गुरु प.पू. देवेंद्रनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार आध्यात्मिक कार्य करणारे नगर येथील संतरत्न पू. (प्रा.) अशोक नेवासकर !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी सतत प्रार्थना अन् अन्य आध्यात्मिक उपाय करणार्‍या अनेक संतांपैकी एक संतरत्न म्हणजे नगर येथील संत पू. अशोक नेवासकर होय. विशेष म्हणजे पू. नेवासकर यांच्या माध्यमातून त्यांचे गुरु प.पू. देवेंद्रनाथ महाराज हेच कार्य करतात, याची प्रचीती वेळोवेळी येते. पू. नेवासकर यांच्या माध्यमातून प.पू. देवेंद्रनाथ महाराज यांचे आशीर्वाद सनातनच्या कार्याला आणि साधकांना लाभले आहेत. त्यांना सनातन आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी पुष्कळ प्रेम आहे. त्यांचेे सनातनच्या कार्याकडे पुष्कळ लक्ष असते. सनातनचे कार्य जसजसे वाढत आहे, तसतसे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे कार्यही वाढत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्पच आता मूर्त रूपात साकारतांना दिसत आहे.
सनातनच्या कार्यात काही अडथळे किंवा विघ्न निर्माण झाल्यास पू. नेवासकरकाकांना कोणीही न सांगता आधीच सूक्ष्मातून समजते आणि ते हे अडथळे दूर होण्यासाठी स्वतःहून प्रार्थना किंवा अन्य आध्यात्मिक विधी करतात. त्यांच्या संदर्भात पुढील लेख प्रसिद्ध करत आहोत.
पू. (प्रा.) अशोक नेवासकर

 

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आध्यात्मिक कार्यासाठी श्रीलंकेला
निघण्यापूर्वी त्यांना पू. नेवासकरकाका यांनी सांगितलेले आध्यात्मिक उपाय !

‘३.१०.२०१८ या दिवशी मी आध्यात्मिक कार्यासाठी चेन्नई येथून श्रीलंका दौर्‍यावर जाणार असल्याचे पू. नेवासकरकाकांना आधीच सूक्ष्मातून त्यांचे गुरु प.पू. देवेंद्रनाथ महाराज यांच्या माध्यमातून समजले. या कार्यात कोणतेही अडथळे येऊ नयेत आणि कार्य निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी त्यांनी मला भ्रमणभाषवरून संपर्क करून श्रीलंकेला निघण्यापूर्वी आणि तेथे पोहोचल्यानंतर पुढीलप्रमाणे आध्यात्मिक उपाय करण्यास सांगितले.

१. स्वत: भोवती आणि साधकांभोवती ‘रक्षाकंकण’ निर्माण करणे

श्रीलंकेला निघतांना देवाला प्रार्थना करावी. त्यामुळे माझ्याभोवती आणि माझ्यासमवेत असणार्‍या साधकांभोवती ‘रक्षाकंकण’ (कंकणासारखे संरक्षककवच) निर्माण होईल. तिथे पोहोचल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करावी. चेन्नई येथून श्रीलंकेला निघतांनाच कोलंबो येथील ग्रामदेवता, स्थानदेवता आणि वास्तूदेवता यांना स्वतःचे रक्षण होण्यासाठी अन् कार्यात कोणतीही बाधा न येण्यासाठी प्रार्थना करावी आणि कोलंबो येथे पोहोचल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करावी, त्याचप्रमाणे वातावरणातील दिव्यात्म्यांनाही प्रार्थना करावी, म्हणजे त्यांचे आशीर्वाद लाभतील.

२. मंत्राक्षता किंवा भस्म यांमुळे साधकांभोवती संरक्षककवच निर्माण होणार असल्याचे सांगणे

हातामध्ये अक्षता किंवा भस्म घेऊन देवाला प्रार्थना करावी. त्यामुळे त्या अक्षता भारित होतात. या मंत्राक्षतांमुळे किंवा भस्मामुळे आमच्याभोवती संरक्षककवच निर्माण होऊन आमचे रक्षण होईल. (सनातनच्या कार्यातील अडथळे दूर होण्यासाठी पू. नेवासकरकाका मंत्राक्षता भारित करून आम्हाला देतात. त्यांनी यज्ञाच्या वेळी, तसेच अन्य वेळीही मंत्राक्षता भारित करून दिल्या आहेत.)

३. अन्नातून विषबाधा न होण्यासाठी महाप्रसाद ग्रहण करतांना अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करणे

महाप्रसाद ग्रहण करतांना अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करावी. त्यामुळे अन्नातून विषबाधा होणार नाही, तसेच त्यातून कार्य करण्यासाठी चैतन्य आणि शक्ती मिळेल.

४. कुठेही जायला निघतांना प.पू. देवेंद्रनाथांचा आदेश
घेऊन (म्हणजे त्यांना सांगून किंवा त्यांचा आशीर्वाद घेऊन) निघा.

(साधकांच्या रक्षणासाठी वरील आध्यात्मिक उपायांसह दिवसातून एकदा पंचमुखी हनुमानकवच वाचावे, असेही पू. नेवासकरकाका यांनी सांगितले आहे.)

कृतज्ञता !

कार्याची कुठेही वाच्यता न करता साहाय्य करणारे पू. नेवासकरकाका यांच्यासारखे संतरत्न आम्हाला लाभले आहेत. पू. नेवासकरकाकांच्या माध्यमातून सनातन संस्था आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय यांच्या कार्याला प्रत्यक्ष नवनाथांचेच आशीर्वाद लाभले असून त्यांच्या आशीर्वादामुळेच हे कार्य अनेक पटींनी वृद्धींगत होत आहे. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे’, यांसाठी आशीर्वादरूपी कवच देणारे प.पू. देवेंद्रनाथ महाराज आणि त्यांचे शिष्य पू. अशोक नेवासकर यांच्या चरणी सनातन अन् महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय परिवारांतील साधक कोटी कोटी कृतज्ञ आहेत ! अशा संतांच्या आशीर्वादामुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे, हे निश्‍चित ! ‘सर्व साधकांवर आपली अशीच अखंड कृपादृष्टी राहो’, हीच पू. नेवासकरकाका यांच्या चरणी प्रार्थना !’

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय (२.१०.२०१८)

 

अध्ययन, अध्यापन आणि संशोधन हा जीवनाधार असलेले
नाथ संप्रदायाचे गाढे अभ्यासक नगर येथील पू. (प्रा.) अशोक नेवासकर !

१. पू. (प्रा.) नेवासकर यांचे ज्ञानसंपन्न जीवन

१ अ. प्राचीन नागरी जीवन, परंपरा, तसेच सांस्कृतिक वैशिष्ट्ये यांचा सखोल अभ्यास !

प्रा. नेवासकरकाका यांनी ‘इतिहास’ आणि ‘पुरातत्वशास्त्र’ या विषयांत एम्.ए. ही पदवी प्राप्त केली आहे. मूळचे नगर येथील असलेले प्रा. नेवासकर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होताच डेक्कन कॉलेज, पुणे येथे पुरातत्व विभागात संशोधन करू लागले.

१ आ. इतिहासाच्या विविध कालखंडावर विपुल लेखन !

पू. (प्रा.) नेवासकर यांनी इतिहासाच्या विविध कालखंडावर विपुल लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांना ‘संदर्भग्रंथ’ म्हणून पुणे विद्यापिठाने मान्यता दिली आहे.

१ इ. नगर जिल्ह्यातील अनेक गावांतील उत्खननासाठी मार्गदर्शन !

त्यांना अनेक ठिकाणी संशोधन, उत्खनन, शिलालेखांचा अभ्यास, भूर्जपत्रांचे वाचन करण्याची संधी मिळाली. नगर जिल्ह्यातील इनामगाव, नेवासे, तसेच पैठण येथील उत्खननात ते सहभागी झाले होते. इतिहासाच्या अभ्यासाची ती जिवंत अनुभूती होती. या उत्खननात सापडलेल्या अनेक दुर्मिळ वस्तू नगरच्या ऐतिहासिक वस्तूसंग्रहालयात पहावयास मिळतात.

 

२. नाथ संप्रदायाच्या अभ्यासाला आरंभ !

२ अ. सद्गुरु देवेंद्रनाथ यांची प्रथम भेट !

‘पू. नेवासकरकाकांचा पिंड संशोधक वृत्तीचा आहे. आरंभी ‘नवनाथांच्या जन्मकथा भाकडकथा आहेत’, असे ते म्हणायचे. एकदा पत्नीच्या आग्रहामुळे ते नाथभक्त असलेल्या श्री देवेंद्रनाथ (पूर्वाश्रमीचे श्री. विजयकुमार सुळे, जे स्वतः अभियंता (इंजीनियर) आणि वास्तूविशारद (आर्क्टिटेक्ट) होते. त्यांना त्यांचे गुरु राघवेंद्रस्वामी यांनी सूक्ष्मातून ‘देवेंद्रनाथ’ या नावाने दीक्षा दिली.) त्यांचे नाथांवरचे प्रवचन ऐकतांनाच प्रा. नेवासकर यांच्या सगळ्या शंकांचे निरसन होऊन ते नाथमय झाले आणि नाथ संप्रदायाचा अभ्यास, संशोधन अन् प्रचार-प्रसार यांचे पुरस्कर्तेच बनले.

२ आ. अलौकिक शक्ती प्राप्त झालेले सद्गुरु देवेंद्रनाथ आणि त्यांच्या
सहवासाने नेवासकरकाकांच्या इतिहास संशोधनाला मिळालेली चालना !

नेवासकरकाकांना सद्गुरूंचा लाभ आणि सहवास मिळाला. श्री देवेंद्रनाथ यांच्या घराण्यात ७० वर्षांपासून पूर्वापार चालत आलेली नाथभक्ती होती. त्यांची आई मच्छिंद्रनाथांची उपासक असल्याने बालपणापासूनच त्यांना नाथपंथाचे आकर्षण होते. गृहस्थाश्रमी असूनही त्यांची निस्सीम गुरुभक्ती, नाथांची कृपा आणि नाथांची निष्काम सेवा यांमुळे त्यांना अलौकिक शक्ती प्राप्त झाली. नवनाथांच्या सर्व विद्या, सामर्थ्य आणि हठयोगासारखी उच्च योगसाधना त्यांना प्राप्त झाली होती. गुरुपौर्णिमा आणि ‘धर्मनाथांची बीज’ या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या दिवशी त्यांच्यात कानिफनाथांचा संचार होऊन त्यांच्या मुखातून नाथवाणी ऐकायला मिळे. अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधींनी पीडित लोकांवर श्री देवेंद्रनाथांनी योगिक उपचार केले अन् त्यांना व्याधीमुक्त केले.

त्यांच्या सत्संगामुळे नेवासकरकाकांना पुढील इतिहास संशोधनाला चालना मिळाली. ते श्री देवेंद्रनाथ यांच्यासह वर्ष १९७३ ते १९८२ अशी १० वर्षे नाथ संप्रदायाचा अभ्यास, संशोधन, प्रचार-प्रसार आदींसाठी भ्रमंती करत होते. त्यांनी ‘अलख निरंजन’ हे नाथ संप्रदायाचे वार्षिक चालू केले. त्यात त्यांचे आणि श्री देवेंद्रनाथ यांचेही संशोधनात्मक लेख प्रसिद्ध होऊ लागले. नेवासकरकाकांनी देवेंद्रनाथांच्या प्रवचनांचे संकलन करून ‘सद्गुरु सत्संगातील अमृतानुभव’, ‘सिद्ध श्री देवेंद्रनाथ कार्य आणि साधना’ हे ग्रंथ लिहिले. नगर येथील मार्कंडेय मंदिरातील नाथ संप्रदाय प्रणित द्वैत-अद्वैत पिठाच्या स्थापनेमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

३. ‘संशोधक’ म्हणून कार्य करतांनाच संतपदही प्राप्त करणे

पू. नेवासकरकाका डेक्कन कॉलेज, पुणे येथे पुरातत्व विभागामध्ये ‘संशोधक’पदावर कार्यरत होते. संत गोरा कुंभाराच्या ‘तेर’ या गावी (जिल्हा धाराशिव, महाराष्ट्र) त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन झाले आहे. पुरातत्त्व खात्यामध्ये ‘संशोधक’ या मोठ्या पदावर राहून, तसेच ‘व्याख्याते’ म्हणून कार्य करून सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने अध्यात्मात प्रगती करणे आणि संतपद प्राप्त करणे, असे उदाहरण विरळाच आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment