साधकांना ज्ञान देण्याची तळमळ असलेले जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश !

जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश आणि त्यांच्या शिष्या डॉ. प्रीती मिश्रा रामनाथी आश्रमात वास्तव्याला असतांना साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश

 

डॉ. प्रीती मिश्रा

१. नम्रता आणि परेच्छेने वागणे

स्वामीजींनी सांगितले, मी येथे शिकण्यासाठी आलो आहे. स्वामीजी ज्ञानी असूनही नम्रतेेने आणि सतत परेच्छेने वागतात. ते त्यांचे विचार न सांगता तुम्ही जसे सांगाल, तसे मी करीन, असे म्हणतात.

 

२. प्रीती

त्यांना जेवण वाढण्याच्या सेवेत असणारी एक साधिका रुग्णाइत आहे, हे समजल्यावर त्यांनी त्या साधिकेविषयी प्रेमाने विचारपूस केली. स्वामीजींनी साधिकेला ती घेत असलेल्या औषधांविषयी विचारले.

 

३. साधकांना ज्ञान देण्याची तळमळ

अ. विचारून कृती करणे

रामनाथी आश्रमात स्वामीजींनी योग, संगीत आदी विषयांवर मार्गदर्शन केले. कोणत्या विषयावर मार्गदर्शन करायचे ?, हे ते स्वतः न ठरवता ते संबंधित साधकांना विचारून घेतात. स्वामीजींनी आम्हाला सांगितले, तुम्हाला ज्या विषयावर मार्गदर्शन आवश्यक आहे, त्याविषयी मला सांगा. मला जे सांगावेसे वाटेल आणि ते कितीही चांगले असेल; पण त्याचा तुम्हाला लाभ होणार नसल्यास, ते तुम्हाला सांगणे योग्य नाही.

आ. अभ्यासपूर्ण लिखाण

स्वामीजी योग, संगीत आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यापूर्वी विषयाचा अभ्यास करतात. ते सतत लिखाण करतात.

इ. स्वामीजींनी साधकांना पुढील विषयांवर मार्गदर्शन केले.

१. कुंडलिनी, सप्तचक्रे, त्यांचे बीजमंत्र आणि संगीतातील सप्तसूर

२. संगीत चिकित्सेअंतर्गत म्हटले जाणारे विविध राग आणि सूर

३. योग, अध्यात्म आणि संगीत

४. वेद आणि संगीत

 

४. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी जिज्ञासेने जाणून घेणे

साधक आश्रमातील फलकावर त्यांच्याकडून झालेल्या चुका लिहितात. स्वामीजींनी फलक वाचून संबंधित साधकांकडून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन-प्रक्रियेविषयी जाणून घेतले.

 

५. भावपूर्ण संगीत सादर करणे

त्यांना उत्स्फूर्त गीते सुचतात आणि ते स्वतः विविध रागांत ती गीते गातात. त्यांनी साधकांसमोर ही गीते गायली. त्यांनी पुराणातील काही कथांचा आध्यात्मिक स्तरावर भावार्थ सांगून त्यावर गीते गायली.

 

६. भाव

स्वामीजी म्हणाले, यह आश्रम तो गुरुदेव के अमृत का (चैतन्य का) सागर है । हम भी यहां आकर धन्य हुए । (त्यांनी अजून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहिलेही नाही.)

– कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

 

जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश
यांनी जाणलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महानता !

१. स्वामीजींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहिले नसतांनाही त्यांची वैशिष्ट्ये वाचून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर एक रचना लिहून ती मालकंस रागात गायली.

२. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या १४ विद्या आणि ६४ कला यांच्या माध्यमातून ईश्‍वरप्राप्ती या कार्याविषयी स्वामीजींनी काव्य रचून ते भावपूर्णरित्या गायले. त्या गीताचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी शरणागत होऊन कार्य करू, असा आशय होता.

 

जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश
यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जाणवलेली वैशिष्ट्ये

१६.८.२०१९ या दिवशी कॅनडा येथील विश्‍व या संघटनेचे संस्थापक जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश यांचे रामनाथी आश्रमात आगमन झाले. त्यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जाणवलेली वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

 

डॉ. स्वामी सत्यप्रकाश यांची वैशिष्ट्ये

अ. १०० टक्के परेच्छेने वागणे आणि वर्तमानकाळात रहाणे

आ. आपले नाविन्यपूर्ण ज्ञान इतरांना अधिकाधिक देण्याची तळमळ

इ. आश्रमात प्रतिदिन १४ – १५ घंटे विविध विषय शिकवले. साधकांना शिकवण्यासाठी १०,००० हून अधिक उपस्थिती असणार असलेला देहलीतील एक कार्यक्रम रहित करून ते रामनाथी आश्रमात एक दिवस अधिक राहिले.

ई. त्यांनी अध्यात्मातील अनेक विषयांचे संशोधन केले आहे, उदा. रागचिकित्सा.

उ. डॉ. स्वामी कोणत्याही विषयावर लगेच कविता लिहू आणि गाऊ शकतात. त्यांनी आश्रमात असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय या विषयांवर कविता रचल्या आणि गाऊन दाखवल्या.

उ. बहुतेक आश्रमांतील शिष्यांची प्रगती झाल्याचे आढळून येत नाही. पू. स्वामींच्या आश्रमातील शिष्यांची प्रगती झाल्याचे दिसून येते. त्यांच्या शिष्यांत डॉ. प्रीती मिश्रा या एक अप्रतिम उदाहरण आहेत.

ऊ. या वैशिष्ट्यांमुळे स्वामी आणि आम्ही एकच आहोत, असे वाटते.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

डॉ. प्रीती मिश्रा यांचा जगद्गुरु योगऋषी
डॉ. स्वामी सत्यप्रकाश आणि आश्रम यांच्याप्रतीचा भाव !

१. स्वामीजींकडे असलेले ज्ञान समष्टीपर्यंत पोचवण्याची तळमळ

डॉ. प्रीती मिश्रा यांना जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश यांच्याप्रती आणि त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाप्रती अपार आदर आहे. त्यांना स्वामीजींकडे असलेले ज्ञान जिज्ञासूंना मिळावे, याची तीव्र तळमळ आहे. त्यांनी आश्रमातील साधकांची शिकण्याची क्षमता आणि ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा जाणली. त्यांच्या या तळमळीमुळेच स्वामीजींनी साधकांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यासाठी स्वामीजींनी त्यांचा एक नियोजित भव्य स्तरावर दिल्लीला असलेला कार्यक्रम रहित केला आणि ते आश्रमात थांबले.

२. शिकण्याची वृत्ती

अ. डॉ. प्रीतीजींनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रियेविषयी जाणून घेतांना दोन साधिकांना चूक कशी ओळखायची ?, याचे प्रसंगासह वर्णन करायला सांगितले.

आ. त्यांनी त्यांच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवण्याविषयी विचारणा केली.

३. भाव

साधिकेने डॉ. प्रीतीजींना आश्रम आवडला का ?, असे विचारले असता त्या म्हणाल्या, आश्रम छान आहे. येथे सर्व साधक गुण्यागोविंदाने रहातात. असा आश्रम कुठेच पहायला मिळणार नाही. आमचे भाग्य आहे की, आम्हाला येथे यायला मिळाले.

– कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

 

जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश यांची
सतत इतरांचा विचार करण्याची वृत्ती आणि त्यांची अहंशून्यता !

कॅनडा येथील विश्‍व या संघटनेचे संस्थापक जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाशजी यांच्यातील काही गुणांचे मला झालेले दर्शन आणि त्यांनी सांगितलेली बोधपर सूत्रे येथे दिली आहेत.

१. जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाशजी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१ अ. स्वतःच्या वेळेनुसार महाप्रसाद ग्रहण न करता साधकांना असुविधा होऊ नये, यासाठी आश्रमाच्या वेळेत महाप्रसाद ग्रहण करणे

स्वामीजींना प्रसाद आणि महाप्रसाद केव्हा घेणार ?, असे विचारले असता त्यांनी सांगितले, आश्रमातील प्रसाद आणि महाप्रसाद यांच्या वेळेनुसार मी ग्रहण करीन. आश्रमात अन्य साधकांना असुविधा व्हायला नको, यासाठी त्यांनी आश्रमातील वेळेनुसार प्रसाद, महाप्रसाद घेणार असल्याचे सांगितले. स्वामीजी ब्राह्ममुहूर्तावर उठतात. त्यामुळे एरव्ही ते लवकर प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करत असावेत. ते सूर्यास्तानंतर भोजन ग्रहण करत नाहीत.

१ आ. त्यांनी सांगितले, भावनाजींनी (एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे यांनी) मला आश्रमात येण्यास सांगितले आहे. आता मी तुमच्या आज्ञेनुसार वागेन. तुम्ही सांगायचे आणि मी ऐकायचे, एवढेच मला ठाऊक आहे.
१ इ. स्वतःचे वेगळे अस्तित्व न जपणे

एके दिवशी प्रसाद ग्रहण केल्यानंतर स्वामीजींना हात धुण्यासाठी पात्र आणि पाणी पटलावर आणू का ?, असे विचारले. तेव्हा ते म्हणाले, असे केल्याने आश्रमातील जी साधिका माझ्यासाठी पाणी आणि पात्र घेऊन येईल, ती आणि मी वेगळे आहोत, असे होईल.

२. जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाशजी यांनी सांगितलेली बोधपर सूत्रे !

२ अ. माणसाने केवळ स्वतःचा विचार केल्यास त्याच्याकडून पाप घडत असणे आणि त्याने समोरच्या व्यक्तीचा विचार केल्यास त्याला स्वास्थ्य लाभणे

त्यांनी सांगितले, जेथे I म्हणजे मी येतो, तिथे आजारपण किंवा असुविधा (i+llness = illenss) येेते. ज्या ठिकाणी आम्ही, म्हणजे we येतो, तिथे Wellness (We+llness = Welleness), म्हणजेच स्वास्थ्य येते. माणूस जेव्हा स्वतःचा, म्हणजे I चा विचार करतो, तेव्हा Sin, म्हणजे पाप घडते. माणूस जेव्हा समोरच्या व्यक्तीचा विचार करतो, तेव्हा U येतो आणि Sun होतो, म्हणजेच तो सूर्याप्रमाणे परोपकारी होतो.

२ आ. समभावाने पहाण्याचे महत्त्व

आपण एखाद्या व्यक्तीला तुच्छ लेखल्यास आपले मूल्य न्यून होते. आपण त्या व्यक्तीला आपल्यासारखे मानले, तर आपले मूल्य वाढते. प्रत्येक व्यक्ती ही ईश्‍वराचा अंश आहे, हे लक्षात घेतल्यास आपण समभावाने पाहू शकतो.

– श्री. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment