गर्भात जीवात्म्याचा प्रवेश केव्हा होतो ?

निपाणी, कर्नाटक येथील गर्भवैज्ञानिक श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांना ‘वंध्यत्व निवारण’ क्षेत्रात अनेक वर्षांचा अनुभव आहे. श्री. पट्टणशेट्टी यांनी यासंबंधी विचारलेला प्रश्‍न आणि वैद्य मेघराज पराडकर यांनी अध्यात्मशास्त्राच्या आधारे त्यास उत्तर दिले.

श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी

श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी : अध्यात्मशास्त्रानुसार आईच्या पोटातील साधारण ६ ते ८ मासांच्या अर्भकात जीव येतो. वीर्यातील शुक्राणूंची हालचाल होत असते आणि स्त्रीबिजांचीही वाढ होत असते, त्या वेळी त्यांत जीव नसतो का ? जर नसेल, तर शुक्राणूंची हालचाल आणि स्त्रीबिजांची वाढ होते, यामागे कोणते कारण आहे ?

उत्तर : ‘अध्यात्मशास्त्रानुसार ‘आईच्या पोटातील साधारण ६ ते ८ मासांच्या अर्भकात जीव येतो’, असे नसून ‘शुक्राणू आणि स्त्रीबीज यांचा गर्भाशयामध्ये ज्या क्षणाला संयोग होतो, त्याच क्षणाला त्यात जीवात्मा प्रवेश करतो’, असे आहे. गर्भाची वाढ होण्यालाही चैतन्यच कारणीभूत असते. याचे संदर्भ पुढीलप्रमाणे आहेत.

१. शुक्रशोणितजीवसंयोगे तु खलु कुक्षिगते गर्भसञ्ज्ञा भवति ।

– चरकसंहिता, शारीरस्थान, अध्याय ४, सूत्र ५

अर्थ : जेव्हा शुक्राणू, स्त्रीबीज आणि जीव यांचा गर्भाशयात संयोग होतो, तेव्हा त्या संयोगाला ‘गर्भ’ असे म्हणतात.

२. शुक्रशोणितसंसर्गम् अन्तर्गर्भाशयगतं जीवः अवक्रामति सत्त्वसम्प्रयोगात् तदा गर्भः अभिनिर्वर्तते ।

– चरकसंहिता, शारीरस्थान, अध्याय ३, सूत्र ३

अर्थ : शुक्राणू आणि स्त्रीबीज यांच्या गर्भाशयात झालेल्या संयोगात जेव्हा अंतःकरणाने वेढलेला आत्मा (जीवात्मा) प्रवेश करतो, तेव्हाच तो ‘गर्भ’ बनतो.

स्पष्टीकरण : गर्भधारणा होण्यासाठी केवळ ‘शुक्राणू आणि स्त्रीबीज यांचा संयोग होणे’, एवढेच आवश्यक नसून त्यात त्या क्षणी जीवात्म्याचा प्रवेश होणेही अत्यावश्यक आहे. जीवात्म्याचा प्रवेश झाला नाही, तर गर्भधारणा होत नाही. जीवात्म्याचा प्रवेश होणे कर्मावर (प्रारब्धावर) अवलंबून असते.

३. तं चेतनावस्थितं वायुः विभजति…।

– सुश्रुतसंहिता, शारीरस्थान, अध्याय ५, सूत्र ३

अर्थ : चैतन्ययुक्त गर्भाला वायुतत्त्व आकार देते.

४. ‘आईच्या पोटातील साधारण ६ ते ८ मासांच्या अर्भकात जीव येतो’, असे जिथे म्हटले असेल, तिथे त्यांना कदाचित ‘या काळात मन आणि बुद्धी व्यक्त स्वरूपात येतात’, असे म्हणायचे असू शकेल; कारण ‘पाचव्या मासात मन आणि सहाव्या मासात बुद्धी व्यक्त स्वरूपात येते’, असे आयुर्वेदात सांगितले आहे. याचा संदर्भ पुढीलप्रमाणे आहे.

    पञ्चमे मनः प्रतिबुद्धतरं भवति । षष्ठे बुद्धिः ।

– सुश्रुतसंहिता, शारीरस्थान, अध्याय ३, सूत्र ३०

अर्थ : पाचव्या मासात गर्भाचे मन आणि सहाव्या मासात बुद्धी जागृत होते.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment