आयुर्वेद – अनादी आणि शाश्‍वत मानवी जीवनाचे शास्त्र

Article also available in :

‘आयुर्वेद’ हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशा प्रकारे होतो. आयुर्वेदाचा प्रारंभ ब्रह्मापासून झाला आहे’, असे मानले जाते. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला अनुमाने ३००० वर्षांपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. (संदर्भ : संकेतस्थळ)

आयुर्वेद हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. आयुर्वेद म्हणजे मानवाचे आयुष्यमान वाढवणारा मूलमंत्र होय. आयुर्वेदात रोगनिवारणासह रोगप्रतिबंधात्मक उपायही सुचवलेले आहेत. आयुर्वेदात व्यक्तीचा सर्वांगाने म्हणजे तिच्या प्रकृतीचा शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या स्तरांवर विचार केला जातो. जीवन निरोगी राखण्यासाठी सदाचार पालनाची जोड असलेली दिनचर्या, ऋतूचर्या, तात्काळ गुण देणारे अग्नीकर्म आणि वेधनचिकित्सा, शरीर आणि मन यांच्या संतुलनासाठी योगासने, आहार-विहार, आध्यात्मिक उपाय (जप, होम, नामस्मरण, मंत्रोच्चारण), स्वदेशी वस्तूंचा वापर, संस्कृती आणि पर्यावरण यांचे रक्षण इत्यादी विषय अंतर्भूत केलेलेे आहेत. एवढी व्यापक दृष्टी असलेली चिकित्सा केवळ अन् आयुर्वेदातच आहे.

आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद किंवा मानवी जीवनाचे शास्त्र. त्यात शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक स्वास्थ्य कसे राखावे याचे मार्गदर्शन केले आहे. आयुष्याला हितकर व अहितकर आहार, विहार व आचार यांचे विवेचन केलेले आहे. मानवी आयुष्याचे ध्येय व खरे सुख कशात आहे याचाही विचार केलेला आहे. तसेच रोगांची कारणे, लक्षणे, उपचार व रोग होऊ नये म्हणून उपाय दिलेले आहेत. याच आयुष्यातच नव्हे, तर पुढील जन्मांतही सर्वांगीण उन्नति करून मानवी जीवनाचे अंतिम ध्येय, दुःखापासून कायमची मुक्ति व सच्चिदानंद स्वरूपाची सतत अनुभूति कसे गाठावे याचेही मार्गदर्शन आयुर्वेदाने केले आहे. थोडक्यात म्हणजे मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार करणारे व यशस्वी, पुण्यमय, दीर्घ, आरोग्यसंपन्न जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन करणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद.

आयुर्वेद नित्य, अनादि, शाश्‍वत आणि सतत गतीशील असणारे शास्त्र आहे.

न चैव हि अस्ति सुतराम् आयुर्वेदस्य पारम् । (चरकसंहिता विमानस्थान, अध्याय ८, श्‍लोक १४)

म्हणजे आयुर्वेदाच्या ज्ञानाला सीमा नाहीत. सतत वृद्धिंगत होणे हा आयुर्वेदाचा स्वभावच आहे.

सोऽयमायुर्वेदः शाश्‍वतो निर्दिश्यते अनादित्वात् स्वभावसंसिद्ध-लक्षणत्वात् । (चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय ३०, श्‍लोक २५)

म्हणजे आयुर्वेद हा अनादी आणि स्वतःसिद्ध असल्याने शाश्‍वत आहे. आयुर्वेद म्हणजे आयुष्याचा वेद, आयुष्याचे ज्ञान. ज्या ज्या शास्त्रात मानवी आयुष्याला व आरोग्याला उपयुक्त अशी माहिती असेल, ते ते शास्त्र आयुर्वेदातच अंतर्भूत होते. असे प्रत्येक शास्त्र आयुर्वेदाचा अविभाज्य विभाग आहे, असा पूर्वीच्या ऋषीमुनींचा आयुर्वेदाबद्दल विशाल दृष्टिकोन होता. अशा दृष्टिकोनातून विचार केल्यास होमिओपॅथि, अ‍ॅक्यूपंक्चर, आधुनिक वैद्यकशास्त्र, इलेक्ट्रोथिरॅपी, नॅचरोपॅथी, मॅग्नेटोथिरॅपी इत्यादि शास्त्रे आयुर्वेदातच अंतर्भूत आहेत, असे ध्यानात येईल. फार तर त्यांना आयुर्वेदाच्या शाखा म्हणता येईल. आयुर्वेदाच्या विशाल वृक्षाखाली प्रत्येक शाखेने आपापले वैशिष्ट्य जरूर टिकवून ठेवून आपापल्या शाखेचा विस्तार करावा. या अथांग आयुर्वेदाचे अध्ययन करण्यासाठी त्याच्या मूलतत्त्वांचे अध्ययन करणे आवश्यक आहे.

‘न अनौषधं जगति किंचित् द्रव्यम् उपलभ्यते ।’ (चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय 26, श्‍लोक 12)

म्हणजे ‘जगात एकही द्रव्य असे नाही की, ज्याचा औषध म्हणून उपयोग करता येणार नाही’, असे आयुर्वेदाने म्हटले आहे. आयुर्वेदाने वनस्पतीच्या गुणांचे वर्णन तिच्या मानवी शरीरावर होणार्‍या परिणामांवरून केले आहे, उदा. पिंपळी उष्ण आहे, तर आवळा शीत आहे. याचा अर्थ पिंपळीचे तापमान जास्त आहे व आवळ्याचे कमी आहे, असा नाही. ते स्पर्शाला उष्ण किंवा शीत नाहीत. उष्ण द्रव्ये पेशीत चयापचयाची क्रिया वाढवतात, तर शीत द्रव्ये चयापचयाची क्रिया कमी करतात. उष्ण द्रव्यांनी शरीरातील नलिका रुंद होतात, तर शीत द्रव्यांनी नलिका आकुुंचन पावतात. आयुर्वेेदाने गोड, आंबट, खारट, तिखट, कडू व तुरट चवीच्या अन्नाचा व द्रव्यांचा दोष, धातू व मल यांवर कसा परिणाम होतो, याचे चांगले वर्णन केले आहे.

आयुर्वेदात सांगितलेल्या बर्‍याच वनस्पती खेडेगावातही मिळतात; म्हणून नेहमी मिळणार्‍या वनस्पतींचा रोग निवारणासाठी व आरोग्यसंपन्न जीवन जगण्यासाठी कसा उपयोग करावा, याची माहिती आयुर्वेदात मिळेल.

चरक सुश्रुतांच्या काळांत वनस्पतींच्या अवयवांचा औषध म्हणून उपयोग होत असे. बर्‍याच वनस्पतींची संस्कृत नावे त्यांचे गुण व कार्य दर्शवितात, उदा.कुष्ठ वनस्पती कुष्ठरोगावर उपयोगी पडते. ब्राह्मी ब्राह्मणाला बुद्धीला उपयोगी, अश्‍वगंधा घोड्यासारखा वास येणारी. अश्‍व-घोडा हे पुरुषत्वाचे प्रतीक आहे; म्हणून पुरुषांच्या जननेंद्रियांना बलदायक असलेली वनस्पती आहे. बाळंतशोपांना संस्कृतमध्ये शतपुष्पा असे म्हणतात. पुष्प म्हणजे फूल. ही वनस्पती स्त्रियांच्या पुष्पेंद्रियांवर म्हणजे जननेंद्रियांवर काम करणारी आहे. मेदा व महामेदा यांच्यामुळे शरीरातील मेद धातू वाढतो व वजन वाढण्यास मदत होते.

 

१. आयुर्वेदाची महनीय परंपरा

काय, शल्य, शालाक्य, बाल, ग्रह, विष, रसायन आणि वाजीकरण अशी आयुर्वेदाची आठ अंगे आहेत. आयुर्वेदाच्या सर्व संहिता आणि संग्रह ग्रंथ यांत ब्रह्मदेवाला आयुर्वेदाचा आदिप्रवक्ता म्हटले आहे.

ब्रह्मदेवाने ही विद्या दक्ष प्रजापति आणि भास्कर यांना दिली. दक्षाच्या आयुर्वेदविषयक परंपरेत सिद्धांताला आणि भास्कराच्या परंपरेत चिकित्सापद्धतीला प्राधान्य होते. दक्ष प्रजापतीकडून अश्‍विनीकुमारांनी समग्र आयुर्वेदाचे अध्ययन केले. अमृत मिळवण्यासाठी औषधी निवडून काढणे आणि योग्य स्थानी त्यांची निपज करणे, हे अश्‍विनीकुमारांचे विशेष कार्य होय. अश्‍विनीकुमारांनी वृद्ध च्यवनऋषींना त्यांच्या चिकित्सेने तारुण्य प्राप्त करून दिले, अश्‍विनीकुमारांनीच इंद्राला आयुर्वेद शिकवला. इंद्राने भृगू, अंगिरा, अत्री, वसिष्ठ, कश्यप, अगस्त्य, पुलस्त्य, वामदेव, असित आणि गौतम या दहा ऋषींना आयुर्वेदाचे ज्ञान करून दिले.

चरकसूत्र आणि चरकसंहिता यांत सांगितलेली आयुर्वेदाची महती

१. ‘आयुर्वेद म्हणजे दीर्घायुष्यासंबंधी विचार करणारा वेद होय. याची व्याख्या अशी – ‘तत्रायुर्वेदयतीत्यायुर्वेदः …यतश्‍चायुष्याण्यनायुष्याणि च द्रव्यगुणकर्माणी वेदयत्यतोऽप्यायुर्वेदः ।’ म्हणजे जो आयुष्याचे ज्ञान करवतो, तो आयुर्वेद होय. तसेच जो आयुष्याला हितप्रद आणि हानीकारक अशी द्रव्ये, गुण, कर्मे समजावून सांगतो, तो आयुर्वेद होय ! – (चरकसूत्र ३०.३३)

२. हिताहितं सुखं दुःखं आयुस्तस्य हिताहितम् ।

मानं च तच्च यत्रोक्तम् आयुर्वेदः स उच्यते ॥ – चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय १, श्‍लोक ४१

अर्थ : योग्य-अयोग्य, सुख-दुःख यांचा मानवाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो, याचे मोजमाप ज्यात सांगितले आहे, त्याला ‘आयुर्वेद’ म्हणतात.

 

२. हिंदु धर्माची अद्वितीय देणगी असलेल्या आयुर्वेदाचे महत्त्व

‘आयुर्वेद ही जिवाला काळानुसार आणि प्रकृतीनुसार यम-नियम बंधनांचे आचरण शिकवून आध्यात्मिक उन्नतीमध्ये साहाय्य करणारी उपासनापद्धतच आहे. त्यामुळे प्रारब्धामुळे आजार असले, तरी आयुर्वेदात सांगितलेले आचरण केल्यामुळे जिवाला ते भोगणे सहज होऊन वाईट शक्तींचा त्रास न होता आध्यात्मिक उन्नती करणे शक्य होते.

आयुर्वेद हे विलंबाने नव्हे, तर लगेच गुण देणारे शास्त्र !

‘महर्षि वाग्भटांनी आपल्या ग्रंथात रोगांवर उपचार सांगणारे ‘चिकित्सास्थान’ नावाचे प्रकरण रचल्यावर या प्रकरणाविषयी पुढील श्‍लोक लिहून ठेवला आहे. –

आयुर्वेदफलं स्थानम् एतत् सद्योऽर्तिनाशनम् ।

– अष्टांगहृदय, चिकित्सास्थान, अध्याय २२, श्‍लोक ७३

अर्थ : या ग्रंथातील चिकित्सास्थानात सांगितलेले उपचार ताबडतोब दुःखाचा नाश करणारे आहेत; म्हणून चिकित्सास्थान हे आयुर्वेदाचे फळ आहे.

फार प्राचीन काळापासून आयुर्वेद हे लगेच गुण देणारे शास्त्र म्हणून प्रसिद्ध आहे.

गुरुकुल शिक्षणपद्धतीचा लोप झाल्याने आयुर्वेदाचे परिपूर्ण ज्ञान असणार्‍या वैद्यांची संख्या तुलनेने अल्प आहे. बहुतेक वैद्य रुग्णाची प्रकृती, रोगाची कारणे इत्यादींचा विचार न करता अ‍ॅलोपॅथीच्या धर्तीवर आयुर्वेदीय उपचार करत (चिकित्सा देत) असल्याने आणि रुग्णही पथ्ये इत्यादी नीट पाळत नसल्याने ‘आयुर्वेदीय औषधांनी विलंबाने गुण येतो’, हा अपसमज रूढ झाला आहे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, आयुर्वेदीय चिकित्सक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.४.२०१४)

 

 

श्री. निषाद देशमुख

 

३. आयुर्वेद उपचारपद्धती ही साधनापद्धतीचा प्रकार असणे

‘सर्वोच्च सुख, म्हणजेच आनंद हे साधनेनेच मिळू शकते’, हे सत्य प्राचीन ऋषि-मुनी यांना ज्ञात असल्याने त्यांनी साधनेच्या दृष्टीने विविध पद्धती आणि शास्त्र निर्माण केले. आयुर्वेद उपायपद्धतीही याला अपवाद नाही. त्यामुळे सर्वसाधारण उपासनापद्धतीत अंतर्भूत असलेली गुणवैशिष्ट्ये आयुर्वेदातही आढळून येतात. याचे विश्‍लेषण पुढे दिले आहे.

३ अ. आयुर्वेदाद्वारे काळानुसार आणि प्रकृतीनुसार मार्गदर्शन केले जाणे

आयुर्वेदात जिवाला काळानुसार आणि प्रकृतीनुसार करायचे आचरण आणि पाळायचे पथ्य यांचे मार्गदर्शन केले जाते, उदा. कोणत्या ऋतूत कोणता अन्नपदार्थ प्रामुख्याने आणि किती प्रमाणात ग्रहण करावा, वृद्धावस्थेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी इत्यादी. या प्रकारे जीव काळानुसार आणि प्रकृतीनुसार वागत असल्याने त्याला आवश्यक शक्ती मिळून त्याची साधना शारीरिक, मानसिक आणि इतर आजारांना बरे करण्यासाठी वापरली न जाता आध्यात्मिक उन्नतीसाठी वापरली जाते.

३ आ. आयुर्वेदातील यम-नियमांचे पालनामुळे जिवाचा मनोलय होण्यास साहाय्य होणे

आयुर्वेदात औषधोपचारासह पथ्यपालनाला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. यामुळे जिवाला औषधांसह विविध यम-नियम यांचे पालन करावे लागते. औषधासंदर्भातील यम-नियमांच्या पालनामुळे जिवाचे मनानुसार वागणे न्यून होऊन काही प्रमाणात मनोलय होण्यास साहाय्य होते.

३ इ. शारीरिक स्तरासह मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील त्रास न्यून करण्यासाठी साहाय्य करणे

प्राचीन काळातील वैद्यांमध्ये जिवाला होत असलेले रोगांचे मूळ कारण ज्ञात करण्याची क्षमता असे. यामुळे ते जिवाला विविध मंत्रांनी युक्त औषध जिवाला द्यायचे. ज्यामुळे जिवाला शारीरिकसह मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर होत असलेले त्रास न्यून होण्यासही साहाय्य व्हायचे. त्याच प्रकारे कोणत्या कृतीने मनाला त्रास होऊ शकतो ते न करण्यासंदर्भातही आयुर्वेदात मार्गदर्शन दिले आहे, उदा. संभोग कोणत्या ऋतूत करावे आणि कधी करू नये ? इत्यादी. थोडक्यात आयुर्वेदीय उपचारपद्धतीमुळे शारीरिक स्तरासह मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरील त्रास न्यून होतात.

३ ई. देहात न्यून झालेले तत्त्व मिळवून देणार्‍या साधनेचे मार्गदर्शन करणे

अनेक योगमार्ग ईश्‍वराशी एकरूप होण्यासाठी आवश्यक तत्त्व मिळून देणारी साधना सांगतात तेच कार्य काही प्रमाणात आयुर्वेदही करते. पंचतत्त्व हे ईश्‍वराची पराशक्ती आहे. जिवात असलेल्या पंचतत्त्वांच्या समीकरणात पालट झाल्यावर जिवाच्या कफ, वात आणि पित्त यांच्यात वाढ होऊन त्याला विविध रोग होतात. आयुर्वेद या तिन्हीचा समतोल साधणे शिकवतो, म्हणजेच पंचतत्त्वांपैकी न्यून असलेल्या तत्त्वात वाढ करतो. त्याच प्रकारे आयुर्वेदातील अष्टतंत्र यांमध्ये ‘भूतविद्या’ एक तंत्र आहे. या तंत्रात देव आणि ग्रह आदींमुळे निर्माण झालेले विकार, म्हणजेच दैवी शक्ती न्यून पडल्यामुळे निर्माण झालेले विकार अन् त्यांच्या उपचारांचा सामावेश आहे.

 

४. प्रारब्धामुळे आजार होत असतांनाही आयुर्वेद निर्माण करण्याचे कारण

जिवाला झालेले सर्व रोग हे प्रारब्धामुळे नसून काही रोग अयोग्य क्रियमाणामुळेही उद्भवत असतात. प्रारब्ध आणि क्रियमाण या दोन्हींमुळे निर्माण झालेले आजार योग्य प्रकारे भोगून संपवण्यासाठी आयुर्वेदाचे ज्ञान ईश्‍वराने समष्टीला दिले आहे.

 

५. प्रारब्धामुळे असलेल्या आजारांवर आयुर्वेद उपचारपद्धतीचा लाभ

५ अ. आयुर्वेद उपचारपद्धतीमुळे जिवाच्या साधनेची हानी न होणे

जीव रोगाने ग्रस्त झाल्यावर त्याच्या देहात कार्यरत प्राणशक्ती प्रथम रोग न्यून करण्यास कार्यरत होते. रोगातील जंतू प्रभावशाली असल्यास प्राणशक्तीला त्यांचा पराभव करणे शक्य न झाल्याने रोगात वाढ होते. रुग्ण साधना करणारा असल्यास त्याची मन:शक्ती जागृत असते. अधिकतर रुग्णांना आजारपणामुळे निर्माण झालेली स्थिती स्वीकारली जात नसते आणि प्रारब्ध भोगून संपवणे साधनेच्या दृष्टीने अधिक योग्य आहे याचे त्यांना ज्ञान नसते. त्यामुळे मंद प्रारब्धामुळे निर्माण झालेले रोग ते मन:शक्तीच्या बळावर दूर करतात. यामुळे त्यांच्याकडे जन्मोजन्मी असलेली साधनारूपी शक्ती व्यय होते. अशा प्रकारे रोग इत्यादी कारणांसाठी साधना व्यय केल्यास जिवाची आध्यात्मिक प्रगती होत नाही आणि अनेकदा आध्यात्मिक अधोगतीही होते. ७१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे ‘विकार प्रारब्धामुळे झालेला आहे कि क्रियमाणामुळे’, हे सहज समजते. तसेच त्या पातळीला जिवाचा मनोलय झालेला असल्याने आणि तो रोगाकडे साक्षीभावाने पहात असल्याने त्याच्या मनात प्रारब्धामुळे झालेला रोग बरा करण्याचे विचार येत नाहीत. ७१ टक्क्यांहून न्यून आध्यात्मिक पातळी असलेल्या जिवांना रोग झाल्यावर त्यांच्या साधनेची हानी होऊ नये, यासाठी आयुर्वेद योजले गेले आहे. आयुर्वेद हा साधनापद्धतीचा एक प्रकार असल्याने त्याच्या पालनाने निर्माण होणारी शक्ती रोग न्यून करण्यासाठी वापरली जाते आणि जीव करत असलेली साधना रोग बरा करण्यासाठी वापरली न जाता जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी वापरली जाते. यामुळे आयुर्वेद उपायपद्धतीने मंद प्रारब्धामुळे झालेले रोग बरे होतात, मध्यम प्रारब्धामुळे झालेल्या रोगांची झळ न्यून होते, तर तीव्र प्रारब्धामुळे निर्माण झालेले रोग भोगण्याची शक्ती मिळून साधनेची हानी होत नाही.

५ आ. आयुर्वेद उपचारपद्धतीमुळे जिवावर वाईट शक्तींचे (सूक्ष्मातील) आक्रमण न्यून प्रमाणात होणे

जीव आजारी झाल्यावर त्याच्या रज-तम गुणांमध्ये वाढ होते, तसेच वाईट शक्तींच्या प्रतिकार करण्याची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक क्षमता न्यून होते. याचा लाभ घेऊन वाईट शक्ती जिवावर आक्रमण करून त्याच्यावर नियंत्रण मिळवतात आणि पुढील अनेक वर्षे त्याचा छळ करत रहातात. मृत्यूच्या वेळीही जिवाची स्थिती कमकुवत झालेली असते. वर्तमान आधुनिक चिकित्सा आणि तंत्रज्ञान पद्धती यांमुळे जिवाची प्राणशक्ती अधिक प्रमाणात अधोगामी होते. प्राणशक्ती अधिक प्रमाणात अधोगामी झाल्यावर देहात विविध टाकाऊ वायूंची निर्मिती होऊन प्राणशक्तीचे प्रमाण उणावून प्राणशक्तीवहन संस्थेत विविध अडथळे निर्माण होतात. यामुळे लिंगदेहाला प्राण सोडून जाणे कठीण होते, तसेच वाईट शक्तींना लिंगदेहावर नियंत्रण मिळवून त्याला लक्षावधी वर्षे दास बनवून ठेवणे शक्य होते. याउलट आयुर्वेद चिकित्सेमुळे जिवाची प्राणशक्ती अधिक प्रमाणात उर्ध्वगामी होते. प्राणशक्ती उर्ध्वगामी झाल्यावर प्राणशक्तीवहन संस्थेत प्राणशक्तीचा प्रवाह कार्यरत राहिल्याने अडथळे निर्माण होत नाही. त्यामुळे मृत्यूसमयी प्राणशक्तीच्या जोरावर लिंगदेहाला देह सोडणे सहज होऊन त्याचे वाईट शक्तींपासून रक्षणही होते.

५ इ. आयुर्वेद उपचारपद्धतीमुळे जिवाची देहबुद्धी न्यून झाल्याने त्याला पुढची गती सहजतेने मिळणे

वर्तमान आधुनिक चिकित्सा आणि तंत्रज्ञान पद्धती यांमुळे जिवाचा देहभाव जागृत रहातो. यामुळे त्याला मृत्यूसमयी देह आणि त्याच्याशी निगडित आसक्ती यांचा त्याग करणे कठीण जाते. याउलट आयुर्वेद उपचारपद्धतीतील प्रार्थना, मंत्र, पथ्य अशा उपचारपद्धतींचा जिवाच्या मनावर परिणाम होऊन तो ईश्‍वरी अनुसंधानात रम्य होत असल्याने जिवाला ‘मी आणि देह वेगळे’ हा भाव निर्माण होऊन देहबुद्धी न्यून होण्यास साहाय्य होते. यामुळे जिवाला मृत्यूसमयी देहात न अडकता पुढची गती मिळणे सहज शक्य होते.

५ ई. आयुर्वेद उपचारपद्धतीमुळे जिवाची आध्यात्मिक उन्नती होण्यास साहाय्य होणे

आयुर्वेद उपचारपद्धतीमुळे रोगग्रस्त भागातही प्राणशक्तीचा संचार होत असतो. त्यामुळे प्रारब्धामुळे देह आजार भोगत असला, तरी वाईट शक्तींना रोगग्रस्त भागावर आक्रमण करून स्थान निर्माण करता येत नाही. आयुर्वेदीय उपचारपद्धतीमुळे देहात प्राणशक्तीचे आवश्यक त्या प्रमाणात उर्ध्व आणि अधो असे दोन्ही प्रकारे संचारण होत असते. उर्ध्वगामी प्राणशक्तीच्या प्रवाहामुळे कुंडलिनीचक्र संवेदनशील होतात. यामुळे जीव आजारी असतांनाही करत असलेल्या साधनेचा परिणाम संबंधित कुंडलिनीचक्रावर झाल्याने त्या चक्राची जागृती होऊन जिवाला आध्यात्मिक उन्नती करणे शक्य होते. यासमवेत अधोगामी प्राणशक्तीच्या प्रवाहामुळे विविध वायूंची निर्मिती होऊन देहाचे कार्य सुरळीत चालण्यास साहाय्य होते. थोडक्यात आयुर्वेद उपचारपद्धतीमुळे जिवाची आध्यात्मिक उन्नती होण्यास साहाय्य होते.

५ उ. निष्कर्ष

आजाररूपी खडतर प्रारब्धातही जिवाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तिन्ही स्तरांवर आधार मिळून त्याची साधना व्यय न होता त्याला आजारपणातही साधना करून आध्यात्मिक उन्नती करता येण्यासाठी ईश्‍वराने आयुर्वेदाचे ज्ञान समष्टीला दिले आहे.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०१८, सकाळी १२.५१)

 

६. विकार प्रारब्धामुळे होत असले, तरी आयुर्वेद का सांगितला आहे ?

वैद्य मेघराज पराडकर

१. ‘अधर्म हेच सर्व विकारांचे मूळ कारण आहे. ‘सत्ययुगामध्ये धर्म त्याच्या सत्य, शौच, तप आणि दान या चारही पादांवर उभा होता. त्या वेळी कोणताही विकार नव्हता. त्रेतायुगात धर्माचा सत्य हा एक पाद न्यून झाला. त्यामुळे अधर्मामुळे विकारांची उत्पत्ती झाली. विकारांमुळे ऋषींच्या साधनेत अडथळा येऊ लागला. हा अडथळा दूर होऊन साधना चांगल्या प्रकारे करता यावी, यासाठी भरद्वाज ऋषींनी इंद्राकडून आयुर्वेद शिकून घेऊन इतर ऋषींना शिकवला.’ (संदर्भ : चरकसंहिता, सूत्रस्थान, अध्याय १) त्यामुळे साधनेतील विकाररूपी अडथळे दूर करण्यासाठीच आयुर्वेद पृथ्वीवर अवतरला आहे.

२. प्रारब्ध भोगावेच लागते; पण साधनेने त्याची तीव्रता अल्प करता येते. यासाठी आयुर्वेदात ‘दैवव्यपाश्रय चिकित्सा’ सांगितली आहे. ‘दैवव्यपाश्रय चिकित्सा’ म्हणजे ‘नामजप, मंत्र, नियम, प्रायश्‍चित्त, यज्ञ, शांती आदी साधना.’

३. सर्वच विकार प्रारब्धामुळे नसतात. काही विकार क्रियमाणामुळेही होतात. हे विकार योग्य क्रियमाणाने टाळता यावेत किंवा झालेले विकार बरे व्हावेत, यासाठी आयुर्वेद आहे.

४. या जन्मातील क्रियमाण म्हणजे पुढील जन्मातील प्रारब्ध. त्यामुळे या जन्मात क्रियमाण चुकू नये आणि पुढील जन्मी प्रारब्धाची झळ बसू नये, यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०१८)

 

७. आजाराचे मूळ कारण शोधून उपचार सांगणारा आयुर्वेद !

आधुनिक वैद्यकशास्त्र आयुर्वेद
१. औषधांचा परिणाम औषधें रासायनिक आणि कृत्रिम असल्यामुळे अधिक काळ सेवन करीत राहिले, तर शरीरातील अवयव निकामी होणे. यात वापरण्यात येणाऱ्या वनस्पतींचे मानवी शरीराशी साधर्म्य असल्यामुळे कोणताही दुष्परिणाम न होता  शरीर पूर्णपणे त्याचे पचन करू शकणे.
२. औषधांचा परिणाम कशावर होतो भौतिक शरीर शरीर आणि मन
३. चिकित्सा करण्याची पद्धत केवळ लक्षणानुसार चिकित्सा केली जाते आयुर्वेद हा उपवेद असल्याने आजाराच्या  वात, पित्त, कफ प्रधान प्रकृतीनुसार मूळ कारणावर उपाय करून स्वास्थ्य प्रस्थापित करता येते.
४. अधिदैविक चिकित्सा, तसेच ग्रहबाधेवरील चिकित्सा नसणे असणे
५. ‘गर्भधारणेपूर्वीच स्त्री बीज तथा पुरुष बीज सारवान (उत्तम प्रतीचे) व्हावे ‘ यासाठीची चिकित्सा नसणे ‘प्रजोत्पादनाने भावी पिढी सुदृढ बनविण्यासाठी गर्भधारणेपूर्वीच स्त्री बीज तथा पुरुष बीज सारवान व्हावे, तसेच गर्भ धारणा झाल्यानंतर मासानुमासिक काढ्याने गर्भाचे पोषण उत्तम होऊन गर्भ सुदृढ व्हावा,’ यासाठी उपाय योजना सांगितली आहे.

८. आयुर्वेदाला विसरून स्वत:ची आणि देशाची हानी करणारे भारतीय !

आपल्याकडील स्वदेशी औषधी म्हणजे आयुर्वेद ! निसर्गाने मुक्त हस्ते उधळलेला, बहाल केलेला अनमोल खजिना ! आयुर्वेदातील औषधे मंत्रांवर आधारित आहेत. आपल्या ऋषिमुनींनी खोलवर अभ्यास करून, खडतर तपश्‍चर्या, म्हणजेच साधना करून मंत्र सिद्ध करून घेतले आणि आम्हाला किती मोलाचा हा खजिना दिला आहे.

(संस्कृती दर्शन : वैद्य सुविनय दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग.)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment