सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी सांगितल्याप्रमाणे साधनेचे प्रयत्न करू लागल्यावर साधिकेला झालेले लाभ !

(सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे

‘परात्पर गुरु डॉक्टरांची आमच्यावर अपार कृपा आहे की, त्यांनी आम्हा साधकांना साधनेत पुढे घेऊन जाणे आणि परिपूर्ण करणे, यांसाठी सद्गुरु पिंगळेकाकांचा सत्संग दिला आहे. त्यांच्या रूपाने परात्पर गुरु डॉक्टरच आम्हा सर्व साधकांना पुढे पुढे घेऊन जात आहेत. ‘साधकांतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होऊन त्यांची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी सद्गुरु पिंगळेकाकांना तीव्र तळमळ आहे. यासाठी ते साधकांना सतत मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे कृती केल्यावर मला झालेले लाभ पुढे देत आहे.

 

१. स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांची झालेली जाणीव

माझ्यात इतरांशी तुलना करणे, ईर्ष्या करणे, स्वतःला श्रेष्ठ समजणे, स्वकौतुकाची अपेक्षा करणे, कर्तेपणा, असे तीव्र अहंचे पैलू आहेत. या अहंच्या पैलूंमुळे माझे मन अस्वस्थ होऊन त्या विचारांमध्ये राहूनच माझ्याकडून सेवा केली जाते. ‘हे विचार चुकीचे असून त्यामुळे सेवा आणि साधना होत नाही’, हे ठाऊक असूनही मी ते थांबवू शकत नाही. पूर्णवेळ साधिका होण्यापूर्वी मी सतत याच विचारांमध्ये गुंतून रहायचे. आता पूर्णवेळ साधना करू लागल्यानंतर ईश्‍वराच्या कृपेमुळे मला या विचारांची जाणीव होऊ लागली आहे.

 

२. अहंयुक्त विचारांवर मात करण्यासाठी
सद्गुरु पिंगळेकाकांनी करायला सांगितलेले प्रयत्न

२ अ. अहंयुक्त विचार फलकावर लिहिणे

सद्गुरु पिंगळेकाका सांगतात, ‘मनातील अहंयुक्त विचार फलकावर लिहिल्यामुळे ते विचार गुरुदेवांपर्यंत पोचतात आणि गुरुदेव साधकांची स्वभावदोष अन् अहं यांची निर्मूलन प्रक्रिया करून ते न्यून करण्यासाठी साहाय्य करतात.’ हा प्रयत्न चालू केल्यावर माझ्या मनाला हलकेपणा जाणवू लागला.

२ आ. अहंचे विचार इतरांना सांगणे आणि सहसाधकांना चुका विचारणे

आरंभी मनातील अहंचे विचार सहसाधकांना सांगतांना माझा संघर्ष व्हायचा आणि प्रतिमा आड यायची. तेव्हा आढावासेवकाने सांगितले, ‘‘मी चांगली आहे’, ही माझी प्रतिमा सर्वांसमोर राखणे, हेसुद्धा अहंचे लक्षण आहे.’’ त्यानंतर ‘स्वतःच्या चुका साधकांना सांगणे, तसेच भोजनकक्षात चुका सांगणे’, हे प्रयत्न देवाने माझ्याकडून करून घेतले. मी सहसाधकांनाही माझ्या चुका विचारू लागले.

कु. मनीषा माहुर

२ इ. शिक्षापद्धत अवलंबणे

मनात चुकीचा विचार येताच मी स्वतःला चिमटा काढत असे आणि ‘माझ्या मनात हा विचार आलाच कसा ?’, असे स्वतःला विचारत असे.

२ ई. क्षमायाचना करणे

प्रत्येक चुकीचा विचार आल्यावर मी कान पकडून भगवंताच्या चरणी क्षमायाचना करू लागले. त्याचबरोबर प्रत्येक घंट्याला ध्यानमंदिरात जाऊन श्रीकृष्णाच्या चित्रासमोर साष्टांग नमस्कार घालून मी क्षमायाचना करू लागले. यामुळे माझ्यात अंतर्मुखता येऊ लागली आणि ‘मी असमर्थ असून गुरुदेव अन् श्रीकृष्णच माझ्यातील स्वभावदोष आणि अहं दूर करू शकतात’, असे मला वाटू लागले.

२ उ. प्रार्थना करणे

कोणतीही कृती किंवा सेवा करतांना वारंवार ईश्‍वराला प्रार्थना होऊ लागली, ‘माझ्या मनात कर्तेपणाचा विचार यायला नको, माझ्या मनातील अहंचे विचार तूच नष्ट कर आणि मला प्रशंसेच्या विचारांपासून दूर ठेव.’

 

३. ‘इतरांशी तुलना करणे’ आणि ‘ईर्ष्या करणे’
हे स्वभावदोष दूर करण्यासाठी सद्गुरु काकांनी सांगितलेले उपाय

३ अ. सहसाधिकांशी तुलना होऊन मनात ईर्ष्येचे विचार येणे

वरील सर्व प्रयत्न करूनही माझ्या मनात सहसाधिकांशी तुलना होऊन ईर्ष्येचे विचार यायचे. एखाद्या साधिकेचे चांगले प्रयत्न झाल्यावर सद्गुरु काका तिचे कौतुक करत. तेव्हा मला वाटायचे, ‘तिचेच कौतुक का होते ? माझे कौतुक का होत नाही ?’ एखादी साधिका अन्य साधकांना साहाय्य करायची. तेव्हा माझ्या मनात विचार यायचे, ‘सगळे तिचेच साहाय्य का मागतात ? सर्वजण ‘तिचे प्रयत्न चांगले आहेत’, असे का म्हणतात ?’

३ आ. सद्गुरु काकांनी कठोर प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून स्वतः केलेले प्रयत्न सांगणे

मी मनातील हे सर्व विचार सद्गुरु काकांना लिहून पाठवले. तेव्हा त्यांनी हे विचार बैठकीत सांगायला सांगितले आणि म्हणाले, ‘‘ही तुलना आता ईर्ष्येमध्ये रूपांतरित होत आहे. यासाठी कठोर प्रयत्न करायला हवेत.’’ यावर त्यांनी ‘स्वतः कसे प्रयत्न केले’, तेही सांगितले. ते म्हणाले, ‘‘माझी ज्या साधकाशी तुलना होत होती त्या साधकाची सेवा करणे, त्याला साहाय्य करणे, मानस नमस्कार करणे आणि त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करणे, असे प्रयत्न मी करत होतो. तो साधक रुग्णाईत असेल, तर त्याला अल्पाहार नेऊन देणे आणि त्याची भांडी घासणे, असे प्रयत्नही मी केले आहेत.’’

३ इ. साधकांचे साहाय्य घेणे आणि त्यांना साहाय्य करणे

सद्गुरु काकांनी सांगितलेले प्रयत्न ऐकल्यावर मीही प्रयत्न करू लागले. माझ्या मनात ज्या साधकांशी तुलना व्हायची किंवा ईर्ष्येचे विचार यायचे, त्यांना मी प्रतिदिन मानस साष्टांग नमस्कार करू लागले. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे मी लिहून काढू लागले. त्यांना काही साहाय्य हवे असेल, तर साहाय्य करू लागले, तसेच मला साधनेविषयी काही विचारायचे असेल, तर मी त्यांचे साहाय्य घेऊ लागले.

३ ई. सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि सद्गुरु (सौ.)
गाडगीळकाकू यांच्याकडून एकमेकांकडून शिकण्याचे महत्त्व लक्षात येणे

या संदर्भात सद्गुरु (सौ.) बिंदाताई आणि सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांच्याकडूनही मला शिकायला मिळाले. त्या दोघी देहली सेवाकेंद्रात आल्या होत्या. तेव्हा त्या दोघी एकमेकींकडून शिकायला मिळालेली सूत्रे सर्वांना सांगायच्या. त्या वेळी प.पू. गुरुदेवांनी मनात विचार दिला, ‘परिपूर्ण असूनही दोन्ही सद्गुरु एकमेकींकडून शिकत आहेत. मी तर सर्वसामान्य साधक आहे, तर मला न्यूनपणा घेऊन अन्य साधकांकडून शिकता का येत नाही ? सद्गुरु पिंगळेकाका स्वतः सद्गुरु असूनही त्यांच्या मनात सद्गुरु गाडगीळकाकूंप्रती किती भाव आहे.

अशा प्रकारे प्रयत्न होऊ लागल्यावर प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच तुलना आणि ईर्ष्या करणे, हा भाग न्यून झाला.

‘हे भगवंता, हे प.पू. गुरुमाऊली, आपणच माझ्याकडून हे प्रयत्न करून घेतले, यासाठी आपल्या श्री चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. हे गुरुदेव, यापुढेही आपण माझ्याकडून तळमळीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करून घ्यावेत, अशी आपल्या कोमल चरणी अनन्यभावाने प्रार्थना आहे.’

– कु. मनीषा माहुर, देहली सेवाकेंद्र (३.१०.२०१७)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment