जगभरातील वैज्ञानिकांना आध्यात्मिक संशोधनात सहभागी होण्याची संधी देऊन त्यांना ईश्‍वरी कार्यात सामावून घेण्याचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उदात्त दृष्टीकोन !

‘समाजातील सर्वसाधारण वैज्ञानिकांना इतर वैज्ञानिकांशी जुळवून घेऊन त्यांच्यासह कार्य करणे कठीण जाते. काही अंशी त्यांचा ‘मला अधिक कळते’, हा अहंकार आड येतो किंवा संशोधनाचे श्रेय विभागून घेणे त्यांना मान्य नसते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील शिकण्याची तळमळ एवढी आहे की, त्यांनी सूक्ष्म आणि स्थूल या दोन्ही स्तरांवर असामान्य संशोधन केलेले असूनही अजूनही ते प्रत्येक क्षणी १०० टक्के शिकण्याच्या स्थितीत असतात. त्यामुळे सनातनची नियतकालिके, संकेतस्थळे, तसेच ध्वनीचित्रचकत्या यांच्या माध्यमातून ते सातत्याने अन्य वैज्ञानिकांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधनात सहभागी व्हायचे आवाहन करत असतात. खरेतर त्यायोगे ते या वैज्ञानिकांना ईश्‍वरी कार्यात सहभागी होऊन त्याचा लाभ घेण्याची संधी देत असतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक संशोधनाचा परिचय करून देण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे प्रतिनिधी अध्यात्मात रुची असणार्‍या वैज्ञानिकांची भेट घेत असतात. आतापर्यंत विविध क्षेत्रांतील ४० पेक्षा अधिक वैज्ञानिकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक संशोधनाने प्रभावित होऊन एकत्रित कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापैकी काही संशोधकांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेटही दिली आहे.

 

१. डॉ. थॉर्नटन स्ट्रीटर आणि डॉ. किम्बर्ली शिप्की, इंग्लंड

डावीकडून डॉ. किम्बर्ली शिप्की आणि डॉ. थॉर्नटन स्ट्रीटर यांना सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन दाखवतांना श्री. शॉन क्लार्क (उजवीकडे)

सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील विविध बुद्धीअगम्य घटना समजून घेऊन त्यांची वैज्ञानिक परिभाषेत नोंद करण्यासाठी ३.२.२०१४ या दिवशी इंग्लंडमधील डॉ. थॉर्नटन स्ट्रीटर आणि कु. किम्बर्ली शिप्की या २ संशोधकांनी आश्रमाला भेट दिली. एक वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी ते आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निवासाच्या खोलीत गेले असतांना त्यांना अनुभूती आली. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या निवासाच्या खोलीतील भिंतीला स्पर्श केल्यावर ती श्‍वासोच्छ्वास चालू असल्याप्रमाणे हलत आहे’, असे त्यांना जाणवले. त्यांना तेथील भूमीतून स्पंदने येत असल्याचे जाणवले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अत्यंत साधे राहणीमान पाहून ते चकित झाले. त्यांच्या भेटीत दोघांनाही शांतीची अनुभूती आली. आश्रमातून निघतांना डॉ. स्ट्रीटर म्हणाले की, ‘‘हा आश्रम आध्यात्मिक शिक्षणाचे विविध पैलू शिकवणारेे आध्यात्मिक विश्‍वविद्यालयच आहे.’’

 

२. पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल, पुणे

परात्पर गुरु डॉक्टरांचे आध्यात्मिक संशोधनाचे कार्य शास्त्रज्ञ पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल यांना सांगतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

पुणे येथील पू. डॉ. रघुनाथ शुक्ल हे ‘राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एन्.सी.एल्.)’ येथील शास्त्रज्ञ (निवृत्त), ज्योतिष महामहोपाध्याय, वास्तुशास्त्रवाचस्पती, विद्यावाचस्पती, विज्ञानाचार्य आणि जागतिक कीर्तीचे संशोधक ! त्यांची सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी भेट घेऊन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय करत असलेल्या संशोधनकार्याविषयी माहिती दिली. त्या वेळी पू. डॉ. शुक्ल यांनी अत्यंत जिज्ञासेने ती माहिती जाणून घेतली. पू. डॉ. शुक्ल यांनी त्यांच्या परिचितांनाही ‘आध्यात्मिक संशोधनाविषयी सांगा’, असे सांगितले, तसेच ‘अध्यात्म विश्‍वविद्यालय’ हा ग्रंथ त्यांना वाचायला दिला. या भेटीत पू. डॉ. रघुनाथ शुक्ल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी म्हणाले, ‘‘गुरुदेवांना वैश्‍विक आध्यात्मिक ज्ञान (अवकाश ज्ञान) मिळत आहे. ते आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक आणि व्यावहारिक अडचणी सोडवत आहेत. त्यांचे कार्य पुष्कळ महान आहे.’’

 

३. श्री. मयंक बडजात्या, भारत

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या देहातून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक ऊर्जेचा ‘लेकर अँटेना’द्वारे अभ्यास करतांना श्री. मयंक बडजात्या

श्री. बडजात्या एक व्यावसायिक ‘बायो-आर्किटेक्ट’ असून त्यांनी वास्तूकला (आर्किटेक्चर), वास्तूशास्त्र, मानवी ऊर्जा आणि पर्यावरण यांवर पुष्कळ संशोधन केले आहे. त्यांना अतींद्रिय विषयांतील संशोधनाचा २० वर्षांचा अनुभव आहे. सनातनच्या आश्रमात दैवी कण सापडणे, काहीही बाह्य कारण नसतांना रक्ताचे डाग उमटणे, देवतेच्या चित्राने आपोआप पेट घेणे इत्यादी विविध बुद्धीअगम्य घटनांविषयी त्यांना पुष्कळ जिज्ञासा होती. त्यासंदर्भात संशोधन करण्याच्या दृष्टीने त्यांनी १३.६.२०१४ या दिवशी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट दिली. त्यांनी त्यांच्याकडील ‘एस्मॉग स्पिऑन’ (हे उपकरण परमाणू-तणावाचे (इलेक्ट्रो-स्ट्रेस’चे) मापन करते) आणि ‘लेकर अँटिना’ यांच्या माध्यमातून पुष्कळ संशोधन केले. आश्रमातील चैतन्ययुक्त वातावरणाचा साधकांवर आणि साधकांचा या वातावरणावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी पुन्हा एकदा येथे येण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.

 

४. डॉ. प्रदीप देशपांडे, अमेरिका

डॉ. प्रदीप देशपांडे

डॉ. प्रदीप देशपांडे हे अमेरिकेतील लुईव्हिल विद्यापिठाच्या रासायनिक अभियांत्रिकी शाखेचे प्राध्यापक ‘एमेरिटस’ आहेत. ते ‘सिक्स सिग्मा अँड अ‍ॅडव्हांस्ड कंट्रोल्स’ या आस्थापनाचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी (सी.इ.ओ.) आहेत. ते १७.१.२०१५ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते. आश्रमातील आध्यात्मिक संशोधन आणि आश्रमात सापडलेले दैवी कण हे पाहून ते पुष्कळ प्रभावित झाले. त्यांना ‘जी.डी.व्ही. बायोवेल’ या व्यक्तीच्या ऊर्जा क्षेत्राची आणि चक्रांची माहिती देणार्‍या वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून संशोधनाचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. आश्रमातील वातावरणाने ते पुष्कळ प्रभावित झाले. ते म्हणाले, ‘‘आश्रमातील स्पंदने अद्भुत आणि शक्तीशाली आहेत. आश्रम आणि येथील साधक यांच्यात पुष्कळ सात्त्विकता आहे. मी येथे आलो, यासाठी मी पुष्कळ कृतज्ञ आहे.’’ त्यांनी जिज्ञासेने येथील सात्त्विकतेचे रहस्य विचारले. ‘गुरुकृपायोगातील अष्टांगसाधना’ (स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नामजप, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग, प्रीती आणि भावजागृती), हे त्यामागील रहस्य असल्याचे सांगितल्यावर त्यांनी ते सर्व लिहून घेतले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अल्प काळ निवास केलेल्या आश्रमातील खोलीत अजूनही असलेल्या निर्गुण चैतन्यामुळे ती खोली नामजप करण्यासाठी वापरतात. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा जप करत या खोलीत ४० मिनिटे उपायांना बसलेल्या साधकांवर त्याचा काय परिणाम होतो’, हे वस्तूनिष्ठपणे जाणण्यासाठी डॉ. देशपांडे यांनी एक प्रयोग केला. त्या खोलीत नामजपाला बसण्यापूर्वी आणि बसल्यानंतर ५ साधकांच्या ‘जी.डी.व्ही. बायोवेल’ या उपकरणाने मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. साधकांचे ऊर्जाक्षेत्र, तसेच त्यांची कुंडलिनी चक्रे यांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाल्याचे या प्रयोगात दिसून आले. हा पालट पाहून डॉ. देशपांडे चकित झाले. ‘एरव्ही हा पालट घडायला अनेक महिने लागतात’, असा त्यांचा अनुभव होता. अमेरिकेत परतल्यावर त्यांनी आश्रमात सापडलेल्या दैवी कणांवरही स्वतंत्र सखोल संशोधन केले आणि त्यावर आधारित २ शोधनिबंधही स्वतः प्रकाशित केले.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment