रंगपंचमीच्या दिवशी नैसर्गिक रंगांचीच उधळण करण्यामागील शास्त्र

रंगपंचमी हा रंगांचा उत्सव. एकमेकांवर रंग उधळून परस्परांमधील प्रेम वृद्धींगत करण्याचा हा दिवस. या वेळी वापरण्यात येणारे रंग हे नैसर्गिक आणि सात्त्विक असावेत, असे शास्त्र सांगते. सध्या मात्र अत्यल्प दरात रासायनिक आणि घातक रंग बाजारात उपलब्ध होऊ लागल्याने लोक त्यालाच पसंती देऊ लागले आहेत; परिणामी हा सण साजरा करणार्‍याला यातून काहीच आध्यात्मिक लाभ होत नाही. रासायनिक रंगामुळे होणारी हानी आणि सात्त्विक रंगांचे लाभ, तसेच नैसर्गिक रंग कसे बनवावेत यांविषयीचे विवेचन या लेखातून केले आहे.

  • नैसर्गिक गुलाल हवेत उधळल्याने नेमके काय होते ?

  • नैसर्गिक गुलाल पाण्यात मिसळून केलेला रंग एकमेकांवर उडवल्याने काय होते ?

 

१. नैसर्गिक गुलाल उधळल्याने होणारे स्वास्थ लाभ

‘होलिकादहन केल्यामुळे निर्माण होणारी उष्णता आणि नैसर्गिक गुलालाच्या गंधामुळे शीतकाळात जन्माला आलेले रोगजंतू मरतात. गुलालाची उधळण केल्यास तो गळ्याच्या माध्यमातून फुप्फुसांमध्ये जाऊन साठलेल्या कफाला दूर करतो. यामुळे होलिकोत्सवाचा विधी आरोग्यदृष्ट्या योग्य ठरतो.’

संदर्भ : ‘वन इंडिया’ संकेतस्थळ

 

२. रंगपंचमीला नैसर्गिक गुलाल उधळल्याने होणारे आध्यात्मिक लाभ

२ अ. रंगपंचमी साजरी करण्यामागील अध्यात्मशास्त्र

होलिकादहन केल्याने वायूमंडलात सगुण आणि मारक तेजतत्त्व कार्यरत होते. यामुळे वायूमंडलात वाढलेल्या वाईट शक्तींचे त्रास अल्प होतात. होलिकादहनानंतर हळूहळू तेजतत्त्वाचे कार्य मारककडून तारक आणि सगुणाकडून निर्गुण होत जाते. निर्गुण स्थितीत असलेल्या तारक तेजतत्त्वाचा लाभ होण्यासाठी रंगपंचमी साजरी केली जाते. निर्गुण तेजतत्त्व ग्रहण करणे सर्वांना शक्य होत नाही. यामुळे विभूती, गुलाल यांसारख्या तेजतत्त्वयुक्त घटकांच्या माध्यमातून निर्गुण तेजतत्त्व ग्रहण करण्याचा प्रयत्न केला जातो. तेजतत्त्वाची तारकता कार्य समाप्तीचे प्रतीक असते. यामुळे रंगपंचमीला ‘विजयोत्सव’, असेही समजले जाते.

२ आ. रंगपंचमीला नैसर्गिक गुलालाची उधळण केल्याने होणारे लाभ

‘तारक तेजतत्त्वाचे कार्य ‘संवर्धन करणे’, असे आहे. यामुळे तारक तेजतत्त्वाची मनुष्यासहित चराचर सृष्टीला आवश्यकता असते. होलिकादहनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढलेल्या तारक तेजतत्त्वाचा चराचर सृष्टीला लाभ होण्यासाठी रंगपंचमीला विभूती, नैसर्गिक गुलाल आणि रंग यांची उधळण करण्याची प्रथा आहे. विभूती, गुलाल आणि रंग यांच्यातील सूक्ष्मकणांच्या साहाय्याने निर्गुण तेजतत्त्वाचे सगुण स्वरूपात प्रकटीकरण होते. यामुळे त्यांची उधळण केल्याने वायूतत्त्वाच्या साहाय्याने तारक तेजतत्त्व सर्वत्र प्रक्षेपित होते. असे केल्याने जीव, वास्तू आणि वायूमंडल यांच्यात आवश्यक त्या प्रमाणात तेजतत्त्वाचे संवर्धन होऊन त्यांना कार्य करण्यासाठी बळ मिळते. यातून हिंदु धर्मातील कृतींमागे दडलेले अध्यात्मशास्त्र लक्षात येते.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०१९, संध्याकाळी ६.१९)

 

नैसर्गिक गुलाल पाण्यात मिसळून केलेले रंगीत पाणी
एकमेकांवर उडवल्याने होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र

१. होळी खेळण्यासाठी वापरले जाणारे घटक, त्यांचा काळ, संबंधित
पंचतत्त्व, सगुण-निर्गुण स्तर आणि त्यांची तेजतत्त्व ग्रहण करण्याची क्षमता

टीप १ – पुरातन काळात राख आणि गुलाल यांची उधळण केली जायची. काळानुसार समष्टीची आध्यात्मिक पातळी अल्प होत गेली. यामुळे द्वापरयुगापर्यंत त्या त्या काळाच्या उन्नतांनी समष्टीला अधिकाधिक लाभ होण्याच्या दृष्टीने घटकांमध्ये पालट केला.

२. नैसर्गिक गुलाल पाण्यात मिसळून एकमेकांवर
उधळल्याने होणारे परिणाम आणि त्यामागील शास्त्र

आपतत्त्व कनिष्ठ, तर त्या तुलनेत तेजतत्त्व उच्च तत्त्व आहे. यामुळे नैसर्गिक गुलाल पाण्यात मिसळल्यावर त्यातील तेजतत्त्वाचा परिणाम आपतत्त्वावर होतो. रंगपंचमीला नैसर्गिक गुलाल मिश्रित पाणी दुसर्‍या जिवावर उडवल्यावर त्यावर पुढील परिणाम होतात.

अ. नैसर्गिक गुलाल मिश्रित पाण्यामध्ये आप आणि तेज ही दोन्ही तत्त्वे कार्यरत असतात. आपतत्त्वामुळे जिवाचा देह संवेदनशील होतो, तर तेजतत्त्वामुळे त्यातील रोगजंतू अल्प होऊन जिवाच्या संवर्धनाची क्रिया आरंभ होते. यामुळे रंगपंचमीला वायूमंडलात कार्यरत तेजतत्त्व त्याला १० टक्के अधिक प्रमाणात ग्रहण करता येते.

आ. ५० टक्क्यांहून अल्प आध्यात्मिक पातळी असलेले जीव, वास्तू आणि वायूमंडल हे पृथ्वी अन् आप या तत्त्वांशी संबंधित असतात. या घटकांच्या शुद्धीसाठी आप आणि तेज या तत्त्वांची आवश्यकता असते. नैसर्गिक गुलाल मिसळलेले पाणी यांमध्ये आप आणि तेज तत्त्वे कार्यरत असतात. यामुळे दुसर्‍यांवर पाणी उधळल्यावर त्याचा परिणाम त्यांच्यावर होऊन त्यांची शुद्धी आणि संवर्धन सहजतेने होते. यामुळे पुरातन काळापासून समष्टी स्तरावर पिचकारीने पाणी दुसर्‍यांवर उधळून रंगपंचमी खेळली जाते.

इ. आपतत्त्व हे शुद्धीसाठी सर्वांत पूरक तत्त्व आहे. यामुळे नैसर्गिक गुलाल मिसळलेले पाणी दुसर्‍या जिवावर टाकल्यावर त्याच्यावर असलेले त्रासदायक आवरण अल्प होते. त्रासदायक आवरण अल्प झाल्यावर जिवाला वायूमंडलात कार्यरत चैतन्य अधिक प्रमाणात ग्रहण करणे शक्य होते. वर्तमान कलियुगात अधिकांश जिवांवर त्रासदायक आवरण असल्याने त्यांच्या शुद्धीसाठी ही कृती काही प्रमाणात पूरक ठरते.

ई. नैसर्गिक गुलाल मिश्रित पाणी उडवणे ही कृती आघातात्मक आहे. यामुळे दुसर्‍या जिवावर पाणी उडवल्याने होणार्‍या आघातामुळे त्याच्या देहातील स्पंदने अधिक कार्यरत होऊन प्रक्षेपित होतात. या कृतीचा उद्देश ‘जिवाची देहबुद्धी अल्प करून त्याचा भाव जागृत करणे’, असा असल्याने ही कृती मंद गतीत करणे अपेक्षित आहे. वर्तमानकाळात अनेक लोक पिचकारी न वापरता बादली, रबरी पाईप अशा माध्यमांतून दुसर्‍यांवर पाण्याचा तीव्र आघात करतात. यामुळे जिवाच्या देहबुद्धीत वाढ झाल्याने वाईट शक्तींना त्याचे नियंत्रण घेणे सहज शक्य होते.

३. साधना करणारे आणि उन्नत यांनी
पाण्याद्वारे रंगपंचमी खेळणे अयोग्य असण्यामागील शास्त्र

अ. तेजतत्त्वाच्या तुलनेत आपतत्त्व सगुण आहे. यामुळे गुलाल मिश्रित पाणी उडवल्यावर साधना करणार्‍या जिवाची निर्गुण तत्त्व ग्रहण करण्याची सहज क्षमता अल्प होऊन तो सगुणात येतो. अध्यात्मात सगुणातून निर्गुणात जाणे महत्त्वाचे असल्याने आध्यात्मिकदृष्ट्या ६१ टक्क्यांहून अधिक पातळी असलेल्या जिवांसाठी असे करणे अयोग्य ठरते. या पातळीला ‘गुलालाची उधळण करणे’ अधिक श्रेष्ठ ठरते.
आ. रंगपंचमी साजरी करण्यामागील आध्यात्मिक उद्देश

रंगपंचमी साजरी करण्यामागील आध्यात्मिक उद्देश ‘व्यष्टी आणि समष्टी स्तरांवर तेजतत्त्व ग्रहण करणे’, असा आहे. गुलाल मिश्रित पाणी उडवल्याने व्यक्ती आणि समष्टी दोन्ही आपतत्त्वप्रधान होतात. यामुळे त्यांना वायूमंडलात कार्यरत तेजतत्त्व तुलनेत अल्प प्रमाणात ग्रहण होते. असे असले, तरी समष्टीची शुद्धी आणि जिवांची भावजागृती यांसाठी काही उन्नत अशी कृती करतात.

या कारणामुळे साधना करणारे आणि उन्नत यांच्यासाठी नैसर्गिक गुलाल पाण्यात मिसळून केलेला रंग एकमेकांवर उडवणे अयोग्य ठरते. या तुलनेत त्यांनी राख, गुलाल इत्यादींच्या माध्यमातून रंगपंचमी साजरी करणे अधिक श्रेष्ठ ठरते.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०१९, रात्री ७.०४)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


रंगपंचमी

४. रासायनिक आणि नैसर्गिक रंगांच्या उधळणीमुळे होणारे परिणाम

अ. रासायनिक रंगांच्या वापरामुळे होणारी हानी

खालील चित्र मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

बाजारात मिळणाणार्‍या रासायनिक रंगांचे सूक्ष्म-चित्र

१. ‘रासायनिक आणि असात्त्विक रंग सिद्ध करतांना व्यक्‍तीतील अहंभाव त्या वस्तूत उतरतो. त्यामुळे तेथे तमोगुणी कार्यरत वलय निर्माण होते. कोणतीही कृती करतांना त्या व्यक्‍तीतील त्रिगुण त्या वस्तूमध्ये उतरतात आणि त्यातून तशी स्पंदने प्रक्षेपित होतात.

२. रासायनिक द्रव्ये वापरल्यामुळे रासायनिक रंगांमध्ये तमोगुणी वलय कार्यरत होते.

३. रासायनिक रंगांतून मायावी वलयांचे प्रक्षेपण होते. तसेच रंगांमधील विविधता व्यक्‍तीचे मन आकर्षित करून घेते. त्यामुळे व्यक्‍तीचे मन मायेतील विचारांमध्ये रमू लागते.

४. वायूमंडलातील काळे प्रवाह रासायनिक रंगात आकृष्ट होतात आणि त्यांचे वातावरणात प्रक्षेपण होते.

५. रासायनिक रंगांमध्ये तमप्रधान काटेरी कण आणि मायावी कण कार्यरत होतात. त्यामुळे त्यात ईश्‍वरी चैतन्य आकृष्ट करण्याची क्षमता नसते.

६. रासायनिक रंगांभोवती काळ्या आवरणाचा थर असतो.

७. वातावरणात काटेरी कण पसरतात आणि त्यामधून तमप्रधान काळ्या वलयांचे प्रक्षेपण होऊन वातावरण दूषित बनते.

आ. सात्त्विक रंगांची उधळण केल्यामुळे होणारे लाभ

खालील चित्र मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

वातावरण

‘होळीच्या दिवशी होळी प्रज्वलन झाल्यामुळे वातावरणातील रज-तमप्रधानतेचे प्रमाण न्यून होते. होळीपासून पाचव्या दिवशी येणारी सकाळ म्हणजे रंगपंचमी. या दिवशी पृथ्वीवरील रज-तमप्रधानतेचे प्रमाण अल्प होते.

१. ब्रह्मांडातून निर्गुण तत्त्व एका रेषेत पृथ्वीवर येते.

१ अ. ते वातावरणात एका वलयाच्या रूपात विद्यमान असते.

२. आनंदाचा प्रवाह आणि तेजतत्त्वात्मक शक्‍तीचे कण पृथ्वीवर आकृष्ट होतात.
३. ईश्‍वरी चैतन्याचा प्रवाह पृथ्वीवर येणे

या दिवशी वातावरणात सात्त्विक रंगांची उधळण करण्यात येते, तेव्हा या सात्त्विक रंगांच्या माध्यमातून रंग आणि गंध यांचे कण वातावरणात पसरतात. त्या वेळी ते वातावरणात कार्यरत झालेले ईश्‍वरी चैतन्य आकृष्ट करतात.

३ अ. वातावरणात हे ईश्‍वरी चैतन्य वलयांच्या रूपात कार्यरत असते.
४. तेजतत्त्वात्मक शक्‍तीचे कण पृथ्वीवर आकृष्ट होतात. सात्त्विक रंगांची उधळण करणार्‍या व्यक्‍तीला ईश्‍वरी निर्गुण चैतन्याचा सगुण स्तरावर लाभ होणे

रंगांची उधळण करण्यासाठी सात्त्विक रंग, उदा. हळद, गुलाल इत्यादी वापरल्याने त्यांच्यात ईश्‍वरी चैतन्य आकृष्ट करण्याची क्षमता असते. त्यामुळे ते ईश्‍वरी निर्गुण चैतन्य आकृष्ट करतात आणि त्याचा सगुण स्तरावर व्यक्‍तीला लाभ करून देतात. ही क्षमता रासायनिक रंगांमध्ये नसते.

इ. रंग उधळण्याच्या कृतीनंतर होणारा परिणाम

५. वातावरणात कार्यरत असणार्‍या निर्गुण तत्त्वाच्या वलयातून निर्गुण तत्त्वात्मक कण काही प्रमाणात वातावरणात पसरतात.
६. ईश्‍वराकडून आकृष्ट झालेल्या आनंदाच्या प्रवाहामुळे वातावरणात आनंदाचे वलय निर्माण होते आणि त्यातून आनंदाच्या प्रवाहांचे प्रक्षेपण होते.
७. गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार आनंद आणि चैतन्य यांचे कण रंग उधळणार्‍या व्यक्‍तीकडे आकृष्ट होणे

आनंदाच्या प्रवाहांच्या माध्यमातून वातावरणात आनंदयुक्‍त ईश्‍वरी तत्त्वाचे कण पसरतात. सात्त्विक रंग वातावरणात उधळल्यावर त्यातील कण वातावरणात पसरतातच; पण ते रंग उधळणार्‍या व्यक्‍तींकडेही पुन्हा आकृष्ट होतात, उदा. एखादा चेंडू आकाशात फेकला असता गुरुत्वाकर्षण नियमानुसार तो पुन्हा भूमीकडे येतो, अगदी त्याचप्रमाणे ही कृती घडते. रंगांनासुद्धा गुरुत्वाकर्षण नियम लागू असल्याने चैतन्य आणि आनंद यांचे कण व्यक्‍तीकडे आकृष्ट होतात.

८. तेजतत्त्वात्मक शक्‍तीचे कण रंगांच्या माध्यमातून वातावरणात पसरतात.
९. ते तेजतत्त्वात्मक शक्‍तीचे कण थोड्या प्रमाणात कार्यरत असणार्‍या अनिष्ट शक्‍तींशी लढण्याचे कार्य करतात.
१०. सात्त्विक रंगांची उधळण केल्याचा व्यक्‍तीतील भावानुसार तिला लाभ होतो.
११. व्यक्‍तीमध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वलय निर्माण होते.
१२. शक्‍तीचे कणसुद्धा व्यक्‍तीच्या देहात पसरून देहावरील काळे आवरण दूर होते.’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा

५. होळीचे रंग बनवण्याची पद्धत

‘झाडाची पाने, फुले, हळद, खनिज या माध्यमातून रंगाची निर्मिती होते. लहानसहान कीटकांपासून काही रंग सिद्ध होतात. लाख नावाच्या किड्यापासून लेकोइक आम्ल मिळवले जाते. या आम्लावर रासायनिक प्रक्रिया करून लाल रंग बनवतात. समुद्रात आढळणार्‍या शंख-शिंपल्यातील कीटकांपासून पांढरा रंग बनवला जातो. हा रंग सूर्यप्रकाशात हळूहळू हिरवा, त्यानंतर निळ्या रंगात रूपांतरित होतो. मेक्सिकोमध्ये कार्मीन रेड या कीटकापासून द्राव्य बनवले जाते. त्यासाठी कीटकांना चांगले सुकवून त्यांची बारीक पावडर बनवली जाते.

रंगामध्ये प्रामुख्याने शिसे, पोटॅशियम डायक्रोमेट, बोरिक पावडर, कास्टीक सोडा, ब्लिचिंग पावडर, झिंक ऑक्साईड, ऑक्झालिक अ‍ॅसिड, तसेच इतर रासायनिक मिश्रणाचा वापर केला जातो.’

– लोकमत, १९.३.२०११.

६. नैसर्गिक रंग बनवण्याची पद्धत

अ. लाल रंग

‘लाल चंदनाची (रक्‍तचंदनाची) भुकटी (पावडर) कोरड्या लाल रंगाच्या रूपात वापरू शकतो. ती त्वचेसाठी लाभदायक आणि सौंदर्यवर्धक आहे. एक लिटर पाण्यात दोन चमचे लाल चंदनाची भुकटी टाकून ते पाणी उकळल्याने लाल रंग बनतो. यात आवश्यकतेनुसार पाणी मिसळू शकतो.

अ १. ओला लाल रंग

१. दोन चमचे लाल चंदन पावडर १ लिटर पाण्यात उकळल्यावर सुंदर लाल रंग बनतो.

२. लाल डाळिंबाच्या साली पाण्यात उकळल्यावरही लाल रंग बनतो.

आ. कोरडा हिरवा रंग

१. हा रंग केवळ मेंदी पावडर किंवा मेंदी पावडर कणकेत मिसळून बनवलेल्या मिश्रणाचा उपयोग करून करता येतो. कोरड्या मेंदीने त्वचा लाल होण्याची भीती नसते. हे मिश्रण पाण्यात मिसळून लावले, तरच त्वचा लाल होईल.

२. मेंदी पावडरसमवेत आवळ्याची पावडर मिसळली, तर भुरकट रंग बनतो. तो केसांसाठी चांगला असतो.

आ १. ओला हिरवा रंग

दोन चमचे मेंदी पावडर एक लिटर पाण्यात चांगल्या प्रकारे मिसळल्यावर हा रंग बनतो.

इ. कोरडा पिवळा रंग

चार चमचे बेसनामध्ये (चण्याच्या डाळीच्या पिठात) दोन चमचे हळद पावडर मिसळल्याने उत्तम पिवळा रंग बनतो. हा त्वचेसाठी उत्तम प्रकारे उटण्यासारखे कार्य करतो. सामान्य हळदीच्या जागी कस्तुरी हळदीचा वापरही करू शकतो. ती अतिशय सुगंधी असते. तसेच बेसनाच्या जागी कणिक, मैदा, तांदुळाचे पीठ, आरारुट किंवा मुलतानी मातीचाही उपयोग करू शकतो.

इ १. ओला पिवळा रंग

१. दोन चमचे हळदीची पावडर दोन लिटर पाण्यात टाकून चांगल्या प्रकारे उकळल्यास गर्द पिवळा रंग बनतो.

२. अमलतास, झेंडू यांसारखी पिवळी फुले रात्री पाण्यात भिजवून सकाळी उकळल्यावर पिवळा रंग बनतो.

उ. जांभळा रंग

बीट पाण्यात उकळवून वाटल्यास उत्तम जांभळा रंग बनतो.

ऊ. काळा रंग

आवळाचूर्ण लोखंडाच्या भांड्यात रात्रभर भिजवल्याने काळा रंग बनतो.’

Leave a Comment