भागवत कथाकथनाच्या वेळी तादात्म्य पावणारे आणि स्वतःच्या भावावस्थेनेे श्रोत्यांनाही भावमुग्ध करणारे बडोदा येथील संत प.पू. डोंगरे महाराज !

 

१. प.पू. डोंगरे महाराज यांच्याविषयीचे वृत्त वाचल्यावर बालपणी
प.पू. डोंगरे महाराज यांची भागवत कथाकथनाच्या वेळी असणारी भावमुद्रा,
मंत्रमुग्ध करणारी अमृतमय वाणी आणि त्यांच्यासह श्रोत्यांची होणारी भावजागृती आठवणे

‘बडोदा, गुजरात येथील संत शिरोमणी आणि भागवत कथेचे उच्च कोटीचे कथाकार प.पू. रामचंद्र डोंगरे महाराज यांच्याविषयी नुकतेच प्रकाशित झालेले गुजराती भाषेतील वृत्त वाचले आणि मला पुष्कळ आनंद झाला. (गुजरातमध्ये सर्व कथाकार आणि धार्मिक कृती (पौरोहित्य) करणार्‍यांना ‘महाराज’ असे संबोधण्यात येते.) त्या क्षणी माझ्या बालपणी मी ऐकलेल्या त्यांच्या भागवत कथेच्या आठवणी, प.पू. डोंगरे महाराज यांचे रूप, त्यांची भावमुद्रा, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी त्यांची अमृतवाणी आणि त्या वेळी श्रोत्यांच्या डोळ्यांतून अविरत वाहणार्‍या अश्रूधारा इत्यादी सर्व चित्रे क्षणभरात माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेली अन् माझी भावजागृती झाली.

१ अ. प.पू. डोंगरे महाराज यांच्यातील उच्च भावावस्थेमुळे कथा
ऐकतांना श्रोत्यांना ज्ञान आणि चैतन्य मिळून त्यांनीही ती भावावस्था अनुभवणे

प.पू. डोंगरे महाराज यांची प्रेमळ वाणी, विषयाचे ज्ञान, कथेतील प्रसंग मांडण्याची शैली यांमुळे ते गुजरातमध्ये गावोगावी प्रसिद्ध आहेत. माझ्या लहानपणीही ते सांगत असलेल्या विषयांचे मला आकलन होत होते; मात्र तेव्हा श्रोत्यांच्या डोळ्यांतून वाहणार्‍या अश्रूधारा पाहून मला पुष्कळ आश्‍चर्य वाटायचे. त्या वेळी श्रोते ती भावावस्था अनुभवत असल्याचे मला कळत नव्हते. आता मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यावर ‘तेव्हा श्रोत्यांची भावजागृती का होत होती ?’, हे माझ्या लक्षात आले. भागवत कथा सांगतांना प.पू. डोंगरे महाराज यांची भावावस्था उच्च प्रतीची असल्याने त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे ज्ञान आणि चैतन्य श्रोते ग्रहण करत अन् आनंद अनुभवत असत.

१ आ. श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंग सांगतांना प.पू. डोंगरे महाराज
त्या कथानकाशी एकरूप झाल्याने त्यांची भावमुद्रा पाहून श्रोत्यांचीही भावजागृती होणे

प.पू. डोंगरे महाराज यांच्या भागवत कथेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या भागवत कथेत भगवान श्रीकृष्णाविषयीचे कथन विशेष असायचे. श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रसंग सांगतांना ते त्या कथानकाशी एकरूप होत असत. तेव्हाची त्यांची भावमुद्रा पाहून कठोर वाटणारी व्यक्तीही त्या वातावरणाशी समरस होऊन तिची भावजागृती व्हायची, उदा. माता यशोदेने बालकृष्णाला केलेले शासन किंवा मथुरेला जायला निघालेला कृष्ण इत्यादी प्रसंग सांगतांना महाराजांच्या डोळ्यांतून अश्रू वाहायचे आणि श्रोतेही आपल्या अश्रूंना वाट करून द्यायचे.

 

२. प.पू. डोंगरे महाराज यांच्याविषयी संक्षिप्त माहिती

२ अ. साधे आणि पवित्र जीवन जगणे

प.पू. डोंगरे महाराज यांचा जन्म वर्ष १९२६ मध्ये बडोदा, गुजरात येथे झाला. त्यांनी वर्ष १९९१ मध्ये देहत्याग केला. ते लहानपणापासून धार्मिक वातावरणात राहिल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार झाले. त्यांचे जीवन अत्यंत साधे आणि पवित्र होते. त्यांनी आयुष्यात कधीही शिवण केलेले वस्त्र घातले नव्हते. ते धोतर आणि उपरणे वापरायचे. ते संपूर्ण दिवसात एकदाच भोजन ग्रहण करत.

२ आ. भागवत कथाकथनास आरंभ

त्यांच्यात ज्ञान संपादन करण्याची जिज्ञासा अधिक होती. त्यामुळेच वयाच्या २३ व्या वर्षी त्यांनी मराठी भाषेत भागवत कथा सादर केली. ते वयाच्या ३० व्या वर्षी गुजराती भाषेतून भागवत कथा सांगू लागले. बडोद्यापासून ६० कि.मी. अंतरावरील ‘भालसर’ या गावी त्यांनी प्रथमच गुजराती भाषेतून भागवत कथा सांगितली.

२ इ. मिळालेले धन समाजसेवेसाठी अर्पण करणे

त्यांनी सहस्राहून अधिक भागवत कथा सांगितल्या; मात्र त्यांनी कधीही धन आणि प्रसिद्धी यांसाठी कथाकथन केले नाही. ते कधीही कोणाकडून भेटवस्तू घेत नसत. त्यांचे जीवन एखाद्या तपस्व्याप्रमाणे होते. कथेच्या वेळी श्रोत्यांकडून मिळालेले धन ते समाजसेवेसाठी देत होते. नवसारी येथील ‘रोटरी आय इन्स्टिट्यूट’ या रुग्णालयाला त्यांनी भागवत कथा करून मिळालेले धन दान दिले होते.

२ ई. त्यांनी स्वतःला कधीही कोणाच्या गुरुपदी स्थापित केले नव्हते.
ते ‘ईश्‍वरावर श्रद्धा ठेवा; त्याच्या चरणी शरण जा’, असेच नेहमी सांगत.

२ उ. अमृतमय वाणी

त्यांच्या अमृतमय वाणीने समाजात धर्मजागृती होत असे. यावरून ‘त्यांना ज्ञान, भक्ती, वैराग्य इत्यादी ईश्‍वरी गुण प्राप्त झाले होते’, असे वाटते.

अशा देवतुल्य उच्च कोटीच्या संतांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. कृष्णकुमार जामदार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.११.२०१९)

Leave a Comment