प्रयाग कुंभपर्वाच्या निमित्ताने ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांचा व्यापक धर्मप्रसार !

‘धर्माधिष्ठित आणि लोककल्याणकारी हिंदु राष्ट्राच्या स्थापने’चे ब्रीद घेऊन अविरत झटणार्‍या सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांचा प्रयागराज येथे चालू असलेल्या कुंभमेळ्यातील धर्मप्रसार कार्याचा वेध घेणारा हा लेख… !

‘काश्मिरी आणि बांगलादेशी हिंदूंच्या अत्याचारांच्या भव्य चित्रप्रदर्शना’चे प्रवेशद्वार !

 

१. कुंभक्षेत्रात भाविकांचे धर्मप्रबोधन करणार्‍या २ प्रदर्शनांचे आयोजन

१ अ. सनातन संस्थेचे ‘धर्मशिक्षण आणि राष्ट्र-धर्मरक्षण प्रदर्शन’ !

कुंभक्षेत्र २५ कि.मी. विस्तीर्ण आहे. त्याच्या हृदयस्थानी म्हणजे संगमक्षेत्राजवळील मोरी मार्गाजवळ ‘सनातन संस्थे’ला जागा मिळणे, ही केवळ गुरुकृपा होती. कुंभक्षेत्री येणार्‍या भाविकांपैकी ३० टक्के भाविकांना या क्षेत्रातून जावेच लागते. या ठिकाणी सर्व शंकराचार्य, रामानंदाचार्य, दशनामी आखाडे आणि धर्मसम्राट करपात्री स्वामीजी यांच्या ‘धर्मसंघ’ यांसारख्या मोठ्या संघटनांचे पंडाल आहेत. अगदी त्या रांगेत सनातन संस्थेचे ‘धर्मशिक्षण आणि राष्ट्र-धर्मरक्षण प्रदर्शन’ विराजमान आहे.

या प्रदर्शनात गंगास्नान, धर्माचरण, देवतांची उपासना, देवालय दर्शन, धार्मिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र, साधना, गो-गंगारक्षण, मंदिरांचे पवित्र्यरक्षण, भोंदूबाबांविषयी प्रबोधन, सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन, क्रांतीपुरुषांचे स्मरण आणि हिंदु राष्ट्र-जागृती आदींविषयी १०० हून अधिक प्रबोधनपर फलक लावण्यात आले आहेत. या प्रदर्शनात सनातनने बनवलेली श्री गणेशमूर्ती ही आकर्षणाचा बिंदू ठरली आहे. प्रदर्शन पहाणारे अनेक युवक श्री गणेशमूर्तीसमवेत स्वतःचे छायाचित्र (सेल्फी) काढतात. प्रदर्शनातील एका दालनात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, हिंदु विधीज्ञ परिषद, उद्योगपती परिषद, आरोग्य साहाय्य समिती आदींच्या कार्याची आणि कार्यात सहभागी होण्याची माहिती सांगणारे प्रदर्शन आहे. प्रदर्शनात आलेले जिज्ञासू, मान्यवर, संत आदींशी संवाद साधण्यासाठी संवाद कक्ष आहे. या ठिकाणी सनातनचे संत अशा मंडळींशी संवाद साधतात. प्रदर्शनातील ‘सीडी (ध्वनीचित्र-चकती) प्रसारण’ कक्षातून सनातनच्या कार्याची माहिती सांगणारे चलचित्र (व्हिडिओ) दाखवले जातात.

१ आ. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘काश्मिरी आणि बांगलादेशी हिंदूंच्या अत्याचारांचे चित्रप्रदर्शन’ !

हरिद्वार येथील भूमा-निकेतन पिठाचे पीठाधीश्‍वर जगद्गुरु स्वामी अच्युतानंद तीर्थ स्वामीजी यांनी वर्ष २०१३ मध्ये प्रयाग येथे झालेल्या कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीचे कार्य पाहिले होते. त्यांनी या वेळी समितीच्या प्रदर्शनासाठी ६० फूट भूमी उपलब्ध करून दिली आहे. ही जागाही संगमक्षेत्राच्या अगदी जवळ आणि सनातन संस्थेच्या प्रदर्शनापासून १५० फूट अंतरावर आहे. या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीने काश्मिरी आणि बांग्लादेशी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांची माहिती देणार्‍या चित्रांचे प्रदर्शन लावले आहे. तेथे समितीने बनवलेल्या ‘धर्मांतर’, ‘सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन’, ‘शौर्यजागरण’ आदींविषयीचे प्रदर्शनही लावले आहे. काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचारांचे भीषण सत्य कथन करणार्‍या ‘….आणि जग शांतच राहिले !’, हे चलचित्र (व्हिडिओ) तेथे प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवले जात आहे. सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शनही या ठिकाणी लावण्यात आले आहे.

कुंभक्षेत्रात भाविकांचे धर्मप्रबोधन करणार्‍या सनातनच्या प्रदर्शनाचे प्रवेशद्वार
राममंदिर उभारणीचे आंदोलन करतांना भाविक आणि सनातनचे साधक यांच्यासमवेत १. श्री श्री १००८ बाबा गोविंददास महाराज २. श्री. चेतन राजहंस आणि ३. श्री. अरविंद पानसरे

 

२. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने आयोजित पुस्तक प्रदर्शनात सहभाग !

राष्ट्रीय पुस्तक न्यासाने कुंभक्षेत्रात राष्ट्रीय ग्रंथप्रदर्शन आयोजित केले आहे. या ग्रंथप्रदर्शनामध्ये सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शन २८ जानेवारीपासून ११ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. या प्रदर्शनात सनातनच्या सात्त्विक वस्तूंचे विक्रीप्रदर्शनही लावण्यात येणार आहे.

 

३. सनातनच्या ग्रंथांची फिरती प्रदर्शने !

कुंभक्षेत्रात गर्दीच्या ठिकाणी सनातनच्या ग्रंथांची फिरती ग्रंथप्रदर्शने लावण्यात येतात. काही साधक ‘ग्रंथांचा अ‍ॅप्रन’ घालून गर्दीच्या ठिकाणी प्रसार करतात. ‘कुंभमहिमा’, ‘गंगामहिमा’ आदी ग्रंथांचा प्रसार या निमित्ताने केला जात आहे.

कुंभक्षेत्री सनातनचे फिरते ग्रंथप्रदर्शन आणि ग्रंथांचा अ‍ॅप्रन घालून प्रसार करणारे साधक

 

४. विविध संतांच्या शुभहस्ते विविध ‘अ‍ॅप्स’चे लोकार्पण !

सनातन पंचांगाचे iOS प्रणालीतील अ‍ॅप नुकतेच उपलब्ध झाले आहे. त्यातील हिंदी भाषिक अ‍ॅपचे लोकार्पण आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज, गुजराती भाषिक अ‍ॅपचे जगद्गुरु रामानंदाचार्य हंसदेवाचार्य महाराज आणि इंग्रजी भाषिक अ‍ॅपचे लोकार्पण प.पू. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीच्या ‘कुंभ अ‍ॅप’चे लोकार्पण ज्योतिष आणि द्वारकाशारदा पीठाधीश्‍वर शंकराचार्य जगद्गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी महाराज यांच्या मंगलहस्ते करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे माहितीपुस्तक पहातांना शंकराचार्य म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तर पुष्कळ मोठे कार्य केले आहे !’’ शंकराचार्य पदावरील व्यक्तीचे हे उद्गार परात्पर गुरूंचा महिमा सांगणारे होते.

 

५. हिंदु राष्ट्र-संपर्क अभियान !

कुंभक्षेत्रामध्ये देशभरातून आलेले संत, आखाडे, आध्यात्मिक संस्था आदींमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी एकत्रितपणे ‘हिंदु राष्ट्र-संपर्क अभियान’ आरंभले आहे. या अंतर्गत कुंभक्षेत्रात प्रत्येक सेक्टरमध्ये वसलेले आखाडे, आध्यात्मिक संस्था, संत आदींना भेटून सनातन आणि समिती यांचे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य सांगितले जाते अन् संस्था-समिती आयोजित प्रदर्शनांमध्ये त्यांना आमंत्रित केले जाते. या निमित्ताने समविचारी आणि समष्टी विचारांच्या संतांचा धर्मकार्यातील सहभागाविषयी अभ्यास होतो आणि व्यष्टी पातळीच्या संतांचे आशीर्वाद मिळतात. दिवसभरात प्रत्येकी दोन साधकांचे ४-५ गट कुंभक्षेत्रात संपर्क अभियान राबवत असतात.

 

६. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती
समिती यांच्या कार्याची माहिती सांगणारी पत्रकार परिषद !

कुंभक्षेत्री पोहोचल्यानंतर संस्था आणि समिती यांच्या कार्याची व्यापक प्रसिद्धी होण्यासाठी प्रसिद्धी विभाग स्थापन करण्यात आला. या अंतर्गत कुंभक्षेत्री आलेल्या पत्रकार-संपादकांच्या भेटी घेऊन संस्था आणि समिती यांचे कार्य सांगणे अन् त्यांना प्रदर्शने पहाण्यासाठी आमंत्रित करणे, हा उद्देश होता. ३ दिवसांत ७० पत्रकारांना संपर्क झाल्यानंतर आम्ही सनातन संस्थेच्या प्रदर्शनात पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेला ६८ पत्रकार उपस्थित होते. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी एकत्रितपणे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ‘उभय संस्था कुंभक्षेत्रात कोणते उपक्रम राबवणार आहेत’, याविषयी माहिती देण्यात आली. अनेक दूरचित्रवाहिन्यांनी सनातन संस्थेचे प्रदर्शन ध्वनीचित्रित करून वाहिन्यांवर २-३ मिनिटांचे वृत्तप्रसारण केले.

 

७. ‘काश्मिरी हिंदू विस्थापन दिना’निमित्त जागृतीपर कार्यक्रम !

१९९० च्या दशकाच्या आरंभी साडेचार लाख काश्मिरी हिंदू विस्थापित झाले. यातही १९ जानेवारी १९९० या दिवशी मोठ्या प्रमाणात हिंदूंचे विस्थापन झाले होते. या दिवशी म्हणजे ‘काश्मिरी हिंदू विस्थापन दिना’चे निमित्त साधून धर्मजागृती करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने संपर्कात आलेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्यासाठी एका जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम समितीच्या ‘विस्थापित काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे भीषण वास्तव मांडणार्‍या चित्रप्रदर्शना’च्या ठिकाणीच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला १० संत, १० पत्रकार आणि १५ हिंदुत्वनिष्ठ, तसेच १५ भाविक असे एकूण ५० जण उपस्थित होते.

 

८. ‘स्वच्छ कुंभ, सात्त्विक कुंभ’ अभियान !

उत्तरप्रदेश शासनाने ‘स्वच्छ कुंभ’ अभियानाच्या अंतर्गत विविध अशासकीय संस्थांना या अभियानाला पूरक अभियान राबवण्याविषयी सूचना केली होती. या दृष्टीने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती ‘स्वच्छ कुंभ, सात्त्विक कुंभ’ अभियान राबवत आहे. या अभियानाचे स्वरूप वैचारिक आहे. कुंभक्षेत्रात ‘कुंभ’, ‘तीर्थ’, ‘गंगा’ आणि ‘मंदिरे’ यांच्या पावित्र्याविषयीच्या जागृतीसाठी हस्तपत्रकांचे वितरण करण्यात येत आहे. कुंभक्षेत्रात सरकारने शौचालये उभारली आहेत; पण ती अस्वच्छ आहेत. कुंभक्षेत्रातील सेक्टर १५ मध्ये सनातन संस्थेच्या प्रदर्शनापासून जवळच असलेली काही शौचालये सनातन संस्थेच्या साधकांनी ‘स्वच्छ कुंभ’च्या अंतर्गत स्वच्छ केली. त्यामुळे सनातनच्या प्रदर्शनामध्ये येणार्‍या वृद्ध नागरिकांना सुविधा झाली. सात्त्विक कुंभच्या अंतर्गत विविध मोहिमा चालू करण्याची सिद्धता चालू आहे. या मोहिमा पुढीलप्रमाणे असतील :

श्री. चेतन राजहंस

अ. जनतेला लुबाडणार्‍या आणि चरस-गांजाचे सेवन करणार्‍या भोंदूबाबांविरुद्ध कृती करणे. या अंतर्गत पोलीस ठाणे आणि आखाडा परिषद यांच्याकडे तक्रारी करण्यात येतील.

आ. उघड्यावर अन्नपदार्थ विकणार्‍या विक्रेत्यांचे प्रबोधन करून त्यांना ते झाकण्यास भाग पाडणे.

इ. देवतांचा वेश परिधान करून भीक मागणार्‍यांचे प्रबोधन करून त्यांना वेश काढण्यास भाग पाडणे किंवा आवश्यकतेनुसार धर्मभावना दुखावल्याबद्दल पोलिसांत तक्रार करणे.

ई. देवतांची चित्रे, मंत्र, चिन्ह असलेले कपडे, टी-शर्ट, शाली न घालण्याविषयी भाविकांचे प्रबोधन करणे.

 

९. ध्वजारोहण समारंभ आणि राजयोगी (शाही) स्नान या वेळी आखाड्यांचे स्वागत !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संतांचे हार्दिक स्वागत करणारे कापडीफलक (बॅनर्स) बनवले आहेत. वैष्णव आखाड्यांच्या ध्वजारोहण समारंभाच्या वेळी सनातनच्या साधकांनी या आखाड्यातील साधू-संतांचे हार्दिक स्वागत केले. मकरसंक्रांती आणि पौष पौर्णिमा या पर्वण्यांना असलेल्या राजयोगी (शाही) स्नानाला जाणारे साधू-संत अन् भाविक यांचे हार्दिक स्वागत करणारे कापडीफलक सनातन संस्थेने संगमतीर्थावर लावले होते. अनेक माध्यमांनी राजयोगी स्नानासाठी जाणार्‍या जनसमुदायाचे छायाचित्र घेतले, तेव्हा त्यात सनातनचे हार्दिक स्वागताचे फलक स्पष्टपणे दिसत होते.

 

१०. कुंभक्षेत्रात २ ठिकाणी ‘रामनाम गजर अभियान’ !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी कुंभक्षेत्रात २ ठिकाणी ‘रामनाम गजर अभियान’ आयोजित केले. १० जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात राममंदिरांची सुनावणी चालू होणार होती. त्या दिवशी २५ संत-भाविकांच्या उपस्थितीत कुंभक्षेत्रातील संकटमोचन मंदिराजवळ हे ‘रामनाम गजर अभियान’ राबवण्यात आले. १५ जानेवारीला मकरसंक्रांतीच्या निमित्त संगमतीर्थावर पवित्र स्नानाला आलेल्या ५० भाविकांच्या उपस्थितीत उत्स्फूर्तपणे रामनाम गजर अभियान राबवण्यात आले.

 

११. कुंभक्षेत्रातील भावी आयोजन !

६ फेब्रुवारी या दिवशी कुंभक्षेत्रात संपर्क अभियान आणि प्रदर्शनांतील भेटी यांमधून जवळीक झालेले समविचारी संत अन् हिंदु संघटना यांच्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संघटन मेळाव्या’चे आयोजन करण्यात येणार आहे. याच समवेत समविचारी संतांच्या साहाय्याने कुंभक्षेत्रात २ ठिकाणी संतसंमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘प्रयागस्य प्रवेशे तु पापं नश्यति तत्क्षणात् ।

– मत्स्यपुराण, अध्याय १०४, श्‍लोक १२

अर्थ : प्रयागमध्ये केवळ प्रवेश केल्यानेच पापापासून तत्क्षणी मुक्ती मिळते.

सनातन संस्थेचे ८० साधक प्रतिदिन कुंभक्षेत्रात धर्मप्रसारासाठी ‘अहर्निश सेवामहे’ या तत्त्वानुसार सेवारत आहेत. प्रत्येकासाठी हा मेळा गुरुकार्याचा महाकुंभ आहे. कुंभक्षेत्री निवास करतांना प्रत्येक साधकासमोर गंगास्नानाचे, पापमुक्तीचे, अक्षयवटाच्या मोक्षदायी दर्शनाचे आमिष आहे; परंतु या दैवी प्रलोभनाला बळी न पडता आणि कडाक्याच्या थंडीचा प्रतिकार करून हे साधक तपस्व्याप्रमाणे गुरूंचे समष्टी कार्य करत आहेत. गुरूंचे समष्टी कार्य म्हणजे ‘सनातन धर्माचा विश्‍वव्यापी प्रसार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’ ! कुंभक्षेत्री हे समष्टी गुरुकार्य गुरूंनीच पूर्णत्वाला न्यावे, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !

सोशल मीडियाद्वारे धर्मप्रसार !

कुंभमेळ्यातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा प्रत्येक उपक्रम, प्रदर्शनातील संतांच्या भेटी यांची क्षणाक्षणाला प्रसिद्धी करण्याचे दायित्व सोशल मीडियाची सेवा करणार्‍या साधकांकडे आहे. सोशल मीडियाद्वारा प्रसिद्धीसाठी यंदा प्रथम राजयोगी स्नानाचे ‘फेसबूक लाईव्ह’ करण्यात आले. आता प्रतिदिन अध्यात्म, साधना, धार्मिक कृती, गंगारक्षा, हिंदु राष्ट्र आदी विषयांवर कुंभक्षेत्रातून ‘फेसबूक लाईव्ह’ करण्याची योजना आहे.

संकलक – पू. नीलेश सिंगबाळ, उत्तर-पूर्व भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती आणि  श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment