भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी काश्मीरमधील श्री खीर भवानीदेवी !

श्रीनगरपासून ३० कि.मी. अंतरावर तुल्लमुल्ल येथील सुप्रसिद्ध श्री खीर भवानीदेवीचे मंदिर ! काश्मीरच्या गंदेरबल जिल्ह्यात असलेले हे मंदिर हिंदूंसाठी महत्त्वाचे स्थान आहे. हे मंदिर श्री राग्न्यादेवीशी संबंधित आहे. ज्येष्ठ मासातील अष्टमी, तसेच प्रत्येक मासातील शुक्ल पक्ष अष्टमी या तिथींना भाविक मोठ्या प्रमाणात मंदिरात दर्शनासाठी येतात. महाराजा प्रताप सिंह यांनी वर्ष १९१२ मध्ये हे मंदिर बनवले होते. त्यानंतर महाराजा हरि सिंह यांनी मंदिराची देखभाल आणि सुशोभीकरण केले. सध्या या मंदिराचे अधिकार ‘जम्मू-काश्मीर श्राईन बोर्डा’कडे आहेत. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांचा सतत पहारा असतो.

श्री राग्न्यादेवीचे मंदिर

 

पौराणिक संदर्भ

पुराणानुसार रावण हा माता राग्न्यादेवी हिची पूजा करत असे. त्यामुळे त्याला सातत्याने देवीचा आशीर्वाद मिळत असे. देवी राग्न्या ही आधी लंकेमध्ये राहत होती, पण रावणाच्या वाईट कर्मांमुळे देवीने रावणाला शाप दिला आणि हनुमानाला स्वत:ला सतीसार (काश्मीर) येथे घेऊन जाण्याची आज्ञा केली. बाह्य जगतापासून लांब बर्फाने आच्छादित पर्वतरांगांध्ये हे स्थान होते. हनुमानाने देवी, तिचे वाहन आणि ३६० नाग यांच्यासमवेत या ठिकाणी आणले.

मंदिर परिसरातील चिन्नार वृक्ष

 

मंदिराची रचना

श्री खीर भवानीदेवीचे मंदिर चहुबाजूंनी पाण्याने वेढले असून मंदिराच्या परिसरात चिन्नार वृक्षाची मोठी झाडे आहेत. या मंदिराभोवती पाण्याचे अष्टकोनी तळे आहे. त्यातून आत गेल्यावर एक चौकोनी आकाराचे तळे आहे. मंदिरातील गाभार्‍यात देवीची मूर्ती स्थापन केली आहे.

देवीला शुद्ध खीर पुष्कळ आवडते. त्यामुळे देवीची पूजा ‘महाराग्न्या’ या नावानेच केली जाते. देवीच्या निजस्थानी एक रहस्यमयी ठिकाण आहे. असे म्हटले जाते की, त्या रहस्यमयी स्थानावर सहस्रोंच्या संख्येने नागदेव आणि त्यांचे अष्टकुल देवता राहतात. श्री गणपति, भीम राज आणि कुमार हे अमृतकुंडच्या द्वारापाशी राहतात. अमृतकुंडाच्या मध्यभागी पूर्व दिशेला अष्टनाग देवता म्हणजे – वासुकि नाग, नील नागराज, तक्षक नागराज, पद्मनागराज, महापद्म नागराज आदी राहतात. अमृतकुंडाच्या मध्यभागी अनंत नागराज राहतात. यांना २ सहस्र डोळे आणि २ सहस्र जिव्हा असलेल्या सहस्र नागांनी वेढले आहे. देवी राग्न्या ही अनंत नागराजावरील १ सहस्र पाकळ्या असलेल्या गुलाबाच्या पुष्पावर विराजमान झाली आहे.

अमृतकुंडामध्ये असलेले देवीचे स्थान

 

भविष्यातील शुभाशुभ घटनांचे संकेत देणारे अष्टकोनी तळ्यातील पाणी !

या कुंडाचे चमकणारे पाणी भविष्यामध्ये होणार्‍या घडामोडींविषयी सूचना देते. गुलाबी, दूधाळ आणि फिकट हिरवा अशा रंगांचे पाणी शुभ संकेत देते, तर काळा, गडद लाल या रंगांचे पाणी अशुभ गोष्टींचे संकेत देते. जलरूपात वास्तव्य असलेली ही देवी भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारी आहे. देवी राग्न्या ही जलरूपी तुल्लमुल्ल नागावर विराजमान आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment