गुरुकृपायोगाचे महत्त्व

अर्थ

कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीवशिवाशी जोडला जाणे, याला ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात.

 

गुरुकृपायोगाचा उगम

‘गुरुकृपायोगात ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग एकत्रित आहेत. माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांच्या कृपेने, गुरुकृपेने हा योग सुचला; म्हणून मी त्याचे नाव ‘गुरुकृपायोग’ असे ठेवले. आज अचानक लक्षात आले की, मला गुरुकृपेने हा योग सुचला नसून गुरूंनीच तो निर्मिला आहे. १९९३ मध्ये प.पू. बाबांनी मला सांगितले, ‘‘डॉक्टर, तुम्ही आम्हाला तन-मन-धन दिले. आम्ही तुम्हाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दिले.’’ ‘ज्ञान, भक्ती आणि वैराग्य’ यांचा अर्थ आहे, ‘ज्ञानयोग, भक्तीयोग आणि वैराग्य, म्हणजे कर्मफळाची अपेक्षा न करता कर्म करण्यास शिकवणारा कर्मयोग’, म्हणजेच तेव्हा बाबांनी मला ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग दिले, म्हणजेच गुरुकृपायोग शिकवला.’ – डॉ. आठवले (वैशाख पौर्णिमा, कलियुग वर्ष ५११४ (६.५.२०१२)

 

गुरुकृपायोगाचे महत्त्व

निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे फुकट न घालविता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची ते गुरुकृपायोगात साधक शिकतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्नती होते.

 

गुरुकृपेचे महत्त्व

गुरुकृपेने आदी भ्रम नष्ट होणे

‘बुद्धीने निर्गुण कळते आणि प्रीतीने सगुण कळते. अर्थात ही बुद्धी म्हणजे शास्त्राभ्यासाने आलेले बुद्धीचे सूक्ष्मत्व होय. या बुद्धीमुळे अनादी भ्रम नष्ट होतो. ‘मी ब्रह्मापासून वेगळा आहे’, असा प्रत्येकाला जीवदशेच्या आरंभापासूनच भ्रम (विपरीत ज्ञान, गैरसमज) असतो. याला ‘अनादी भ्रम’ ही संज्ञा आहे. पुढे शास्त्राभ्यास केल्यावर ‘मी ब्रह्मापासून वेगळा नाही’ हे बुद्धीने समजते; परंतु पुढे ‘मी ब्रह्मापासून जर वेगळा नाही, तर मला तशी अनुभूती का येत नाही ?’, असा भ्रम उत्पन्न होतो. या भ्रमाला उद्भव असल्याने, याला ‘आदी भ्रम’ ही संज्ञा आहे. आदी भ्रम श्री गुरुकृपेनेच नष्ट होतो; म्हणजे खर्‍या सत्संगात आलेल्या सगुणाच्या प्रेमाने आणि प्रेमाचे प्रीतीत (निरपेक्ष प्रेमात) रूपांतर झाल्यावर सगुणाचा आकारच नष्ट होतो. त्यामुळे सापेक्ष ज्ञानाने होणार्‍या ‘सगुण म्हणजे साकार’ आणि ‘निर्गुण म्हणजे निराकार’ या समजुती नष्ट होतात. सापेक्ष ज्ञानाची परिणती निरपेक्ष ज्ञानात झाल्यामुळे सगुण-निर्गुण, साकार-निराकार हे भेद रहात नाहीत. सगुण भक्तीला लागल्यावर ज्या ठिकाणी साक्षात सगुण साक्षात्कार होतो, त्याच ठिकाणी निर्गुणाचे (बुद्धीजन्य) ज्ञान नाहीसे होते आणि ‘मी ब्रह्म आहे’, अशी त्याला अनुभूती येते. म्हणूनच सर्व संतांनी निर्गुण हा वाच्यांश आणि सगुण हा लक्ष्यांश दिला आहे. वाच्यांश म्हणजे वाचेने (वाणीने) बोलण्याचा विषय, तर लक्ष्यांश म्हणजे ज्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायचे त्या लक्ष्याचा, ईश्वराचा अंश. सत्संग प्राप्त न झाल्यामुळे विद्वानांना हे पटत नाही. संत तुकारामांच्या अभंगांच्या पोथ्या बुडविणारा रामेश्वरभट्ट हा त्यांच्या कृपेनेच पूर्ण झाला.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

Leave a Comment