मुलांनो, आतापासूनच स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवून ‘व्यक्तीमत्त्व विकास’ साधा आणि गुणसंपन्न होऊन आनंदी जीवनाचीही प्रचीती घ्या !

 

  • स्वभावदोषांची सूची करा !
  • नियमित ५ सूचनासत्रे करा !
  • चुकांसाठी शिक्षा किंवा प्रायश्‍चित्त घ्या !
  • दोष-निर्मूलनासाठी प्रार्थना करा !

 

१. व्याख्या

‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ म्हणजे स्वभावदोष दूर करण्यासाठी पद्धतशीरपणे आणि नियमित अवलंबण्याची एक विशिष्ट प्रक्रिया.

 

२. महत्त्व

२ अ. सुखी अन् आदर्श जीवन जगता येणेे

स्वभावदोषांमुळे जीवनाची अपरिमित हानी होते. स्वभावदोषांमुळे जीवन दुःखी आणि निराशाजनक होते. स्वभावदोष-निर्र्मूलन प्रक्रियेमुळे दोषांवर नियंत्रण येऊन स्वतःमध्ये गुणांचा विकास होतो; म्हणून जीवन सुखी अन् आदर्श बनते.

२ आ. व्यक्तीमत्त्वाचा खरा विकास होणे

अनेक मुले स्वतःचे व्यक्तीमत्त्व आदर्श घडवण्यासाठी उच्च शिक्षण घेणे, आवडत्या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करणे, विविध भाषांचे अध्ययन करणे, स्पर्धा-परीक्षांना बसणे, व्यायाम आणि खेळ यांद्वारे शरीरयष्टी सक्षम करणे यांसारखे विविध मार्ग अवलंबतात.

२ इ. मुलांनो, अनेक स्वभावदोष असलेले व्यक्तीमत्व कोणाला आवडेल का ?

स्वतःतील भित्रेपणा, अबोलपणा, इतरांचा विचार न करणे यांसारखे स्वभावदोष दूर केल्यामुळे व्यक्तीमत्वाचा खरा विकास होतो. असे दोषरहित व्यक्तीमत्त्वाच समोरील व्यक्तींवर किंवा समाजात छाप पाडू शकते; म्हणून व्यक्तीमत्वाचा विकास होण्यासाठी स्वभावदोष घालवणे अपरिहार्य ठरते.

२ ई. जीवनातील कठीण प्रसंगांना सहजपणे तोंड देता येणे

अनेक मुलांचे कठीण प्रसंगात मानसिक संतुलन बिघडते. स्वभावदोष-निर्र्मूलन प्रक्रियेमुळे मन एकाग्र आणि खंबीर होण्यासह विवेकबुद्धीही जागृत होते. त्यामुळे कठीण प्रसंगातही स्थिर रहाता येण्यासह अयोग्य किंवा अविचाराने कृती करण्यापासून मनाला रोखता येते.

२ उ. सध्याच्या स्पर्धात्मक युगात पुढे (अग्रस्थानी) रहाता येणे

स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे मनाची शक्ती अनावश्यक गोष्टींवर व्यय (खर्च) होत नाही. त्यामुळे व्यक्तीच्या कार्यक्षमतेचा परिपूर्ण वापर होऊन स्पर्धात्मक युगात पुढे (अग्रस्थानी) रहाता येते.

 

३. स्वभावदोषांवर मात करण्यासाठी प्रक्रिया राबवा !

३ अ. स्वतःमधील स्वभावदोषांची सूची (यादी) बनवणे

३ अ १. उद्धटपणा, हट्टीपणा, लहरीपणा, वेळेचे पालन न करणे, दुसर्‍यांना दोष देणे, अव्यवस्थितपणा, आळस, एकाग्रता नसणे, स्वतःच्या वस्तू इतरांना न देणे, खोटे बोलणे, भित्रेपणा, चिडचिडेपणा, रागीटपणा अशा प्रकारे दोष मुलांमध्ये असू शकतात. अशा प्रकारे दोषांची सूची करून मुलांमध्ये त्यांतील सर्वाधिक तीव्र दोष कुठले आहेत, ते निवडा.

३ अ २. स्वतःच्या चुका शोधा !

मुलांनो, आपल्याकडून दिवसभरात घडलेल्या चुका स्वभावदोष-निर्मूलन सारणीत वेळोवेळी लिहायच्या असतात. प्रथम चुका म्हणजे काय, ते समजून घेऊया. काही वेळा आपल्याकडून एखाद्याचा अपमान होईल अशासारखे चुकीचे बोलले जाते किंवा निरर्थक हट्ट करण्यासारखी एखादी अयोग्य कृती होते. या जशा चुका आहेत, तसेच मनात अयोग्य विचार, प्रतिक्रिया किंवा भावना निर्माण होणे, यासुद्धा चुकाच आहेत, उदा. दुसर्‍याविषयी मनात द्वेषाची भावना निर्माण होणे.

३ अ ३. स्वतःच्या चुका शोधायची स्वतःला सवय लावा !

आपण जर दैनंदिन व्यवहार करतांना ‘मला माझ्या चुका शोधायच्याच आहेत’, असा दृढ निश्‍चय करून सतर्कता बाळगली, तर स्वतःच्या बर्‍याच चुका स्वतःच्याच लक्षात येतात.

३ अ ४. स्वतःच्या चुका कळण्यासाठी दुसर्‍यांचे साहाय्य घ्या !

मुलांनो, कधी कधी काही चुका आपल्या स्वतःच्या लक्षात येत नाहीत. अशा चुका लक्षात आणून देण्यास आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-परिवार इत्यादींना सांगून ठेवावे.

३ आ. ‘स्वयंसूचना’ म्हणजे काय ते समजून घेऊन त्या नियमित द्या ! 

स्वतःकडून झालेली चुकीची कृती, मनात आलेला अयोग्य विचार आणि व्यक्त झालेली किंवा मनात उमटलेली अयोग्य प्रतिक्रिया यांच्यात पालट होऊन त्यांच्या ठिकाणी योग्य कृती होण्यासाठी किंवा योग्य प्रतिक्रिया निर्माण होण्यासाठी स्वतःच  स्वतःच्या  अंतर्मनाला (चित्ताला) जी योग्य सूचना द्यावी लागते, तिला ‘स्वयंसूचना’ असे म्हणतात. अगदी सोप्या शब्दांत सांगायचे तर स्वतःकडून घडलेल्या अयोग्य गोष्टीसंबंधी अंतर्मनाला (चित्ताला) योग्य गोष्ट करण्याचा उपाय सुचवणे, म्हणजे ‘स्वयंसूचना’ होय. १ सूचना ५ वेळा मनात म्हणावी. अशी दिवसभरात ५ सत्रे करावीत.

३ इ. दोष-निर्मूलन प्रक्रियेचा आढावा दुसर्‍याला द्या !

 

आई-वडिलांचे महत्त्व जाणणार्‍या थोर विभूती !

१. श्रावणबाळ

याने अंध आई-वडिलांची सेवा न थकता केली. त्यांनी काशीयात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर ती पूर्ण करण्यासाठी श्रावणबाळाने त्यांना कावडीत बसवले आणि कावड खांद्यावर घेऊन तो काशीयात्रेला पायी निघाला.

२. प्रभु श्रीरामचंद्र

‘अयोध्येचे राज्य धाकटा बंधू भरतला देऊन रामाने १४ वर्षे वनवासाला जावे’, या माता कैकयीच्या आज्ञेचे रामाने मनःपूर्वक पालन केले आणि वडिलांचेही वचन राखले.

३. भक्त पुंडलिक

याने आई-वडिलांची केलेली सेवा म्हणजे तपश्‍चर्याच होती. तपश्‍चर्येमुळे श्री विठ्ठलही प्रसन्न होऊन त्याला भेटण्यासाठी आला. त्या वेळी आई-वडिलांच्या सेवेेत थोडाही खंड पडावयास नको; म्हणून पुंडलिकाने जवळची एक वीट भिरकावून श्री विठ्ठलाला तिच्यावर उभे रहाण्याची विनंती केली.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘स्वभावदोष घालवा आणि आनंदी व्हा !’)

Leave a Comment