईल, असे मानणे, हे दिवास्वप्न ठरू शकते. त्यामुळे आपत्काळातून तरून जायचे असेल, तर संतांनी सांगितल्याप्रमाणे साधना करणेच अपरिहार्य आहे. संकटकाळामध्ये अधिकोषांमधील पैसे नाही, तर साधनेचा ‘बॅलन्स’च उपयोगी पडतो. साधनामार्गावर असणार्‍या अनेकांनी कोरोनाच्या संकटकाळात याची प्रचीतीही घेतली आहे. ‘सर सलामत, तो पगडी पचास’ ! सध्या जी अस्तित्वाची लढाई चालू झाली आहे, ती केवळ वैद्यकीय किंवा सामाजिक अथवा आर्थिक आघाडीवर लढून चालणार नाही, तर ती आध्यात्मिक पातळीवरही लढाई लागेल.

साधनेचे पाठबळच संकटांना स्थिर राहून सामोरे जाण्याचे धैर्य देते; मात्र ही आध्यात्मिक शिदोरी तुटपुंजी असेल, तर मात्र अवस्था सैरभैर होते. सध्या ‘इंटरनेट’, वीज, तसेच अन्य सोयीसुविधा यांची बर्‍यापैकी उपलब्धता तरी आहे. आगामी काळात जेव्हा तेही ठप्प होईल, तेव्हा व्यक्तीची मानसिक स्थिती कशी होईल ? जेव्हा उपचार करायला आधुनिक वैद्यही अपुरे पडतील किंवा औषधांचा तुटवडा निर्माण होईल, तेव्हा काय होईल ? या केवळ कल्पना किंवा शक्यता नाहीत. भविष्यवाणीप्रमाणे नजिकच्या काळात हेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीचे ४ टप्पे संपत आले आहेत. अजून याचे किती टप्पे असणार आहेत, ते ठाऊक नाही. त्यामुळे नागरिकांनी भ्रमात न रहाता आध्यात्मिक बळ वाढवण्यासह स्वरक्षण, प्रथमोपचार, अग्नीशमन यांचे प्रशिक्षण घेणे, रोगनिर्मूलनासाठी केवळ ‘अ‍ॅलोपॅथी’वर अवलंबून न रहाता विविध उपचारपद्धतींचा अभ्यास करणे, उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड करणे यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

‘कालचक्र’ हे या आपत्काळाचे कारण आहे. आध्यात्मिक भाषेत सांगायचे, तर जेव्हा पृथ्वीवर अधर्म बोकाळतो, तेव्हा आपत्काळ येतो आणि तो सरून गेल्यावर पुन्हा चांगल्या काळाला आरंभ होतो. सध्या जग वेगाने आपत्काळाच्या गर्तेत प्रवेश करत आहे. असे असले, तरी साधनारूपी नौका या गर्तेत वाट दाखवील. ज्याप्रमाणे मध्यरात्रीनंतर सूर्योदय होतो, त्याप्रमाणे आपत्काळातून बाहेर पडल्यावर संपत्काळाची सोनेरी पहाटी पहाता येईल; मात्र त्यासाठी राजा आणि प्रजा दोघांनीही साधना करणे आवश्यक आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment