श्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचे छायाचित्र आणि सनातन-निर्मित श्री गणपतीचे चित्र यांत आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदने असल्याचे वैज्ञानिक स्तरावर सिद्ध !

श्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचे छायाचित्र आणि सनातन-निर्मित
श्री गणपतीचे सात्त्विक चित्र यांत आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ लाभदायक
स्पंदने आहेत, हे स्पष्ट करणारी पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)
या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील विनायकांची आठ स्थाने. ही श्री गणपतिक्षेत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. मुद्गल पुराणात त्यांचे वर्णन आढळते. (टीप १) हे अष्टविनायक स्वयंभू आहेत. ज्या देवतांच्या मूर्तींची निर्मिती आणि स्थापना कुणी केली ?, ते ठाऊक नसते, अशा मूर्ती स्वयंभू म्हणजे आपल्या आपण उत्पन्न झालेल्या मानल्या जातात. (टीप २) श्री गणपतीच्या चैतन्यमय स्वयंभू मूर्तीचे (पुणे येथील मोरगावच्या श्री मोरेश्‍वराचे) छायाचित्र आणि कलियुगात अधिक गणेशतत्त्व असलेले सनातन-निर्मित श्री गणपतीचे सात्त्विक चित्र यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी ७ आणि ८.९.२०१५ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात चाचणी घेण्यात आली. त्यासाठी पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (ऑराचा) अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे. येथे लक्षात ठेवायचे महत्त्वाचे सूत्र म्हणजे दोन चित्रांचा श्रेष्ठतेच्या दृष्टीने निवाडा करणे, हा या चाचणीचा उद्देश नसून एकाच देवतेच्या दोन वैशिष्ट्यपूर्ण चित्रांचा स्पंदनांच्या दृष्टीकोनातून अभ्यास करणे, हा त्यामागील उद्देश आहे. ज्यांना सूक्ष्मातील, म्हणजे स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील कळते, ते दोन चित्रांतील स्पंदनांचे विश्‍लेषण करू शकतात; पण सर्वसाधारण व्यक्तीला सूक्ष्मातील स्पंदनांविषयी माहिती देण्यासाठी आधुनिक वैज्ञानिक उपकरणे किंवा तंत्रज्ञान (उदा. पिप) काही प्रमाणात उपयुक्त ठरते. व्यक्तीने स्वतः साधना करून सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक असते; कारण सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता व्यक्तीला आध्यात्मिक प्रगतीतच नव्हे, तर व्यावहारिक जीवनातही यशस्वी होण्यात साहाय्यभूत ठरते. या चाचणीच्या निमित्ताने वाचकांना चाचणीतील वस्तूंच्या संदर्भातील अध्यात्मशास्त्रीय माहिती मिळेल आणि त्यांच्यात सूक्ष्मातील स्पंदने जाणण्याची जिज्ञासा निर्माण होईल.
टीप १ – (संदर्भ : भारतीय संस्कृतिकोश, प्रथम खंड (तृतीयावृत्ती), पृ. ३३२)
टीप २ – (संदर्भ : भारतीय संस्कृतिकोश, दहावा खंड (द्वितीयावृत्ती), पृ. २१६)

 

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत पटलावर (टेबलावर) श्री गणपतीचे चित्र ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाचे पिप तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. ही मूळची नोंद होय. त्यानंतर श्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचे छायाचित्र आणि सनातन-निर्मित श्री गणपतीचे सात्त्विक चित्र एकेक करून पटलावर ठेवून पिप छायाचित्रे घेतली. या छायाचित्रांचा अभ्यास केल्यानंतर श्री गणपतीच्या दोन्ही चित्रांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?, हे जाणता आले.

 

२. चाचणीतील श्री गणपतीच्या दोन चित्रांची माहिती

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मोरगावचा श्री मोरेेश्‍वर

२ अ. श्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचे छायाचित्र

हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या श्री मोरेेश्‍वराचे छायाचित्र आहे. मोरेश्‍वराच्या मूर्तीसंबंधी सांगतात, मूळची मूर्ती मृत्तिका, लोह आणि रत्ने यांच्या अणूंपासून बनवलेली असून ती सांप्रतच्या दृश्य मूर्तीमागे अदृश्य आहे. ती मूळ मूर्ती ब्रह्मदेवाने स्थापन केली होती; परंतु पुढे असुरांनी तिचा वारंवार विध्वंस केल्यामुळे पांडवांनी तिला तांब्याच्या पत्र्याने झाकले आणि तिच्यापुढे आज दिसत असलेली मूर्ती बसवली. (संदर्भ : भारतीय संस्कृतिकोश, सातवा खंड (प्रथमावृत्ती), पृ. ५३४)

सनातन-निर्मित श्री गणपतीचे सात्त्विक चित्र

२ आ. सनातन-निर्मित श्री गणपतीचे सात्त्विक चित्र

हे कलियुगात अधिक गणेशतत्त्व असलेले चित्र आहे. कलियुगात कोणत्याही देवतेचे चित्र किंवा मूर्ती यांत त्या त्या देवतेचे अधिकाधिक ३० टक्केच तत्त्व येऊ शकते. सनातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्रात २८.५ टक्के (टीप) गणेशतत्त्व आले आहे. या चित्रात जास्तीतजास्त गणेशतत्त्व येण्यासाठी सनातनच्या साधक-चित्रकारांनी हे चित्र भावपूर्वक रेखाटले आहे. या चित्राकडे पाहून अनेकांना नापजप चांगला होणे आदी आध्यात्मिक अनुभूती आल्या आहेत. (संदर्भ : सनातन-प्रकाशित ग्रंथ श्री गणपति – खंड १, पृ. ३१)

टीप – एखाद्या चित्रात त्या देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आले आहे ?, हे अध्यात्मातील जाणकार व्यक्तीच सांगू शकतात. चाचणी केलेल्या चित्रातील श्री गणपतितत्त्वाचेे प्रमाण हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ध्यानातून मिळालेल्या ज्ञानातील आहे.

 

३. पिप तंत्रज्ञानाची ओळख

३ अ. चाचणीतील घटकांची आध्यात्मिक स्तरावरील
वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारे अभ्यासण्याचा हेतू

एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक, संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारेे सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

३ आ. पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक
आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे

या तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) सामान्यपणे डोळ्यांना न दिसणारी अशी रंगीत प्रभावळ (ऑरा) पाहू शकतो. पिप या संगणकीय प्रणालीला व्हिडीओ कॅमेर्‍याशी जोडून त्याद्वारे वस्तू, वास्तू, प्राणी किंवा व्यक्ती यांची ऊर्जाक्षेत्रे विविध रंगांत पहाता येतात. यात सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा आहे.

 

४. चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता

अ. या चाचणीची पिप छायाचित्रे घेण्यासाठी विशिष्ट कक्ष (खोली) वापरण्यात आला. या कक्षाच्या भिंती, छत आदींच्या रंगांचा चाचणीतील घटकाच्या प्रभावळीतील रंगांवर परिणाम होऊ नये, यासाठी भिंती, छत आदींना पांढरा रंग दिला होता.

आ. संपूर्ण चाचणीच्या वेळी कक्षातील प्रकाशव्यवस्था एकसारखीच ठेवली होती, तसेच कक्षाबाहेरील हवा, प्रकाश, उष्णता यांचा कक्षातील चाचणीवर परिणाम होऊ नये, यासाठी चाचणीच्या वेळी कक्ष बंदिस्त ठेवण्यात आला होता.

 

५. चाचणीतील पिप छायाचित्रे आणि निरीक्षणे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त सूत्रे

या छायाचित्रांत नकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या रंगांविषयी लिखाण तपकिरी रंगात, तर सकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या रंगांविषयी लिखाण निळ्या रंगात दिले आहे.

५ अ. मूळची नोंद (वातावरणाची मूलभूत प्रभावळ)

चाचणीमध्ये एखाद्या घटकामुळे (उदा. या चाचणीत श्री गणपतीचे चित्र पटलावर ठेवल्यानंतर) वातावरणात झालेला पालट अभ्यासण्यासाठी त्या घटकाचे पिप छायाचित्र घेतात; पण वातावरणात सातत्याने पालट होत असल्यामुळे घटकाची चाचणी करण्यापूर्वी घटक ठेवणार असलेल्या वातावरणाचे (उदा. या चाचणीत श्री गणपतीचे चित्र पटलावर ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाचेेेे) पिप छायाचित्र प्रथम घ्यावे लागते. याला मूळची नोंद म्हणतात. नंतर घटकाच्या पिप छायाचित्राची मूळच्या नोंदीशी (वातावरणाची मूलभूत प्रभावळ दर्शवणार्‍या पिप छायाचित्राशी) तुलना केल्यानंतर त्या घटकामुळे वातावरणात झालेला पालट लक्षात येतो.

५ आ. मूळच्या नोंदीच्या तुलनेत वस्तूची प्रभावळ दर्शवणार्‍या
पिप छायाचित्रातील रंगांच्या प्रमाणात वाढ किंवा घट होण्यामागील तत्त्व

चाचणीसाठी घटक (उदा. या चाचणीत श्री गणपतीचे चित्र पटलावर) ठेवण्यापूर्वीच्या (मूळच्या नोंदीच्या) तुलनेत घटक ठेवल्यानंतरच्या प्रभावळीतील रंगाच्या प्रमाणात वाढ किंवा घट होते. ही वाढ किंवा घट त्या घटकातून प्रक्षेपित होणार्‍या त्या रंगाशी संबंधित स्पंदनांच्या प्रमाणानुसार असते, उदा. चाचणीसाठी घटक ठेवल्यानंतर त्यातून चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण पुष्कळ प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण वाढते, तर चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण न झाल्यास किंवा इतर स्पंदनांच्या तुलनेत अल्प प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण घटते. (हे लक्षात घेऊन सूत्र ६ अ. निरीक्षण १ आणि ६ आ. निरीक्षण २मध्ये दिलेल्या सारण्या वाचाव्यात.)

५ इ. प्रभावळीत दिसणार्‍या रंगांची माहिती

चाचणीतील वस्तूच्या (किंवा व्यक्तीच्या) पिप छायाचित्रांत दिसणार्‍या प्रभावळींचे रंग हे त्या वस्तूच्या ऊर्जाक्षेत्रातील विशिष्ट स्पंदने दर्शवतात. प्रभावळीतील प्रत्येक रंगाविषयी पिप संगणकीय प्रणालीच्या निर्मात्यांनी प्रसिद्ध केलेल्या कार्यपुस्तिकेतील (मॅन्युअलमधील) माहिती आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेल्या शेकडो चाचण्यांतील निरीक्षणांचा अनुभव यांच्या आधारे प्रत्येक रंग कोणत्या स्पंदनाचा दर्शक आहे ?, ते निश्‍चित केले आहे. ते सूत्र ६ अ. निरीक्षण १मध्ये दिलेल्या सारणीतील दुसर्‍या उभ्या स्तंभात सांगितले आहे.

५ ई. नकारात्मक स्पंदने

पिप छायाचित्रातील राखाडी, गुलाबी, नारिंगी आणि भगवा हे रंग अनुक्रमे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक त्रासदायक ते अल्प त्रासदायक स्पंदने दर्शवतात. या सर्व आध्यात्मिकदृष्ट्या त्रासदायक असणार्‍या स्पंदनांना (रंगांना) लिखाणात एकत्रितपणे नकारात्मक स्पंदने असे संबोधले आहे.

५ उ. सकारात्मक स्पंदने

पिप छायाचित्रातील फिकट गुलाबी, पोपटी, निळसर पांढरा, पिवळा, गडद हिरवा, हिरवा, निळा आणि जांभळा हे रंग अनुक्रमे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक ते अल्प लाभदायक स्पंदने (रंग) दर्शवतात. या सर्व आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणार्‍या स्पंदनांना (रंगांना) लिखाणात एकत्रितपणे सकारात्मक स्पंदने असे संबोधले आहे.

५ ऊ. पिप छायाचित्रात सर्वसाधारणपेक्षा उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक रंग दिसणे अधिक चांगले असणे

पिप छायाचित्रात पोपटी किंवा निळसर पांढरा हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांचे स्थान (जागा) त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेले असते.

५ ए. पिप छायाचित्रातील रंगांच्या वैशिष्ट्यांचा त्या रंगाच्या प्रत्यक्षातील आध्यात्मिक वैशिष्ट्याशी संबंध नसणे

पिप संगणकीय प्रणालीच्या निर्मात्यांनी पिप छायाचित्रात नकारात्मक स्पंदनांसाठी भगवा आणि नारिंगी, हे रंग निर्धारित केले आहेत. त्याचा आणि त्या रंगांच्या प्रत्यक्षातील आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा (उदा. भगवा रंग त्याग अन् वैराग्य यांचे प्रतीक आहे.) कोणताही संबंध नाही.

५ ऐ. पिप छायाचित्रांची तुलना करतांना चाचणीसाठी ठेवलेले
श्री गणपतीचे चित्र, तसेच पटल यांवरील रंग ग्राह्य धरलेले नसणे

ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने पिप छायाचित्र क्र. २ आणि ३ यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १ शी) करतांना चाचणीसाठी ठेवलेले श्री गणपतीचे चित्र, चित्राच्या आधारासाठी ठेवलेला ठोकळा, तसेच पटल यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

 

६. निरीक्षणे

सूचना १ : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) छायाचित्र क्र. २ आणि ३ यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १ शी) करतांना छायाचित्रांतील पटल, तसेच छायाचित्रे यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.

सूचना २ : पिप छायाचित्रात पोपटी किंवा पांढरा (चंदेरी) हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते.

६ अ. निरीक्षण १ – पिप छायाचित्रांत दिसणार्‍या प्रभावळींचे रंग,
ते कशाचे दर्शक आहेत आणि त्यांच्या प्रमाणात झालेली वाढ किंवा घट

श्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचे छायाचित्र आणि सनातन-निर्मित चित्र यांच्या प्रभावळींची तुलना मूळच्या नोंदीशी केली आहे, हे लक्षात घेऊन पुढील सारणी वाचावी.

प्रभावळीचे रंग प्रभावळीचे रंग कशाचे दर्शक आहेत ? मूळची नोंद (श्री गणपतीचे छायाचित्र ठेवण्यापूर्वी ) (या विषयीच्या स्पष्टिकरणासाठी सूत्र ५ अ पहा ) श्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचे (श्री  मोरेेश्‍वराचे) छायाचित्र ठेवल्यानंतर (या स्तंभांतील निरीक्षणांच्या स्पष्टिकरणासाठी सूत्र ७ आ पहा) सनातन-निर्मित श्री गणपतीचे सात्त्विक चित्र ठेवल्यानंतर ( या स्तंभांतील निरीक्षणांच्या स्पष्टिकरणासाठी सूत्र ७ इ पहा )
१. नकारात्मक स्पंदने दर्शविणारे रंग
१ अ. भगवा वातावरणातील नकारात्मकता प्रामुख्याने पिवळ्या रंगाखाली दिसत आहे. थोडा घटला पुष्कळ घटला.
१ आ. नारंगी भावनिक तणाव गडद हिरव्या रंगाखाली दिसत आहे. दिसत नाही. पुष्कळ घटला.
२. सकारात्मक स्पंदने दर्शविणारे रंग
२ अ. पोपटी सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपाय क्षमता (टीप १) दिसत नाही. दिसत नाही. थोडा दिसत आहे.
२ आ. निळसर पांढरा शुद्धता आणि पवित्रता दिसत नाही. दिसत नाही. पुष्कळ दिसत आहे.
२ इ. पिवळा चैत्तन्य किंवा ज्ञान प्रामुख्याने मध्यभागी दिसत आहे. पुष्कळ वाढला. थोडा वाढला.
२ ई. गडद हिरवा स्थूल स्तरावरील आध्यात्मिक उपाय क्षमता (टीप २) भगव्या रंगाखाली दिसत आहे. थोडा वाढला. थोडा घटला.(टीप ३)
२ ए. हिरवा सकारात्मकता नारंगी रंगाखाली दिसत आहे. दिसत नाही.(टीप ४) दिसत नाही.(टीप ३)

टीप १ – घटकाच्या अंतर्बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने अल्प किंवा नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता

टीप २ – घटकाच्या केवळ बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने अल्प किंवा नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता

टीप ३ – गडद हिरवा हा सर्वसाधारण सकारात्मक स्पंदने दर्शवणारा रंग जरी न्यून झाला असला आणि हिरवा रंग दिसेनासा झाला असला, तरी उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेल्या रंगांपैकी पोपटी रंग थोडा दिसू लागला अन् निळसर पांढरा रंग पुष्कळ दिसू लागला, तर पिवळा रंग वाढला, हे या सारणीतील सूत्र २ अ, २ आ आणि २ इ यांवरून स्पष्ट होते. याविषयी अधिक माहितीसाठी सूत्र ५ ऊ पहावे.

टीप ४ – हिरवा हा सर्वसाधारण सकारात्मक स्पंदने दर्शवणारा रंग जरी दिसेनासा झाला असला, तरी त्याहीपेक्षा उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेल्या रंगांपैकी पिवळा रंग पुष्कळ वाढला, हे या सारणीतील सूत्र २ इ वरून स्पष्ट होते. याविषयी अधिक माहितीसाठी सूत्र ५ ऊ पहा.

६ आ. निरीक्षण २ – पिप छायाचित्रांतील प्रत्येक स्पंदनाचेे (रंगांचे) प्रमाण (टक्के)

‘पिप’ छायाचित्रांतील प्रभावळीचे रंग रंगांचे प्रमाण (टक्के)
मूळची नोंद (श्री गणपतीचे चित्र ठेवण्यापूर्वी ) श्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचे (श्री  मोरेेश्‍वराचे) छायाचित्र ठेवल्यानंतर सनातन-निर्मित श्री गणपतीचे सात्त्विक चित्र ‘ठेवल्यानंतर
१. नकारात्मक स्पंदने दर्शविणारे रंग (या विषयीच्या स्पष्टिकरणासाठी सूत्र ५ ई पहा )
१ अ. भगवा २७ २० १२
१ आ. नारंगी १६
नकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण ४३ २० १३
२. सकारात्मक स्पंदने दर्शविणारे रंग (या विषयीच्या स्पष्टिकरणासाठी सूत्र ५ उ पहा )
२ अ. पोपटी
२ आ. निळसर पांढरा ३३
२ इ. पिवळा ३५ ५९ ३७
२ ई. गडद हिरवा १९ २१ १५
२ ए. हिरवा
सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण ५७ ८० ८७
३. नकारात्मक  + सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण ४३ + ५७ = १०० २० + ८० = १०० १३ + ८७ = १००

 

७. निरीक्षणांचे विवरण आणि निष्कर्ष

७ अ. मूळची नोंद – सनातन आश्रमातील सात्त्विक
वातावरणामुळे सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक दिसणे

कलियुगातील सर्वसाधारण वास्तूमधून सकारात्मक स्पंदनांपेक्षा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण अधिक असते. ही चाचणी अत्यंत सात्त्विक अशा सनातन आश्रमात केलेली असल्याने मूळच्या नोंदीच्या वेळीही (चाचणीसाठी श्री गणपतीचे चित्र ठेवण्यापूर्वीच्या) प्रभावळीत सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण नकारात्मक स्पंदनांपेक्षा अधिक आहे.

७ आ. श्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीच्या छायाचित्रामुळे
वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे

मूळच्या नोंदीच्या तुलनेत श्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीच्या छायाचित्राच्या प्रभावळीतील नकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या रंगांपैकी भगवा रंग घटला आणि नारिंगी रंग दिसत नाही. सकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या रंगांपैकी हिरवा रंग दिसत नाही; पण त्यापेक्षा उच्च सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांपैकी गडद हिरवा रंग थोडा आणि चैतन्याचा पिवळा रंग पुष्कळ वाढला आहे. या चित्रात मूळच्या नोंदीच्या (५७ टक्क्यांच्या) तुलनेत पुष्कळ अधिक, म्हणजे ८० टक्के सकारात्मक स्पंदने आहेत. हे छायाचित्र उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ लाभदायक आहे.

७ इ. सनातन-निर्मित श्री गणपतीच्या सात्त्विक चित्रामुळे
वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे

मूळच्या नोंदीच्या तुलनेत सनातन-निर्मित सात्त्विक चित्राच्या प्रभावळीतील नकारात्मक स्पंदने दर्शवणारे भगवा आणि नारिंगी हे दोन्ही रंग पुष्कळ घटले आहेत. सकारात्मक स्पंदने दर्शवणार्‍या रंगांपैकी गडद हिरवा थोडा घटला, तर हिरवा रंग दिसत नाही; पण त्यांपेक्षा उच्च सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांपैकी चैतन्याचा पिवळा रंग थोडा वाढला, पवित्रतेचा निळसर पांढरा रंग पुष्कळ प्रमाणात, तर सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक उपायक्षमता असणारा पोपटी रंगही थोडा दिसत आहे. या चित्रात मूळच्या नोंदीच्या (५७ टक्क्यांच्या) तुलनेत पुष्कळ अधिक, म्हणजे ८७ टक्के सकारात्मक स्पंदने आहेत. हे चित्र सात्त्विक असून उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या पुष्कळ लाभदायक आहे. (याचे कारण सूत्र ८ मध्ये दिले आहे.)

७ ई. सनातन-निर्मित सात्त्विक चित्रात श्री गणपतीच्या स्वयंभू
मूर्तीच्या छायाचित्रापेक्षा थोडी भिन्न सकारात्मक स्पंदने आढळणे

चाचणीतील दोन्ही चित्रांत सकारात्मक स्पंदने पुष्कळ असली, तरी स्वयंभू मूर्तीच्या छायाचित्रापेक्षा सनातन-निर्मित सात्त्विक चित्रात पोपटी आणि निळसर पांढरा या रंगांनी दर्शवलेली सकारात्मक स्पंदने आढळली आहेत. याची आध्यात्मिकदृष्ट्या पुढील कारणे संभवतात.

१. दोन्ही चित्रांत गणेशतत्त्व पुष्कळ प्रमाणात असले, तरी कार्यानुमेय दोन्ही चित्रांतील तारक आणि मारक तत्त्वांच्या प्रमाणात भिन्नता असणे

२. श्री मोरेश्‍वराची मूर्ती आणि सनातन-निर्मित सात्त्विक चित्र यांची निर्मिती भिन्न कालखंडात, भिन्न उद्देशांनी, भिन्न प्रकारे आणि भिन्न माध्यमांतून झालेली असणे

७ उ. श्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीच्या छायाचित्रातील सकारात्मक
स्पंदनांचे प्रमाण सनातन-निर्मित सात्त्विक चित्रापेक्षा अल्प असण्याचे कारण

श्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीच्या छायाचित्रातील सकारात्मक स्पंदनाचे प्रमाण ८० टक्के, तर सनातन-निर्मित सात्त्विक चित्रात ते ८७ टक्के आहे. अध्यात्मातील जाणकारांच्या मते दोन्हींमध्ये गणपतितत्त्व पुष्कळ प्रमाणात आहे; पण चाचणीसाठी मोरेश्‍वराच्या मूर्तीचे छायाचित्र वापरले आहे आणि छायाचित्रणातील त्रुटींमुळे छायाचित्रात मूळ मूर्तीमध्ये आहेत, तेवढी सकारात्मक स्पंदने आढळतीलच, असे नाही. त्यामुळे मूळ मूर्तीत पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असूनही ती त्या मूर्तीचे छायाचित्र ठेवून घेतलेल्या पिप छायाचित्रात दिसली नाहीत.

 

८. सनातन-निर्मित श्री गणपतीच्या सात्त्विक चित्रात
श्री गणपतितत्त्व पुष्कळ अधिक प्रमाणात असण्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणे

८ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प अन् त्यांचे लाभलेले मार्गदर्शन !

संतांच्या उच्च आध्यात्मिक स्तरामुळे त्यांच्यात संकल्पशक्ती असते. एखादी गोष्ट घडो, एवढाच विचार त्यांच्या मनात आला, तरीही ती गोष्ट घडते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मनात समाजाला देवतांची सात्त्विक चित्रे उपलब्ध व्हायला हवीत, असा विचार येणे, हा संकल्पच आहे. त्यामुळे देवतांची चित्रे काढणारे साधक-कलाकार पुढे आले आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार परिश्रमपूर्वक आणि सूक्ष्म-स्तरावरील अभ्यास करून चित्रे काढली.

८ आ. सनातन-निर्मित श्री गणपतीचे सात्त्विक चित्र हे धर्मशास्त्रात दिलेल्या गणपतीच्या
रूपाच्या वर्णनानुसार, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काळानुसार केलेल्या मार्गदर्शनानुसार असणे

शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती नेहमी एकत्रित असते, असा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यामुळे देवतेचे रूप आले की, त्याची शक्ती तेथे असतेच. प्रत्येक देवतेच्या रूपाचे वर्णन द्रष्ट्या ऋषिमुनींनी धर्मशास्त्रात लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे चित्रकाराने स्वतःच्या कल्पनेने काढलेल्या चित्रापेक्षा धर्मशास्त्रात दिलेल्या वर्णनानुसार असलेल्या चित्रांत त्या त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात असते. धर्मशास्त्रात एकाच देवतेची अनेक नावे आणि त्यानुरूप असणार्‍या रूपांचा उल्लेख आढळतो. अशा वेळी उपासकांनी काळानुसार देवतेच्या कोणत्या रूपाची उपासना करणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे, ते केवळ अध्यात्मातील जाणकार, म्हणजे संतच सांगू शकतात. सनातन-निर्मित श्री गणपतीचे सात्त्विक चित्र हे धर्मशास्त्रात दिलेल्या गणपतीच्या रूपाचे वर्णन आणि काळानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन यांनुसार बनवलेले आहे.

८ इ. साधक-कलाकारांनी व्यावसायिक हेतूने प्रेरित होऊन
नव्हे, तर ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, या भावाने देवतांची चित्रे काढणे

चित्रकला, संगीत, नृत्य आदी सर्व कलांची निर्मिती ईश्‍वरापासून झाली आहे. त्यामुळे ईश्‍वराची (सर्वोच्च आणि सातत्याने मिळणार्‍या आनंदाची) अनुभूती घेता येणे, हे या सर्व कलांचे अंतिम साध्य आहे. थोडक्यात सांगायचे, तर कलेसाठी कला नव्हे, तर ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, याची जाणीव परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनामुळे साधक-कलाकारांना सतत होती. देवतांची चित्रे काढण्यामागे त्यांचा अन्य कोणताही व्यावसायिक हेतू नव्हता.

८ ई. साधक-कलाकारांमध्ये सूक्ष्म स्पंदने जाणण्याची क्षमता असणे

स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. देवतांची चित्रे काढतांना त्या चित्रांत त्या देवतेचे तत्त्व येत आहे का ? हे कळण्यासाठी चित्रकारामध्ये सूक्ष्मातील स्पंदने जाणण्याची क्षमता असावी लागते. ही क्षमता योग्य साधनेने विकसित होते. साधक-कलाकारांमध्ये ती क्षमता असल्याने ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार श्री गणपतीची अधिकाधिक गणेशतत्त्व असणारी चित्रे काढू शकले.

– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२१.८.२०१७)

ई-मेल : [email protected]

 

आपल्या अद्वितीय संशोधनातून समाजाला आध्यात्मिक स्तरावर लाभदायक
असणारी चित्रे, मूर्ती, ग्रंथ आदी उपलब्ध करून देणारे ऋषितुल्य परात्पर गुरु डॉ. आठवले !

योगशास्त्र, नाट्यशास्त्र, व्याकरण, ज्योतिष, मूर्तीशास्त्र आदी सर्वच प्राचीन शास्त्रांचे रचनाकार ऋषीमुनी हे संशोधकच होते. त्यांनी मानवाच्या उन्नतीसाठी अनेक शास्त्रांची निर्मिती केली. त्यांनी सर्वोच्च ज्ञान मिळवून मानवाला प्रत्येक विषयातील अंतिम सत्य काय आहे, ते आधीच सांगून ठेवले आहे. त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. प्राचीन ऋषीमुनींचीच परंपरा पुढे चालवणारे अध्यात्मातील अद्वितीय कार्य परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे जुलै २०१७ पर्यंत ३०३ ग्रंथांच्या १६ भाषांत ६९ लक्ष ६० सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत आणि १३ सहस्र विषयांवर ८ सहस्रहून अधिक ग्रंथ होतील, एवढे लिखाण प्रकाशित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधक-कलाकारांनी देवतांची तत्त्वे अधिक प्रमाणात असणारी चित्रे आणि मूर्ती यांची निर्मिती केली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली १४ विद्या आणि ६४ कला यांचे शिक्षण आध्यात्मिक परिभाषेतून देणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय आकार घेत आहे !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment