वाशी (नवी मुंबई) येथील ‘प्रॉपर्टी एक्झीबिशन’मध्ये भरवलेल्या सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

महापौरांची ग्रंथप्रदर्शनाला भेट !

ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन संस्थेच्या कार्याची माहिती घेतांना महापौर जयवंत सुतार

नवी मुंबई – बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई यांच्या वतीने वाशी येथील रेल्वेस्थानकाच्या जवळील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता प्रदर्शन (‘प्रॉपर्टी एक्झीबिशन’) या कार्यक्रमाच्या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवी मुंबईचे महापौर श्री. जयवंत सुतार यांनी या ग्रंथप्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन कार्याची माहिती घेतली आणि सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. अध्यात्मशास्त्राची समाजाला ओळख व्हावी, राष्ट्र आणि धर्म कार्याचा प्रसार व्हावा, या उद्देशाने ७ ते १० डिसेंबर या कालावधीत हे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे.

सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत चालू असणार्‍या या ग्रंथप्रदर्शनामध्ये आयुर्वेद, राष्ट्र आणि धर्म, सामाजिक आदी विविध ग्रंथ उपलब्ध आहेत. या ठिकाणी भ्रमणसंगणकाद्वारे (लॅपटॉप) जिज्ञासूंना धर्मशिक्षणाच्या ध्वनीचित्रफीती आवर्जून दाखवण्यात येत असून त्याविषयी जिज्ञासूंच्या शंकांचे निरसनही करण्यात येत आहे. कक्षावर सनातन संस्थेची विविध सात्त्विक उत्पादनेही उपलब्ध आहेत. या प्रदर्शनाला मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांसह अन्य जिल्ह्यांतील गुंतवणूकदार, व्यावसायिक आणि घराची आवश्यकता असणारे लाखो लोक भेट देतात. या वर्षीचे हे १९ वे मालमत्ता प्रदर्शन असून प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही सनातन संस्थेला या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

क्षणचित्रे

१. वाशी येथील दृष्टी इस्टेट एजन्सीचे श्री. नंदू जाम यांनी संस्थेचे कार्य पुष्कळ चांगले असल्याचे सांगून कार्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

२. नेरूळ येथील श्री. रसिकभाई नागराणी यांनी संस्था करत असलेले धर्मकार्य पुष्कळ चांगले असल्याचे सांगून हे कार्य सेवा म्हणून करत असल्याविषयी कौतुक केले.

३. अनेक जिज्ञासूंनी संस्थेच्या अध्यात्म आणि धर्म प्रचाराच्या कार्याची आवर्जून माहिती घेऊन हे कार्य आवश्यक असल्याचे सांगितले.

४. काही पालकांनी पाल्यांसाठी नैतिक आणि संस्कार यांच्याविषयीचे ग्रंथ घेऊन संस्थेच्या कार्याविषयी विश्‍वास व्यक्त केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment