भावभक्तीचा आदर्श निर्माण करणारे संत सावता महाराज !

संत सावता महाराज

कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ॥ लसण मिरची कोथंबिरी । अवघा झाला माझा हरि ॥

स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातो हात ॥ सावत्याने केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ॥

संसारातील कर्तव्ये विठ्ठलरूप स्मरून करत रहाणे, यालाच संत सावता महाराज ‘कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ।’ म्हणतात.

अरण, ता. माढा, जि. सोलापूर येथील संत सावता महाराज यांच्या मूळ समाधीचे स्थान. त्यांच्या मूर्तीला भावपूर्ण नमस्कार करूया !

संत सावता महाराज (संत सावता माळी) यांचा काळ वर्ष १२५० ते १२९५ चा आहे. सावता माळी हे ‘कर्तव्य आणि कर्म करीत रहाणे, हीच खरी ईश्‍वरसेवा’, अशी प्रवृत्तीमार्गी शिकवण देणारे संत ! वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले.

फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय ! ‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात. ‘ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतांनाच काया-वाचे-मने ईश्‍वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’, असे ते म्हणत. धार्मिक प्रबोधनाचे आणि ईश्‍वरभक्तीच्या प्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने अन् ‘व्रत’ म्हणून आचरले. समरसता आणि अलिप्तता यांतील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तीमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग सध्या उपलब्ध आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात