शरिरावर आलेले त्रासदायक (काळे) आवरण का आणि कसे काढावे ?

Article also available in :

अनुक्रमणिका

 

१. व्यक्तीवर त्रासदायक आवरण पुनःपुन्हा येण्याची कारणे

१ अ. कालमाहात्म्यानुसार होणारा वाईट शक्तींचा त्रास

कालमाहात्म्यानुसार सध्याच्या सूक्ष्मातील आपत्काळात एकंदरीतच वाईट शक्तींचा त्रास वाढला असल्याने व्यक्तीवर त्रासदायक आवरण पुनःपुन्हा येत असते.

१ आ. प्रारब्धानुसार होणारा वाईट शक्तींचा त्रास

यामुळेही व्यक्तीवर त्रासदायक आवरण येत असते.

१ इ. व्यक्तीमधील स्वभावदोष आणि अहं

१. स्वभावदोषांमुळे व्यक्तीच्या मनोदेहात सूक्ष्म जखमा निर्माण होतात. सूक्ष्म जखमांतून रज-तमात्मक स्पंदने निर्माण होतात. यांमुळे तसेच रज-तमात्मक स्पंदनांमुळे वाईट शक्ती लगेचच त्या व्यक्तीकडे आकर्षित झाल्यामुळे व्यक्तीवर त्रासदायक आवरण येते.

२. अहं हा अनेक स्वभावदोषांचे मूळ आहे; म्हणून स्वभावदोषांप्रमाणेच अहं हासुद्धा वाईट शक्तींच्या त्रासाला कारणीभूत ठरतो.

 

२. व्यक्तीवर त्रासदायक आवरण आल्याने व्यक्तीची होणारी हानी

२ अ. विविध शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होणे वा असलेले त्रास वाढणेे

व्यक्तीवर त्रासदायक आवरण आल्यामुळे तिला ‘न सुचणे, मन अस्वस्थ असणे, मनात नकारात्मक विचार येणे, निरुत्साह वाटणे, ‘नामजप करावा’ असे न वाटणे, उपायांचा परिणाम न होणे’, यांसारखे त्रास होतात. कधी कधी शरिराच्या एखाद्या भागात वेदना होणे, पित्त होणे यांसारखे त्रासही होऊ शकतात. व्यक्तीवर आवरण आल्यामुळे तिला आधीच असलेले त्रास आणखी वाढतात.

२ आ. नामजपादी आध्यात्मिक उपायांचा विशेष लाभ न होणे

व्यक्तीवर त्रासदायक आवरण आले असेल, तर तिने शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक त्रासांच्या निर्मूलनासाठी कितीही वेळ नामजपादी उपाय केले, तरी आवरणामुळे त्या उपायांची सात्त्विक स्पंदने तिच्यापर्यंत तेवढ्या प्रमाणात पोहोचत नाहीत अन् त्यामुळे तिच्या त्रासांचे निवारण लवकर होत नाही.

२ इ. साधनेमुळे मिळणारे चैतन्यही तेवढ्या प्रमाणात ग्रहण होत नाही

 

३. दिवसभरात किती वेळा आवरण काढावे ?

व्यक्तीवर दिवसभरात मध्ये मध्ये आवरण येतच असते. त्यामुळे व्यक्तीने साधारणपणे प्रत्येक घंट्याला (तासाला) एकदा तरी आवरण काढावे.

 

४. आवरण काढण्याची पद्धत

४ अ. आवरण काढण्यासंबंधीच्या सामाईक सूचना

४ अ १. आवरण काढण्यापूर्वी गुरु किंवा उपास्यदेवता यांना ‘माझ्यावरील आवरण नीट निघू दे’, अशी भावपूर्ण प्रार्थना करावी.

४ अ २. आवरण काढतांना उपास्यदेवतेचा किंवा त्रासनिवारणासाठी उपयुक्त असलेल्या देवतेचा नामजप करावा.

४ अ ३. आवरण काढतांना डोळे उघडे ठेवावेत.

४ अ ४. स्वतःच्या हातांनी अथवा सात्त्विक उत्पादन वा वस्तू यांच्या साहाय्याने आवरण काढावे.

४ अ ४ अ. स्वतःच्या हातांनी आवरण कोणी काढावे ?

स्वतःला जरासा किंवा मध्यम आध्यात्मिक त्रास असल्यास स्वतःच्या हातांनी आवरण काढावे. हातांनी आवरण काढतांना हातांच्या बोटांतून प्रक्षेपित होत असलेल्या प्राणशक्तीमुळे आवरण दूर होण्यास साहाय्य होते. अशा व्यक्तींनी सात्त्विक उत्पादन वा वस्तू यांच्या साहाय्याने आवरण काढण्यासही आडकाठी नाही.

४ अ ४ आ. सात्त्विक उत्पादन वा वस्तू यांच्या साहाय्याने आवरण कोणी काढावे ?

स्वतःला तीव्र आध्यात्मिक त्रास असल्यास सात्त्विक उत्पादन वा वस्तू (उदा. प्रज्वलित न केलेली सात्त्विक उदबत्ती, सात्त्विक लघुग्रंथ, नियतकालिक ‘सनातन प्रभात’, मोरपीस) यांच्या साहाय्याने आवरण काढावे. सात्त्विक उत्पादन वा सात्त्विक वस्तू यांतील चांगल्या शक्तीमुळे शरिरावरील आवरण दूर होण्यास साहाय्य होते.

४ अ ५. आवरण शरिराच्या कोणत्या भागाचे काढावे ?

अ. सहस्रारचक्रापासून स्वाधिष्ठानचक्रापर्यंत आवरण काढावे.

आ. डोके ते गळा या भागात आवरण येण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या भागात पुढून, वरून आणि मागून आवरण काढावे.

इ. शरिराचा दुखणारा अवयव किंवा विकारग्रस्त इंद्रिय यांभोवतीचेही आवरण काढावे.

४ अ ६. आवरण काढण्याची कृती प्रत्येक वेळी साधारणपणे ५ मिनिटे तरी करावी.
४ अ ७. आवरण काढून झाल्यानंतर उपास्यदेवतेप्रती भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करावी.

४ आ. सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या साधकांनी आवरण काढण्याची पद्धत

सनातनच्या आश्रमातील आणि सेवाकेंद्रातील साधक ध्यानमंदिर, संत पूर्वी रहात असलेली खोली इत्यादी ठिकाणी बसून नामजपादी उपाय करत असल्याने तेथील सात्त्विकतेमुळे साधकांनी स्वतःच्या शरिरावरील काढलेले त्रासदायक आवरण वातावरणात न पसरता लगेच नष्ट होते. त्यामुळे  शेजारी बसलेल्या साधकांना त्या त्रासदायक शक्तीचा त्रास होत नाही. आश्रमातील आणि सेवाकेंद्रातील सेवेची ठिकाणे किंवा खोल्या येथेही बर्‍यापैकी सात्त्विकता असतेच. त्यामुळे तेथेही आवरण काढतांना शेजारी बसलेल्या साधकांना त्या त्रासदायक शक्तीचा त्रास होत नाही.

४ इ. घरी रहाणार्‍या साधकांनी आवरण काढण्याची पद्धत

४ इ १. आवरण काढण्यापूर्वी खोलीत सात्त्विक उदबत्ती आणि संतांच्या आवाजातील भजने लावावीत.

४ इ २. आवरण काढतांना शक्यतो खोलीत एकट्याने बसावे ! : हे शक्य नसल्यास दोन व्यक्तींमध्ये न्यूनतम ५ – ६ फुटांचे अंतर ठेवावे. एवढे अंतर ठेवल्यामुळे आवरण काढण्याच्या कृतीमुळे निघालेल्या त्रासदायक शक्तीचा दुसर्‍या व्यक्तीला त्रास होणार नाही.

४ इ ३. आवरण काढून झाल्यावर सात्त्विक उदबत्तीच्या साहाय्याने वास्तूशुद्धी करावी ! : वास्तूतील प्रत्येक खोलीत उजवीकडून डावीकडे या मार्गाने, तसेच भिंतींच्या कडेकडेने फिरत वास्तूशुद्धी करावी. त्यानंतर ती उदबत्ती खोलीतच लावून ठेवावी. यामुळे वास्तूमध्ये त्रासदायक शक्ती पसरली असल्यास ती नष्ट होईल.

४ इ ४. खोलीत लावलेली संतांच्या आवाजातील भजने काही काळ चालूच ठेवावीत.

(अधिक माहितीसाठी वाचा : सनातनचे ग्रंथ ‘विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ?’ आणि ‘प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय’)

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

५. स्वतःवरील त्रासदायक शक्तीचे आवरण नियमितपणे काढा !

पू. डॉ. मुकुल गाडगीळ

‘सध्या त्रास होत असलेल्या साधकांना नामजपादी उपाय सांगतांना असे लक्षात आले की, वातावरणातील अनिष्ट शक्ती साधकांचे आज्ञाचक्र आणि अनाहतचक्र यांवर त्रासदायक शक्तीचे आवरण वारंवार आणत आहेत. हे आवरण वाढून मग डोक्यापासून ते छातीपर्यंत घोंगडे पांघरल्याप्रमाणे पूर्णपणे आवरण येते. यामुळे साधकांना ‘न सुचणे, मन अस्वस्थ असणे, निरुत्साह, नामजप करावासा न वाटणे, उपायांचा परिणाम न होणे’, असे त्रास होत आहेत. यासाठी साधकांनी डोक्यावर किंवा छातीवर दाब जाणवत असल्यास, तसेच वरील त्रास होत असल्यास प्रथम त्या विशिष्ट स्थानाचे किंवा छातीपासून डोक्यापर्यंतच्या शरिराच्या भागाचे आवरण काढावे. साधक ठराविक वेळाने अत्तर आणि कापूर यांचे उपाय करतात, तेव्हा त्यांनी स्वतःवरील आवरणही काढावे. आवरण काढण्यासाठी १ – २ मिनिटेच लागतात.

स्वतःवरील आवरण हाताच्या बोटांनी किंवा सनातन प्रभात नियतकालिकाने काढू शकतो. हाताच्या बोटांनी आवरण काढण्याचा लाभ म्हणजे आपल्या हाताच्या बोटांतून अविरतपणे जी प्राणशक्ती प्रक्षेपित होत असते, ती प्राणशक्तीही आपल्याला मिळते. सनातन प्रभात नियतकालिक सात्त्विक असल्याने त्यानेही आवरण निघते. आपल्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण नियमितपणे काढल्यास त्रासाचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात न्यून होते.’

 

६. अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना डोळ्यांवर
आवरण येत असल्याने आपला त्रास वाढू नये, यासाठी ते लगेच दूर करा !

‘अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना वाईट शक्तींचा त्रास वाढलेला असतो. त्यामुळे वातावरणात त्रासदायक शक्तीचे प्रमाण अधिक असते. आपण पंचज्ञानेंद्रियांपैकी डोळ्यांद्वारे बघून सर्वाधिक प्रमाणात सर्व गोष्टींचे आकलन करून घेत असल्याने ते दिसणाऱ्या दृश्यातील चांगल्या किंवा वाईट स्पंदनांनी भारित होतात. अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना वातावरणात त्रासदायक शक्तीचे प्रमाण अधिक असल्याने आपले डोळे त्या सूक्ष्मातील त्रासदायक स्पंदनांनी भारित होतात, म्हणजे त्यांच्यावर त्रासदायक (काळ्या) शक्तीचे आवरण येते. त्यामुळे डोळ्यांना जडपणा जाणवणे, ग्लानी येणे, अंधारी येणे, असे त्रास होतात. आपण डोळ्यांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण वेळीच काढले नाही, तर त्रासदायक शक्ती शरिरात प्रवेश करून ती कुंडलिनीचक्रांना भारित करते, तसेच पुढे शरिराच्या अन्य अवयवांवरही आवरण येते; म्हणून अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना आपला त्रास वाढू नये, यासाठी डोळ्यांवर आवरण जाणवल्यास ते लगेच काढणे आवश्यक आहे.’

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment