कल्याण येथील ऐतिहासिक त्रिविक्रम देवस्थान आणि हिंदूूंना एकसंध ठेवणार्‍या वैकुंठ चतुर्दशीचे महत्त्व !

निरनिराळ्या देवतांची देवालये संपूर्ण जगतात उभी राहिली. प्रत्येक साधक आपले दैवत आणि संप्रदाय यांचे कौतुक आणि प्रसार करू लागला; आपल्या दैवतापेक्षा दुसर्‍या दैवतांस कनिष्ठ समजून त्या देवतांच्या साधकांशी वैर करू लागला. परिणामी शैव-वैष्णव एकमेकांसमोर उभे ठाकले. हा भेदभाव नष्ट करण्यासाठी अनेक ग्रंथांची निर्मिती झाली.

श्री कालभैरव वरद स्तोत्रात देवतांच्या एकरूपतेविषयी उल्लेख आहे –

तेहतीस कोटी देव असती । प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती । सामान्य मती । गुंग होऊन जातसे ॥ ६॥

गाणपत्य म्हणती गणपती । शक्ती म्हणती महाशक्ती । स्मार्त म्हणती पशुपती । वैष्णव म्हणती श्री विष्णु ॥ ७॥

नाना देव देवता । प्रत्येकाची ज्येष्ठ श्रेष्ठता । आपापल्या परीने भक्ता । आकर्षूनी घेतसे ॥ ८॥

हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ कोण कोणाहूनी कनिष्ठ । हे न कळल्याने स्पष्ट । मन संभ्रमी पडत असे ॥ ९ ॥

काही वेळा हा भेदाभेद विकोपास जाऊन दंगली चालू झाल्या. त्या वेळी जगद्गुरु श्री शंकराचार्य यांनी पंचायतन देवतापद्धती चालू करून भेदाभेद मिटवून एकोपा करण्याचा प्रयत्न केला. असे अनेक प्रयत्न प्राचीन ऋषींपासून चालू आहेत.

संस्कारामुळे गुणांची वृद्धी आणि दोषांचा क्षय होतो आहे हे माहीत असल्याने अनेक आक्रमणांना तोंड देत सनातन हिंदु संस्कृती टिकून आहे. जीवनपद्धतीचा अभ्यास करून,  राजकीय, धार्मिक, सामाजिक, वैज्ञानिक प्रगती सनातन हिंदु संस्कृतीने केली आहे. त्यातीलच ‘वैकुंठ चतुर्दशी’ हा एक महान प्रयोग आहे.

कार्तिक शुद्ध चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी या नावाने आणि पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. हे जवळ जवळ जोड व्रत आहे. विष्णु आणि शिव ही एकाच परमात्म्याची कार्यपरत्वे प्रकट झालेली दोन रूपे आहेत. आपण केवळ अज्ञानामुळे दोन निरनिराळे देव कल्पून पंथोपंथांची एकमेकांशी मतभिन्नता दिसून येते. शास्त्राने ही मतभिन्नता दूर करून विष्णुशिवात्मक ऐक्य दर्शवण्यासाठी वरील प्रकारची योजना केलेली आहे. पंचांगात या दिवसाकरीता ‘वैकुंठ चतुर्दशीचा उपवास, आवळीचे झाडाखाली विष्णू पूजन, मध्यरात्री विष्णुपूजन करून नंतर अरुणोदयी शिवपूजन करावे’, असा उल्लेख केलेला दिसतो.  अनेक जण वैकुंठ चतुर्दशीचे दिवशी व्रत करतात. वैकुंठ वात लावतात. रात्रीला हरिहर भेटीचा आनंद घेतात.

त्रिविक्रम देवस्थानी वैकुंठ चतुर्दशी या दिवशी शंकराला तुळस आणि श्री विष्णूला बेल वाहण्याची पद्धत आहे. संत नरहरी यांच्या काळात शैव आणि वैष्णव यांच्यात विस्तव जात नसे. तेथेच पांडुरंगाने लिंग दर्शन घडवले. या लिंगावर जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी श्री पांडुरङ्गष्टकम् स्तोत्र लिहिले. श्री विष्णूने वामन अवतारात बळीराजाला जे दर्शन घडवले ते श्री त्रिविक्रम म्हणून प्रसिद्धीस आले. श्री त्रिविक्रम हे आपल्या मस्तकावर लिंग धारण करतात.

ऐतिहासिक कल्याण शहरात श्री त्रिविक्रमाचे मंदिर असून या देवस्थानात वैकुंठ चतुर्दशीचा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो. हे देवालय पेशवेकालीन असून या देवालयातील मूर्ती पेशव्यांचे कारभारी श्रीमंत बळवंतराव मेहेंदळे यांनी अठराव्या शतकात गुजरात मोहिमेवरून आणली. ही गंडकी पाषाणाची मूर्ती असून तिच्याभोवती प्रभावळ आहे. या प्रभावळीवर दोन्ही बाजूंना दशावतार कोरले असून जय-विजय, राई-रखुमाई आहेत. ही मूर्ती चतुर्भुज असून पद्म, चक्र, शंख धारण केलेली आहे. तसेच नियमाप्रमाणे मस्तकी शिवलिंग धारण केलेले आहे. येथे शिव विष्णु यांचा मिलाप होत असल्याने एकाच वेळी सर्व देवतांचे भक्तांना दर्शन होते.

– श्री. दिनेश देशमुख (विश्‍वस्त)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment