सनातन संस्थेच्या वतीने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात तीन दिवसांचे साधना शिबिर

दीपप्रज्वलन करतांना श्री. निंबालाल सोनवणे आणि डावीकडे सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

रामनाथी, गोवा – हिंदु राष्ट्र स्थापनेचा प्रारंभ हा आपल्या व्यष्टी (वैयक्तिक) स्तरापासून होतो, तसेच आपल्यात साधनेने आत्मबळ आले, तर आपण समाज आणि राष्ट्र यांच्यासाठी काहीतरी करू शकतो. त्यामुळे साधना करून आध्यात्मिक प्रगती करणे, हा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा गाभा आहे, असे प्रतिपादन सनातन प्रभात नियतकालिकांचे समूह संपादक ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नागेश गाडे यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या ‘साधना शिबिरा’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रा. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन अध्ययन केंद्राचे समन्वयक श्री. संदीप शिंदे हे उपस्थित होते. या शिबिराला महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथील उद्योजक, वैद्य, वाचक आणि हितचिंतक उपस्थित होते.

शिबिराचा प्रारंभ सनातन पुरोहित पाठशाळेेचे पुरोहित श्री. अमर जोशी यांनी केलेल्या शंखनादाने झाला. सनातन पुरोहित पाठशाळेचे पुरोहित श्री. अमर जोशी आणि श्री. ईशान जोशी यांनी वेदमंत्रपठण केले. या मंगलमय वातावरणात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि ठाणे येथील ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक श्री. निंबालाल सोनवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म आणि गुरुकृपायोगानुसार साधना’ या विषयावर बोलतांना श्री. गाडे यांनी प्रारब्ध, संचित आणि क्रियामाण, व्यक्तीच्या जीवनातील सुख-दु:खामागील कारणे अन् ईश्‍वरप्राप्तीसाठी करावयाचे प्रयत्न आदी विषयांवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘सनातन संस्थेच्या कार्याशी जोडले गेलेले जीव ईश्‍वराशी जोडले जावेत. आज जे ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांनी त्यापुढील प्रयत्न करावेत आणि त्यांची ईश्‍वराकडे अधिक शीघ्रतेने वाटचाल व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.’’

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत सहभागाची आवश्यकता’ या विषयावर बोलतांना प्रा. महावीर श्रीश्रीमाळ म्हणाले, ‘‘रामराज्यात प्रजा साधना आणि धर्माचरण करणारी होती; म्हणून ती रामराज्यात राहू शकली. आपल्यालाही हिंदु राष्ट्रात टिकून राहायचे असेल, तर साधना करणे आवश्यक आहे. एकमेकांना साहाय्य करून हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करावी, हा या शिबिरामागील उद्देश आहे. त्यामुळे साधनेद्वारे हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल कशी करावी, हे या शिबिराच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.’’ या वेळी आरोग्य साहाय्य समितीच्या समन्वयक अश्‍विनी कुलकर्णी यांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातन संस्थेचे कार्य यांचा परिचय’ करून दिला. शिबिराचे सूत्रसंचालन सनातनचे श्री. सुनील कदम यांनी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment