हवामान पालटाचा भारतीय बालकांना आजीवन धोका ! – ‘लॅन्सेट’ विज्ञानपत्रिकेतील अहवाल

हवामानातील पालट लक्षात घेऊन भावी पिढीसाठी सरकारने आतापासूनच उपाययोजना काढणे आवश्यक ! 

नवी देहली – जागतिक तापमानवाढीमुळे हवामानात होत असलेल्या पालटांचा सर्वाधिक फटका जगभरातील, विशेषत: भारतीय बालकांना अधिक प्रमाणात बसेल. जीवाश्म इंधनाचा वापर तातडीने न्यून न केल्यास पुढील पिढ्यांना अन्नाचा तुटवडा, रोगांचा वाढता संसर्ग, पूर, जीवघेण्या उष्णतेच्या लाटा यांना तोंड द्यावे लागू शकते, असे ‘लॅन्सेट’ या विज्ञानपत्रिकेतील एका अहवालात म्हटले आहे.

‘आरोग्य आणि हवामानातील पालट’ या विषयावर ‘लॅन्सेट’मध्ये प्रतिवर्षी व्यापक मूल्यमापन अहवाल प्रसिद्ध केला जातो. त्यात वरील धोका व्यक्त करण्यात आला आहे. जगभरातील ३५ संस्थांमधील १२० तज्ञ एकत्र येऊन याविषयाचा अभ्यास करतात आणि अहवाल सिद्ध करतात. यामध्ये जागतिक बँक आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी यांचाही समावेश असतो.

या अहवालात म्हटले आहे की,

१. जगातील कार्बन उत्सर्जन आणि हवामानातील पालट अशाच गतीने चालू राहिले, तर आज जन्माला येणारी बालके जेव्हा ७१ वर्षांची होतील, तेव्हा जगाचे तापमान ४ अंश सेल्सिअसने वाढलेले असेल. त्यामुळे त्यांच्या जीविताला प्रत्येक टप्प्यावर धोका असेल.

२. पॅरीस करारात ठरल्यानुसार तापमानवाढ २ अंशांपर्यंत मर्यादित न ठेवल्यास भावी पिढ्यांचे आरोग्य उत्तम स्थितीत राहणे कठीण आहे.

३. वैश्‍विक तापमानवाढीचा सर्वाधिक फटका अर्भके आणि बालके यांना बसेल. कुपोषण आणि त्याच्याशी संबंधित आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. डेंग्यूसारख्या आजारांची लागण बालकांना लवकर होईल. फुफ्फुसांची क्षमताच क्षीण झाल्यामुळे दम्यासारखे आजार आणि त्यातून हृदयविकार अन् पक्षाघाताचा धोका वाढेल.

४. भारतात वर्ष २०१६ मध्ये वायूप्रदूषणामुळे ५ लाख अकाली मृत्यू झाले. यातील ९७ सहस्र ४०० मृत्यू कोळशामुळे होणार्‍या प्रदूषणामुळे झाले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment