कोल्हापुरातील १०७ वर्षांतील सर्वांत भीषण पूरस्थितीचे भयावह वास्तव !

१. कोल्हापुरातील गेल्या १०७ वर्षांतील सर्वांत भीषण महापूर !

कोल्हापुरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या जवळचा पंचगंगा नदीच्या पाण्याने जलमय झालेला परिसर ! महामार्गाचा काही भागही पाण्याखाली गेला होता.
कोल्हापूर शहरातील जलमय झालेल्या भागात बोटीद्वारे साहाय्य करतांना नागरिक !
पुराच्या पाण्यात अडकलेले नागरिक

अ. कोल्हापूर शहरात ६ ऑगस्टपासून नागरिकांना महापुराची झळ तीव्रतेने जाणवू लागली.

आ. वर्ष २००५ च्या महापुराचा फटका शहरातील काही भागाला बसला होता; मात्र त्याची या वर्षीची तीव्रता किती असेल, याचा कयास नसल्याने नागरिक घरीच होते. ५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून नदीची पाणीपातळी वेगाने वाढू लागली. वर्ष २००५ मध्ये पायाच्या घोट्याएवढे पाणी आलेल्या ठिकाणच्या पाण्याची पातळी या वेळी काही तासांतच ५ फुटांहून अधिक झाली.

इ. पंचगंगा नदीची पाणीपातळी ५५ फुटांपर्यंत गेली होती. वर्ष १९८९ च्या महापुराची आठवण सांगणारी पंचगंगा रुग्णालयाजवळची फरशी केव्हाच बुडून गेली होती.

ई. आजवर कधीही कोल्हापूर शहरालगतचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बंद पडला नव्हता; मात्र तावडे हॉटेलजवळील पुलावरही पाण्याची पातळी १५ फुटांपर्यंत गेली आणि सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले.

उ. महामार्गावरील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील दूधगंगा आदी नद्यांचेही पाणी रस्त्यांवर १० फूट उंचीवर गेले आणि कोल्हापूरचा कर्नाटकशी संपर्क तुटला. गेल्या १०७ वर्षांतील हा सर्वांत भीषण महापूर असल्याचे या वेळी लक्षात आले.

 

२. महापुराची भीषणता दर्शवणारी नागरिकांची स्थिती !

अ. पंचगंगा नदीच्या जवळ असलेली, विशेषतः शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी ही गावेच्या गावे पाण्याखाली गेली. गावांना बेटाचे स्वरूप आले. नागरिक घर, देवळे आदींच्या गच्चीत आणि प्रसंगी छपरावर जाऊन बसले. त्यातच पावसाचा जोरही अल्प होत नव्हता. त्यामुळे नागरिकांना अक्षरशः भिजत रात्र काढून साहाय्याची वाट पहावी लागत होती.

आ. शेजारीच असलेल्या सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या जवळची सर्व गावे पाण्याखाली गेली. शहरातील ३-४ मजली इमारतीही या पुरात जलमय झाल्या. सांगलीमध्ये पुराची पातळी ५७.५ फुटांपर्यंत वाढली होती, असे शासकीय सूत्रांनी सांगितले आहे.

इ. काही खेड्यांतील मातीची घरे पुरात वाहून जाण्याइतकी स्थिती बिकट होती. सहस्रो घरांची पडझड झाली. काही लोकांनी गावातील शाळेत आसरा घेतला; पण नंतर शाळेतही पाणी आले. काही ठिकाणी तर शाळाही वाहून गेल्या. साखर कारखाने, त्यांची सभागृहे, देवळे आदी ठिकाणी लोकांची तात्पुरती सोय करण्यात आली.

 

३. आपत्कालीन साहाय्य करतांना झालेली अवस्था आणि चटका लावणारा अपघात !

अ. शहरातील नागरिकांनी परस्परांना साहाय्यास प्रारंभ केला; मात्र शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यांतील नदीजवळच्या गावातील लोकांना साहाय्य मिळणे अवघड झाले होते. या नागरिकांना साहाय्य मिळण्यासाठी नौदलाच्या आणि लष्कराच्या बोटी येण्याची वाट पहावी लागली.

आ. सांगलीतील अनेक गावांमध्ये, तसेच कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातही पूरस्थिती उलटून ६ दिवस झाल्यानंतरही पुरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत यंत्रणा पोचलेल्या नव्हत्या. काही ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधीही नागरिकांपर्यंत पोचले नव्हते. त्याचा राग महिलांच्या प्रतिक्रियांतून दिसत होता.

इ. काही पूरग्रस्त नागरिक स्वतःच्या घरात दुसर्‍या-तिसर्‍या मजल्यावर जाऊन बसले होते. त्यांना बोलावण्यासाठी बोटीतील सैनिकांना मोठे प्रयत्न करावे लागत होते.

ई. अनेक नागरिक घर सोडून यायला सिद्ध नव्हते. स्वतः कष्टाने उभे केलेले घर कसे सोडायचे, हा त्यांचा प्रश्‍न होता. त्यांना सैनिकांनी वारंवार समजावले. पाणी वाढत असल्याची माहिती दिली; मात्र तरीही काहीजण ऐकत नव्हते. अशांना प्रसंगी कारवाईचा धाक दाखवून बोटीतून आणावे लागले.

उ. काही गावांतील नागरिकांना घरातील जनावरांचे काय करायचे ? हा प्रश्‍न होता. प्राण्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. काही लोकांनी आधी प्राण्यांना वाचवा, मग आम्हाला वाचवा ! असे सैनिकांना सांगितले. काही ठिकाणी जेसीबी यंत्रणा आणून प्राण्यांना अलगद उचलून पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले.

ऊ. ब्रह्मनाळ (तालुका पलूस, जिल्हा सांगली) येथे बचावकार्यासाठी गेलेली नाव उलटून १४ जणांचा मृत्यू झाला. ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला चटका लावणारी होती.

 

४. निवाराकेंद्रातील नागरिकांचे निरुत्तर करणारे प्रश्‍न !

अ. निवाराकेंद्रांमध्ये आलेल्या पूरग्रस्तांच्या व्यथाही मोठ्या होत्या. काही जणांनी विचारले की, आता पुन्हा संसार कसा उभा करायचा ? आम्हाला शासनाकडून हानीभरपाई मिळेल; पण त्यासाठी आवश्यक असणारे आधारपत्र, शिधापत्रिका आदी सर्व महापुरात वाहून गेले आहे. आम्हाला साहाय्य तरी कसे मिळणार ? साहाय्य मिळाले, तरी पुन्हा नव्याने घर उभारण्यासाठीचे कष्ट चुकणार आहेत का ?

आ. निवाराकेंद्रातील एका शाळकरी मुलाने एका पत्रकाराला विचारले, आज माझे दप्तर आणि शाळा दोन्ही वाहून गेले आहे. मी शाळा कशी शिकणार ?

इ. महापुराच्या काळातच चोर्‍यांचे प्रमाणही वाढले होते. पावसामुळे कसबा बावडा, कोल्हापूर येथून काहीजण निवाराकेंद्रात रहायला गेले. तेव्हा त्यांच्या बंगल्यातून ५० सहस्र रुपये रोख आणि ८६ तोळे सोने चोरांनी पळवल्याचे नंतर लक्षात आले. लक्ष्मीपुरी येथील एक घर फोडून १४ तोळे सोने आणि १८ सहस्र रुपये पळवून नेण्यात आले. केवळ २-३ दिवसांतच चोरीच्या ५-६ घटना उघडकीस आल्यामुळे पूरग्रस्त हवालदिल झाले.

१२ ऑगस्टला अनेक ठिकाणी पुराचे पाणी ओसरले असले, तरी घरात झालेला चिखल आणि गाळ कसा काढायचा, हा प्रश्‍न आता नागरिकांसमोर आहे. संभाव्य रोगराईवरील उपाययोजना, साथीचे वाढते प्रमाण रोखणे, त्यासाठीचे प्रश्‍न प्रशासनासमोर आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment