नवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या अध्यात्म अन् धर्मशिक्षण यांच्या प्रसाराला सकारात्मक प्रतिसाद

गोरेगाव येथील स्थानिक नगरसेवक श्री. हर्ष पटेल आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. संदीप सिंग ग्रंथप्रदर्शन पाहतांना

मुंबई – मुंबई आणि पालघर जिल्ह्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अध्यात्म आणि धर्मशिक्षण यांचा प्रसार भित्तीत्रके, हस्तपत्रके, प्रवचन, ग्रंथप्रदर्शन आणि शौर्यजागरण उपक्रम इत्यादी माध्यमांतून करण्यात आला. तत्पूर्वी दोन्ही जिल्ह्यांत नवरात्रीपूर्वी या उत्सवातील पावित्र्य जपण्यासाठी आणि अपप्रकार रोखण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते.

नवी मुंबई – कोपरखैरणे येथील ओमकार समाज प्रबोधन संस्था येथे ६ ऑक्टोबर या दिवशी प्रवचन, ग्रंथप्रदर्शन, तसेच धर्मशिक्षण देणारे फ्लेक्स यांच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला. सनातन संस्थेच्या डॉ. ममता देसाई यांनी उपस्थित भाविकांसमोर नवरात्रीतील उपासनेचे शास्त्र, ‘कुंकूमार्चन का करावे ?’, ‘नवरात्रीत अखंड दीपप्रज्वलन का करावे ?’, तसेच धर्माचरणाचे महत्त्व इत्यादी विषय समजावून सांगितले.

या वेळी परिसरातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. विषय आवडल्याने सर्व महिला आणि उपस्थित भाविक प्रवचन लक्षपूर्वक ऐकत होते. मंडळाच्या वतीने समितीच्या कार्यकर्त्यांचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.

ओमकार समाज प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनील किंद्रे, सर्वश्री गुलाबराव पाटील, सचिन वाशिवले, राजकुमार गुंजाळ आणि सर्व कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment