विद्यार्थ्यांना संगीत कला आणि कीर्तन कला साधनेच्या स्तरावर शिकवणार्‍या अन् मुरुगा देवाप्रती भाव असणार्‍या (पू.) सौ. कांतीमती संतानम् !

चेन्नई येथील सौ. कांतीमती संतानम् या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांच्या संगीत साधनेतील गुरु आहेत.

गेली ४४ वर्षे भजनाचे वर्ग घेणार्‍या आणि त्यातून सहस्रो जणांना संगीत कला आणि कीर्तन कला साधनेच्या स्तरावर शिकवणार्‍या पू. (सौ.) कांतीमती संतानम् यांची पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी उलगडलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ (डावीकडे) भेटण्यासाठी आल्या, याकरता आनंदाने ‘सद्गुरु घर आयो, आनंद भयो रे’ हे भजन गातांना पू. (सौ.) कांतीमती संतानम्
पुढच्या रांगेत बसलेल्या डावीकडून सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, पू. (सौ.) कांतीमती संतानम्, पू. (सौ.) उमा रविचंद्रन्, मागे उभे असलेल्या डावीकडून सौ. रमा (पू. कांतीमती यांच्या कन्या), श्रीमती जानकी राधाकृष्णन (पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांच्या आई)

 

१. बालपणापासून भजने ऐकण्याची आवड

‘पू. (सौ.) कांतीमती संतानम् यांना बालपणापासून साधनेची आवड आहे. त्या २ वर्षांच्या असल्यापासून घराबाहेर वडिलांची सायकल घट्ट धरून उभ्या रहायच्या. त्या वेळी त्यांना स्वतःचे भान नसायचे. त्यांची आई त्यांना ‘घरात येऊन आवरून जा’, असे सांगत असे; पण घरात आवरायला गेल्यावर ‘वडील त्यांना सोडून भजनाला जातील’, या भीतीने त्या तेथून हलत नसत. इतक्या लहान वयातही त्यांना गाण्याची आणि ईश्‍वराची स्तुती ऐकण्याची तीव्र तळमळ होती.

 

२. वात्सल्यभाव

त्या दिवसभर पुष्कळ व्यस्त असतात, तरी त्या घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी खाऊ देतात. आम्ही त्यांच्याकडे भजने शिकायला जायचो. आम्ही वर्ग संपवून घरी जातांना त्यांचा निरोप घ्यायचो. तेव्हा ‘आम्ही सुखरूप घरी पोचावे’, यासाठी त्या ‘मुरुगा, या सर्वांच्या समवेत रहा’, असे म्हणत. यातून त्यांच्यातील वात्सल्यभावाचे दर्शन घडते.

 

३. संगीतकला आणि कीर्तनकला साधना म्हणून शिकवणे

३ अ. वक्तशीरपणा

त्या भजनांचा प्रत्येक कार्यक्रम वेळेत चालू करून वेळेत संपवतात.

३ आ. संयम

त्या गायला अवघड असलेली गाणी पुष्कळ संयमाने शिकवतात. त्यामुळे वर्गातील सर्व विद्यार्थी ती गाणी एकतानतेने गाऊ शकतात. आम्हाला ‘गाण्यातील प्रत्येक ओळ परिपूर्णरित्या गाता यावी’, यासाठी काही वेळा त्या आम्हाला एकच ‘संगती’ (एखादी ओळ) १० ते २५ वेळा गायला सांगतात.

३ इ. नेतृत्वगुण

त्या प्रेमळ आणि शिस्तप्रियही आहेत. त्यांनी आमच्या भजनाच्या गटातील सदस्यांमध्ये एकसंघता आणली आहे.

३ ई. विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणे

विद्यार्थी चांगले गात असतांना पू. कांतीमती यांना पुष्कळ आनंद होतो. एखाद्या आईला ज्याप्रमाणे स्वतःच्या मुलाच्या यशाचा अभिमान वाटतो, तसाच त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो. त्यांचे विद्यार्थी ७ ते ७० वर्षे या वयोगटातील आहेत. कोणत्याही वयाचा विद्यार्थी गात असतांना ‘पहा, माझे लेकरू कसे गात आहे’, असे त्या कौतुकाने म्हणतात. त्या विद्यार्थ्यांना भजने म्हणण्यासाठी नेहमी प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात.

३ उ. भावावस्थेत गाणे आणि इतरांना भावाची अनुभूती घेण्यास शिकवणे

त्या भावावस्थेत भजने म्हणतात. काही वेळा त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रूही येतात. त्या गाणे शिकवत असतांना त्याचा भावार्थ प्रत्येक विद्यार्थ्याला समजावून सांगतात, जेणेकरून त्यांनाही भावाची अनुभूती घेता येईल.

३ ऊ. बाह्य रूपाला महत्त्व देण्यापेक्षा योग्य त्या गाण्यांचा संच निवडायला प्राधान्य देणे

सामान्य महिला साडी नेसतांना योग्य रंगसंगतीचे पोलके आणि दागिने घालतात. पू. कांतीमती यापेक्षा वेगळ्या आहेत. त्या कार्यक्रमात योग्य त्या गाण्यांचा संच निवडायला प्राधान्य देतात. गाण्याच्या एका संचात विरूथम, त्यानंतर मुख्य गाणे आणि नामावली असा क्रम असतो. त्या मोठ्या कौशल्याने ऐकणार्‍याला त्या गाण्याची गती आणि त्यातील भावाची अनुभूती देण्याचा प्रयत्न करतात.

३ ए. गाण्यातील भाव ओळखून त्याला पूरक असा राग निवडणे

त्यांना कर्नाटकी शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान आहे. त्या विविध दुर्मिळ राग आणि ताल सहजतेने गाऊ शकतात. त्या एखाद्या गाण्यातील भाव ओळखून त्याला पूरक असा राग निवडतात. त्या गाण्यातील शब्दांचा पालट आणि पुनरावृत्ती पद्धतशीरपणे करतात. त्यामुळे मूळ गाण्याचे सौंदर्य वाढते.

 

४. कर्तेपणा देवाला देणे

त्यांना केवळ संगीत या विषयातीलच नव्हे, तर हिंदी आणि गणित या विषयांतील पुष्कळ ज्ञान आहे. असे असूनही त्या ‘मला काही येत नाही. मुरुगा देव माझ्याकडून सर्वकाही करवून घेत आहे’, असे सांगतात.

 

५. भजनात रंगणे

त्या सतत भजनात रंगलेल्या असतात. ‘त्यांचा अंतर्मनातून सतत नामजप चालू असतो’, असे मला जाणवले.

 

६. भाव

अ. त्या नेहमी ईश्‍वराविषयी बोलतात आणि त्याच्यासंबंधी विचार करतात. त्या भगवान सुब्रमण्यम याच्या अनुसंधानात असतात. त्या कधी ‘आज मुरुगा देवाने स्वयंपाक केला’, असे म्हणतात, तर कधी ‘आज कृष्णाने जेवण बनवले’, असे म्हणतात. प्रत्यक्षात त्या दिवशी मुरुगा देव आणि कृष्ण यांची भजने म्हणण्यात देहभान विसरल्याने त्यांना स्वयंपाक करतांना कष्ट जाणवत नाहीत. त्यांना प्रत्यक्ष देवाने येऊन स्वयंपाक केल्याची प्रतिदिन अनुभूती येते.

आ. त्यांच्या भजन गटातील सर्व सदस्य मध्यमवयीन असल्याने त्यांना नृत्य करता येत नाही, तरीही त्यांनी भजनाच्या कार्यक्रमांमध्ये आमच्याकडून ‘कोलाट्टम्’ हा नृत्यप्रकार करून घेतला. त्यामुळे आम्ही गोपीभावात रंगून गेलो.

मी त्यांच्या भजन वर्गाला जाऊ लागल्यापासून माझी नामसंकीर्तन योगाने साधना चालू झाली. त्यांनी माझ्या साधनेचा पाया पक्का करून घेतला आणि मला सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यासाठी पात्र केले. भूतकाळाचा विचार करतांना ‘परात्पर गुरुदेवांनी मला या सात्त्विक बंधनातून (भजनाच्या वर्गाला जाणे) मुक्त केले आणि त्यांनीच मला सत्त्व, रज आणि तम यांच्या पलिकडे घेऊन जाणार्‍या साधनेचा आरंभ करून दिला’, याची मला जाणीव झाली. आता १५ वर्षांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून पू. (सौ.) कांतीमती यांची दैवी गुणवैशिष्ट्ये विश्‍वातील साधकांना शिकायला मिळणार आहेत. त्यामुळे ‘हे चक्र पूर्ण झाले आहे’, असे मला वाटते. त्यांच्या संगीतवर्गाला जाण्याचे माझे कार्य परात्पर गुरुदेवांच्या कृपेने पूर्णत्वाला गेले आहे.’

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment