भूमितीतील ‘पाय’ची संख्या निर्धारित करणारे केरळ येथील प्रसिद्ध गणिततज्ञ माधवम् !

‘भारताला ऋषिमुनींची थोर परंपरा आहे. ऋषिमुनींनी लिहिलेले वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी ग्रंथ मानवाला सर्वंकष ज्ञान देतात. त्यांमध्ये मनुष्यासाठी आचारधर्म, उपासना, साधना, संरक्षण इत्यादी सर्वच विषय आहेत. ऋषिमुनींना हे ज्ञान त्यांच्या तपोबलामुळे, म्हणजे आध्यात्मिक सामर्थ्यामुळे मिळाले. त्यांना साधनेत पूर्णत्व आल्यावर ईश्वराकडून ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी लिहून ठेवलेल्या या अमूल्य ज्ञानामुळे मानवाला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटायला हवी.

प्रसिद्ध गणिततज्ञ माधवम्

प्राचीन काळी भारतात ऋषिमुनींचे आश्रम, म्हणजे विश्वविद्यालयेच होती. भरद्वाजमुनी आणि दुर्वासऋषि यांच्या आश्रमात एका वेळी १० सहस्र विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी निवास करत होते. द्वापरयुगात सांदिपनी ऋषींचा आश्रम शिक्षणाचे मोठे केंद्र होता. महाभारत युद्धानंतर तक्षशिला, विक्रमशिला, नालंदा आदी विश्वविद्यालये भारतात निर्माण झाली. ऋषिमुनींनी केवळ ज्ञान मिळवले नाही, तर अशा प्रकारे ज्ञानदानाचेही कार्य केले. त्या काळी लिखाणाचे साहित्य फारसे नसल्याने ऋषींकडून मिळालेले मौखिक ज्ञान शिष्यांकडून मुखोद्गत केले जायचे. अशा प्रकारे ते ज्ञान वृद्धींगत होत गेले आणि वर्षानुवर्षे टिकून राहिले. लाखो वर्षांपूर्वी लिहिलेले हे ग्रंथ अजूनही काही प्रमाणात टिकून आहेत, ते त्यांतील शाश्वत स्वरूपातील ज्ञानसामर्थ्य आणि चैतन्य यांमुळेच ! असेच एक केरळ मधील प्रसिद्धगणिततज्ञ ‘माधवम्’ यांच्या महान कार्याची माहिती घेण्यासाठी आम्ही त्रिशूर येथे गेलो.

 

१. केरळ राज्यातील संगमग्राम गावात वर्ष
१३५० मध्ये होऊन गेलेले प्रसिद्ध गणिततज्ञ माधवम् !

केरळ राज्यात त्रिशूर जिल्ह्यात संगमग्राम नावाचे गाव आहे. ते आता ‘इरन्नालक्कुडा’ या नावाने प्रसिद्ध आहे. या गावामध्ये वर्ष १३५० मध्ये ‘माधवम्’ नावाचे प्रसिद्ध गणिततज्ञ होऊन गेले. ‘इरन्नालक्कुडा’ या गावात माधवम् जेथे रहात असत, त्या ठिकाणी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन विभागातील काही साधकांनी भेट दिली. त्या वेळी त्यांचे वंशज श्री. राजकुमार नंवसरी यांनी माधवम् यांच्याविषयी आणि श्रीकृष्ण मंदिराविषयी माहिती दिली.

 

२. माधव यांनी भूमितीतील ‘पाय’ची संख्या पूर्णांकानंतर
१६ अंकांपर्यंत निर्धारित करून गणितशास्त्रीय इतिहासात दिलेले मोठे योगदान !

माधवम् यांना केरळ विद्यालयाच्या खगोलशास्त्र आणि प्राचीन गणितशास्त्र विभागाचे संस्थापक मानले जाते. माधवम् यांनी भूमितीतील ‘पाय’ ची संख्या (वर्तुळाच्या परिघाची लांबी मोजतांना धरलेला स्थिरांक किंवा ‘अव्यय राशी’ म्हणजे ‘पाय’. परिघाची लांबी = व्यास × पाय) पूर्णांकानंतर १६ अंकांपर्यंत (१६ अपूर्णांक) निर्धारित करून गणितशास्त्रीय इतिहासात मोठे योगदान दिले होते. माधव इरन्नालक्कुला येथील श्रीकृष्ण मंदिरात पुजारी होते. तेथे असलेल्या दोन शिळांवर झोपून ते अवकाशाचे निरीक्षण करायचे आणि तारकांच्या निरीक्षणाच्या आधारे त्यांनी गणितातील अनेक महत्त्वाचे सिद्धांत मांडले. या दोन्ही शिळांना ‘कृष्णशिळा’ म्हणतात.

माधवम् यांनी (१) आणि (२) या शिळांवर आडवे पडून अवकाश निरीक्षण केले होते.

 

३. माधवम् यांनी केलेल्या संशोधनाकडे
भारतियांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ‘जेझुईट मिशनरी’
च्या प्रचारकांना भारतातील अमूल्य असे गणितशास्त्र विदेशात नेणे शक्य होणे

माधवम् यांनी त्यांचे काही संशोधन देवनागरी आणि जुन्या मल्याळम् भाषेमध्ये मंदिरातील शिळांवर कोरून ठेवले आहेत. त्याचे संशोधन होणे अजूनही बाकी आहे. प्रसिद्ध गणिततज्ञ असूनही भारतात त्यांच्या संदर्भात कुठेही संशोधन तर दूरच; पण त्यांच्या अमूल्य अशा गणितासंदर्भातील माहितीदेखील जतन करण्यास भारतीय असमर्थ ठरले. माधवम् यांनी शिळांवर झोपून केलेल्या संशोधनाचे लिखाण असलेले ८ ग्रंथ होते. या ग्रंथांमध्ये गणितासंदर्भात अमूल्य माहिती लिहून ठेवली होती; परंतु हे ग्रंथ ‘जेझुईट मिशनरी’चे प्रसारक विदेशात घेऊन गेले. अशा प्रकारे भारतातील अमूल्य असे गणितशास्त्र विदेशात गेले. आता विदेशात ‘केरळा मॅथमॅटिक्स’ शिकवले जाते. न्यूटन, गॅलीलिओ आदींनी सांगितलेल्या सिद्धांतांपैकी अनेक सिद्धांत त्यांच्यापूर्वी ३०० वर्षे आधी होऊन गेलेल्या माधवम् यांनी लिहून ठेवले होते. ‘केरळा स्कूल ऑफ मॅथमॅटिक्स’मध्ये माधवम् यांचे सिद्धांत शिकवले जातात; पण जेथे माधवम् यांनी संशोधन केले, त्या श्रीकृष्ण मंदिराविषयी सांगितले जात नाही.

अशा प्रकारे भारतातील सोन्याहून मौल्यवान असे ज्ञानरूपी वैभव भारतातून संपुष्टात आले.’

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment