सनातनचे ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चे कार्य देशाला सुधारत आहे ! – महामंडलेश्‍वर श्री महंत श्री रामेश्‍वरदास महाराज

कुंभमेळा प्रयागराज २०१९

डावीकडून महामंडलेश्‍वर श्री महंत श्री रामेश्‍वरदास महाराज आणि श्री. राजा भैय्या यांना ग्रंथप्रदर्शनाची माहिती देतांना श्री. अभय वर्तक

कुंभमेळ्याचे सजीव शब्दचित्रण करणारे सदर : कुंभदर्शन

‘कुंभदर्शन’ या विशेष सदरात आपण प्रयागराज येथे चालू असलेल्या ‘कुंभमेळ्या’संदर्भातील छायाचित्रे अन् वैशिष्ट्यपूर्ण माहिती प्रतिदिन पहात आहोत. यातून वाचकांना हिंदु धर्माचे अनन्यसाधारण महत्त्व आणि साधना करणे का आवश्यक आहे, हे उमगेल. या सदरामुळे आपल्याला घरबसल्या भक्तीभावाचा किंचित्सा अनुभव अवश्य येईल. असे असले, तरी या कुंभमेळ्याच्या पवित्र काळात हिंदूंनी साधना करण्याचा संकल्प करावा; कारण आगामी आपत्काळात ही साधनाच आपल्याला तारणार आहे, हे निश्‍चित !

प्रयागराज (कुंभनगरी), १८ जानेवारी (वार्ता.) – ‘सनातन संस्था समाजाला जागृत करण्याचे प्रभावी कार्य करत आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय ठेवून सनातन संस्था हे कार्य करत देशाला सुधारत आहे. ‘धर्मो रक्षति रक्षित: ।’ या सिद्धांतानुसार सनातन संस्था संस्कृतीचे रक्षण करत असून संस्कृतीच्या विरोधात अपकृत्य करणार्‍यांचा ही संस्था विरोधही करत आहे. या संस्थेचे कार्य करणार्‍या सर्व साधकांचे कौतुक करतो’, असे गौरवोद्गार जम्मू-काश्मीर खालसाचे अध्यक्ष महामंडलेश्‍वर श्री महंत श्री रामेश्‍वरदास महाराज यांनी १७ जानेवारीला येथे काढले.

महामंडलेश्‍वर श्री रामेश्‍वरदास महाराज आणि त्यांच्या समवेत आलेले जम्मू येथील गोरक्षा दलाचे कार्य करणारे श्री. राजा भैय्या यांनी कुंभनगरीतील सनातनच्या राष्ट्र अन् धर्मजागृतीच्या ग्रंथप्रदर्शनास भेट दिली. त्या वेळी त्यांनी हे विचार मांडले. या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनी त्या दोघांना सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाची संपूर्ण माहिती दिली. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या मंगलहस्ते महंत श्री रामेश्‍वरदास महाराज यांना सनातनचा हिंदी भाषेतील ‘गंगाजी की महिमा’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

सनातनचे ग्रंथ पाहून पुष्कळ चांगले वाटले ! –
श्री महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ महंत गोपालदास महाराज

श्री महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ महंत गोपालदास महाराज (उजवीकडे) यांना ग्रंथ भेट देतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

प्रयागराज (कुंभनगरी), १८ जानेवारी (वार्ता.) – जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथील आश्रमाचे श्री महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ महंत गोपालदास महाराज यांनी १६ जानेवारीला कुंभमेळ्यातील सनातनच्या ग्रंथ आणि फ्लेक्स प्रदर्शनास भेट दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्यांचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी त्यांना प्रदर्शनाची माहिती दिली. सनातनचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांनीही सनातनच्या कार्याविषयी त्यांना माहिती देऊन अवगत केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी महंत गोपालदास महाराज यांना सनातनचा ‘गंगाजीका महिमा’ हा हिंदी ग्रंथ भेट दिला. या वेळी राष्ट्र आणि धर्मजागृतीविषयक ग्रंथ अन् फ्लेक्स प्रदर्शन पाहून ते म्हणाले, ‘‘मला तुमचे प्रदर्शन पाहून पुष्कळ चांगले वाटले. माझे तुम्हाला पूर्ण सहकार्य असेल. जम्मू येथे आमचे ३ आश्रम आहेत. तुम्ही आश्रमाला भेट द्यावी. तेथे तुमच्या रहाण्याची पूर्ण व्यवस्था केली जाईल.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात