अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील थोर सिद्धपुरुष श्री प्रसाद महाराज केतकर !

 

१. जन्म आणि बालपण

अध्यात्म, पत्रकारिता, लेखन-साहित्य, स्वातंत्र्यलढा अशा अनेक क्षेत्रांत ज्यांनी आपला ठसा उमटवला आहे, असे हे केतकर घराणे ! श्री. विश्‍वनाथ वामन केतकर यांच्या पत्नी सौ. आवडी यांनी पुत्रप्राप्तीसाठी श्रीविष्णूला साकडे घातले. माघ मासात वसंतपंचमीला (१५ फेब्रुवारी १९१८ या दिवशी) त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. आठवे अपत्य असल्याने ‘कृष्ण’ नाव ठेवायचे, असे सर्वानुमते ठरले. घरातील धार्मिक वातावरणामुळे योग्य वयात योग्य संस्कार बाळावर घडत होते. अथर्वशीर्ष, मारुतिस्तोत्र, रुद्र मुखोद्गत झाले. पोहण्यात आणि मल्लखांबात विशेष प्राविण्य असायचे. त्यामुळे शाळेत तो सगळ्यांचा आवडता विद्यार्थी होता. त्याला लहानपणापासून गरीब आणि संत यांच्याविषयी विशेष प्रेम होते. एकदा भिक्षा मागायला आलेल्या साधूला त्याने घरातील पोटमाळ्यावरील ट्रंकेतील कोरे धोतर आणून दिले.

 

२. आध्यात्मिक वाटचालीचा आरंभ

कृष्णाची विष्णूवर श्रद्धा जडली आणि तो सेवा करू लागला. काही काळानंतर त्याचे पितृछत्र हरपले. आईच्या शब्द आणि प्रेमाखातर त्यांनी विवाह केला. हळूहळू त्यांचे संसारात मन रमेना. ‘गाणगापूरला जाऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन यावा’, असे त्यांना वाटू लागले. एकदा ते एकटेच ठरवून अचानकपणे गाणगापुरी गेले आणि इथूनच खरा आध्यात्मिक वाटचालीला आरंभ झाला.

 

३. अंबरनाथ येथील वास्तव्यात केलेली खडतर साधना !

यापूर्वीही एकदा गाणगापुरी गेले असता एक स्वप्न त्यांना आठवले. त्याला अनुसरून मार्ग शोधायला त्यांनी आरंभ केला. अचानक एक दिवस अंबरनाथला शिवमंदिरात जायचा योग आला. तेथील परिसर पाहताच गाणगापूरच्या स्वप्नाची त्यांना आठवण झाली. आपण योग्य ठिकाणी आल्याची त्यांना निश्‍चिती झाली. योगायोगाने चाळीच्या मालकांची भेट होऊन नोकरी आणि राहायला जागा मिळाली. त्यांनी काम करून घरी आल्यावर गुरुचरित्राचे वाचन आणि नामजप करून वेळ सत्कारणी लावला.

कधी उकडलेल्या भाज्या, वांगी, शेंगा, तर कधी गूळदाणे; कधी नुसत्या चहावर राहून उरलेले सर्व वेळ ते ध्यानधारणा आणि जप करत. साधनेमुळे ते समोरच्या व्यक्तीचा सर्व भूतकाळ, भविष्यकाळ सहज सांगू लागले. त्यामुळे त्यांच्या माणसांची वर्दळ चालू झाली. साधनेत व्यत्यय येऊ लागल्यामुळे त्यांनी एक वार ठरवून घेतला. प्रत्येक रविवारी आणि पौर्णिमेला ते चालत मलंगगडला जात. अशी १२ वर्षे त्यांनी तपश्‍चर्या केली. कधी एका पायावर उभे राहून, तर कधी कमरेवर पाण्यात उभे राहून, कधी दिवसभर केवळ खारीक खाऊन तीव्र साधना केली. या वेळी नोकरीमध्ये कुठेही तडजोड केली नाही.

 

४. सद्गुरूंची भेट !

सद्गुरु करायला पाहिजे, ही खंत त्यांच्या मनात होती. एके दिवशी एका परिचितांनी त्यांना विचारले, ‘‘मी कल्याणला एका सत्पुरुषांच्या दर्शनाला जाणार आहे. येता का ?’’ क्षणाचाही विलंब न लावता ते ‘हो’ म्हणाले. क्रमांक आल्यानंतर त्यांनी सद्गुरूंना साष्टांग नमस्कार केला. सद्गुरूंनी त्यांना उठवले आणि ‘गुरुचरित्र वचनाची किती पारायणे केली ?’, असा एकच प्रश्‍न विचारला. कृष्ण यांना काय बोलावे ?, हे समजले नाही. भारावलेल्या स्थितीतून बाहेर आल्यानंतर हेच आपले सद्गुरु असून त्यांंच्याकडून अनुग्रह घेण्याची निश्‍चिती त्यांना झाली. १९६३ च्या गुरुपौर्णिमेला कालिका मंदिर, नाशिक येथे अनुग्रह मिळाला. ‘सद्गुरु बापूजी भंडारी यांच्यामुळे (जे कल्याणला भेटले होते) जीवनाचे सार्थक झाले’, असे त्यांना वाटले. बापूजींनी अनुग्रह दिल्यानंतर त्यांचे नाव ‘प्रसाद’ असे ठेवले. सद्गुरुप्राप्तीमुळे त्यांना वाचासिद्धी प्राप्त झाली. दुःखी-कष्टी लोकांची गर्दी वाढू लागली आणि त्यामुळे सोमवार ते गुरुवार त्यांनी अडचणी निवारण्यासाठी चालू केले.

 

५. कार्यविस्तार आणि निर्वाण

त्यांनी सात दिवस दत्तजयंती उत्सव, सात दिवस मौन आणि कडक उपवास प्रतिदिन गुरुचरित्राचे वाचन असे चालू केले. दत्तजयंती सप्ताहात भजन, कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद ही प्रथा अद्यापही चालू आहे. श्री प्रसाद महाराजांचा व्याप इतका वाढला की, कायमची रात्रपाळी घेऊन ते प्रतिदिन लोकांचे दुःख निवारण करू लागले. गुरुचरित्रातील सर्व चमत्कार त्यांनी येथे केले. अगदी गतप्राण झालेले उठवेपर्यंत ! या साधनाकाळात अनेक मोठमोठे यज्ञ आदी अनेक कार्यक्रम झाले. १९८६ मध्ये त्यांनी दत्तगुरूंची मूर्ती स्थापन केली. साधनेत व्यत्यय नको, म्हणून केवळ गुरुवार मार्गदर्शनासाठी ठरवला. पू. प्रसाद महाराज विनामूल्य अडचणी सोडवत. कालांतराने त्यांची प्रकृती खालावली. १८ डिसेंबर १९९४ या दिवशी (मार्गशीर्ष कृष्ण पक्ष दशमी) त्यांची प्राणज्योत अनंतात विलीन झाली.

 

६. जागृत स्थान म्हणून नावारूपास आलेला महाराजांचा ‘प्रसादाश्रम’ !

श्री प्रसाद महाराजांचे नामकरण सद्गुरूंनी केल्यामुळे आश्रमाचे ‘प्रसादाश्रम’ असे नाव ठरवले होते. महाराजांनी देह ठेवून २४ वर्षे झाली, तरी भक्त, शिष्य परिवाराला आजही अनुभूती येतात. त्यांची कामे ‘प्रसादाश्रमा’त जाऊन केवळ दर्शन घेतल्याने पूर्ण होतात. आजही लांबून अनेक मंडळी येतात; पण रिकाम्या हाताने कोणी जात नाही. त्यांना काही ना काही अनुभव येतात. एक जागृत स्थान म्हणून अनेकांनी येथे भेटी दिल्या.

प.पू. गगनगिरी महाराज, पू. पाचलेगावकर महाराज, प.पू. दादा महाराज जोशी (धार, मध्यप्रदेश), प.पू. भक्तराज महाराज (इंदोर, मध्यप्रदेश), प.पू. शिवानंद सरस्वती (कोल्हापूर), प.पू. दत्तानंद सरस्वती (इंदूर) प.पू. श्री. अच्युत महाराज (कणकेश्‍वर) अशा अनेक संतांचा पदस्पर्श या स्थानाला लाभला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment