तिरुवट्टार (तमिळनाडू) येथील आदिकेशव देवालयात अखेरच्या श्‍वासापर्यंत भावपूर्ण सेवा करणार्‍या पू. वसुमतीआजी (वय ८५ वर्षे) !

पू. वसुमतीआजी

कन्याकुमारी (तमिळनाडू) – ‘तिरुवट्टार गावातील आदिकेशव (पद्मनाभ) देवालयात पूजेसाठी वापरण्यात येणारे निरांजन, समई, आदी उपकरणांच्या स्वच्छतेची सेवा बालपणापासून भावपूर्ण आणि निरपेक्षपणे करणार्‍या अन् नारायणदेवाचा अखंड नामजप करून संतपद गाठलेल्या पू. वसुमतीआजी (वय ८५ वर्षे) यांनी त्यांच्या येथील निवासस्थानी १ मे २०१९ या दिवशी देहत्याग केला. त्या अनेक दिवस आजारी होत्या. साधकांना त्यांच्या देहत्यागाविषयी नुकतेच समजले.

 

पू. वसुमतीआजी यांच्यातील संतत्व ओळखणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या दैवी प्रवासाच्या निमित्ताने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १.३.२०१५ या दिवशी आदिकेशव देवालयाला भेट दिली होती. तेव्हा त्यांची पू. वसुमतीआजी यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी पू. आजींनी ७० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सद्गुरु (सौ.) गाडगीळ यांच्या लक्षात आले होते. यानिमित्ताने त्यांनी पू. आजींचा हार आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला होता. या वेळी पू. वसुमतीआजींनी सनातन  संस्थेच्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याला आशीर्वाद दिले होते.

 

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रती अत्युच्च भाव असणार्‍या पू. वसुमतीआजी !

पू. आजींचा परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती अतिशय भाव होता. तिरुवट्टार या पुष्कळ लांब असलेल्या गावात रहाणार्‍या पू. वसुमतीआजींना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील संतत्व सूक्ष्मातून ओळखले. ज्याप्रमाणे प्रभु श्रीरामाने शबरीचा उद्धार केला, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांनीही पू. वसुमतीआजींचा उद्धार केला. एप्रिल २०१९ मध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कु. प्रियांका लोटलीकर यांच्या समवेत काही साधकांनी पू. आजींची भेट घेतली, त्या वेळी या साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली खाऊरूपी भेट पू. आजींना दिली. तेव्हा त्यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव जागृत झाला. पू. आजींची दृष्टी कायम शून्यात असायची. पू. आजींचा स्पर्श अतिशय मऊ होता. त्यांच्या शरिराला एकप्रकारची चमक होती, असे कु. प्रियांका लोटलीकर यांच्या लक्षात आले.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात